ग्रहणाची शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यावर “अंधश्रद्धांवर” हसावं की रडावं कळतंच नाही..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
अवकाशात घडणाऱ्या अनेक घटनांनी माणसाला सुरुवातीपासून कोड्यात टाकलं आहे. या घटनांच्या कुतुहलापायी माणसाने अनेक शोध लावले. अफाट तर्कशक्ती आणि उपलब्ध साधनांच्या बळावर तो आकाशातील घटनांचे अचूक अंदाज लावायला शिकाला, इतकेच नव्हे तर चंद्र, मंगळ यांपर्यंत पोहोचला.
मात्र याचवेळी त्याने त्या गोष्टी स्वतःच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असा कयास बांधण्यास सुरुवात केली. आणि यातून अनेक ही अंधश्रद्धांचा जन्म झाला.
ग्रहणात घराबाहेर पडु नकोस, घरात झोपु नकोस, ग्रहण सुटल्यास अंघोळ कर अशा सुचनांचा पाऊस तुमच्यावरही अनेकदा कोसळला असेल. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती घेतली तर वर्षानवुर्ष पाळल्या जाणा-या अंधश्रद्धांबाबत हसु आल्याखेरीज राहणार नाही.
हे ही वाचा –
- “रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा याचं शास्त्रीय उत्तर
- भानामती, काळी जादू, करणी भारतातल्या या ७ ठिकाणी हा प्रकार आजही चालतो!
ग्रहणाच्या बाबतीतही अशा अनेक अंधश्रद्धा आजही पाळल्या जातात. ग्रहण ही अवकाशात घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचा पृथ्वीवर राहणाऱ्या माणसाच्या नशिबावर, दैनंदिन कामावर, त्याच्या शुभ अशुभावर काही परिणाम होत असतो हे असं म्हणणं हे कितपत विज्ञाननिष्ठ आहे?
या अंधश्रद्धा कशा चूक आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रथम ग्रहण होते म्हणजे नेमके काय होते हे जाणून घेऊयात.
ग्रहण म्हणजे काय?
ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रांगेमध्ये येतात. त्यावेळी जर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर त्या पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यामुळे चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र हा तांबूस – भुरकट रंगाचा दिसतो.
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जर चंद्र आला, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे त्या भागातून सूर्य थोडा झाकल्यासारखे दिसतो म्हणजेच सूर्यग्रहण घडतं.
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
प्राचीनकाली सौरडाग आणि प्रभाकिरीट यांच्या संबंधांविषयी संशोधन केले जातं. १८ ऑगस्ट १८६८ रोजी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी लाॅकियर या शास्त्रज्ञाने महाराष्ट्रातील विजयदूर्ग किल्ल्यावरून निरीक्षणे करून हिलीयम विषयी संशोधन केले होते असा उल्लेख सापडतो.
आजही ती जागा ‘साहेबाचा कट्टा’ या नावाने ओळखली जाते.
२९ मे १९१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणात केलेल्या प्रयोगावरून तारकांकडून येणाऱ्या प्रकाशाचे विचलन होते हे आइन्स्टाईनचे संशोधन सिद्ध झाले.
खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.
सूर्यग्रहणात वेगवेगळ्या परंपरा मानल्या जातात. काही गोष्टी न करण्यास घरातील थोरामोठ्यांकडून सांगितले जाते. जेव्हा चंद्रग्रहण लागते तेव्हा कोणत्याही देवी-देवतांचे दर्शन घेणे अशुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी देवी-देवतांना कपाटात बंद करून ठेवले जाते आणि पुजेलाही काही काळ विश्रांती दिली जाते.
या व्यतिरिक्त या दिवशी गर्भवती स्त्री, वृद्ध यांना औषध देखील दिले जात नाही.
याचेच एक उदाहरण म्हणजे ग्रहणाच्या काळात युरोपात अनेक गरोदर महिलांनी थयलीडोमाइड नावाचे चुकीचे औषध घेतल्याने अनेक विकृत मुले जन्माला आली असा दाखला दिला जातो. आजही ग्रामीण भागात ही अंधश्रद्धा घरोघरी कसोशीने पाळली जाते.
चंद्रग्रहणाच्या दिवशी गर्भवती स्त्रीला कोणतेही काम न करण्याचा आणि घरातून बाहेर न जाण्याचा सल्ला दिला जातं. गरोदर महिलेने ग्रहणकालात भाजी चिरल्यास, कपडे शिवल्यास अथवा एखादा पदार्थ शिजवल्यास व्यंग असलेले मूल जन्माला येते असेही सांगितले जाते.
हे ही वाचा –
- फुटक्या आरशात पाहू नये ते पापणी फडफडणे अशुभ, वाचा विचित्र ११ अंधश्रद्धांबद्दल
- केवळ एका (अंध)श्रद्धेपोटी मुंबईतील उंच इमारतींमध्ये एक गंमतीशीर साम्य आहे!
ग्रहणकाळात जेवू नये, झोपू नये, मलमूत्रविसर्जन करू नये – अशीदेखी धारणा आहे.
तसेच ग्रहणकाळात घरामध्ये सगळीकडे तुळशीची पाने टाकली जातात. भारतात ग्रहणाविषयी वेगवेगळ्या मान्यता आहेत. पण विज्ञानाच्या दृष्टीने त्या सत्य नाहीत हे आजवर झालेल्या प्रयोगांच्या आधारे म्हणावे लागेल. यामागे काही खगोलशास्त्र आहे, जे आपण वरील सारांशामध्ये पाहिले.
गर्भवती महिलांना या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये खूप जपले जाते. त्यांना घरातील ज्येष्ठ स्त्रियांकडून वेगवेगळे सल्ले दिले जातात. पण या सर्व नेहमीच अंधश्रद्धा असल्याचे दिसून आले आहेत. कारण या गोष्टी न करण्याची जी कारणे सांगितली जातात यामागे काही ठोस आणि तर्कसंगत पुरावा असा नाही.
परंपरेनुसार जे चालत आलेले आहे, तेच आपण पुढे चालवतो. ग्रहणात कितीतरी गोष्टी न करण्यास सांगितले जाते. पण जरी आपण त्या केल्या तरीदेखील त्यामुळे आपले नुकसान होत नाही.
ग्रहणाबाबत अजून एक विचित्र गैरसमज म्हणजे, ग्रहणात बुटक्या माणसाला ओढल्यास तो लांब होतो.
उंच आणि ठेंगणा होणे हे माणसाच्या शरीराच्या वाढीवर अवलंबून असते. असे ग्रहणात वाढून माणसे उंच होऊ लागली असती, तर आज आपल्याला कोणताही ठेंगणा माणूस दिसला नसता.
जे लोक हे पाळत नाहीत किंवा ज्यांचा यावर विश्वासच नाही अशा लोकांना देखील त्याचे काही नुकसान होत नाही. त्यामुळे या सर्व दंतकथा असल्याचे उघड आहे.
मुळात पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ताऱ्याच्या एकमेकांच्या सावलीखाली येण्याने माणसाच्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होतो हा दावाच अनाकलनीय आहे.
जयंत नारळीकर यांच्यासारख्या अनेक वैज्ञानिकांनी सांगूनही आपण त्यांचे मत विचारात घ्यायला आणि विवेकी वागायला तयार नाही.
भारतीय लोक अशा अंधश्रद्धांना तिलांजली देऊन जितक्या लवकर विवेकवादाची आणि विज्ञानाची कास धरतील तितके ते जास्त प्रगतीकडे जाणार आहेत.
ग्रहणाला दान मागण्याची एक प्रथा आपल्याकडे आहे. यावेळी आपल्या विचारांना लागलेलं अंधश्रद्धांचे ग्रहण सुटावे आणि अज्ञानाची सावली जाऊन ज्ञानाचा प्रकाश पडावा असे दान मागायला हवे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.