इस्लामचा त्याग करणे शक्य आहे काय? धर्मांतर केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
धर्म ही अत्यंत नाजुक बाब आहे. भारत हा असा देश आहे जिथे अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. आनंदाने एकमेकांचे सण साजरे करतात. यानिमित्ताने आपल्याला इतर धर्मांची ओळख होते.
शालेय जीवनात आपण इतर धर्मांमधील प्रथांचा अभ्यास केलेला असतो, पण पुस्तकी ज्ञानापेक्षा वास्तव मात्र वेगळं असतं.
भारतीय घटनेच्या २५ व्या कलमानुसार प्रत्येक नागरिकाला आपला “धर्म” स्पष्टपणे जाहीर करणे (to profess), आचरण करणे व प्रसार करणे याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जगातील इतरही प्रमुख राष्ट्रांनी (उदा.यु एस्, यु.के, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी) नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले आहे.
जगाच्या इतिहासात धार्मिक कारणावरून फार मोठा हिंसाचार घडून आला आहे व आजपर्यंत चालूच आहे. अनेक विद्वान,समाजशास्त्री व मानवतावादी लोक या हिंसाचाराला कसे आटोक्यात आणता येईल या विषयी चिंतीत आहेत.
धर्म ही वैयक्तिक गोष्ट असून प्रत्येक मनुष्याला आपला धर्म निवडण्याचा अथवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे या विचाराप्रत ते आले असून त्याचा प्रचार व प्रसार ते आपल्या बोलण्यातून आणि प्रसारमाध्यमातून व्यक्त करत असतात. युनोच्या मानवी हक्क जाहिरनाम्यातील कलम १८ असे सांगते की,
“प्रत्येकाला विचार करण्याचे,सदसद्विवेकबुद्धी वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, यात धर्म बदलण्याचा, व्यक्ति अथवा समाज म्हणून, खाजगी अथवा सार्वजनिकरित्या धर्म, श्रध्दा, शिकवण, पूजा-अर्चा समाविष्ट आहे.”
धार्मिक स्वातंत्र्य याचा अर्थ “जुन्या धर्माचा त्याग करून नवीन धर्म स्वीकारणे” असा होतो व हे वरवर बघता कोणताही धर्म नाकारत नाही. धर्मांतर करण्यासाठी आधीच्या धर्माचा त्याग करणे ही अपरिहार्य गोष्ट असते.
इतरांनी आपला धर्म स्वीकारावा यासाठी अब्राह्मिक (ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम) धर्मातील लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात, परंतु आपल्या अनुयायांनी इतर धर्म स्वीकारण्याची मुभा या धर्मांमध्ये नाही.
विशेषतः इस्लामची भूमिका या बाबतीत अधिक कठोर आहे.
हा विषय स्पष्ट होण्याकरता एक उदाहरण घेऊ. एका मोठया पटांगणात हिंदूं, बौद्ध, ख्रिस्ती, ज्यू, इस्लाम असे पिंजरे ठेवलेले आहेत. त्यातील प्रत्येक पिंजऱ्याला दोन दरवाजे आहेत, एक आत येण्यासाठी व दुसरा बाहेर जाण्यासाठी.
कोणालाही आपल्या इच्छेनुसार दुसऱ्या पिंजऱ्यात जाण्याची मुभा आहे. त्यातील काही जण इस्लामच्या पिंजऱ्यात घुसले. घुसल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, “अरे या पिंजऱ्याला बाहेर पडण्याचा दरवाजाच नाहीये..!”
असा हा प्रकार आहे. हे विशेषतः सर्व धर्म समभावाच्या गप्पा मारणाऱ्यांनी लक्षात ठेवणे आवश्य. असो.
धर्मत्याग करणाऱ्याला अरबी भाषेत “मुर्तद” असा शब्द आहे. इस्लामी कायद्यानुसार, “मृत्युदंड” हीच धर्मत्यागासाठी शिक्षा आहे. ही शिक्षा श्रध्दावानांनी (मुस्लिमांनी) इहलोकात द्यावयाची की,अल्लाह ती परलोकात देणार याविषयी काहीसा वाद आहे.
परंतु धर्मत्याग करणाऱ्याला या भूलोकातच देहांताची शिक्षा दिली पाहिजे असे इस्लामी न्यायशास्त्राच्या रथी-महारथींचे प्रतिपादन असते. त्यासाठी ते कुराणातील आयातींचा दाखला देत असतात.
असे असले तरी इस्लामच्या आरंभीच्या काळापासून धर्मत्यागाची उदाहरणे आढळून येतात. त्यातील काही जणांनी इस्लामचा प्रत्यक्ष त्याग जरी केला नसला तरी धर्म विरोधी आचरणाचा आरोप ठेऊन त्यांना धर्मबाह्य ठरवण्यात आले. यातील बहुतेकांची हत्या करण्यात आली. (252/इस्लामचे अंतरंग: लेखक: श्रीरंग गोडबोले).
सध्याच्या महितीयुगात विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बंधने घालणे अवघड झाले आहे. मुद्रित वाङ्मयावर बंदी घालणे शक्य असले तरी इंटरनेटमुळे कोणतीही माहिती आज जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत क्षणार्धात पोहोचते.यु ट्यूब वर अशाअसंख्य भूतपूर्व मुस्लिमांनी आपले अनुभव कथन केले आहेत.
धर्म सोडण्यामागची कारणे कोणतीही असोत मुस्लिम व्यक्तीसाठी धर्मत्याग करणे ही सोपी गोष्ट नसते. प्रचंड तणावाखाली त्यांना जीवन जगावे लागते. प्रत्यक्ष मृत्युदंड दिल्याच्या किंवा प्राणघातक हल्ले केल्याच्या बातम्या नेहमी कानावर पडत असतात.
भारतातील एका टीव्ही चॅनेलवर एका मौलानाने हे जाहीरपणे सांगितले की, ‘इस्लाम धर्म सोडून जाणाऱ्या माणसाला मृत्यूदंड हीच शिक्षा आहे.’
अशा भूतपूर्व मुस्लिमांना सुरवातीला स्वतःचा स्वतःशीच होणाऱ्या संघर्षाला सामोरे जावे लागते. नंतर कुटुंब, समाज आणि जर इस्लामिक देश असेल तर त्या देशाच्या शासन यंत्रणेकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवावे लागते.
कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल व पुढील आयुष्य कसे जगायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो.
अशा भूतपूर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन त्या त्या देशात स्वतंत्र आधार गट स्थापन केले आहेत. त्याद्वारे सभासदांना कायदेशीर आर्थिक,भावनिक पाठबळ मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.