दोन “राजकीय पी. ए.” मित्रांची कथा आणि व्यथा : जोशींची तासिका
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
परळी वैजनाथ शहर राज्यात राजकीयदृष्ट्या हाय व्होल्टेज म्हणून ओळखले जाते. या मतदार संघात एका ग्राम पंचायतीचा जरी निकाल लागला तरी मुंबई डेस्कसाठी ती ब्रेकिंग न्यूज असते. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व प्रितम मुंडे हे तिघे राजकारणात चांगलेच सक्रिय आहेत, यापैकी प्रितम जेमतेम साडे तीन वर्षांपूर्वी अपघाताने राष्ट्रीय राजकारणात गेल्या.
मात्र, धनंजय आणि पंकजा हे दोघेही मातब्बर वेगवेगळ्या पक्षात राज्य स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावतात.
या दोघांच्याही यशात त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांचे स्वीय सहाय्यक मोलाची भूमिका बजावतात.
सतत प्रचंड काम करून लोकांच्या शिव्यांचे धनी असलेल्या या दोन पूर्वाश्रमीच्या मित्रांची कहाणी आज या लेखाच्या माध्यमांतून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे.
धनंजय मुंडे यांचे सध्या स्विय सहाय्यक आहेत ते प्रशांत भास्करराव जोशी तर प्रदीप लक्ष्मीकांत कुलकर्णी हे पंकजा मुंडे यांचे आजमितीला स्विय सहाय्यक आहेत. दोघांनीही नव्वदच्या दशकांत प्रसारमाध्यमं क्षेत्रात नशीब आजमावलेले आहे. दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी सातच्या आत घरात सारखे संस्कार असणारी चाकोरीबद्ध जेमतेम मध्यमवर्गीय अशी होती.
प्रदीप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतलेली आहे तर प्रशांत यांना पैशांअभावी अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून विज्ञान शाखेत पदवी घ्यावी लागली; पुढे प्रशांत यांनी औरंगाबाद येथील एम. आय. टी. महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवीका पूर्ण केली आहे.
शिकत असताना दोघेही पार्ट टाईम नौकरी करायचे. प्रशांत व प्रदीप दोघेही वीस – पंचवीस वर्षांपूर्वी परळी वैजनाथ येथून निघणाऱ्या साप्ताहिक जगमित्र, मराठवाडा साथी, सोमेश्वर एक्सप्रेस, वैद्यनाथ टाईम्स आदी वृत्तपत्रांत कार्यरत होते.
प्रदीप व प्रशांत या दोहोंना तरुण भारत वृत्तपत्राचादेखील अनुभव आहे.
मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अचानकपणे विसाव्या शतकाच्या अखेरीस दोघेही मुंडे कुटुंबियांच्या सेवेत रुजू झाले.
पंडितअण्णा मुंडे आणि गोपीनाथराव मुंडे हे जेव्हा एकत्रीत होते तेव्हा प्रदीप व प्रशांत दोघांनींही दोन्ही दिग्गजांसोबत काम केलेले आहे. प्रदीप कुलकर्णी यांनी पंडितअण्णा मुंडे, गोपीनाथराव मुंडे, धनंजय मुंडे यांचे सहाय्यक म्हूणन काम पाहिलेले आहे आणि सध्या ते राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्विय सहाय्यक आहेत.
तर प्रशांत जोशींना पंडितअण्णा मुंडे, गोपीनाथराव मुंडे यांच्यासाठी कामाचा अनुभव तर आहेच अन् सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे ते स्विय सहाय्यक आहेत.
बहुतांश लोकांना कोणताही पी. ए. म्हणजे शिष्ट, गर्विष्ठ, कामचुकार, पैसे खाऊ असाचं वाटतो. चहापेक्षा किटली गरम, नंदी आदी विशेषणे आणि दूषणे तर त्यांना नित्याचीच असतात. सर्वांना पि. ए. लोकांचा रुबाब दिसतो पण त्यासाठी अनेक वर्षे घेतलेली मेहनत, अपार कष्ट कोणाला दिसतं नाहीत हे या नौकरीचे दुर्दैव आहे.
जसे की सर्वांना वर्ल्ड कप उचलणारा एम. एस. धोनी दिसतो पण त्यासाठी अथक परिश्रम घेणारा महेंद्रसिंग दुर्लक्षिला जातो; अगदी तसेच सर्वांना सध्याचे प्रदीप कुलकर्णी अन् प्रशांत जोशी दिसतात मात्र त्यासाठी अहोरात्र झटणारे प्रदीप व प्रशांत कोणाला दिसत नाहीत.
कोणत्याही नेत्याचे कान, नाक, डोळे हे स्विय सहाय्यक असतात. सर्वजण एक गोष्ट विसरतात – नेता निर्णय घेताना पि. ए. लोकांचे इनपुट विचारात घेऊन स्वतःचे डोके वापरून निर्णय घेतात. त्यामुळे निर्णय आपल्या मनासारखा झाला तर तो नेत्याने घेतला आणि विरोधात गेला तर पिएमुळे झाला असे सरधोपट गणित सामान्य जनतेचे असते.
इतर लोकप्रतिनिधींच्या पिए लोकांचे वेगळे आहे. त्यांना फक्त त्यांच्या मतदार संघातून कामासाठी लोक फोन करतात किंवा भेटतात. या दोघांना मात्र राज्यातील जनता भंडावून सोडते.
काही गंमती जमती
दोघांशी माझा परिचय नेहमीप्रमाणे कटकटीने झाला. आजही काही मुद्द्यांवर मतभेद असतात पण आता परिस्थिती वेगळी आहे. सर्वांना एकमेकांचे स्वभाव ठाऊक झाले आहेत. या दोघांशी चांगला परिचय झाला तो डिसेंबर २०१४ च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान.
तेव्हा विद्यमान सरकार येऊन जेमतेम महिना – दीड महिना झाला होता.
एका संध्याकाळी नागपूरच्या विधान भवनातील पंकजा मुंडे यांच्या कार्यालबाहेर प्रदीप कुलकर्णी व मी बसलो होतो. त्यांचा फोन सारखा खणखणत होता, त्याचा वैताग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं होता. मी विचारलं “काय झालं दादा इतकं वैतागायला?” प्रदीप यांनी फोन हातात दिला आणि म्हणाले “करा थोडावेळ हँडल”.
त्यांच्याकडून फोन घेतला, पहिला फोन उचलला समोरून आवाज आला “सप्ताह सुरु आहे आणि पाणी नाही, जरा दोन टँकर पाठवून द्या.” मी म्हणालो “अहो, कोण बोलतंय? कुठून बोलताय?”.
समोरची व्यक्ती म्हणाली “ओ साहेब मी बोलतोय, इथूनच बोलतोय.”
मी पुन्हा विचारले “अहो, कोण बोलतंय? कुठून बोलताय?”
पुन्हा समोरून तेच उत्तर “ओ साहेब मी बोलतोय, इथूनच बोलतोय.”
अखेर फोन ठेवणे याशिवाय मी काहीच करू शकतं नव्हतो.
तो फोन ठेवतो न् ठेवतो पुढचा फोन आला.
“साहेब जरा ताईंना फोन द्या”.
मी म्हणालो “ताई सभागृहात आहेत, काय काम आहे सांगा. तुमचं नाव-गावं सांगा तसा निरोप देतो.”
समोरची व्यक्ती म्हणाली “माझा नंबर तुमच्याकडे नाही? हे बरोबर नाही. तुम्हीच सांगा मी कोण बोलतोय?” असं म्हणत समोरचा बाप्या १० मिनीटं नडला.
अखेर पंधरा मिनिटांनी प्रदीप यांना फोन परत दिला आणि हात जोडले. आता या खेळात प्रदीप चांगलेच मुरले आहेत. समोरच्या व्यक्तीला “माझा नंबर कुठून आणि कसा भेटला?” असे विचारात रडकुंडीला आणतात.
प्रदीप आणि प्रशांत यांच्यातील एक गमतीदार फरक म्हणजे प्रदीप हे कमालीचे फोटो पराङ्मुख आहेत तर प्रशांत प्रचंड सेल्फीप्रेमी आहेत. प्रदीप सोशल मीडियापासून जितके फटकून असतात तितकेच प्रशांत यांच्याबाबतीत जरा उलटे आहे. सोशल मीडियात पल पल की खबरवर त्यांचे लक्ष असते.
प्रशांत यांचा फोन म्हणजे जीव की प्राण आहे. सतत अपडेट राहणे. बातम्या टाकणे हा त्यांचा आवडता उपक्रम. त्या धांदलीत कधीकधी “प्रिंटच्या जागी फिल्म” करतात, तर कधी “पैशांचा पाऊस पाडतात”.
एका WhatsApp group वर प्रशांत, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे आणि माझी जुगलबंदी चांगलीच रंगायची. बाकी, काही असो प्रशांत जोशी हे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. कमालीचा संयम हा त्यांचा खरा यूएसपी आहे. नवनवीन तंत्रज्ञान शिकणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
काही व्यथा
दीड-दोन वर्षांपूर्वी राज्यात नगर परिषद निवडणुकीचे वारे वाहत होते. ऐन त्या गडबडीत प्रदीप जरा चिंताग्रस्त जाणवत होते. थोडी माहिती काढली असता कळाले की त्यांच्या पत्नी सौ. कल्पना वहिनी एका मोठ्या आजाराशी निकराने लढत होत्या.
“मुलं शिक्षणाचे तरीही आधी लगीन कोंढाण्याचे” या उक्तीप्रमाणे प्रदीप हे सर्वसामान्य परिस्थिती आहे असे भासवत प्राणपणाने काम करत होते.
प्रशांत यांच्या पत्नी सौ. वैभवी वहिनी एका सहकारी बँकेत नौकरीला होत्या. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांची किंमत त्यांना नौकरीतील त्रासाने मोजावी लागली. काहीच चूक नसताना बँकेने दूर बदली केली. अखेर वहिनी सध्या गृहिणी म्हणून समर्थपणे कुटूंब सांभाळत आहेत.
काँटों का तो नाम ही बदनाम है… चुभती तो निगाहें भी है…
कोणतेही सण वार असो या दोघांना नेत्यांच्या आणि जनतेच्या तैनातीत रहावे लागते. कोणी म्हणतं की “दोघेही उपकार करत नाहीत, कामाचा पगार घेतात.” हे तेच लोक बोलतात ज्यांना कामाच्या ठिकाणी पाच मिनिटंदेखील अधिक झाले तरी जीवावर येते.
दौऱ्यावर असताना नेते मंडळी उठायच्या आधी तयार होऊन नेत्यांची तयारी करून ठेवावी लागते आणि झोप नेत्यांचा डोळ्याला डोळा लागला की येते. इतकं सारं करूनही पदरी लोकांची दूषणेच.
काँटों का तो नाम ही बदनाम है… चुभती तो निगाहें भी है… याप्रमाणे दोघेही आपापले काम आपापली स्वामीनिष्ठा जपतं करतं आहेत. अर्थात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनाही श्रेय द्यावे लागेल की प्रशांत जोशी असो वा प्रदीप कुलकर्णी यांच्या कितीही तक्रारी आल्या तरी योग्य ती शहानिशा करूनच त्या तक्रारींची दखल दोन्ही नेते घेतली तर घेतात.
२०१९ जसेजसे जवळ येईल दोघांचेही व्याप वाढणार आहेत, या व्यापाचे तापात नको तर उत्तरोत्तर यशात रुपांतर होवो अशा जोशी-कुलकर्णी या द्वयींना शुभेच्छा देऊन लेखणीला विराम देतो.
जय हिंद!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.