' ‘मराठी शाळा की इंग्रजी शाळा?’ : चुकीच्या दिशेने होणारी विघातक चर्चा – InMarathi

‘मराठी शाळा की इंग्रजी शाळा?’ : चुकीच्या दिशेने होणारी विघातक चर्चा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: ओंकार दाभाडकर

===

“मराठी शाळा की इंग्रजी शाळा?” हा विषय विचारवंत आणि मनस्वी पालक दोन्ही गटांसाठी अतिशय आपुलकीचा आहे. आणि हा विषय अर्थातच, महत्वाचा देखील आहेच.

परंतु दुर्दैवाने, चर्चा मूळ मुद्द्याला हात न घालता वेगळ्याच स्तरावर होते आणि त्यामुळे ह्या वादात ‘शिक्षण’ केंद्रित व्हिजन नेहेमीच हरवून जातं.

मी लहान असताना ‘शाळा’ म्हणजे सरकार मान्य मराठी पाठशाळा असं सरळसोट समीकरण होतं. मी पंधरा वर्षांचा होई पर्यंत अधूनमधुन कुणीतरी ‘कॉन्व्हेंट’ वाला चकाचक मुलगा दिसायचा.

पण ‘हे काहीतरी वेगळं असतं’ इतकाच भाव यायचा त्याच्याकडे बघून – इतकं ते तुरळक, ऑफ-दि-फ्यु-फॉर-दि-फ्यु प्रकरण होतं.

आता मराठी शाळेत जाणारं पोर म्हणजे ‘पालकांना इंग्रजी शाळा अजिबात परवडू शकत नाही म्हणूनच!’ – असं चित्र आहे.

 

marathi-school-marathipizza0

 

आमच्याकडे घरकाम करायला येणाऱ्या ताई – ज्यांचा नवरा रिक्षा चालवतो – आपल्या दोन्ही मुलांना जाणीवपूर्वक इंग्लिश मिडीयम मधून शिकवत आहेत. त्यावरून ह्या परिवर्तनाची व्याप्ती लक्षात येते.

हे उगाच घडलेलं, वरवर निर्माण झालेल्या ‘गैरसमजांपोटी’ झालेलं परिवर्तन नाही.

आणि म्हणून –

आपल्या पाल्याला मराठीत शाळेत घालावं का? – ह्या प्रश्नाचं उत्तर सापडण्याआधी – बहुतांश लोक पाल्यांना इंग्रजी शाळेत का घालतात? – ह्या प्रश्नाचा व्यावहारिक विचार करावा लागतो. आणि त्याचं उत्तर सापडण्यासाठी मुळात शाळेत का जावं?’ ह्याचा विचार करावा लागतो.

आपण शाळेत जातो – कारण आपल्याला जगाबद्दल खूप काही शिकायचं, जाणून घ्यायचं असतं आणि त्याबळावर आपलं भविष्य घडवायचं असतं. हे शिकण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण घरी-नातेवाईकांत मिळणं अशक्य असतं.

म्हणून एक व्यवस्था उभी रहाते, ज्यात मूल ‘घडवणं’ हेच काम केलं जातं.

 

marathi school 1 inmarathi

 

सगळं आयडीयलिझम एकीकडे – आपलं बाळ पुढे एका अत्यंत क्रूर स्पर्धेत उभं रहाणार आहे आणि त्यात त्याने टिकायला हवं असेल तर बालवाडी – नर्सरी पासून जे जे आवश्यक असेल ते ते करायलाच हवं – असा दृष्टिकोन पालकांनी बाळगणं चूक नाही. हाच दृष्टिकोन स्वाभाविक आणि व्यवहार्य आहे.

मग ही असं शिकलेलली पोरं ‘भारतीय’ नसतात, ‘मातृभाषेतून’ शिकलेले नसल्याने फक्त ‘पोपटपंची’ करतात, त्यांची मातृभाषा निकृष्ट बनते आणि त्यामुळे ते ‘संस्कृतीपासूनच’ दुरावतात –

ही सगळी कारणं – भविष्यात उभ्या राहणाऱ्या पोटा-पाण्याच्या-गाडी-घराच्या-परदेशी शिक्षण-नोकरी व्यवसायाच्या भव्यदिव्य स्वप्नापुढे टिकत नाहीत.

पालकांनी मराठी शाळा ‘सोडणं’ सुरू केलं ते ह्या कारणापोटी. मूल ‘घडवण्यात’ मराठी शाळा कमी पडू लागल्या म्हणून.

 

indian-school-marathipizza
indiatoday.intoday.in

 

आणि – माईंड यू – हे कमी पडणं फक्त ‘इंग्रजी भाषेतील शिक्षण’ ह्या अनुषंगाने अजिबातच नाही. बदलत्या काळानुसार पालकांच्या शाळेकडून असणाऱ्या अपेक्षा झपाट्याने बदलत गेल्या.

मराठी शाळा तितक्या वेगाने स्वतःला आधुनिक करू शकल्या नाहीत – म्हणून पालकांनी कालानुरूप असणाऱ्या शाळा निवडायला सुरूवात केली.

माझ्या लहानपणी मला जसे शिक्षक होते, तसे शिक्षक आज मराठी शाळांमध्ये खरंच दिसत नाही. आणि हे आपल्या डीएड-बीएड ची व्यवस्था बघता अगदीच साहजिक आहे.

(आजही कळकळीने शिकवणारे शिक्षक आहेतच. त्यांना नाकारणे वा त्यांचा अपमान करणे हा हेतू अजिबात नाही. परंतु पूर्वी ‘शिक्षक म्हणजे सर्वश्रुत, विचारी, आदर्श व्यक्ती’ हे जे समीकरण होतं तो आज अपवाद होऊन गेला आहे हे कटू वास्तव नाकारून चालणार नाहीच.)

अस्खलित इंग्लिश जाऊ देत, पण जगभरात होत असलेले शिक्षण क्षेत्रातील नवनवे प्रयोग अजूनही मराठी शाळांमध्ये पोहोचलेले नाहीत. त्यातून मिळालेले ‘धडे’ शाळा शिकल्या नाहीत.

३-४ वर्षांचं मूल घरी मोबाईल-लॅपटॉप हाताळत असताना, शाळेत मात्र जुना अभ्यासक्रम शिकत असेल तर पुढील १५ वर्षांत तो काय शिकणार आणि किती ‘पुढे’ येणार हा प्रश्नच आहे.

इंग्रजी अस्खलित असणं ही गरज आहेच – पण ती अनेक गरजांपैकी एक आहे. मराठी शाळांनी ह्या गरजा भागवल्या तर पालक मराठी शाळा कधीही प्राधान्यानेच निवडतील!

मला माझ्या मुलाने सायन्स-मॅथ्स-इंग्लिश अत्यंत चांगल्याप्रकारे शिकायला हवं आहे. जोडीने एक्स्ट्रा करिक्युलर प्रयोग करायला हवे आहेत. त्याने मी म्हणतोय, माझं स्वप्न अपूर्ण राहिलं म्हणून बास्केट बॉल – गिटार शिकू नये.

परंतु मला ‘वेळ निघून गेल्यावर’ ह्या गोष्टी उमगल्या-समजल्या. त्याला त्याच्यासमोर योग्य वयात हे पर्याय उपलब्ध असावेत.

 

School-Being-Marathi-inmarathi
eingmarathi.in

 

फॉर्म्युला वन, रॉजर फेडरर, गेम ऑफ थ्रोन्स…हे जग त्याच्यापासून दूर कुठंतरी अज्ञात ठिकाणी असू नये. त्याने पहिली पासून आयआयटी आयआयएम च्या ओझ्याखाली अजिबात जगू नये.

पण ‘असं काहीतरी असतं’, असे उत्कृष्ट पर्याय जगात आहेत – ह्याचं भान त्याला शाळेतून मिळावं. त्याने ‘अवेअर’ असावं. त्याच्या आजूबाजूची मुलं देखील ह्याच ‘जजब्याची’ असावीत. त्या मुलांचे पालकदेखील असा विचार करणारे असावेत.

शाळेकडून माझ्या ह्या सगळ्या अपेक्षा असतात. माझ्या ह्या अपेक्षा जी शाळा पूर्ण करेल – तिथे मी माझ्या मुलाला टाकणार. सध्या हे इंग्लिश मीडियममध्येच होत आहे – म्हणून तिकडे ओढा आहे.

त्यामुळे आज जेव्हा मराठी शाळा की इंग्रजी – ही चर्चा होते तेव्हा ‘माध्यम’वर असलेला फोकस अगदीच चुकीचा असतो. फोकस ‘शिक्षणाच्या दर्जाचं व्हिजन’ हा असायला हवा.

मीसुद्धा मराठी माध्यमांत शिकलो. पण मला इंग्लिशचे शिक्षक अत्युत्कृष्ट लाभले. (माझ्या आईने जालन्यात इंग्लिश, मॅथ्स चा पाया पक्का केलेल्या कितीतरी बॅचेस घडवल्यात.) ८ वी ला सेमी इंग्लिश घेतलं.

१२ वी नंतर चेतन भगत वाचायला घेतला. टाईम्स वगैरे आधीपासून नजरेखालून घालायचोच. परिणाम काय? तर मुंबईतील बऱ्यापैकी नावाजलेल्या एमबीए कॉलेजमध्ये चार ही सेमिस्टर क्लास रिप्रेझेंटेटीव्ह असताना, ना माझ्याच वर्गातील मुला-मुलींसमोर ‘लाजलो’ ना शिक्षकांना ‘इम्पॉर्टन्ट क्वेस्चन्स’ साठी मस्का मारताना घाबरलो.

थोडक्यात – माझ्या मराठी मीडियमचा ‘इंग्रजी अस्खलित असण्यात’ अडथळा आला नाही.

पण –

माझ्या एमबीएतील सवंगड्यांइतकं ग्लोबल व्हिजन माझं नव्हतं – हे कटू सत्य कसं नाकारू?

 

 

mba students inmarathi
iibs

 

स्पोकन इंग्लिश चांगलं आहे म्हणून कार्सचे टॉप इंटरनॅशनल ब्रॅण्ड्स आपोआप कळत नसतात. बेसिक मॅथ्स अगदी पक्कं आहे म्हणून HUL ची मार्केटिंग स्ट्रॅटेजी किती युनिक आहे ह्याची उदाहरणं ‘आपोआप’ डोळ्यासमोर तरळत नसतात.

(HUL म्हणजे हिंदुस्थान युनिलिव्हर. इंग्रजाळलेल्या शाळा-कॉलेजांमधून बाहेर पडलेल्याना हे वेगळं सांगावं लागत नाही. मला ते सांगावं लागलं!) माझी स्पर्धा ‘फटाकडी इंग्रजी बोलणाऱ्या’ मुलांशी नसते. ‘चतुरस्त्र ज्ञान असणाऱ्या’ मुलांशी असते.

ती मुलं इंग्लिश मीडियमची असणं हा फॅक्टर कमी महत्वाचा. ती चांगल्या प्रतीच्या शाळांमधून बाहेर पडलेली मुलं होती – हा फॅक्टर फार फार महत्वाचा आहे.

व्योमला (माझ्या मुलाला) मी मराठी माध्यमांत घातलं ते ‘अस्मिता’ वगैरे म्हणून अजिबात नाही. व्यावहारिक गरजेपोटी आणि ती गरज ‘शिक्षणाच्या दर्जावर कॉम्प्रमाइज न करता’ भागतीये म्हणून!

व्योमने इंग्रजाळलेलं मराठी बोलू नये, त्याला मराठी, भारतीय संस्कार असलेलं शिक्षण मिळावं ही मनापासूनची कळकळ आहेच. पण तरीही – मराठी शाळेची निवड केली, निवड करू शकलो.

कारण मला चांगली शाळा मिळाली! डोंबिवलीत असल्याचा फायदा! I am lucky…Or rather…Vyom is lucky!

प्रवेश घ्यायला गेलो होतो तेव्हा बालवाडी वर्गात चक्कर मारली. “चला खाऊची वेळ झाली” असं शिक्षिकेने म्हटल्यावर – त्या बाळांनी आपापले डब्बे उघडल्यावर “वदनी कवळ घेता…” सुरु केलं. तो आनंद अवर्णनीय होता.

 

marathi school inmarathi
youtube

 

परंतु ह्या आनंदापोटी मी व्योमच्या सायन्स-मॅथ्स-इंग्लिश वर पाणी सोडण्यास कधीच तयार होणार नाही. सुदैवाने मला ह्याकडे जातीने लक्ष देणारी शाळा मिळाली. छंदवर्ग ‘कम्पल्सरी’ चालवणारी, मैदानी खेळ खेळायला लावणारी मराठी शाळा मला मिळाली! आणि म्हणून व्योमसाठी मराठी शाळा निवडता आली.

इंग्रजी शाळांमुळे बऱ्याच नव्या समस्या निर्माण होत आहेत. मुलांसाठी, पालकांसाठी, समाजासाठी – सर्वांसाठीच. परंतु ह्या समस्या टाळायच्या, म्हणून आहेत तश्या कमी दर्जाच्या मराठी शाळांमध्ये आपल्या पाल्याला कुणीही घालू नये. कुणी घालणारही नाही.

सबब, मराठी शाळांना ‘आधुनिक’ करायला हवं. दर्जा फार फार सुधारायला हवा.

ते एकदा साध्य झालं की पालक मराठी शाळांवर तुटून पडतील – आपोआप. आपणहोऊन.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?