Mi-26 : मानव आणि यंत्र यांच्या एकत्रित कामाची परिसीमा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक – श्रीनिवास देशमुख
—
शीतयुद्धाचा इतिहास पाहताना एक लक्षात येईल की जरी दोन राष्ट्रांच्या कंपूमध्ये युद्ध होत नसले तरी तिखटपणा काही कमी होत नव्हता. एक तर लष्करी अस्त्र त्यांची परिसीमा गाठत होते आणि नवनवीन अस्त्रे प्रयोगशाळेत तयार होत होती आणि लागलीच लष्कराकडे येत होती.
अमेरिका आणि सोविएत रशिया यांच्यातली शस्त्र बनवण्याची स्पर्धा म्हणजे लष्करी परिभाषेत ‘मोठं’ हे विशेषण ज्या गोष्टींच्या मागे असेल, मग ते विमान असो, हेलिकॉप्टर असो अथवा पाणबुडी असो, बऱ्याच गोष्टी सोविएत रशियाने बनवल्या.
नुसत्या बनवून काही उपयोग नसतो! त्या किती वेळ साथ देतात, कोणत्या परिस्थितीत साथ देतात, लष्करी भूमिका निभवत असतांना नागरी सेवांमध्ये त्यांचा कितपत उपयोग होतो या सुद्धा काही बाबी असतात. यात रशियन अस्त्रे बऱ्याच ठिकाणी सरस आहेत.
आज आपणसुद्धा अशाच एका मोठ्या हेलिकॉप्टरची ओळख करून घेणार आहोत. कारण, आपल्या वायू सेनेतला या विमानाचा कार्यकाळ आता जवळपास संपला आहे.
या हेलिकॉप्टरचे नाव आहे, Mi-२६! हे जगातलं सगळ्यात मोठं, शक्तिशाली आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं हेलिकॉप्टर आहे. याच्या बद्दल जाणून घेण्याआधी लष्करी परिभाषेमध्ये लष्करी सामग्रीची वाहतूक किती महत्वाची असते हे बघू!
कोणत्याही देशाची लष्करी ताकत त्यांना मिळणाऱ्या logistical support वर अवलंबून असते. ज्यालाच आपण रसद म्हणतो.
त्यातही शांतता काळात आणि युद्धाच्या काळात कोणती रसद किती वेळात पोहोचवायची याची लष्करी समीकरणे असतात. युद्धाच्या काळात तर रसदीवर युद्ध किती लांबेल आणि किती वेळात आटपेल याचा एक अंदाज लावता येतो.
सगळ्याच ठिकाणी आपल्याला मोठी विमाने नेता येत नाहीत. कारण त्यांना तयार करायला वेळ लागतो. परत, ज्या ठिकाणी रसद पोहोचवायची आहे तिथे धावपट्टीपण पाहिजे.
बर, चला धावपट्टी नसली तरी रसद paradrop करता येते. जर युद्ध मैदानी प्रदेशात असेल तर paradrop करता येईल. डोंगराळ प्रदेश असेल, वेळेची कमतरता असेल अश्या वेळेस काय करणार? अश्या वेळेस कामाला येत ते हेलिकॉप्टर! असे हेलिकॉप्टर ज्याची सामग्री वाहतूक करायची क्षमता मोठी आहे आणि बाकी हेलिकॉप्टरचे गुणधर्म तर आपण जाणताच.
हेलिकॉप्टर युगाचा नवा अध्याय:
हेलिकॉप्टरच्या piston engine मध्ये बदल होत गेले आणि काळानुसार ते शक्तिशाली होत गेले. पण, त्याचं वाढत वजन बघता हेलिकॉप्टर काही मोठे होत नव्हते. त्यांमुळे त्यांची सामान वाहू क्षमतापण कमी झाली. त्यात piston engine कमी तापमानात लवकर चालू होत नसे. याला उपाय म्हणून gas-turbine engine वापरात आले.
एकतर हे कमी तापमानात चालू होण्यासाठी नखरे करत नसे आणि हेलिकॉप्टरच्या design मध्ये महत्वाच्या असलेल्या weight to power ratio चांगला होता.
यामुळे हेलिकॉप्टरचा आकार वाढवणे सोयीस्कर झाले आणि तयार झाले Mi-६ हे हेलीकॉप्टर, जे सुद्धा जगातील मोठे, वेगवान आणि शक्तिशाली हेलिकॉप्टर होते. An-१२ विमानाची जी क्षमता होती तेवढीच याचीसुद्धा क्षमता होती.
बाकीच जग जे करायला बिचकत होत ते रशियाने करून दाखवलं. Piston engineच्या सातपट सामग्री वाहून नेण्याची याची क्षमता आहे.
याचे engine fuselage च्या वर ठेवले आणि हा एकप्रकारचा पायंडाच पडला. कदाचित आपली स्वदेशी हेलिकॉप्टरसुद्धा हाच फोर्मुला वापरतील.
यामुळे अमेरिकन हेलिकॉप्टर असोसीएशनने मिल कंपनीला Sikorsky पारितोषक दिलं! इथेच उगम झाला transport हेलिकॉप्टरचा! Mi-२६ समजून घेण्यासाठी हा संक्षिप्त इतिहास महत्वाचा आहे.
याच्यानंतरसुद्धा बरीच मॉडेल आली. पण, मिखाईल मिल यांच्या निधनानंतर जणू या कंपनीकडे पाठच फिरवली गेली. आता मिल कंपनीला आम्ही अजूनसुद्धा अभिनव गोष्ट तयार करू शकतो हे सिध्द करावे लागणार होते. याच जिद्दीने तयार झाले Mi-२६! ताकदवान engine, नवे धातू यांचा उपयोग करून या विमानाने आपले नाव कमावले.
सोविएत रशियाच्या सेनेत १९८० मध्ये हे हेलिकॉप्टर दाखल झाले. २० टन वजन वाहून नेण्याच्या क्षमतेने Mi-२६ ने नवा विक्रम प्रस्थापित केला.
या हेलिकॉप्टरची निर्मिती एका अटीवर झाली होती.
ती अट म्हणजे ‘हेलिकॉप्टरचे नूसते वजन, हेलिकॉप्टर जेवढे अधिकतम वजन उचलू शकते अथवा वाहू शकते, त्याच्या अर्धे हवे!’ ही अट म्हणजे एक मोठे तांत्रिक आव्हानच होते!
तीन मजली इमारतीएवढी याची उंची आहे आणि याच्या रोटरचा (rotor) विस्तार हा Airbus A३२० च्या पंख्यांच्या विस्ताराएवढा आहे! ११००० अश्वशक्तीचे हे हेलिकॉप्टर ४४००० पौंड अथवा एकसाथ ११ family कार एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. अमेरिकेच्या Chinook पेक्षा याची सामग्री वाहून नेण्याची क्षमता दुपटीपेक्षा जास्त आहे!
हे विमान नागरी सेवेत म्हणजे अग्निशामक दल, तेलाच्या विहिरीसाठी लागणारे यंत्र इत्यादी गोष्टी सहज बजावते आणि निष्णात आहे! याचं खरं नाव झालं ते चेर्णोबिल (Chernobyl) स्फोटानंतर किरणोत्सर्ग थांबवणे!
या कामासाठी Mi-२, Mi-६, Mi-८, Mi-२४R आणि Mi-२६ वापरले गेले. यातही सिंहाचा वाटा उचलला Mi-२६ ने! चेर्णोबिलचा किरणोत्सर्ग थांबवणे म्हणजे क्रमांक ४च्या reactor वर हवेतून एक खास मिश्रण टाकणे. ते मिश्रण होते वाळू, शिसे, बोरॉन आणि clay.
क्रमांक ४ च्या reactor वर उड्डाण करणे म्हणजे जवळपास २००० तापमान आणि १००० पटीचा किरणोत्सर्ग! हे सर्व झेलण्याची ताकद फक्त Mi-२६ मध्येच होती.
प्रत्येक फेरीत Mi-२६ १००% आपले काम फत्ते केले. मानव आणि यंत्र यांचा सुगम संगम म्हणजे ही घटना! या धाडसी योजनेत ३० Mi-२६ने सहभाग नोंदवला!
अजून काही घटना म्हणजे अफगाणिस्तानातून जायबंदी झालेले Chinook बाहेर काढले, चीनमध्ये झालेल्या भूकंपानंतर बचाव योजना, इत्यादी!
भारतीय वायू सेना:
भारतीय वायू सेनेने मोठ्या वजनाचे मालवाहू हेलिकॉप्टर म्हणून Mi-२६ ची निवड केली. १९८६ मध्ये ४ Mi-२६ वायू सेनेत आले. १९८९ मध्ये २ उरलेले दोन Mi-२६. अशी ही Mi-२६ ‘Feather Weights’ नावाच्या समूहात शामिल झाली. कारगिल युद्धात २५ तास Mi-२६ ने उड्डाण केले. यात Mi-२६ चे काम होते artillery आणि तत्सम गोष्टी उंचीवर पोहोचवणे. १९९९ मध्ये कोसलेल्या मिग-२१ ला याने उचलून चंडीगडला पोहोचवले.
२०१० मध्ये श्रीनगर भागात लोहमार्गाच्या कामासाठीसुद्धा Mi-२६चा उपयोग झाला. २०१३ मध्ये उत्तराखंड मध्ये निसर्गाच्या कोपाने रस्ते वाहून गेले. BRO ने ते रस्ते पुनर्बांधणीसाठी घेतले असता, Mi-२६ने २ bulldozer पित्तोरगड येथुन बंगापानी (९६ किमी) हलवले. तसेच Mi-२६ ने इंधनाचीसुद्धा ने-आण केली.
सध्या एकच Mi-२६ कार्यरत आहे पण तेही १०० तासासाठी, जी एक मोठी विवंचना आहे.
दोन Mi-२६ दुर्घटनेत गेले आणि उरलेल्या Mi-२६ नी आपले तांत्रिक आयुष्य संपवले आहे. वायू सेनेकडे हेच एकमेव मालवाहू हेलिकॉप्टर आहे. आपले १५ Chinook २०१९ आणि त्याच्या पुढे येतील. तो पर्यंत काय हा मोठा प्रश्न आहे. आता वायू सेना Mi-२६ एकदम जीकरीच्या वेळेसच उडवणार आहे. ज्यांचे प्रशिक्षण करावायचे आहेत, त्यांना परदेशात पाठवले जाणार आहे.
निवृत्त Air Vice Marshal मनमोहन बहादूर यांच्या मते सध्या आपल्याकडे Mi-२६ चे तांत्रिक आयुष्य वाढवण्याची सुविधा नाही.
हे हेलिकॉप्टर त्याच्या आकारमानामुळे दुसर्या कुठल्या विमानात वाहून नेणे मुश्कील आहे. रशियासोबत सध्या याबाबतीत बोलणी चालू आहे. प्रश्न हा नाही की बोलणी कधी पूर्ण होईल. खरा प्रश्न हा आहे की Mi-२६ ची जागा Chinook घेऊ शकेल का? अलविदा Mi-२६!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.