कट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
समाजाची जडणघडण बदलण्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त आहे.
: नरेंद्र दाभोलकर
देशात जोराने फोफावणारा कट्टर हिंदुत्ववाद ही आता एक वास्तविकता आहे. अर्थात, त्या वास्तविकतेने निर्माण होऊ पाहणारे प्रश्न सर्वांनाच मान्य आहेत असं नाही. परंतु ज्यांना कुणाला ह्या समस्येचं अस्तित्व पटलं आहे, त्यांच्यात ह्या समस्येला सामोरं जाण्याबद्दल पुरेसं एकमत नाही. फक्त एकमतच नाही असं नसून, “आमचा मार्ग नं वापरणारे सगळे छुपे हिंदुत्ववादी” असा हेत्वारोप देखील आहे.
सर्वसाधारणपणे, कट्टर हिंदुत्ववादावर उपाय म्हणजे “संविधानवाद” वा ह्या कट्टर हिंदुत्ववाद्यांची जमेल तितकी खिल्ली उडवणे – हे मार्ग सर्वमान्य झाल्या सारखे आहेत. ह्या मार्गांसमोर, नव्याने उभा होऊ पाहणारा हिंदू-हित-वाद हा “छुपा हिंदुत्ववाद आहे” असा आरोप केला जातो.
पण वास्तविकता काय आहे?
संविधानवाद हा कोणत्याही लोकशाही प्रेमी, आधुनिक व पुरोगामी विचारसरणीच्या माणसाचा मूल भावच असणार. ती नैसर्गिक आणि ऑब्व्हियस चॉईस असणार आहे. ह्याला ऑप्शन नाहीच. परंतु “कट्टर हिंदुत्व” ही ज्यांना ज्यांना “समस्या” वाटते – त्यांनी ह्या समस्येवर “उपाय” काय हा विचार करताना आपल्यासमोर उभ्या असलेल्या ह्या समस्येचं स्वरूप आणि व्याप्ती समजून घ्यायला हवी.
कुठलीही कट्टर विचारधारा दोन अंगांवर उभी असते – पहिलं मेंदू आणि दुसरं धड.
कट्टर हिंदुत्वाचा मेंदू म्हणजे विविध “उच्च पदस्थ”. साध्वी, शंकराचार्य, VHP/बजरंग दल चे टॉप नेते इत्यादी. हे लोक हिदुत्वाबद्दल र्हेटरीक जन्माला घालणारे आणि रुजवू पहाणारे असतात. त्यामागे त्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा, प्रतिगामी विचार, मुस्लिम द्वेष, दलित द्वेष असे विविध “रिझनिंग” असू शकतात. ही मंडळी आपल्या अंतस्थ हेतूपाई कट्टर हिंदुत्वाचा मार्ग अंगीकारून चालत असतात. त्यांच्यासाठी कट्टर हिंदुत्व हे माध्यम असतं.
त्यामुळे हे लोक “बदलतील” ही शक्यता नसते. त्यांनी घटनाबाह्य कृत्य केलं आणि ते सिद्ध करता आलं तर त्यांना होणारं अनुशासन हा त्यांना थांबवण्याचा एकमेव उपाय असतो.
परंतु – त्यांची परिणामकारकता कमी करता येऊ शकते. त्यासाठी ह्या मेंदूचा उर्वरित धडावरील असलेला प्रभाव कमी करावयास हवा. उर्वरित धड म्हणजे – कुठल्याही छुप्या अंतस्थ हेतू शिवाय, फक्त “कट्टर हिंदुत्व आवडतं, पटतं, आवश्यक वाटतं” म्हणून ह्या मेंदूच्या अधिपत्याखाली/प्रभावाखाली आलेला बहुसंख्य कट्टर हिंदुत्ववाद्यांचा समूह.
ह्या समूहाचे छुपे अजेंडे नसतात. वैयक्तिक महत्वाकांक्षा नसतात. एकवेळ राजकीय महत्वाकांक्षा जरी असल्या, तरी त्या हिंदुत्ववादी असण्यामागे कारण म्हणून नसतात. “हिंदुत्ववादी आहेच, शिवाय “मोठं” देखील व्हायचं आहे” अश्या स्वरूपाच्या ह्या महत्वाकांक्षा असतात. एकुणात “आपल्या सुरक्षेसाठी आपण कट्टर हिंदू वा हिंदुत्ववादी असायला हवं, आपलं अस्तित्व टिकून राहण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी असणं अत्यंत आवश्यक आहे” – अशी प्रामाणिक आणि ठाम धारणा असलेला हा समूह असतो.
हिंदुत्ववाद उभा असतो, परिणामकारक असतो, वृद्धिंगत होत असतो तो ह्या दुसऱ्या अंगाच्या जोरावर. “धडा” च्या बळावर.
– आणि हा समूह बदलू शकतो.
कट्टर हिंदुत्व अनावश्यक तर आहेच, त्याच जोडीला खुद्द हिंदूंसाठीच हानिकारक देखील आहे – हे जर पटवून देता आलं तर ह्या समूहात मतपरिवर्तन घडून येऊ शकतं. कट्टर हिंदुत्व संपवण्याचा वा त्याची धग/धार कमी करण्याचा हा एकच मार्ग आहे. (अर्थात, त्या जोडीला संविधानाची “कट्टर” अंमलबजवणी होऊन खरा खुरा सेक्युलर भारत उभा रहाणे – हे देखील अत्यावश्यक आहेच.)
आता ह्या समूहाचं मतपरिवर्तन कसं घडवून आणायचं – इथे आपण येऊन थांबतो.
कसं होईल मत परिवर्तन?
हिंदुत्ववादी तरुणांची खिल्ली उडवून?
“घटना सर्वतोपरी” असं म्हणून, पटवून देऊन?
की – कट्टर हिंदुत्व खुद्द हिंदूंच्या मुळावर उठतं – हे समजावून सांगून?
सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्यायला हवी की मतपरिवर्तन घडवण्यास “खिल्ली” हा सर्वात नकारात्मक मार्ग आहे. त्याने मतपरिवर्तन तर घडत नाहीच, उलट समोरच्याची मतं अधिक घट्ट होतात. त्यामुळेच प्रबोधनाचा वारसा चालवणाऱ्या बहुतेक सर्वच समाजसुधारकांनी वाणी मधासारखी गोड ठेऊन जनमानस बदलण्यावर जोर दिलेला आहे. सर्वांनीच अधूनमधून आपल्या टार्गेट ऑडियन्सची कठोर शब्दांत कानउघाडणी केली आहेच. परंतु त्यात माता-पित्याने प्रेमाने, काळजीने रागे भरण्याचा सूर असतो, खिल्ली उडवण्याचा नाही.
त्यामुळे खिल्ली उडवणे, उपमर्द करणे हा मार्ग शक्य तितक्या कसोशीने टाळलेला बरा. (बदल घडवून आणायचे असतील तर!)
पुढे, “घटना सर्वतोपरी” – हा मार्ग किती व्यवहार्य आहे? मूठभर विचारी माणसांनी आपापसात चर्चिण्यास उत्तमच. पण हिंदुत्ववादाकडे आकर्षित होणारा बहुसंख्य भावनाशील समुदाय ह्या तात्विक गोष्टींनी योग्य मार्गी लागणार नाहीये. असं का, ते समजण्यासाठी मुळात हिंदू तरुण हिंदुत्ववादी का होतो हे समजून घेणं (आणि वस्तुस्थिती मान्य करणं!) क्रमप्राप्त आहे.
गेल्या ६०-७० वर्षांत “भारतात हिंदूंवर अन्याय होतो” – ही भावना रुजण्यात – रुजवण्यात काँग्रेस-संघ/भाजप, पुरोगामी-प्रतिगामी, लोकशाहीवादी-फॅसिस्ट अश्या सर्व कंपूंचा वाटा आहे. खरंतर ही भावना पार १९२५ पासूनच आहे. संघाचा जन्म, पुढे सावरकरांनी हिंदुत्व ह्या संकल्पनेला दिलेला जन्म आणि त्यामागे उभं केलेलं तत्वज्ञान ह्याच भावनेपोटी झालेले आहेत.
आता “हिंदूंवर अन्याय होतो” ही भावना योग्य की अयोग्य, अयोग्य असल्यास ह्या अपप्रचारास जबाबदार कोण, योग्य असल्यास ह्या अन्यायास जबाबदार कोण – हे मुद्दे टाळून, आपण ही वस्तुस्थिती मान्य करूया की अनेक हिंदूंच्या मनात ही भावना घट्ट रुजली आहे. आणि ह्या भावनेपोटीच ते हिंदुत्ववादाकडे वळत आहेत.
ही भावना मूळ धरण्यामागे एक गृहीतक आहे की “घटना पक्षपाती आहे” आणि/किंवा “घटनेची अंमलबजावणी हिंदूंना न्याय देण्याच्या दिशेने होत नाही.”. ही भावना देखील खरी/खोटी, योग्य/अयोग्य है फंदात पडण्यापेक्षा – ह्या भावनेचं अस्तित्व मान्य करूया.
वरील दोन्ही गोष्टी एकदा समजून घेतल्या की मग “घटना सर्वतोपरी” हा तर्क भावनाशील, अस्मितावादी हिंदुत्ववादी तरुण मनास किती पटेल ह्याचं स्पष्ट उत्तर सापडतं. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे – भावनेला तर्काने, बुद्धिप्रामाण्याने “निरुत्तर” करता येईल, “जिंकता” येणार नाही. वादविवादात जिंकणं वेगळं आणि “माणसाला जिंकणं” वेगळं.
वादविवादात जिंकलं की माणूस दुरावतो. कट्टर हिंदुत्ववाद जर निष्प्रभ करायचा असेल तर हिंदूंना तोडून, त्यांना दुरावून चालणार नाही – त्यानेच तर तो अधिक कट्टर होतोय…!
आणि म्हणूनच हिंदू-हित-वाद हा योग्य मार्ग ठरतो.
एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी की हिंदू-हित-वाद “घटना सर्वतोपरी” ह्या तत्वाला १०१% अनुसरूनच आहे. हिंदू-हित-वादी लोक हे मानवनिर्मीत राज्यघटना, लोकशाही व्यवस्था, इहवादी राज्यव्यवस्था, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य ह्या आधुनिक संकल्पना प्रिय असणारेच आहेत. मनुस्मृती विरोधकच आहेत. वैदिक विमाने, गणपती प्लास्टिक सर्जरी ह्यावर हसू फुटणारेच आहेत.
फक्त कट्टर हिंदुत्वावर “उत्तर” वा “उपाय” म्हणजे उर्मट-खिल्ली-वाद वा तार्किक संविधानवाद हा मार्ग न अनुसरता – हिंदू-हित-वाद – हा सौम्य प्रबोधनाचा मार्ग निवडणारे आहेत.
काय आहे हिंदू-हित-वाद ?
हिंदूंनी “अस्मिता” वादी नं रहाता, इतिहास केंद्रित नं रहाता स्वतःचा ऐहिक उत्कर्ष कशात आहे हे ओळखावं आणि स्वतःचं “हित” साधावं : हे मानणारा विचार म्हणजे हिंदू-हित-वाद.
गोवंश हत्या बंदी स विरोध करणारे गो रक्षक जेव्हा शेतकऱ्यांवर भाकड गाईंच्या पोषणाचा भार टाकतात तेव्हा त्यास हिंदू-हित-वाद्यांचा प्रखर विरोध तात्विक तर असतोच. शिवाय व्यावहारिक देखील असतो. गोवंश हत्या बंदी खुद्द हिंदूंच्याच पायावर धोंडा पडणारी आहे हे पटवून देणं हिंदू-हित-वाद समर्थकांना अधिक “सोपं” वाटतं.
अनेकांना हिंदुहितवादी हे छुपे हिंदुत्ववादी वाटतात. गल्लत इथेच होते. समोरच्याला “शत्रुपक्ष घोषित करून त्याविरोधात तलवारी परजल्या नाहीत” म्हणजे तुम्ही समोरच्याच्याच गटातील आहात असा प्रतिगामी टोळीवादी विचार आहे हा.
ज्याला “गो माता” ला भावनिक बनवून गरीब शेतकऱ्यांवर भाकड गाई पाळण्याची आततायी बळजबरी करावीशी वाटते तो हिंदुत्ववादी. तर ज्याला गो माता ह्या भावनिक मुद्द्यापेक्षा हिंदू शेतकऱ्यांच्या व्यवहार्य अडचणींपोटी भाकड गायी विकणं हेच अधिक श्रेयस्कर वाटतं तो हिंदु-हित-वादी. ज्याला “गो माता” हा महत्वाचा मुद्दा नं करता, पाण्यासाठी वणवण भटकावं लागणाऱ्या आमच्या खऱ्याखुऱ्या माता-भगिनी ही प्राथमिकता असावी असं वाटतं – तो हिंदू-हित-वादी.
– अशी ही साधी-सरळ-स्पष्ट मांडणी आहे. हेच मग फाळणी, वैदिक विमानं, इस्लाम चा प्रश्न,चातुर्वर्ण्य, अखंड हिंदुस्थान वगैरेवर लागू केलं की फरक स्पष्ट होतो.
राज्यघटना सर्वांचंच हित करणारी आहे ह्यात वाद नाही. परंतु ते पटण्यासाठी, मुळात “अस्मिता महत्वाची की स्व-हित?” ह्या प्रश्नाचा गुंता सोडवता आला पाहिजे. एकदा स्व-हित साध्य करण्याचं महत्व पटलं की व्यक्ती आपोआप इहवादी विचार करू लागते, आणि मग आपोआपच मनुष्य निर्मित संविधानाकडे नजर वळते.
संविधानाने घालून दिलेली आधुनिक मूल्यं कट्टर हिंदुत्ववादी मनांमध्ये “रुजवण्यासाठी” जो सौम्य प्रबोधनाचा मार्ग अनुसरला जातो – त्याला हिंदू-हित-वाद म्हणतात. आणि म्हणूनच हिंदुहितवाद हाच कट्टर हिंदुत्वावर योग्य आणि व्यवहार्य उपाय आहे.
हिंदू-हित-वाद म्हणताना, अखिल-मानवजात-हित-वाद का नको हा प्रश्न देखील उपस्थित होतो. ह्यावर साधं सरळ उत्तर हेच आहे की मुळातच हिंदुहितवाद हा मुळात हिंदुत्ववादाकडे आकर्षित होऊ पाहणाऱ्या हिंदूंसाठी “पर्याय” म्हणून आहे. त्यामुळे स्वाभाविकच तो “हिंदू” केंद्रित असणार. प्रबोधन “आतूनच” घडत असतं. मुस्लिमांनी अधिक आधुनिक व्हावं हे खुद्द मुस्लिमानेच सांगायला हवं – तरच ते सकारात्मकरित्या ऐकल्या जाईल.
जाताजाता – नरेंद्र दाभोलकरांची ही सुंदर मुलाखत आवर्जून बघावी. लेखाच्या सुरुवातीला दाभोलकरांचं दिलेलं quote ह्या मुलाखतीत आलेलं आहे.
नरेंद्र दाभोलकर कोण होते, हिंदुहितवादी होते का – हे प्रश्न अर्थातच अनावश्यक आहेत. परंतु कट्टर हिंदुत्वावर खरोखर सकारात्मक उपाययोजना करावयाची असेल तर सौम्य प्रबोधनात्मक हिंदू-हित-वादी मार्गाचा अवलंब करण्याशिवाय पर्याय नाही.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.