बौद्ध भिक्षू होणं वाटतं तेवढं सोपं नाही! भिक्षु होण्यासाठी काय करावं लागतं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भगवान गौतम बुद्धांना आपल्या देशातच नव्हे, तर परदेशातही खूप मान आहे. जसजसे आपण भारताच्या पूर्वेला जायला लागतो, तसतसा बौद्ध धर्माचा प्रभाव वाढताना दिसतो.
श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन, व्हिएतनाम, जपान या देशांमध्ये बौद्ध धर्म एक प्रमुख धर्म आहे. भारतातही लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश येथे प्रसिद्ध बौद्ध मठ आहेत.
मौर्य साम्राज्य स्थापन करणाऱ्या सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा नातू असलेल्या सम्राट अशोकाने कलिंगाच्या लढाईमध्ये झालेल्या भीषण संहारामुळे व्यथित होऊन अहिंसावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी या धर्माचा प्रसार भारताच्या सीमांच्या बाहेर केला.
आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्मात जाहीर प्रवेश करून बौद्ध धर्माला समाजमान्यता मिळवून दिली.
इतर धर्मांप्रमाणे बौद्ध धर्मातही दोन प्रकारच्या जीवनशैली सांगितलेल्या आहेत. एक सामान्य, गृहस्थाश्रमी माणसांसाठी आणि दुसरी सर्वसंगपरित्याग करून विरक्त आयुष्य जगणाऱ्या भिक्षुंसाठी.
भिक्षू किंवा पूर्ण संन्यासी बनण्याची प्रक्रिया मोठी कठीण आहे, आणि ती प्रत्येकासाठी नक्कीच नाही. ज्याला मनापासून धर्मप्रसार आणि धर्माच्या उत्थानासाठी काम करण्याची इच्छा आहे, तोच या मार्गाचा स्वीकार करू शकतो.
सनातन वैदिक धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यामध्ये अनेक साधर्म्यस्थळं आहेत, उदाहरणार्थ तंत्रमार्ग, पण त्याचबरोबर बौद्ध धर्माने वैदिक धर्मातल्या यज्ञपरंपरेला पूर्णपणे सोडचिठ्ठी दिलेली आहे.
स्वतः गौतम बुद्धांनी बौद्ध भिक्षुंसाठी काही नियम सुनिश्चित केलेले आहेत. या भिक्षुंचं आयुष्य हे त्याग, वैराग्य आणि समाधी यांनीच व्याप्त असेल, हा या नियमांचा हेतू आहे.
यातले काही नियम पुढीलप्रमाणे आहेत –
वय –
वयाच्या किशोरावस्थेत असलेला कुणीही बौद्ध भिक्षू बनू शकतो. जर आईवडील आणि इतर नातेवाईकांची संमती असेल, तर यापेक्षा कमी वयातही बौद्ध धर्माची दीक्षा दिली जाऊ शकते. पण कोणत्याही वयात भिक्षू बनायचं असेल, तरी कुटुंबाची संमती ही अत्यावश्यक आहे.
दीक्षा –
बौद्ध भिक्षू बनण्यासाठी दीक्षा अत्यावश्यक आहे. दीक्षेशिवाय कुणीही भिक्षू बनू शकत नाही. दीक्षेच्या वेळी आपले नातेसंबंध आणि गृहस्थाश्रमी आयुष्याचा पूर्णपणे त्याग करणं आणि एखाद्या बौद्ध गुरुकडून विधिवत दीक्षा घेणं या दोन्हीही गोष्टी भिक्षू बनण्यासाठी कराव्या लागतात.
स्त्रिया –
बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळात बौद्ध मठांमध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता. केवळ पुरुषच बौद्ध भिक्षू बनू शकत असत. पण काळाच्या ओघात स्त्रियांनाही बौह धर्माची दीक्षा घेण्याची आणि मठांमध्ये राहण्याची परवानगी मिळाली.
भिक्षा –
आसक्ती हे जगातल्या प्रत्येक दुःखाचं मूळ आहे, ही गौतम बुद्धांची मूळ शिकवण आहे. त्यामुळे भिक्षुंचं आयुष्य हे आसक्तीरहित असावं याकडे बौद्ध धर्माचा कटाक्ष आहे.
याचाच एक भाग म्हणून भिक्षुंना भिक्षा मागून किंवा दान म्हणून दिलं गेलेलंच भोजन करण्याची परवानगी आहे. ते स्वतःच्या उपयोगासाठी कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाहीत आणि केवळ दान म्हणून मिळालेलीच वस्तू वापरू शकतात.
भोजन –
अनेक बौद्ध मठांमध्ये बौद्ध भिक्षुंच्या भोजनासंदर्भात अत्यंत कडक नियम आहेत. त्यातला एक म्हणजे ते फक्त दुपारी एक वेळ घन आहार घेऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यांना पाणी किंवा द्रव आहारावरच राहावं लागतं.
कपडे –
बौद्ध भिक्षू केवळ तीन कपडे स्वतःकडे ठेवू शकतात. यातले दोन परिधान करण्यासाठी आणि एक चादर असते. हे कपडेसुद्धा ते जर कुणी दान म्हणून दिले असतील किंवा मग त्यांचा त्याग केला असेल, तरच भिक्षू ते वापरू शकतात. त्यांना कपडे खरेदी करण्याची परवानगी नसते.
ध्यान आणि समाधी –
हा सर्वात महत्वाचा नियम आहे. बौद्ध भिक्षुंनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ हा ध्यानधारणा आणि समाधी यांचा अभ्यास करण्यात व्यतीत करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते.
त्यामुळे ध्यानधारणा हा त्यांच्या दिनक्रमाचा एक महत्वाचा भाग असतो. ध्यानातून कुंडलिनी जागृत करणं हा या अभ्यासाचा उद्देश असतो.
ध्यान करण्याचं स्थान –
बौद्ध भिक्षुंनी एकदा दीक्षा घेतली की त्यांचं आयुष्य हे सामान्य माणसापेक्षा पूर्णपणे वेगळं बनतं. त्यामध्ये कोणत्याही हवामानात आणि निसर्गाच्या कोणत्याही स्वरुपात आपलं ध्यान करत राहणं हे समाविष्ट असतं.
त्यामुळे अशा साधकांना वेगवेगळ्या हवामानात आणि परिस्थितीत राहण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. निर्मनुष्य ठिकाणी किंवा ऐन गर्दीमध्येही त्यांची मानसिक अवस्था ही सारखीच असली पाहिजे याकडे बौद्ध धर्माचा कटाक्ष असतो.
निर्वाण –
ध्यानाचा अभ्यास, कुंडलिनी जागृत करणे आणि समाधी अवस्थेला पोहोचून परमज्ञानाची प्राप्ती होऊन निर्वाणपदाला पोहोचणे हे बौद्ध भिक्षू बनण्यातलं अंतिम ध्येय समजलं जातं. अत्त दीप भव – तूच स्वतःचा दीप हो – या गौतम बुद्धांच्या शिकवणीशी हे पूर्णपणे सुसंगत आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.