' शहरी नक्षलवादाला हरवणायसाठी “दुसऱ्या चळवळीची गरज” – InMarathi

शहरी नक्षलवादाला हरवणायसाठी “दुसऱ्या चळवळीची गरज”

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : अहमद शेख

===

काल पासून घरी बसल्या बसल्या वृत्तवाहिन्यांवरून अनेक बातम्या पाहतोय. त्यातली सर्वात महत्वाची बातमी म्हणजे काल देशभरातून पकडले गेलेले नक्षल समर्थक आणि माओवाद्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते. चार वेगवेगळ्या ठिकाणांहून या पाच जणांना अटक केलीय. त्यामध्ये मुंबईतला दलित पँथरचा संस्थापक सदस्य सुधीर ढवळे हा म्होरक्या.

हे पाच जण किती “महान” आहेत किंवा त्यांचा इतिहास काय हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. सगळ्या माध्यमांनी त्यांना कोळून पिण्याचं काम केलंय. आपला मुद्दा थोडासा वेगळा आहे.

naxalites arrested in koregao bhima riot case inmarathi

 

तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्य लोकांना हे कळणं थोडं अवघड आहे की हे लोक नेमके कोण आहेत. पण त्यांना एल्गार परिषद ठाऊक आहे आणि माध्यमांच्याद्वारे त्यांना एवढंच कळतंय की हे लोक म्हणजे एल्गार परिषदेचे आयोजक होते.

एल्गार परिषदेत भाषणं झाली, भले ती थोडीशी असतील प्रक्षोभक. गाणी झाली, सांस्कृतिक कार्यक्रम झाले मग हे चूक कसं काय? असाच प्रश्न शीतल साठे आणि सचिन माळीबद्दल लोकांना नेहमीच पडायचा.

आणि माध्यमांनी सुध्दा सचिन आणि शीतल यांना कलाकारांच्या चष्म्यातून पाहिलं आणि डोक्यावर घेतलं. परिणामी त्यांना विरोध करणारी, त्यांचे नक्षलवादाशी संपर्क असणाऱ्या गोष्टी उजेडात आणणारी समाजातील काही मंडळी, संघटना, संस्था ह्या जनमानसात बदनाम झाल्या.

“कलाकारांना केवळ कलाकारांच्याच नजरेनं पाहा” अशी बीजे पेरणारी मंडळी दुर्दैवानं माध्यम क्षेत्रात ठासून भरलेली आहेत. उद्या कदाचित सुधीर ढवळे आणि मंडळींबद्दल त्यांच्या त्यागाचे, घरच्या परिस्थितीचे, त्यांच्या समाजभानाचे रिपोर्टस समोर येतील.

एल्गार परिषदेमधली भाषणं आणि सादरीकरण म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग होता, ज्याला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही अशा वावड्या उठतील. आणि सबळ पुराव्याआभावी हे लोक पुन्हा देशद्रोही कारवायांमध्ये सक्रीय होतील. आणि ज्यांनी त्यांच्याविरूध्द बोलण्याचं संशोधन करण्याचं धाडस दाखवलं अशी पुण्यातली आणि मुंबईतली मंडळी आणि संस्था ह्या पुन्हा बदनाम होतील.

कला क्षेत्राला हाताशी धरून सहानुभूती घेत ही मंडळी नेहमची आपल्या कारवाया सक्रीयपणे राबवत असतात. यांना सहानुभूती मिळते ती समाजातील तथाकथित प्रेक्षकांची, गावखेड्यातल्या अशिक्षित गोरगरीब जनतेची. त्यात भरीस भर म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमे हे नेहमी या लोकांना निर्दोष सिध्द करण्यासाठी करत असलेले प्रयत्न.

माझा लिहीण्याचा मुख्य कल आहे तो म्हणजे कला क्षेत्रातून अर्बन नक्सलीजम महाराष्ट्रात पसरवण्याच्या पध्दतींची रोकथाम कशाप्रकारे करता येईल यावर उहापोह करण्याचा.

लोककला, लोकगीते, पथनाट्य, मंचीय नाटके ते थेट सिनेमापर्यंत ही मंडळी समाजात नक्षलवादाच्या समर्थनाचं स्लो पॉईझीनींग करत असतात. पूर्वी त्याचा सरळ सरळ प्रभाव जाणवत नसायचा. परंतु शीतल आणि सचिनसारखे तरूण त्यांच्या जाळ्यात ओढले जायचे आणि मग ते चळवळीसाठी सर्व आयुष्य वाहून घेण्याच्या आणाभाका घ्यायचे. परंतु एल्गार परिषदेनं मात्र सरळ सरळ त्यांचे मनसुबे दाखवून दिले आहेत.

 

naxal songs inmarathi

 

याचा अर्थ आपण असा घ्यायचा का – की – “नक्षलवादाची ताकद आता केवळ छुप्या पध्दतीची राहीली नसून ती इतकी वाढलीय की सरळ सरळ गृहयुध्द करण्याची देखील त्यांची तयारी असावी” ? हे विधान जेवढं धाडसी आहे तेवढंच सत्य असण्याची शक्यता ही सद्य परिस्थितीवरून जाणवते यात शंका नाही.

अर्बन नक्सलीजमची ताकद वाढणे ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा आहे हे वारंवार सांगणारी आणि संशोधन करणारी मंडळीही समाजात आहे. कदाचित त्यांच्या या संशोधनामुळेच गुप्तचर विभागाला बरीच मदतही होत असेल.

आता राहिला मुद्दा “उत्तर द्यायचा”.

त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना, गाण्यांना, नाटकांना तोडफोडीनं नव्हे तर त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. समाजात तळागाळात जाऊन हा देश किती महान आहे.

हजारो वर्षांपासून इथल्या मातीनं जे आमच्यावर उपकार केलेत ते कोणत्याही मार्क्सचं अनुकरण करून, किंवा माओ, शे यांसारख्या विखारी क्रांती करून फिटणारे नाहीत. बुध्दाचा साम्यवाद आणि बुध्दच या राष्ट्रासाठी कसा श्रेष्ठ आहे, हे ज्यावेळेस समजेल आणि त्याच्या अनुकरणातून जेव्हा हा देश खऱ्या समरसतेकडे, बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या समतेच्या दिशेने वाटचाल करेल तेंव्हा या मातीचे उपकार फिटतील.

कलेसारख्या प्रभावी माध्यमातून जनजागृती महत्वाची आहे. कारण जोपर्यंत या लोकांना जनतेची सहानुभूती आहे तोपर्यंत कुठलेही सरकार यांना हद्दपार करू शकणार नाही. जंगलात या लोकांनी सर्वसामान्य आदिवासींच्या घरांची ढाल केली आणि हे लोक सुरक्षितपणे कारवाया करत राहिले . हेच अर्बन नक्षलवादी आज कलेच्या माध्यमातून शहरांतील लोकांच्या मेंदूचा आणि मनाचा ढाल म्हणून वापर करतायत. म्हणून आता या लढाईमध्ये, आपल्या शस्त्रांमध्ये देखील बदल केला पाहिजे.

एक चळवळ उभी राहतेय विचारवंतांची. आता दुसऱ्या चळवळीची गरज आहे आणि ती चळवळ म्हणजे कलाकारांची.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?