इतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
क्रिकेट हा खेळ भारताबरोबरच संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय आहे. भारतामध्ये क्रिकेटचे चाहते तर आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. या खेळाशी भारतातील लोक मनाने जोडले गेले आहेत. आपल्या भारतीय संघाला खूप मोठमोठे दिग्गज खेळाडू लाभले आहेत.
सचिन तेंडूलकर, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली यांनी भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.
भारतीय क्रिकेट आज टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी विराजमान आहे, पण आताच आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला.
तरी आपला भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेला कडवी झुंज देऊन पुनरागमन करेल असा देखील सर्वांचा विश्वास आहे. असो, पण तुम्हाला हे माहित आहे का ? त्या आफ्रिकन संघामध्ये दोन भारतीय वंशाचे खेळाडू देखील होते.
त्यातील एक जगामध्ये नावाजलेला खेळाडू आहे. होय, तुमचा अंदाज बरोबर आहे, तो खेळाडू म्हणजे हाशीम आमला. आज आम्ही तुम्हाला हाशीम आमला सारखेच जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट संघांमध्ये खेळणाऱ्या किंवा खेळून गेलेल्या भारतीय वंशाच्या खेळाडूंविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या खेळाडूंबद्दल…
१. हाशीम आमला
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशीम आमला याची नाळ भारतासोबत जुळलेली आहे. हाशीम आमला याचे कुटुंब भारतातील गुजरात राज्याचे आहेत.
आमलाने १११ कसोटी सामन्यांमध्ये ८५९० धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय आणि टी – २० सामन्यांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे.
२. नासीर हुसेन
इंग्लंडचे माजी कर्णधार राहिलेले नासीर हुसेन एक उत्तम फलंदाज होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये ६५० सामन्यांमध्ये (फर्स्ट क्लासपासून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपर्यंत) ३०००० पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. नासीर हुसेनचा जन्म तामिळनाडूच्या मद्रासमध्ये झाला.
३. शिवनारायण चंदरपॉल
शिवनारायण चंदरपॉल वेस्ट इंडीजसाठी १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळला आहे. त्याची खेळण्याची शैली सर्वांपेक्षा खूप वेगळी होती, पण त्याच्या बॅटमधून कधी धावा निघायच्या थांबल्या नाहीत. त्याच्या कुटुंबाचे मूळ बिहारच्या पूर्णियाशी जोडलेले आहे.
४. ईश सोधी
जानेवारी २०१८ मध्ये टी – २० बॉलरच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठणारा न्युझीलंडचा लेग स्पिनर ईश सोधी याचा जन्म पंजाबच्या लुधियानामध्ये ३१ ऑक्टोबर १९९२ रोजी झाला होता. काही दिवसांपूर्वी भारताविरुद्ध झालेल्या सिरीजमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती.
५. हसीब हमीद
२०१६ मध्ये भारताविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये डेब्यू करणारा मूळ भारतीय वंशाचा खेळाडू हसीब हमीद इंग्लंडकडून खेळतो. तो इंग्लंडकडून सलामीला फलंदाजी करणारा सगळ्यात कमी वयाचा खेळाडू आहे.
६. जीत रावल
जीत रावल याचा जन्म भारताच्या गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये २२ सप्टेंबर १९८८ रोजी झाला. जीत रावल हा न्युझीलंडकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी येतो. जीत रावलने २०१६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.
७. केशव महाराज
केशव महाराज हा दुसरा भारतीय वंशाचा खेळाडू आहे, ज्याचा आताच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका संघामध्ये समावेश होता. केशव महाराजने पहिला कसोटी सामना २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आणि २०१७ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला.
८. मॉन्टी पानेसर
आपल्या फिरकीमध्ये फलंदाजांना अडकवणारा इंग्लंडचा स्पिनर मॉन्टी पानेसर हा मूळ भारतीय वंशाचा आहे. त्याने ५० कसोटी सामन्यांमध्ये १६७ विकेट्स घेतल्या आहेत, तर २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत.
अशा या आणि इतर काही भारतीय मूळच्या क्रिकेट खेळाडूंनी आपले नाव दुसऱ्या देशाकडून खेळताना गाजवले आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.