' सरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव! – InMarathi

सरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अंत्योदय घटकाला सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी सरकारने घेतली असेल. पाणीदार महाराष्ट्र, योजना संपन्न महाराष्ट्र, आरोग्य निधी भरभरून गावागावात पोहोचलेला महाराष्ट्र, अंत्योदय घटकांच्या कल्याणाची जबाबदारी घेतलेला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राची सत्ता हे सगळं वर्तमानपत्र, टीव्ही, चर्चा, डिबेट अन प्रचार, प्रसिद्धीला सोप्पं असतं.

लोकशाही असलेल्या या महाराष्ट्रात माझं गाव अजून किती अंत्योदय घटका मोजतंय हे ना सरकारला माहितेय, ना जिल्हा परिषदेला माहितेय, ना खासदारांना माहितेय, ना आमदारांना माहितेय, ना जिल्हा परिषद सदस्यांना…

सर्वात पुढे असणाऱ्या महाराष्ट्रात भाजपाची सरशी झाली असली तरी ग्रामीण चेहरा अजून माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मोहोळ तालुक्याच्या वाघोली गावात पोहचला नाही. हे गाव गेली १५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मिरवणाऱ्या एका इसमाचे गाव आहे.

निवडणुकांचा जोर सुरु झाला की गाव आठवतो, बकऱ्या, मटणाच्या पार्ट्यांचा धिंगाणा सुरु होतो. लोकसभेला भोंगे लावून अर्धवट तोतऱ्या माईकवर भरचक्क गावगर्दी होते.

 

elections-inmarathi
indianexpress.com

मोदींचा फेव्हर घरापर्यंत पोहोचलेला पाहिला, इंदिरा गांधींसाठी जीव ओवाळणारी माणसंसुद्धा तुरळक आहेत अजून गावात. विधानसभेला राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. थोडक्या कालावधीत गुलाल उधळणारा सिंघम आमदार रमेश कदम घराघरापर्यंत चर्चेचा विषय बनलेला पाहिला.

लोकसभेच्या मोदी लाटेत हिरो असलेल्या अन कधीही न पाहिलेल्या शरद बनसोडेना खासदार केलं.

२०१५ च्या नोव्हेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आणि बहुजन ग्रामविकास नावाचा पॅनल एकतर्फी आला. केंद्र, राज्य, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत असं सगळीकडेच खऱ्या अर्थाने परिवर्तन झालं. मात्र हे सगळं झालं असलं तरी माझं गाव हे लोकप्रतिनिधी नसलेलं गाव म्हणून आता केवळ अधिकृत घोषणा करणं बाकी आहे.

ना पिण्याच्या पाण्याची सोय मुख्यमंत्री पेयजल योजनेतून झाली, ना मजुरांना काम दिलं गेलं, ना गावात विजेची सोय आहे, ना गावाला कोण वाली आहे. सगळंच अंदाधुंदी सुरुय.

नरेंद्र मोदीना पाहून निवडून दिलेले खासदार कधी गावात आल्याचं गावकऱ्यांनी पाहीलंच नाही. निवडून आल्यावर जाताना रस्त्यावर थांबले, ते खरं. सिंघम आमदार असणारे रमेश कदम तर गावाच्या ध्यानातही नाहीत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेले आमदार कदम आणि आमचा गाव कधी स्वप्नातही गाठभेट नाही.

 

ramesh-kadam-inmarathi
timesofindia.indiatimes.com

जिल्हा परिषदेच्या सदस्या असलेल्या महिला प्रतिनिधी गावच्या वेशीपासून अजून अंतर राखून आहेत. प्रतिज्ञापत्र उशिरा दिल्याचा ठपका ठेऊन तब्बल एक वर्षापासून अपात्र ठरवलेले ग्रामपंचायतीचे सरपंच मुकुंद पाटील हतबल झालेत. काम करण्याची धमक आहे मात्र अधिकार नसल्याची खंत लपून राहत नाही.

माझ्या घरापर्यंत वस्तीला जोडणारा दगडांचा रस्ता महाराष्ट्रात कदाचित एखादाच असावा, इतका वाईट आहे.

सोलापूर – कोल्हापूर अशा मोठ्या शहराच्या रस्त्यावर असणारा गाव कधी मागे निघून जातो कळत नाही, ना विजेचा खांब आहे, ना कुठली निशाणी आणि गावाला स्टँड नावाचा प्रकार नाही.

 

India-Drought-inmarathi
indianexpress.com

गावाला नवीन एकही योजना येत नसली तरी पूर्वी आलेल्या योजना केवळ कुणीही वाली नसल्याने परत जाताहेत हे महादुर्दैव. आरोग्य उपकेंद्र मंजूर होऊन अनेक वर्षे झाली मात्र त्याची पुढे कोणतेही कार्यवाही नाही. धवलक्रांती म्हणत जनावरे घेऊन कामधंदा करणाऱ्या गावकऱ्यांनी तब्बल २००० एवढं पशुधन वाढवलं आहे. मात्र जनावरांचा दवाखाना नाही.

तरुण मुलांना व्यायामासाठी व्यायामशाळा नाही, दलित वस्ती सुधार निधी म्हणून आलेला तब्बल १८ लाखांचा निधी आता परत जाण्याच्या मार्गावर आहे.

जिल्हा परिषदेमार्फत आलेला वाघोली – कुरूल या रस्त्याचा १५ लाखांचा निधी तर दुसऱ्याच गावाला घेऊन गेले. तुमची शहरं गलेलठ्ठ पगारांवर इमले वाढवत असली तरी गावच्या शेताभातात राबणाऱ्या माणसांना अजून सरकार काय काम करतं याची पुसटशीही कल्पना नाही.

तब्बल ११ वर्षापासून सरपंचांना पदापासून वंचित ठेवलं असलं तरी विभागिय आयुक्तांनी प्रशासक नेमण्याचंही धाडस केलं नाही.

सर्वात पुढे तुमचा महाराष्ट्र असेल, नसेल माहित नाही. राज्याच्या मखमली सत्तेत बसणारा आणि विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारा नेता आपल्याकडे वर्षानुवर्षे थकीत असलेला लाखोंचा कर भरण्यास धजावत नाही, हेही तेवढंच सत्यय. खरंतर, या अंत्योदय घटकांच्या कल्याणासाठी म्हणून डांगोरा पिटणाऱ्या सरकारला माझ्या गावापर्यंत येता आलं तर बघा नाहीतर माझा गाव सरकारपासून अजून कोसोमैल लांब जाईल……!

 

village-maharashtra-inmarathi
wordpress.com

इंडियापासून भारतापर्यंत…..अन भारतापासून इंडियापर्यंत कसाही प्रवास करा…. माझ्या गावाला लोकप्रतिनिधीच नाही आणि अशी सजा भोगत असलेलं गाव तुमच्या इंडियात एकच असेल हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहित असणं महत्वाचंय !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?