बाळ चिमुकल्या हातांनी डोळे का चोळतं ? अशा वेळी काय काळजी घ्याल ? जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लहान बाळ डोळे चोळत असताना पाहणं हा एक आनंददायी अनुभव असतो. त्याचे चिमुकले हात त्याच्या इवल्याश्या डोळ्यांवरून फिरताना बघताना किती छान वाटतं. पण जर डोळे चोळण्यातून तुमची मुलं तुम्हाला काही सांगू इच्छित असतील तर?
लहान मुलं ज्यावेळी खूप थकलेली असतात किंवा त्यांना खूप झोप येत असते तेव्हा ती सर्वात जास्त डोळे चोळतात.
कधीकधी त्यांचे डोळे खूप कोरडे किंवा शुष्क होतात तर कधी डोळ्यांचा काहीतरी संसर्ग झाला असेल किंवा धूळ, कचरा असे काही गेले असेल तर ते डोळे चोळत बसतात.
थोडक्यात सांगायचं तर तुमच्या लहानग्याचं डोळे चोळणं हे वर सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे असू शकतं. त्यामुळे तुम्ही सावध असायला हवं आणि सजग सुद्धा. तरच तुम्ही हे टाळण्यासाठी आवश्यक मदत तुमच्या बाळाला करू शकाल. आपण मुलं डोळे का चोळतात यांची काही सर्वसाधारण कारणे आज पाहणार आहोत.
१) ते थकलेले आहे.
काही वेळेस बाळाचे डोळे चोळणे हे झोप आल्याचा संकेत असते. याचा अर्थ तुमचं बाळ थकलेलं आहे आणि झोपेला आलंय. जेव्हा तुम्ही थकता तेव्हा तुमचे डोळेसुद्धा जड होतात. बऱ्याचदा बाळ डोळे चोळून डोळ्याच्या आजूबाजूला असलेल्या त्वचेला आराम देत असतं.
जांभई देणे, अस्वस्थ होणे, आणि रडणे ह्यावरूनही समजते की, बाळ थकले आहे आणि बाळाला झोप आली आहे. तेव्हा त्याला आणखी त्रास न देता झोपवणे चांगले.
२) त्याचे डोळे कोरडे पडत आहेत.
बाळाचे डोळे जर खूप कोरडे व्हायला लागले, शुष्क पडायला लागले तर बाळ डोळे चोळायला लागते. बाळाच्या डोळ्यातील tear film ही डोळ्याच्या आतील भागाचे संरक्षण करत असते. जर अधिक काळ डोळे हवेला expose होत राहिले तर डोळ्यांतील आर्द्रता कमी होते.
अशा प्रकारे शुष्क पडलेल्या डोळ्यांमुळे तुमचे बाळ जोरजोरात डोळे चोळायला लागते. ते असे करते कारण असे केल्याने डोळ्यात पाणी येते आणि त्यामुळे डोळ्यातील आर्द्रता परत येते.
३) बाळांसाठी सर्व गोष्टी नवीन असतात आणि त्यांना त्यांचे कुतूहल असते.
तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर तुम्ही जेव्हा डोळे बंद करता आणि तुमचे डोळे चोळता तेव्हा तुमच्या बंद डोळ्यासमोर उजेड येतो आणि विशिष्ट पॅटर्न येतात. एक गोष्ट आपण विसरतो की, बाळासाठी या सर्व गोष्टी नवीन असतात.
लाईट चमकला तर ती घाबरून डोळे मिटतात किंवा चोळतात कारण त्यांच्यासाठी हे नवीन असतं.
ते जिज्ञासूपणाने शिकत असतात. डोळे मिटून चोळताना डोळ्यासमोर येणारे पॅटर्न त्यांना गमतीशीर वाटतात. म्हणून ते पुन्हा पुन्हा अनुभवत असतात.
४) त्यांच्या डोळ्यात काही गेले असेल तर बाळ डोळे चोळते.
जर बाळाच्या डोळ्यात काही गेले असेल तर ते सतत डोळे चोळत राहते. कारण त्याला काहीतरी खूपत असल्याची जाणीव होत असते. तो धुळीचा कण असू शकतो, पापणीचा केस असू शकतो, किंवा पिठाचा कण असू शकतो.
कधीकधी नुसत्या डोळ्याच्या पापण्या फडफडणे हे सुद्धा डोळ्यात कचरा गेल्याचे लक्षण असते. जर तुमच्या बाळाच्या डोळ्यात irritation होत असेल तर स्वच्छ ओले कापड घेऊन डोळे आणि चेहरा पुसून घ्या जेणेकरून आणखी काही डोळ्यात जाणार नाही.
त्यानंतर तुमच्या बाळाचे डोळे साफ करण्यासाठी थंड पाणी वापरा. ( गरम पाणी चुकूनही डोळ्याच्या आत वापरू नका) असे करत असताना कोणाला तरी बाळाचे डोके पकडून ठेवायला सांगा. ते शक्य नसेल तर योग्य तसा आधार घ्या.
जर तुम्हाला कोपऱ्यात काहीतरी गेल्याचे दिसत असेल, तर गरम पाण्यात बुडवलेले फडके वापरून ते काढायचा प्रयत्न करा. जर असे करूनसुद्धा डोळ्यातून पाणी यायचे थांबत नसेल आणि डोळा फडफडत असेल तर याचा अर्थ असा की डोळ्यात अजूनही काहीतरी आहे. अशा वेळी अधिक वेळ न दवडता डॉक्टरांकडे जाणेच चांगले.
५) दुखणारे किंवा खाजणारे डोळे :
लहान मुलांच्या डोळे चोळण्याचं आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे ऍलर्जी किंवा इन्फेक्शन. यामुळे बाळाच्या डोळ्यात वेदना किंवा खाज सुटू शकते.
डोळे सुजतात, लालसर होतात, ताप येऊ शकतो, मुलं चिडचिड करत रडत राहतात. अशा परिस्थितीत, डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्यांचा सल्ला घेणे चांगले. ते नेमके कारण शोधून त्यावर इलाज करू शकतात.
तुम्ही तुमच्या बाळांचे डोळे चोळणे कसे थांबवू शकता ??
तुम्हाला तुमच्या बाळाचं सततचं डोळे चोळणं थांबवण्यासाठी काही उपाय करावे लागतील. त्यातील काही प्राथमिक उपाय पुढीलप्रमाणे :
◆ जर तुमच्या बाळाला सतत डोळे चोळायची सवय असेल किंवा ते अंगावर दूध पिताना सतत डोळे चोळत असेल तर त्यांचे हात झाकून घ्या किंवा आजकाल मिळणारे हातमोजे घाला. तसेच त्याला पूर्ण हाताचे कपडे घाला.
◆ जर तुमच्या असे लक्षात आले की तुमचे बाळ डोळे चोळतंय आणि जांभया देतंय तर त्याला लगेचच झोपवा. त्यांची झोपेची वेळ ठरवा आणि शक्यतोवर बाळाला त्याच वेळी झोपायची सवय करा. यामुळे त्याची डोळे चोळण्याची सवय कमी होईल.
◆ धूळ, कचरा तत्सम काहीही तुमच्या बाळाच्या डोळ्यात जाऊ नये यासाठी जिथे खूप धूळ आहे किंवा हवेत कचरा आहे अशा ठिकाणी बाळाला नेणे टाळा. जर तरीही तुम्हाला अशा धुळीच्या ठिकाणी जावं लागलं तर बाळाचे डोळे आणि नाक झाकून घ्या. यामुळे बाळाचे धुळीपासून संरक्षण होईल.
जर तुम्हाला वाटलं की बाळाच्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे आणि त्यामुळे ते डोळे चोळतंय तर त्याचे डोळे वर सांगितल्याप्रमाणे धुवून घ्या. जर असे करूनही फायदा झाला नाही तर डॉक्टरांकडे घेऊन जा. शेवटी प्रश्न आपल्या लहानग्याचा आहे. त्यामुळे या बाबतीत तडजोड करू नका.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.