भिडे गुरुजी, आम्ही “#डू” आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
स्वातंत्र्योत्तर काळात, महाराष्ट्रात लोकांच्या मनावर प्रचंड मोठं गारुड घालणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. पण त्यातल्या त्यात जीव ओवाळून टाकतील असे समर्थक फार कमी जणांना उभे करता आले. बाळासाहेब ठाकरे हे अश्या प्रकारचे नेते होते. मराठीच्या मुद्द्यावर उभी राहिलेली शिवसेना काही वर्षांत हिंदुत्ववादी झाली आणि बाळासाहेबांचा करिश्मा चरमसीमेवर जाऊन पोहोचला.
बाळासाहेबांना असे कट्टर समर्थक उभे करता येण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. तत्कालीन राजकीय परिस्थिती वगैरे ‘बाहेरील’ काही फॅक्टर्स जसे होते तसेच खुद्द बाळासाहेबांनी खुबीने उभी केलेली स्वतःची आणि सेनेची प्रतिमदेखील फार मोठा फॅक्टर होती.
बाळासाहेबांच्या “एक घाव दोन तुकडे” बाण्याकडे तरुण असलेला, आक्रमक मनोवृत्तीचा व न्यूनगंड अथवा अन्यायाच्या भावनेने पछाडलेला कोणताही माणूस आकृष्ट होणं अगदी स्वाभाविक होतं. त्यांची समोरच्याला एका ठोक्यात शत्रू की मित्र ठरवण्याची साधी सरळसोट मांडणी लोकांना आवडून जायची.
जगभरात मोठ्या समुदायावर गारुड घालणाऱ्या बहुतेक “नायक” मंडळींची हीच खासियत असते. जनतेला त्यांच्या सर्व अडचणींसाठी अमुक एक कुणीतरी वा अमुक एक खास समूह जबाबदार आहे असं सांगून खुद्द जनतेची स्वतःची जबाबदारी उडवून लावायची, त्या जबाबदार व्यक्तीस/समूहास सतत शिव्या घालत रहायच्या हा एक सोपा परंतु आकर्षक मार्ग आपापल्या पंथीयांना दिला की अर्ध काम होऊन जातं.
संभाजी भिडे गुरुजींचा काही ठराविक लोकांवर “राग” आहे तो अशाच प्रकारचा.
सांगली-सातारा-कोल्हापूर पट्ट्यात हजारो “धारकरी” तयार करणाऱ्या भिडे गुरुजींच्या निस्सीम शिवभक्तीची कित्येक उदाहरणं सापडतील. प्रतिष्ठानचा प्रत्येक धारकरी त्यांच्यासाठी जीव द्यायला एका पायावर तयार असेल तो उगाच नाहीच. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला चप्पल नं लावण्याचं व्रत असो वा ह्या वयात आपल्या धारकाऱ्यांबरोबर गड चढून जाणं असो, गुरुजींनी शिवभक्ती “जगली” आहे, अजूनही जगताहेत असं कुणालाही वाटेलच.
परंतु ह्या सर्वात गुरुजींनी त्यांच्या वचन-वर्तनातून दाखवलेली वैचारिक दिशा कशी आहे हे बघताना वरील उदाहरणांच्या पलीकडे जाऊन बघावं लागेल.
मुस्लिम समूह हा शिवप्रतिष्ठानचा “नैसर्गिक शत्रू” आहे. छत्रपतींनी खरंच मुस्लिम द्वेष केला का, मुस्लिम वाईट ठरवून मुस्लिम कट्टरवाद सुटणार आहे का, मुळात असा द्वेष करणं योग्य आहे का ह्या प्रश्नांना भिडण्याचा आपला विषय नाही. गुरुजींच्या शत्रूच्या यादीत मुस्लिम पहिले, एवढं लक्षात घेऊन पुढे जाऊ या.
मिशनरी, अर्थात दुसरे शत्रू आहेत. हेसुद्धा योग्य-अयोग्य वगैरे बाजूला ठेवूया.
देशाचे तिसरे शत्रू, according to भिडे गुरुजी, म्हणजे “सुशिक्षित “xडू” हिंदू लोक”.
हे लोक “xडू” असतात. नेभळट असतात. ह्यांना स्वतःच्या संस्कृती, धर्म, देशाचा अभिमान नसतो. त्यांच्यामुळेच देशासमोर अनेक समस्या उभ्या राहिलेल्या असतात. मुस्लिम प्रश्न, मिशनर्यांनी चालवलेली धर्म परिवर्तन मोहीम असे प्रश्न “xडू” सुशिक्षित लोकांमुळे मोठे झालेले असतात.
म्हणून मग भिडे गुरुजींना – “पाकिस्तान हा खरा शत्रू नाही. खरा शत्रू देशातील सुशिक्षित लोक आहेत!” असं म्हणावंसं वाटतं.
खरंतर ह्या मांडणीत फारसं वेगळं काही नाही. आधी म्हटल्याप्रमाणे, अनेक लोकप्रिय नेत्यांनी केलेली ही मांडणी आहे ही. आहे रे विरुद्ध नाही रे, अभिजन विरुद्ध बहुजन, देशभक्त विरुद्ध “खांग्रेसी”, धर्मनिरपेक्ष विरुद्ध “मोदी भक्त”…अश्या वेगवेगळ्या वेष्टनांत तेच तेच प्रॉडक्ट नेहेमीच विविध भक्तांना विकलं जातं. सरळसोट शत्रू ठरवला की काम सोपं होतं, म्हणून.
भिडे गुरुजींना मुस्लिम आणि ख्रिश्चनांनंतर “आपले हिंदू सुशिक्षित लोक” शत्रू का वाटतात, ह्या मागे ह्याच सरळसोट शत्रू ठरविण्याच्या मानसिकतेचा भाग आहे. आणि त्यामागे गुरुजींचं कारण देखील “व्हॅलीड” आहे.
गुरुजींना सुशिक्षित लोक नं आवडणं अगदी स्वाभाविक आहे.
कारण व्यवस्थित शिकलेले “धारकरी”, गुरुजींच्या मागे धावतील, उभे राहतील असे “भक्त” एकूण लोकसंख्येसमोर नगण्य आहे. गुरुजींनी जो र्हेटोरिक रुजवण्यास घेतला आहे, त्याला उचलून धरणाऱ्यांमध्ये सुशिक्षित लोक कमीच असणार आहेत.
गुरुजींचा र्हेटोरिक, त्यांच्याच शब्दांत, हा असा आहे :
‘छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी भारत देश हिंदवी स्वराज्याच्या कवेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतरही हे कार्य मावळ्यांनी पुढे सुरू ठेवले. अटकेपार झेंडे लावले. १४ वर्षे दिल्लीवर भगव्या झेंड्याने राज्य केले. पण आज हिंदू समाज मरगळला आहे. देशाला चीन वा पाकिस्तान या शत्रूंपेक्षा सुशिक्षित हिंदूंचा जास्त धोका आहे’,
मटा च्या बातमीनुसार –
रायगडावरील प्रस्तावित सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी धारकरी नेमले जाणार असून, सध्या त्यांच्या हातात काठ्या दिल्या जाणार आहेत. पण भविष्यात त्यांना हातात तलवारी घेण्याची गरज भासणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खरी गोम इथे आहे.
बहुतांश हिंदू समाज शिकणारा, किंवा शिकायची इच्छा असणारा आहे. डोक्यात राख घालून घेणारा नाहीये. कोणत्याही समस्येवर, तलवारी तर राहूच द्या, हातात लाठ्या काठ्या घेणं हे समाधान नाही, हे मनापासून पटणारा आहे. हिंदू हा विविध पुरोगामी (खऱ्या अर्थाने) विचार जमेल तसे पचवत, रिचवत, आत्मसात करत पुढे जाणारा समाज आहे. लोकशाही हवी असणारा समूह आहे. मुस्लिम प्रश्न जाणवतो पण त्यावर मुस्लिमांना सतत लांडे म्हणणे, त्यांचा द्वेष करणे वगैरे हिंदूंना आवडत, पटत नाही.
बहुतांश हिंदूंना मतभेद-अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे. मानवनिर्मित घटना मान्य आहे. लोकशाहीने निर्माण केलेल्या यंत्रणा मान्य आहेत. ह्या यंत्रणांधील दोष दिसतात, ते जावेत असंही वाटतं – पण, लोकशाही यंत्रणांमध्ये दोष आहेत म्हणून ती फेकून देऊन हुकूमशाही आणूया, असं बहुतांश हिंदूंना वाटत नाही.
हेच दुःख आहे. इथेच दुखणं आहे.
गुरुजीच नाही, कट्टर हिंदुत्व रुजण्या-रुजवण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच, म्हणूनच, बऱ्यापैकी सभ्य, शांत, सहिष्णू असलेला बहुसंख्य हिंदू नेभळट, पुळचट वाटतो. त्यांने चिडून, पेटून उठावं असं वाटतं. पण पेटून उठून आपल्या देशाची राखरांगोळी करण्यास हिंदू नकार देतो. आणि म्हणून तो भिडे गुरुजींना “x डू” वाटतो.
जर हे असं असणं म्हणजे “x डू” असणं असेल, तर, भिडे गुरुजी, तुमचा पूर्ण आदर राखून हे म्हणावंसं वाटतं – हे असं “x डू” असण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
ज्या ज्या मूळ प्रश्नांवर आपण काम करत आहात – गड किल्ले संवर्धन ते थेट इस्लाम प्रश्न – त्यावर जेव्हा केव्हा कायमस्वरूपी सकारात्मक समाधान निघेल, ते अश्या “x डू” लोकांकडूनच आलेलं असणार आहे.
आज भारतात दलित असोत वा महिला, जेवढ्या तोडक्या मोडक्या मुक्त वातावरणात जगत आहेत, ते अश्याच “सुशिक्षित” डॉ आंबेडकर नावाच्या माणसाने लिहिलेल्या, मानवनिर्मित घटनेच्या बळावरच. भारतात येणारा फॉरेन एक्स्चेंज असो वा भारतातून एक्स्पोर्ट होणारी आयटी सर्व्हिस असो – सर्वकाही “x डू” लोकांमुळेच शक्य होतंय.
अशिक्षित असणं पाप नव्हे. अशिक्षित असणारे शिकलेल्या लोकांपेक्षा “कमी” असतात असंही नव्हे. अशिक्षित लोकही कर्तृत्ववान असतात, सभ्य असतात, सुसंकृत असतातच. त्याचवेळी, त्यांच्यातही व्यक्तिपरत्वे काही दोष असू शकतात. असेच गुण दोष शिक्षितांचेही असतील. आहेत. पण लोकशाहीवादी, सहिष्णू, पुरोगामी (खऱ्या अर्थाने!) असणं – हे ते दोष नव्हेत. हे भारतीय हिंदूंचे लखलखीत सद्गुण आहेत.
आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.