' साध्या सरळ “फोटोग्राफर” च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने हा सिनेमा अनुभवावाच! – InMarathi

साध्या सरळ “फोटोग्राफर” च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने हा सिनेमा अनुभवावाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : विक्रम एडके

===

तुमच्याकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण वगैरेपैकी काहीतरी एक असतं. चार लोकांत तुमचं काहीतरी अस्तित्व असतं.

तुमची लव्हलाईफ फार भारी नसते, पण जे आहे ते आपलं म्हणून तुम्ही त्याचा मनापासून स्वीकार केलेला असतो. थोडक्यात सारं काही छान चाललेलं असतं. संथ वाहाणाऱ्या कृष्णामाईसारखं.

पण एक दिवस असा येतो की तुमची प्रतिष्ठा, अब्रू, तुमचं प्रेम सारं सारं काही एका क्षणात हिरावून घेतलं जातं. होत्याचं नव्हतं होतं.

बरं झालेली गोष्टदेखील इतकी सहजपणे झालेली असते की, आपल्यावर फार मोठा अन्याय झालाय असं बोंबलायला जागाच नसते. गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आपण जीवतोड प्रयत्न करतो.

कारण, तेवढंच आपल्या हातात असतं.

पण हरवलेलं प्रेम कुठून परत मिळणार? तुम्ही गेलाय कधी या परिस्थितीतून? मी तरी गेलोय. मोठाच उद्ध्वस्त काळ असतो तो.

 

cocktail inmarathi

 

वर्षानुवर्षे ज्या व्यक्तीपलिकडे कधी विचारच केलेला नसतो आणि जिच्यावर आपल्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास दाखवलेला असतो, त्या व्यक्तीने एका क्षुल्लक, क्षुद्र स्वार्थापायी आपल्याला लाथाडून निघून जावं? का?

इतके फालतू असतो आपण खरंच? लाख प्रश्नांचं काहूर माजतं आणि डोकं फुटेस्तोवर विचार केला, पार रात्रीच्या रात्री जागून काढल्या तरी उत्तर मात्र एकही मिळत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कारण, उत्तर असतं काळ. तो जसं क्षणात होत्याचं नव्हतं करतो, तसंच हळूहळू आपल्याकडे होतं त्यापेक्षाही सुंदर आयुष्य आपल्याला देतो.

माणूस म्हणून पार बदलूनच टाकतो तो आपल्याला. आपल्यातली निरागसता दगडाने ठेचून टाकतो आणि आपल्या भूतकाळातील स्वरूपाच्या काही हलक्या निशाण्या तेवढ्या मागे ठेवतो. यालाच परिपक्व होणे म्हणतात.

मग खरं प्रेम काय असतं ते उलगडतं, एखादा पूर्वी कधीच नसलेला छंद गवसतो, करिअरची एखादी वेगळीच वाट सापडते.

मग मागे वळून पाहाताना आपल्यालाच कळतं की, परमेश्वर ज्यावेळी आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेत होता आणि आपण विरोध करून स्वतःलाच त्रास करून घेत होतो!

 

god InMarathi

 

त्यावेळी खरं तर तो आपल्याकडचं बिनकामाचं खेळणं काढून घेत होता, त्याहून मोठं आणि अधिक सुंदर काहीतरी देण्यासाठी!!

नाही, मी माझ्या आयुष्याचे चिंतन मांडत नाहीये तुमच्यासमोर.

म्हणजे हे तुमच्या-माझ्या आयुष्याचे चिंतन तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त ही आहे दिलीश पोदनच्या “महेशिण्टे प्रतिकारम”ची (२०१६) मूळ कल्पना.

अगदी तुमच्या आमच्या आयुष्यातली संकल्पना वाटते ना ही? वाटणारच, कारण मुळातच ती केरळमधील आलप्पुळा जिल्ह्यातील तुरावूरमध्ये घडलेली सत्यकथा आहे.

 

maheshinte-prathikaram-fahadh-faasil-anusree-inmarathi

 

“महेशिण्टे प्रतिकारम” म्हणजे “महेशचा प्रतिकार” अर्थात महेशने केलेला प्रतिकार अथवा महेशने घेतलेला सूड.

महेश (फ़हाद फ़ासिल) हा इडुक्की जिल्ह्यातील एका रमणीय खेड्यात राहाणारा एक साधासरळ छायाचित्रकार. तो म्हाताऱ्या वडलांचा सांभाळ करतो आणि गावातील सण-समारंभांची छायाचित्रे काढून गुजराण करतो.

त्याचे आणि सौम्याचे (अनुश्री) लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम आहे. महेशला गावात मान आहे. छान, मस्त आयुष्य चालले आहे त्याचे.

एकेदिवशी तो सहज गावात घडणारे एक भांडण सोडवायला जातो आणि ते लोक याच्यावरच राग काढतात. बेदम मारतात ते त्याला. याच दरम्यान त्याचे प्रेमही त्याच्यापासून दूर जाते.

मार खाल्लेला, अपमानित, जखमी महेश तिरीमिरीत प्रतिज्ञा करतो की, जोपर्यंत मी मला मारणाऱ्याचा सूड उगवणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही.

 

no sandals foot InMarathi

पुढे काय होतं, याची दिल खुश करून टाकणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट!!

“महेशिण्टे प्रतिकारम”ची सगळ्यांत जमेची बाजू ही की, ही कथा एका लहानश्या खेडेगावात घडते. त्यामुळे गावकऱ्यांचा इरसालपणा दाखवायला यात पुरेपूर जागा आहे!

आणि ती तितक्याच ताकदीने वापरून घेतल्यामुळे सबंध चित्रपटभर एक नर्मविनोदाची पखरण झालीये.

याबाबतीत दिग्दर्शक दिलीश पोदनपेक्षाही लेखक श्याम पुष्करन ज्यांना या चित्रपटाच्या लेखनासाठी राष्ट्रपती पारितोषिक मिळालेय, त्यांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे.

कुठेही संयतपणा न सोडता, चित्रपट-माध्यमाच्या समग्र कलात्मकतेशी प्रामाणिक राहूनदेखील एक खुसखुशीत मनोरंजक कलाकृती बनवता येऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “महेशिण्टे प्रतिकारम”.

 

mahesh inmarathi

 

किंबहूना समस्त मलयाळम इंडस्ट्रीकडूनच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे.

चित्रपटात बेबीचेट्टा (अॅलेन्शिए लोपेझ), क्रिस्पिन (सौबिन शाहिर), व्हिन्सेंट भावना (के. एल. अँटनी कोची) अश्या दुय्यम भूमिकादेखील इतक्या चपखल विणल्या आहेत की, त्यामुळे सबंध चित्रटपटालाच एक कलात्मक रेखीवता प्राप्त होते.

एका माणसाबद्दल न बोलणे अपराधच नव्हे तर अक्षरशः पाप ठरेल. तो माणूस म्हणजे महेशची भूमिका केलेला फ़हाद फ़ासिल.

त्याने एवढे सुंदर, एवढे चांगले, एवढे जबरदस्त, एवढे संयत, एवढे सुरेख, एवढे कमाल, एवढे भारी काम केलेय की विचारता सोय नाही. पूर्वी हा माणूस मला अभिनेता म्हणून नुसताच आवडायचा.

पण या चित्रपटापासून मात्र मी अक्षरशः फॅन झालोय त्याचा. काही काही प्रसंगी त्याने केलेला अभिनय असा काही बिनतोड आहे की, ते फक्त तोच करू शकतो.

लग्नाच्या दिवशी तो दुरूनच सौम्याकडे ज्या नजरेने पाहातो; ती नजर, त्यातली हतबलता आणि तरीही तिच्यातील मनापासून चिंतलेली शुभेच्छा अक्षरशः काळीज कापत जाते.

किंवा जिम्सनचा गळा आवळताना जो कर्तव्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आपल्याकडे जरा बरं काम केलं की, अभिनेत्यांना गगन ठेंगणे होते.

पण ते सारेच बच्चे वाटावे असे एक एक अभिनयसम्राट दक्षिणेत आहेत. त्यांचं काम पाहिलं की, आपल्याकडच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तथाकथित अभिनेत्यांवर हसू आल्याशिवाय राहावत नाही.

 

fahad inmarathi

 

नायकाला साजेशी पिळदार शरीरयष्टी नसताना, तिशीतच केसांची पीछेहाट झालेली असतानाही या दिसायला सामान्य फ़हाद फ़ासिलने जे काम केलेय, ते आपल्याकडच्या भल्याभल्यांना जमणारे नाही.

दुर्दैवी आहे, परंतु सत्य आहे हे. आणि हे सत्य मान्य केलं तरच त्यावर उपाय काढता येणार आहेत.

बिजिबालचे संगीत अतिशय सुरेख झालेय. विशेषतः “इडुक्की” आणि “मौनंगळ” ही गाणी. आपल्याकडे इतकी सुरेख गाणी का होत नाही, याची राहून राहून खंत वाटते.

चित्रपटात मला जाणवलेली एकमेव त्रुटी म्हणजे तो मूळ विषयाकडे यायला फारच वेळ लावतो. दोन तासांच्या चित्रपटापैकी पहिला जवळ जवळ एक तास हा पात्रपरिपोष आणि वातावरणनिर्मितीसाठी घालवलाय.

म्हटलं तर ही चांगली गोष्ट आहे आणि म्हटलं तर वाईट. कारण, सबंध चित्रपटच सुशेगात आहे. त्याचा धीमेपणानेच आस्वाद घ्यायचाय. जॅझ संगीतासारखा.

किंवा अधिक मुद्देसूद बोलायचं झालं, तर “महेशिण्टे प्रतिकारम” हा चित्रपटच निसर्गरम्य केरळमधील गावाकडचे जॅझ आहे. रेंगाळणारे, संपल्यावरही चव ठेवून जाणारे आणि पुन्हापुन्हा आठवणी काढायला लावणारे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याकडून एक गोष्ट हिसकावून घेतो ते दुसरी त्याहून चांगली गोष्ट देण्यासाठीच.

“महेशिण्टे प्रतिकारम”मध्ये ही बाब अतिशय कलात्मक ढंगाने आणि तरीही रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमधून सहजगत्या चितारलीये. कशी, ते चित्रपटात पाहूनच समजून घ्यावे.

चुकूनही चुकवू नये असा गोड अनुभव आहे हा!

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?