प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास : भाग १
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – आदित्य कोरडे
—
२० डिसेंबर २०१७ रोजी पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि अगदी सहजच पु लं ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या घराच्या चोरीची कथा आठवली. ही चोरी त्याच्या घराची किंवा घरातल्या कोणत्याही मौल्यवान चीजवस्तूची नसून प्रत्यक्ष चॅप्लिनच्या मृतदेहाची होती.
पु लं च्या घरी काही मौल्यवान चीजवस्तू मिळेल ह्या आशेने चोरी करणारे ( हा असला दुसरा प्रयत्न आहे म्हणे) पु ल नीच म्हटल्याप्रमाणे एखाद्या बँकेवर धाडशी दरोडा घालून पट्टेवाल्याची फक्त टोपी चोरणाऱ्याच्या वंशाचे असणार …. पुलंचा मौल्यावान खजिना तर आमच्यासारख्यांच्याकडे आहे आणि तो चोरी होऊ शकत नाही … असो चार्लीच्या शवाच्या चोरीबद्दल मात्र पुढे सांगेन …
नुकताच २५ डिसेंबर म्हणजे नाताळ झाला. येशू जन्म, सांताक्लोज असलेल्या नेहमीच्याच लोकांपेक्षा ह्या दिवशीची थोडी वेगळी आठवण जर सांगायची म्हटले तर आजपासून बरोबर ४० वर्षापूर्वी सगळ्या जगाला हसवणारा आणि हसवता हसवता गहिवर आणणारा मूकपटांचा अनभिषिक्त बादशहा चार्ली चॅप्लिन हा काळाच्या पडद्या आड गेला.
एकशे तीन वर्षांपूर्वी म्हणजे १९१४ साली त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला होता “Making a Living नावाचा तर १९६७ साली म्हणजे ५० वर्षापूर्वी त्याचा शेवटचा चित्रपट आला होता A Countess from Hong Kong.
त्याने एकूण ८२ चित्रपट बनवले ज्यातले बहुतेक म्हणजे ७७ मूकपट होते तर ५ बोलपट होते. बहुतेक असे म्हटले कारण त्याच्या अनेक मुकापटाना नंतर संगीत दिले गेले होते. तर शेवटचा A Countess from Hong Kong हा अपवाद सोडला तर हे सगळे चित्रपट कृष्ण धवल ३५ मिमी फिल्म वर शूट केलेले होते. त्याचे The Kid (1921), City Lights(1931), Modern Times(1936), The great Dictator(1940) Limelight (1952) हे चित्रपट मास्टरपीस मानले जातात.
आजदेखील चार्लीचे चित्रपट कुठल्या न कुठल्या वाहिनीवर दाखवले जात असतातच. बघता बघता ४० वर्षे झाली त्याला जाऊन आणि ५० वर्षे शेवटचा चित्रपट बनवून, काळ किती भराभर पुढे जातो पण अर्धशतक होऊन गेले तरी ज्याची लोकमानसावरची मोहिनी यात्किंचीतही कमी झाली नाही अशा दुर्मिळ लोकांपैकी एक चार्ली चॅप्लिन!
चार्ली कोणाला माहित नसेल? तो कुणाला माहिती नाही असे होणे शक्यच नाही आणि आवडत नाही असे तर अजिबातच शक्य नाही. माझ्या ७ वर्षाच्या मुलीला अन तिच्या कंपूला देखील तो आजही माहिती आहे, नव्हे तो त्यांचा आवडता आहे आणि त्याचे बरेच चित्रपट तिने मला विकत घ्यायला लावलेत.
शिवाय हल्ली सुरु झालेली कार्टून वरची सिरीयल आहेच – ती मात्र रटाळ आहे. असो… नुकतीच एक बी बी सी ने बनवलेली चार्ली चॅप्लिन वरची चांगली दीड तासाची डॉक्युमेंटरी डाऊन लोड करून पहिली आणि थोडा धक्काच बसला.
त्या डॉक्युमेंटरी प्रमाणे चार्ली हा हॉलीवूडचा पहिला अंतरार्ष्ट्रीय ख्याती पावलेला इसम. त्याच्या काळात चार्ली चॅप्लिन हा जगातला सर्वात लोकप्रिय इसम होता. इतका की लेनिनने असं एकदा म्हटले होते म्हणे की हा (चॅप्लिन) असा एकच माणूस आहे की मला त्याला जाऊन भेटायची इच्छा आहे.
चॅप्लिनची उंची इतकी की चर्चिल आपल्या चार्त्वेल इथल्या राजघरात त्याला राहायला बोलावत असे. बर्नार्ड शॉ, केन्स, एच जी वेल्स.. असे अनेक नामवंत लोक चार्लीचे चाहते होते. याचा चॅप्लिन यालाही अभिमान होता. अगदी गर्व वाटावा इतका होता. त्याचमुळे तो एकदा म्हणाला होता जगात ज्या प्रदेशात लोकांना येशू ख्रिस्तही माहीत नाही, त्या प्रदेशातल्या लोकांना ही मी ठाऊक आहे.(आणि ही वस्तुस्थिती होती.)
तर ही डॉक्युमेंटरी पाहून मला जाणवले कि कलाकार, त्याची कला, कर्तृत्व, दानत, त्याची जनमानसातली प्रतिमा त्याचे सामाजिक व्यक्तिमत्व आणि त्यामागचा माणूस, इत्यादींच आणि त्याचं व्यक्तिगत आयुष्य ह्यांचा आपण जर अन्योन्य संबंध शोधू लागलो तर दारुण अपेक्षाभंग होऊ शकतो. चार्लीसारख्या कलाकाराच्या बाबतीत तर या अपेक्षाभंगाच्या वेदना अधिक तीव्र असू शकतात.
मोठ मोठ्या साहित्यिकांचे जसे मानसपुत्र असतात किंवा असत आणि ते इतके प्रसिद्ध असत कि त्या साहित्यिकांचे नाव घेतले कि ते मानसपुत्रच समोर येतात उदा. भा रा भागवत आणि फास्टर फेणे, ना धो ताम्हणकर आणि गोट्या किंवा आर्थर कॉनन डायल आणि शेरलॉक, तसाच चारली आणि त्याचा जगप्रसिद्ध लिटल ट्रम्प. चारली म्हटले कि हा काहीसा भोळा वेन्धळा, गरीब, धडपड्या पण प्रामाणिक आणि सत्प्रवृत्त लिटल ट्रम्प डोळ्यासमोर येतो.
मुळातला चार्ली कितीही वेगळा असला ( आणि होताच ) तरी त्याची ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरून जात नाही इतकी त्या प्रतिमेची पकड आज जवळपास १०० वर्षानंतरही आपल्यावर कायम आहे.
सिनेजगतात इतके प्रभावी आणि इतके दीर्घकाळ आपली मोहिनी टिकवून असणारे प्रतिमा सृजन ह्या आधी किंवा नंतर झालेले नाही. ह्या लिटल ट्रम्पची भुरळ भल्या भल्या चित्ररथीना, साहित्यिकांना, कलावंताना पडलेली आहे. आपल्याकडे राज कपूर पासून, शम्मी कपूर, अमिताभ बच्चन ते अगदी आपल्या पु ल देशपांडे यांच्यापर्यंत अनेकांनी आपापल्या परीने हा लिटल ट्रम्प साकारलाय (आणि यश ही मिळवलय).
पण चार्ली वैयक्तिक आयुष्यात इतका साधा भोळा गरीब ( स्वभावाने देखील) विनोदी वगैरे नव्हता. नव्हे त्याचे आयुष्य आणि व्यक्तिमत्व विरोधाभासांनी भरलेलं होतं. तो क्वचितच हसायचा. त्याच्या चेहऱ्यावर सहजासहजी स्मित आलंय असं कधी व्हायचं नाही. तो संशयी होता. रागीट होता एकलकोंडा होता, बाईलवेडा होता.
पडद्यावर साधाभोळा सज्जन सहृदय वाटणारा चार्ली प्रत्यक्ष स्वत:च्या पोटाच्या मुलांशी क्रूर पणे वागायचा, तो धनाढ्य होता आणि विलासी आयुष्य जगात होता हा सगळा पैसा त्याने भांडवलशाही अमेरिकेत कमावला पण तो कम्युनिझमचा समर्थक आणि स्टालिनचा चाहता होता.
त्याच्या ह्या कम्युनिस्ट प्रेमाने त्याने FBI च्या चौकशीचा ससेमिरा मागे लाऊन घेतला ज्याचे फलस्वरूप त्याला अमेरिका कायमची सोडावी लागली. त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आले आणि त्यातल्या बहुतेक त्याच्यापेक्षा वयाने खूप म्हणजे खूपच लहान होत्या. त्याची चौथी आणि शेवटची पत्नी उना ओ नील ( ख्यातनाम अमेरिकन नाटककार युजीन ओ नील ची मुलगी ) ही त्याच्या पेक्षा ३६ वर्षानी लहान होती. त्यादोघांनी लग्न केले तेव्हा चार्ली ५४ वर्षांचा होता तर उना फक्त १८ वर्षांची.
लग्नानंतर त्यांना एक नाही दोन नाहीतर चक्क ८ मुलं झाली. शेवटचे मुल झाले तेव्हा चार्ली ७३ वर्षांचा होता. पण त्याच वेळी तो एक जीनियस कलाकार होता. त्याने त्याकाळी जी प्रसिद्धी प्रेम आणि यश मिळवलं टिकवल आणि वाढवलं तसं मिळवणं आजही कुणाला जमलेलं नाही.
१६ एप्रिल १८८९ रोजी चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन याचा जन्म दक्षिण लंडन मध्ये वाल्वर्थ इथे एका जिप्सींच्या कोचमध्ये (वाहनातले घर) झाला लंडनचा हा भाग १९ व्या शतकाच्या शेवटी शेवटी विकटोरीयन कर्मठ इंग्लिश समाज जीवनावरचा उतारा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अनिर्बंध जुगार, वेश्याव्यवसाय, दारू आणि इतर नशापाण्याचे अड्डे ह्याने हा भाग गजबजलेला असे. तिथे असलेल्या म्युझिक हॉल मध्ये अनेक अप्रसिद्ध, गरीब कलावंत आपली कला – गाणी नाटक एकपत्री प्रयोग सादर करत आणि उपजीविका चालवत.
तिथेच अशी सटर फटर कामं करून उपजीविका चालवणारा चार्लीचा बाप चार्ल्स स्पेन्सर चाप्लीन सिनियर हा एका खाटकाचा मुलगा तर आइ हाना चाप्लीन ही एका चाम्भाराची मुलगी हे ही होते.
हे दोघे नवरा बायको वाल्वर्थ इथल्या गजबजलेल्या म्युझिक हॉलमध्ये गाणी नाच नाटक नकला वगैरे करून लोकांचे मनोरंजन करीत व गुजराण करीत. आता ह्या माहितीला तसा पुरावा काही नाही. स्वत: चार्लीनेच ही माहिती सांगितली आहे. चार्लीचा मोठा भाऊ सिडने हा त्यांच्या लग्नाच्या आधीच तिला झालेला होता आणि त्याचे वडील कोण हे ठावूक नव्हते. तो म्हणजे सिडने १४ आठवड्यांचा असताना हाना आणि चार्ल्स ने लग्न केले आणि नंतर चार वर्षानी चार्लीचा जन्म झाला. काही लोकांच्या म्हणण्या प्रमाणे तो जे सांगतो तेच त्याचे वडील होते किंवा काय, या संदर्भातही प्रश्न आहेत.
जो कोणी गृहस्थ वडील म्हणून सांगितला जातो तो व्यसनी, दारूडा बाईलवेडा होता. अन ३८ व्या वर्षीच तो दारू पिऊन मेला. चार्लीच्या आईसंदर्भातही काही गंभीर शंका आहेत.
काही काळ तिला लिली हार्ली ह्या नावाखाली बऱ्यापैकी प्रसिद्धी आणि कामं मिळाली खरी पण अतिरिक्त मद्यपानाने तिचा आवाज खराब झाला, मस्तकशूळाचा विकार जडला आणि मग तिला काम मिळेनासे झाले. नंतर चार्लीच्या आईनं जगण्यासाठी नर्सची काम, कपडे शिवायची काम अशी पडेल ती कामं केली. प्रसंगी चरितार्थासाठी देहविक्रयही केला. तीही व्यसनी होती आणि बेकारी,अपयश, गरिबीमुळे लवकरच नैराश्यग्रस्त झाली आणि पुढे तर मनोरुग्णच झाली.
त्यामुळे वेगवेगळय़ा पुनर्वसन केंद्रांवर तिला वारंवार दाखल करावं लागलं होतं. चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा सरकारी वसतिगृहांतच गेला. साधारण एकुणात तो २ वर्षे शाळेत गेला. बास पुढे नाही..
===
क्रमशः
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com |त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.