' ….अन तो शेवटचा ‘नमस्कार’ ठरला ! – InMarathi

….अन तो शेवटचा ‘नमस्कार’ ठरला !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : रामदास कराड

===

त्या दिवशी सकाळी मी झोपेतच होतो. ८ / ८:३० वाजले असतील. फोनवर फोन येत होते पण माझा मोबाईल सायलेंट मोडवर होता. त्यामुळं तिकडं लक्ष नाही गेलं. नेहमी प्रमाणे वडील सकाळी लवकरच घरा बाहेर पडले होते. बाहेर लोकं काहीतरी चर्चा करत TV पहा असं म्हणत होते वडिलांना. परत वडील घाईघाईने घरी आले. आईला विचारलं हा उठला नाही का..? अजून ! आणि रिमोट हाती घेत TV चालू केला.

कोणतंही चॅनल लावलं तरी बातमी ती एकच चालू होती. बाहेर लोकं चर्चा करत असलेली माहिती खरी होतीच ते पाहून वडील माझ्या रूममध्ये आले, पुढे केलेला माझ्या रूमचा दरवाजा जोरात ढकलून मला म्हणाले ‘आर्रर्रर्ररे.. उठ.. मोठे ‘साहेब’ गेले !

मी गाढ झोपेतून काय..? म्हणून जागा झालो अन वडिलांना म्हणालो काहीही म्हणू नका उगाच ! एवढ्या सकाळी ! असं कसं आज येणार आहेत मोठे साहेब परळीला ! TV बघ बातम्या चालू आहेत..!

ताडकन उठलो अन हॉलमध्ये TV समोर येऊन बातमी पाहू लागलो. दिल्ली निवासस्थानाकडुन एअरपोर्ट कडे जाताना मोठ्या साहेबांच्या गाडीला अपघात झाला ! ..अन त्या अपघातात मोठे साहेब गेले ! ती बातमी पाहून माझी मती गुंग झाली. एखाद्याने झोपेतच डोक्यात ‘दगड’ घालावा अशी ती भावना होती. नव्या नवरी सारखं कितीतरी नवलाईनं सगळं परळी शहर नटलं होतं, हयातभर अहोरात्र ‘संघर्ष’ केलेल्या लोकनेत्यानं मोठं मंत्री पद आपल्या कर्तृत्वानं पटकावलं होतं.

 

gopinath-munde-inmarathi
patrika.com

आख्या परळी शहरा बरोबर तालुका, बीड जिल्हा, मराठवाडा आणि महाराष्ट्राला केवढा मोठा ‘आनंद’ झाला होता. त्या आनंदापुढं जणू गगन ठेंगनं पडलं होतं. अन मधेच हे विपरीत घडलं होतं ! नियतीने नवाच डाव मांडून कोणी स्वप्नातही विचार न केलेला नवा अध्याय सुरू केला होता. दूर.. दूर.. फारच दूररर.. मोठे साहेब सर्वांना माघे टाकून एकटेच निघून गेले होते..

नेटकाच २६ मे ला मोठ्या साहेबांचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडलेला. आणि आज ३ जूनला परळीचा हा ‘भूमिपुत्र’ आपल्या कर्मभूमीत आपल्या माणसांचं स्वागत, आदर, सत्कार स्वीकारायला परळीत येणार होता.

पण नियतीने पुढं वेगळंच वाढून ठेवलं होतं, स्वागत समारंभाला येणाऱ्या लोकांना काय माहीत होतं की पुढं मोठ्या साहेबांच्या अंत्यविधीला आपल्याला जावं लागेल.? ‘सामान्य माणसाचा वाली’ असणाऱ्या मोठ्या साहेबांवर काळाने घाला घातला होता. मोठ मोठ्या संकटांना आपल्या कार्य-कर्तुत्वाने हरवणारे ‘साहेब’ काळापुढं माञ हरले होते. नियतीने आपला डाव साधून सामान्य माणसाची जणू क्रूर चेष्टाचं लावली होती. हा सारा थरारक प्रसंग हृदयपिळवटून हादरवून टाकणारा होता..

 

gopinath-inmarathi
india.com

मोठ्या साहेबांच्या घराजवळील परिसरातच मी राहतो. तसं मोठ्या साहेबांना जवळून अनेकदा पाहिलंय पण व्यक्तिशः नावानिशी माझा साहेबांशी कधी परिचय नव्हता झालेला. “मोठा आणि मोठ्या मनाचा “माणूस” एवढीच साहेबांबद्दल मला ओळख. मोठ्या साहेबांची माझी कधी, कोठे अन कशी गाट-भेट घडली ते सारं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं होतं. तो प्रसंग मी आठवू लागलो. त्यातील एक प्रसंग असाच आजही कायम माझ्या मनात घर करून आहे.

साहेबांच्या घराकडून मेनरोडला येताना एक कॉर्नर आहे, तिथं एकदा ट्राफिक जॅम झाली होती. एक साईड गाड्यांनी फुल्ल जॅम. दुसऱ्या बाजूने लोकं टू व्हीलरवरून आपापल्या परीने गाड्या काडून पुढं चालत रस्ता रिकामा करत होते ! त्यात मी देखील एक होतो. योगायोग असा की ट्राफिक जॅम झालेल्या कॉर्नरला तेवढ्यातच मोठ्या साहेबांची गाडी अगदी माझ्या बाजूलाच येऊन थांबली. साहेब फोनवरती बोलत होते. मी बाजूला गाडीवर होतो, रस्ताही हळू हळू मोकळा होत होता..!

 

munde-inmarathi
youngisthan.in

मोठ्या साहेबांची माझी नजर एक झाली. मी साहेबांकडे आणि साहेब माझ्याकडे एकटक पाहत होतो. काय करावं मला काही सुचेना. मी साहेबांकडे पाहत मान खाली झुकवून ‘साहेब नमस्कार’ असं म्हटलं. आवाज पोहचणार नव्हता. कारण गाडीची काच वर होती. साहेबांचा फोन चालू होता पण मोठ्या साहेबांची नजर माझ्याकडे असल्याने माझ्या तोंडातून बाहेर पडलेले ‘शब्द’ बहुतेक मोठ्या साहेबांनी आतून अचूक ओळखले असणार.

साहेबांनी गाडीची काच लगेच खाली केली आणि कानाचा फोन बाजूला करत गाडीतून एक हात बाहेर काढून वर करत म्हणाले ‘नमस्कार’ !

साहेब तसं म्हणाल्याने मी पुरता गोंधळून गेलो होतो. पण तेवढ्यात रस्ताही रिकामा झाला होता आणि मोठे साहेब वाऱ्याच्या वेगाने तिथून निघून गेले होते. हाच तो काय माझा मोठ्या साहेबांशी अगदी अलीकडच्या काळात आलेला परिचय आणि एवढीच ती काय ओळख …अन तो शेवटचा ‘नमस्कार’ ठरला ! जो कायम आजही माझ्या मनाच्या गाभाऱ्यात एक मोठ्या साहेबांची ‘आठवण’ बनून राहिला आहे..!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?