जपानने पर्ल हार्बर वर केलेला हल्ला खरंच “विनाकारण” होता का? सत्य जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
पहिले महायुद्ध हे ‘ग्रेट वॉर’ किंवा ‘वॉर टू अॅन्ड ऑल वॉर्स’ या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै १९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत युरोपमध्ये झाले.
इतिहासातील सर्वात मोठ्या लढ्यांपैकी ह्या एका लढ्यात ६० मिलियन युरोपीय सहकारी आणि ७० दशलक्षांपेक्षा जास्त सैनिक होते.
युद्धाचा परिणाम म्हणजे यात १९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व सात लाख नागरिक ठार झाले होते. ह्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांतीसह मोठ्या राजकीय बदलांसाठी मार्ग प्रशस्त झाला.

ह्या युद्धानंतर अनेक वर्षांपर्यंत जगातील अनेक देशांना हे कळून चुकले होते की ह्याप्रकारचे युद्ध हे आपल्यासाठी महाविनाशच घडवून आणतील.
त्यामुळे सर्वच देशांचे ह्यावर एकमत झाले की पुन्हा ह्या प्रकारचे युद्ध कधी होऊ नये.
पण पहिल्या महायुद्धा नंतर असेही काही देश होते, जे अजूनही विरोधाभासाच्या विळख्यात अडकून होते.
ह्या महायुद्धानंतर जगाने पहिल्यांदाच वैश्विक मंदी देखील अनुभवली, ज्यामुळे अनेक राष्ट्रांत असंतोष निर्माण झाला होता. त्यांना त्यांचा बदला घेण्यासाठी केवळ संधी हवी होती.
आणि ही संधी त्यांना पहिल्या महायुद्धाच्या २१ वर्षांनंतर मिळाली.

यादरम्यान १९३१ साली जपान अचानकपणे एक विध्वंसक राष्ट्र म्हणून समोर आले. मधल्या काळात जपान आणि चीन ह्यांच्यामध्ये अनेक भयानक आणि विध्वंसक लढाया लढल्या गेल्या.
ह्या युद्धाची सुरवात तेव्हा झाली जेव्हा जपानने चीनच्या मांचुरिया प्रांतात आक्रमण केले.
यातील नानजिंग नरसंहार हा सर्वात भयानक होता. ह्या शहरात झालेल्या हल्ल्यात जपानी सेनेने चीनच्या ३ लाखाहून जास्त लोकांचे प्राण घेतले होते.
पण हे युद्ध जपान आणि चीन ह्यांच्यातले होते. मग यात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हल्ला का केला?
दुसरे महायुद्ध हे जपान आणि चीन ह्यांच्यातील लढायांनी सुरु झाले. ज्यात पर्ल हार्बर हल्ल्यानंतर अमेरिकेने देखील उडी घेतली.
आणि जगाने पुन्हा एकदा एका भयानक महायुद्धाचा थरार अनुभवला.

पर्ल हार्बर, हवाई येथील हे अमेरिकेचे एक नाविक तळ आहे. जिथे अमेरिकेचा सर्वात मोठा नाविक तळ होता.
जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चीनला सैन्य आणि आर्थिक मदत वाढविली. तर जपानला तेल आणि इतर कच्च्या मालाची निर्यात कमी केली.
या प्रतिबंधनामुळे जपानने अमेरिकेला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका मानले.
म्हणून त्यांनी जपानच्या ताब्यात नसलेल्या तेल आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न असलेल्या इतर आशियाई व प्रशांत महासागरातील क्षेत्रांवर कब्जा करण्याचा निर्णय घेतला.
पण जपानला हे माहित होते की अमेरिका चीनशी असलेल्या युद्धात त्यांची मदत करणार नाही, तसेच आशियातील अतिरिक्त क्षेत्र जप्तीसाठी देखील ते सहमती देणार नाही.
अमेरिका आणि जपान ह्या दोन्ही सरकारांनी आपापली मजबूत भूमिका घेतली होती. दोघांपैकी कुणीही एकमेकांसमोर नमायला तयार नव्हते.
आता हे दोन्ही राष्ट्र एकमेकांचा राष्ट्रीय स्तरावर पाणउतारा केल्याशिवाय शांत राहणार नव्हते.

तरी देखील दोन्ही राष्ट्रांच्या सरकारने वाटाघाटी करून शांतीपूर्ण पर्याय काढण्याचा आपापला प्रयत्न सुरु ठेवला होता.
पण जपानी सरकारच्या मते अमेरिकेसोबतचे युद्ध अनिवार्य होते आणि त्यानुसार त्यांनी तयारी करण्यास सुरवात देखील केली होती.
अमेरिकेचा पराभव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पर्ल हार्बरवरील अमेरिकन पॅसिफिक फ्लीटला निर्णायक धक्का देणे. ही पहिली कारवाई असेल असे जपानने ठरवले.
त्यांना असे वाटायचे की याने अमेरिकेच्या आद्योगिक क्षेत्राला खूप हानी पोहोचेल आणि त्यांच्या सैन्याचे यश हे केवळ पॅसिफिक फ्लीट वर अवलंबून आहे, जे जपान युद्धाच्या सुरवातीच्या काळातच नष्ट करेल.
आणि जेव्हा अमेरिका ह्या हल्ल्यातून सावरत असेल, तेव्हा आपण सहजपणे त्यांच्या आशिया आणि पॅसिफिक दरम्यान चालणाऱ्या सैन्य मोहिमांचा पाठपुरावा करू शकू.
जपानी सरकारला असे देखील वाटले होते की, ह्या निर्णायक विजयाने अमेरिका निराश, हताश होऊन जाईल आणि जपान विरोधात युद्धात का पुकारले ह्यावर पश्चाताप करेल.
पण इथेच जपानने एक खूप मोठी चूक केली होती. ती म्हणजे अमेरिकेला कमी लेखण्याची! ज्याची शिक्षा हिरोशिमा आणि नागासाकीने भोगली.

७ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी जपानाने अमेरिकेच्या पर्ल हार्बर येथील नाविक तळावर आकस्मिक हल्ला चढवला.
३५३ जपानी लढाऊ विमाने, बाँब आणि टॉर्पेडो विमाने यांचा वापर करून तळावर हल्ला केला. अमेरिकन नौदलाच्या आठही लढाऊ जहाजांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांपैकी चार जहाजे बुडाली.
या आठपैकी सहा जहाजे पुन्हा मिळवून्, दुरुस्त करून त्यांचा वापर पुढे युद्धात करण्यात आला.
जपानी नौदलाने तीन क्रूझर, तीन विनाशिका, एक विमानविरोधी प्रशिक्षण नौका आणि एक सुरुंगनौका यांचेही नुकसान केले. अमेरिकेची १८८ विमाने नष्ट झाली.
२,४०२ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले. १,२८२ अमेरिकन लोक जखमी झाले. वीजकेंद्र, गोदी, इंधन व टॉर्पेडो साठवण्याची गोदामे तसेच, पाणबुडीचे धक्के आणि मुख्यालय यांवर हल्ला केला गेला नाही.
अमेरिकेच्या तुलनेत जपानाचे कमी नुकसान झाले: २९ विमाने आणि ५ लहान पाणबुड्या नष्ट झाल्या, ६५ सैनिक कामी आले वा जखमी झाले व केवळ् एक जपानी सैनिक पकडला गेला.
ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला व त्याने अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले.
८ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानाविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनच्या बाजूने युद्धात उतरली.
यापुढील अमेरिकन कारवायांमुळे जर्मनी व इटली यांनी ११ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले ज्याला अमेरिकेने तसेच प्रत्युत्तर दिले.
तत्कालीन अमेरिकन साष्ट्रपती फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांनी ७ डिसेंबर, १९४१ या दिवसाबद्दल ‘अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी’ (बदनाम, असंतोषजनक दिवस) असे उद्गार काढले होते.

जपानने भलेही युद्धाच्या दृष्टीने चांगली खेळी खेळली. पण तीच खेळी त्यांच्यावर उलटून आली. त्यांनी अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर नाही तर त्यांच्या मनावरच जणू हल्ला केला होता.
ह्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणु हल्ला केला.
तेव्हा संपूर्ण जगाने पहिल्यांदाच अणु हल्ल्याचा विध्वंस अनुभवला. आणि जपान अजूनही त्या हल्ल्यातून सावरू शकलेला नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.