भुजबळांची कोठडीतून सुटका : अर्थात, गुप्त खलित्याचे रहस्य उलगडले !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
स्वातंत्र्योत्तर काळात नावारूपास आलेले स्वतंत्र हिंदुस्थानातील एकमेव स्वतंत्र संस्थान जे की “ महाराष्ट्र राज्याची आण बाण शान बालेकिल्ला ए शरदमती” संस्थान म्हणून ओळखले जाते. जशी प्रलयकाळी सारं जग बुडाल्यानंतर फक्त शंकराची काशी जिवंत राहते असा काशी क्षेत्राचा वेदात आणि पुराणात बोलबाला आहे तसाच बोलबाला राजकीय वेदांतात शरदमतीचा आहे. फार काय बोलावे, शके २०१४ साली तमाम हिंदुस्थानाची सत्ता मोदीशहा नावाच्या तुर्काने काबीज केल्यानंतर ही शरदमती संस्थानाने आपला गड राखला आणि शरदमती ही फक्त जाणत्या राजांची आहे, होती आणि राहील असा डंका अलम दुनियेत वाजला.
हल्ली नव्या पेशवाई च्या जमान्यातही पेशवाईला गाडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा संस्थानाचे सर्वेसर्वा जाणत्ये राजे यांच्या स्वप्नातला पुरोगामी महाराष्ट्र बनवण्यासाठी कटीबद्ध असणारा किल्ला म्हणून या बालेकिल्ल्याचा विशेष उल्लेख केला जातो.
मोदीशहा नावाच्या तुर्काने पेशवाई पदाची वस्त्रे देवून महाराष्ट्रात राज्य शकट हाकण्यासाठी पाठविलेला पेशवाईचा नवा पोशिंदा, १४ विद्या ६४ कले मध्ये पारंगत असणारा गायन बहाद्दर देवा कलमवीस ला राजसिंहासानावरून पायउतार करण्यासाठी देवाचा पेशवेपदाचा वस्त्रग्रहण समारंभ सोहळा झालेचे दिवशीच या संस्थानाने स्वत:चा वीस कलमी कार्यक्रम पेश केला होता.
स्वतंत्र हिंदुस्थानचे साम्राज्य कुठल्या का नीतीने चालेना पण हजारो वर्षापासून आजपर्यंत, आत्तापर्यंत महाराष्ट्रात फक्त शरदनीती चालत असताना त्याला देवा कलमवीस ने राजरोस आव्हान देवून अडगळीत पडलेली चाणक्यनीति राबविल्याने संस्थानाने देवाच्या चालींचा मागोवा घेण्यासाठी “बारभाई कारस्थानाच्या” धरतीवर स्वत:चा असा “शाफुआं आणि मावावादी भाई भाई” असा चारसौ बीस कलमी कार्यक्रम राबविल्याची गुप्त खबर पिवळ्या बखरी मध्ये यापूर्वीच छापली आहे.
सदर कार्यक्रमाचा भाग म्हणून संस्थानाच्या दूर सीमेपल्याड गरीब आदिवासी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या तसेच ताओवासी मावाचाचा यांच्या अहिंसात्मक मार्गाच्या शिकवणुकीवर वर्षानुवर्षे मेणबत्त्या हातात घेवुन गुमान चालत राहुन सरकार चा संवैधानिक मार्गाने निषेध करणाऱ्या निष्पाप देवभोळ्या मावा सैनिकांपर्यंत कितपत मदतीचे “हात” पोहोचू शकतात याची चाचपणी घेणे सुरु आहे असा उल्लेख ही टुकार भोकाटे याने स्वत:च्या “तुमान पिवळी पडली” या बखरी मध्ये केल्याचा ठोस संदर्भ आहे.
खुद्द महाराष्ट्रात पेशवाईचा जातीयवादी आणि अनागोंदी कारभार मोठ्या प्रमाणावर सुरु असून शिवछत्रपतींच्या स्वप्नातला पुरोगामी महाराष्ट्र हा नोहे असे उद्वेगजनक उद्गार जाणत्या राजांनी अनेक वेळा भर सभेत, भर कार्यक्रमात, भर रस्त्यात, भर गावात, भर राज्यात जिथे मिळेल तिथे भरभरून काढलेले आहेत.
संस्थानाचे ज्येष्ठ मांडलिक मा. मा. बाहुबली यांना देवाच्या शासन काळात भर चौकात बेड्या घालून जेरबंद केले गेले. कधी काळी राज्याचा शकट स्वत:च्या बाहूबलाने एकहाती हाकणारा, राज्याच्या जनतेच्या कल्याणाची पुरेपूर काळजी घेणारा, स्वत:ची सारी संपत्ती गरीब रयतेला देवून नाशकात गवताच्या पंचवटी मध्ये राहणारा सहस्त्रार्जुन बाहुबली असहायपणे हातात हातकड्या पडल्यावर आपल्यावरच्या अन्यायाविरोधात धाय मोकलून रडला होता.
बाहुबलीच्या जाण्याने नाशकाचा वाली गेला, प्रदेश पोरका झाला, पेशव्याच्या अत्याचाराने कळस गाठला, हा अन्याय पाहून वणीच्या सप्तशृंगीचा कोपही अनावर झाला.
दस्तुरखुद्द शरदमती संस्थानाच्या गादीवर वारसा सांगण्याइतका armstrong असणारा मोहरा देवा ने तुरुंगात धाडल्यावर देवाची खुनशी नजर संस्थानाच्या युवराज पदी विराजमान असलेले कर्तृत्ववान अशा दादासाहेबांवर वळली होती. राज्यात अत्यंत मृदूवाणी आणि शांत स्वभाव असणारे दादासाहेब “अजितशत्रु” म्हणून ओळखले जातात. राज्यात च काय परंतु खुद्द संस्थानात देखील दादासाहेबांना नावालाही कुणी शत्रू नाहीत. आपल्या मृदू मुलायम वाणीने दादासाहेबांनी कायम आपल्या मित्रांचीच नव्हे तर आपल्या नसलेल्या शत्रूंचीही मने अनेकदा जिंकलेली आहेत.
दादासाहेबांच्या दुर्दैवाने संपूर्ण राज्यातील मिडीया ही पेशव्यांची असल्याने दादासाहेबांच्या तोंडात काय पण हृदयातही नसलेली घाणेरडी वाक्ये या मनुवादी मिडीयाने अनेकदा त्यांच्या धोतरातुन नव्हे नव्हे पेपरातुन छापलेली आहेत.
“धरणात पाणी नाही तर मग मी मुतु का”, “मी टग्या आहे”, “ राज्यात वीज नसल्याने पोरं जन्माला घालायचा दर वाढला आहे” या आणि अशा अत्यंत साध्या सरळ स्वच्छ मनाने दादासाहेबांकडुन बोलल्या गेलेल्या शब्दांचा विपरीत संबंध लावून दादासाहेबांना बामणी मिडीयाने कायमस्वरूपी बदनाम केले आहे. दादासाहेबांनी केलेली अनेक लोकोपयोगी कामे, संपूर्ण महाराष्ट्राला सिंचनाखाली भिजवून टाकण्याचा त्यांचा भीम प्रयोग याच हलकट मिडीयाने लपवून ठेवला.
अशा दादासाहेबांवर देवाने वक्रदृष्टी वळवलेली पाहून थोरले धनी संतापले नाही तर नवलच. असाल तुम्ही राज्याचे पेशवे पण शेतकऱ्यांच्या पोशिन्द्यांवर वक्रदृष्टी वळवाल तर खबरदार!
संपूर्ण राज्यात हल्लाबोल करू! अशा शब्दात त्यांनी देवाचे वाभाडे काढले. इतकेच नव्हे तर खास पालैस्तान( नव्या करारातील पॅलेस्टाईन) वरून मागवलेली अल मुकर्रम अल जझीर अल इलाही जीतुद्दिन आव्हाड नावाची तोफ देखील देवावर संस्थानाच्या खास मुंब्रा हद्दीतून डागली होती.
अलीकडेच,
“तुम्ही लाखांचे पोशिंदे, आम्ही तुम्हास सांगू नये” या धर्तीवर जाणत्या राजांनी देवाला “तुम्ही असाल राज्याचे नामधारी राजे तरीही प्रार्थना करा की आमचे हात तुमच्या पर्यंत पोहोचू नये” अशा धर्तीवर लिहिलेला आणि असाच गुप्त आशय असणारा खलिता काही दिवसांपूर्वी धाडला होता. देवाच्या दावणीला बांधली गेलेली मीडिया या खलित्याचा अर्थ लावू शकली नाही. ध्यानी मनी राजांबद्दल मनी विखार असणाऱ्या मिडीयाने “बाहुबली यांच्या प्रकृती बद्दल काळजी वर्तवणारे जाणत्या राजाचे पेशव्यास पत्र” अशा मथळ्याखाली हा खलिता छापला होता.
आपल्या जुन्या सरदाराबद्दल अपार काळजी, माया, त्याच्या प्रकृती बद्दल वाटणारी चिंता याची देखील पेशवाईचे भगवे पायदळ सांभाळणाऱ्या सुभेदारांनी नेहमीप्रमाणे खिल्ली उडवली होती परंतु या खलित्याचा योग्य असर म्हणून आज बाहुबली सारखा जुना विश्वासू सरदार कालकोठडीतून बाहेर आला.
हिंदुस्थान चे माजी वजीरे आलम अटळ वचनदेई यांनी वाळुची पखऱण असलेल्या रणरणत्या भूमीत उडवलेले बार अंतराळात हिंदुस्थानावर नजर ठेवण्यासाठी बसवलेल्या हेरांना ही दिसले नाहीत म्हणून जगभर जसा जळफळाट झाला होता तसाच तडफडाट आज बाहुबली ची सुटका झाल्यावर मनुवादी मीडिया आणि कावेबाज पेशवाईचा होतो आहे.
तात्पर्य :-
बाहुबलीच्या सुटकेच्या मुहूर्तावर शरदमती च्या बालेकिल्ल्यातील खलबतखान्यात सुपारी कुटता कुटता कुटली गेलेली कुटनीती फळास आली! एल्गार सफल झाला, देवा कलमवीस ला धडा बसला, पेशवाई ला खिंडार पडले, तुर्की सत्तेला संस्थानाची ताकद कळाली, दिल्लीचे तख्त हादरले, मोदीशहा संतापला, राज्यात नव्या पेशवाई ला गाडणाऱ्या खऱ्या लोकशाहीची चाहूल लागली! आता लक्ष्य शके २०१९ ची निर्णायक लढाई, फोडा, ओढा, झोडा, नवी पेशवाई मसणात गाडा. जय पुरोगामी महाराष्ट्र, जय चपटी.
( बाहुबली ची कालकोठडीतून सुटका, इतिहासाचार्य टुकार भोकाटे, संदर्भ बखर:- तुमान)
===
टीप : लेख उपहासात्मक आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.