' झुंडी रस्त्यावर का उतरल्या? : भाऊ तोरसेकर – InMarathi

झुंडी रस्त्यावर का उतरल्या? : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

===

(लेखांक दुसरा)

लेखांक पहिला : कळपाची मानसिकता

===

नववर्षाच्या आरंभी मुंबईसह अनेक शहरांमध्ये ज्या हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्याचे अनेकांना नवल वाटलेले आहे. भीमा कोरेगावला दोनशे वर्षे झालेली असताना आणि मागली कित्येक वर्षे तो सोहळा विनासायास पार पडलेला असताना, याचवर्षी त्यावरून इतका हिंसाचार व दंगल सदृष्य परिस्थिती का निर्माण व्हावी, असाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे अशा गहन प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. मात्र ज्यांना तितके कष्ट घ्यायचे नसतात, त्यांच्यासाठी अशा घटनांमागे कारस्थान वा कुठल्या तरी संघटनांचा हात असल्याचे आरोप करणे सोपे असते.

परंतु अशा उत्तरांनी हिंसाचाराचे थैमान किंवा त्यासाठी सहजगत्या मोठा जमाव रस्त्यावर कसा येऊ शकतो, त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. ते उत्तर झुंडीच्या मानसशास्त्रात उपलब्ध आहे.

 

psychology_of_riots_inmarathi
thedailybeast.com

कुठल्याही समाजात व त्याच्या घटकांमध्ये कसली तरी वैमनस्ये वा वितुष्टे असतातच. त्याचा उपयोग करून घेण्याचे चातुर्य ज्यांच्यापाशी असते, ते अशा मनात साचलेल्या ज्वलनशील मानसिकतेला भडकवू शकत असतात. त्याला काडी कशी लावली जाते? त्याचे उत्तर समान शत्रू समोर आणावा लागतो असे आहे.

शत्रू ही अशी चीज असते, की त्याचे निर्मूलन निर्दालन करण्यासाठी झुंड सहज निर्माण करता येत असते.

“हिटलरच्या ज्युविरोधी प्राचाराचा आवाका बघून कोणीतरी त्याला म्हणाले की ज्यु लोकांना तुम्ही वाजवीपेक्षा जास्त महत्व देत नाही ना? त्यावर हिटलर उत्तरला की, छे छे असे बिलकुल ना्ही. एक शत्रू म्हणून ज्यु लोकांना जे महत्व आहे, ते मुळीच कमी लेखता येणार नाही.”

याचा अर्थ इतकाच, की कुठल्याही लोक समुदायाची माथी भडकवायची असतील, तर त्यासाठी द्वेष करण्याची अतीव इच्छा उफ़ाळून यावी, असा कोणीतरी सामर्थ्यशाली शत्रू असावा लागतो. किंबहूना तसा शत्रू नसेल तर काल्पनिक स्वरूपात त्याचे अस्तित्व असल्याचे दाखवण्याची कल्पकता असली पाहिजे. भीमा कोरेगाव प्रकरणातून पेटलेल्या हिंसा वा भावनांचा उद्रेक बघितला, तर त्यात ब्राह्मण किंवा दोनशे वर्षापुर्वीची पेशवाई हा तसा शत्रू आहे. त्याचे निर्दालन वा विनाश ब्रिटीशांनी कधीकाळीच करून टाकलेला आहे. पण आजही तो शत्रू दाखवून माथी भडकवणे सोपे आहे.

 

bhimakoregaon_elgarparishad_inmarathi
facebook.com/bhimakoregaon200

म्हणून मग फडणवीस नावाचा जन्माने ब्राह्मण असलेला कोणी महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाला. मग अगदी शरद पवारही अगत्याने त्याचा उल्लेख पेशवा म्हणून करून घेतात. डावे पुरोगामी एल्गार परिषद भरवून पिडीत मागास व गरीब समाजाची ब्राह्मण ही खरी समस्या असल्याच्या डरकाळ्या फ़ोडू लागतात. त्यातून अशा शोषित गरीबांना एकत्र करायचे काम सोपे होत असते. विवेकाने विचार करण्याची झुंडीतल्या व्यक्तीची कुवत निकामी करून टाकता येत असते.

राजकीय क्षेत्रात आपल्या नाकर्तेपणाने नामशेष होत आलेल्या तथाकथित पुरोगाम्यांना, मागल्या तीन वर्षात नरेंद्र मोदी नावाचे आव्हान पेलता आलेले नाही. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे वा गैरकारभाराचे आरोप करून त्याला शह देता आलेला नाही. फडणवीस यांच्यावरही दोषारोप करण्याचे कुठले निमीत्त उपलब्ध नाही. मग त्यांना राजकारणात अडवण्याचे वा खच्ची करण्याचे हत्यार कुठून मिळवायचे? तर त्यासाठी पेशवाई व ब्राह्मणी वर्चस्व, असे अस्तित्वहीन कारण पुढे केले जाते.

ते केल्यावर माथी भडकायची असतील तर इतिहासातील वा कपोलकल्पित अन्यायाचा डंका वाजवणे भाग असते. सैतानाचे नाव घेतल्याशिवाय लोकांना परमेश्वराची महत्ता कशी उमजावी?

आज महाराष्ट्राच्या कुठल्याही गाव जिल्ह्यात जाऊन बारकाईने अभ्यास केला, तर जितक्या काही घटनात दलित वा मागास वर्गाच्या घटकांवर अन्याय अत्याचाराचे प्रसंग आलेले आहेत, त्यात कुठूनही कुणा जन्माने ब्राह्मण असलेल्याचा सहभाग आढळणार नाही. फार पुर्वीच ग्रामीण भाग सोडून बहुतांश ब्राह्मणांनी शहरे महानगरात आपले बस्तान बसवले आहे. पूर्वपुण्याई वा जातीपातीच्या अस्मितेवर आपण जगूही शकणार नाही, हे ओळखून नव्या युगाशी जुळवून घेतले आहे. नव्या कालखंडात अस्तित्व टिकवून आपली नवी महत्ता व्यवहारी पातळीवर सिद्ध केलेली आहे. बहुतांश ब्राह्मणांना आज जातीच्या अस्मितेवर मोठेपण सांगण्याची गरजही राहिलेली नाही.

मग दलितांवरील अत्याचाराचा ब्राह्मण व पेशवाई मानसिकतेशी काय संबंध येतो? सहाजिकच अशा घटना घडतात वा त्याचे गुन्हे नोंदले जातात, त्यात बहुतांश बहूजन समाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या जाती उपजातींचा समावेश असतो.

ग्रामिण गावगाड्यात आज सवर्ण म्हणून ओळखला जाणारा वर्ग, असा मराठा कुणबी वा इतरमागास समाजातून आलेला आहे. ज्याला हिंदू वा ब्राह्मणधर्म म्हणून तावातावाने बोलले जाते, त्याची पताका जन्माने ब्राह्मणांच्या हाती राहिलेली नसून इतर मध्यम जातींकडे गेलेली आहे.

हे गावोगावच्या दलितांनाही माहित आहे आणि अन्य जातींचाही तो अनुभव आहे. मग ब्राह्मण वा पेशवाईच्या नावाने खडे फ़ोडून काय साधले जात असते? कोण अशा चिथावण्या देत असतो? तर जे राजकारणात वैफ़ल्यग्रस्त झालेले आहेत, तेच असे जातीचे विष पेरत असतात. आपला नाकर्तेपणा वा न्युनगंड लपवण्यासाठी ब्राह्मणशाही वा पेशवाईच्या नावाने शिमगा करणे सोपे आहे. तितके मराठे वा अन्य ओबीसींच्या विरोधात बोलणे सोपे नाही. त्यासाठी ब्राह्मण शब्दाचा बागुलबुवा करण्याला गत्यंतर उरलेले नाही.

शत्रू म्हणून ज्यु लोकांना असलेले महत्व हिटलर प्रतिपादन करतो, तिथे ब्राह्मण हा शब्द टाकला, मग पेशवाईचा सातत्याने होणारा उपहासात्मक उल्लेख उलगडू शकतो.

भीमा कोरेगावच्या सोहळ्यात पुढाकार घेणार्‍या नेते व संघटना बघितल्या, तर त्यांचा दलित वा आंबेडकरी चळवळीशी दुरान्वये संबंध नसल्याचेच सिद्ध होईल. यापुर्वी त्यांनी कधी भीमा कोरेगाव युद्धाच्या दिवसाचे कौतुकाने साजरेपण केल्याचा उल्लेख सापडणार नाही. मग यावर्षीच त्यांनी त्यात इतका उत्साहाने भाग कशाला घेतला? तर अशा निराश पराभूत राजकारण्यांना वास्तविक विद्यमान राजकारणात आपल्या भूमिका लोकांना पटवणे अशक्य झालेले आहे. अन्य कुठला तरी मुखवटा चढवून विविध समाज घटकांना आपल्या गोटात आणण्यासाठी, त्यांना सामान्य लोकांच्या झुंडी हव्या आहेत. सहाजिकच ज्यांच्या भावनेला हात घालून बागुलबुवा माजवला तर त्यांना कोणी सैतान वा शत्रू दाखवणे भाग आहे.

दलित गरीबांना भांडवलदार उद्योगपती जमिनदारांच्या नावाने भडकावणे आता शक्य नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या वैमनस्य वा वेदनेला फ़ुंकर घालणेच भाग आहे. त्यातून पेशवाई वा ब्राह्मणधर्म हे शब्द पुढे आलेले आहेत. हिंदू म्हणजे ब्राह्मणधर्म असल्याचा कंठशोष करून झालेला आहे. जे काही आजकाल अन्याय अत्याचार खेडोपाडी होतात, तेच राज्यात ब्राह्मण जातीचा मुख्यमंत्री नसतानाही झालेले आहेत. तेव्हा कोणी वंजारा मराठा जातीचा उल्लेख करीत अशा घटनांना जातीय रंग दिलेला नव्हता.

चार दशकापुर्वी पुणे जिल्ह्यातील व भीमा कोरेगावच्या नजिक असलेल्या बावडा गावामध्ये दलितांना बहिष्कृत करण्यात आलेले होते आणि त्याविरुद्धाच्या आंदोलनातून दलित पॅन्थर नावाची आक्रमक संघटना नावारूपाला आलेली होती. पण त्याला कोणी कधी मराठेशाही वा जातीय नाव दिलेले नव्हते. मग आजच पेशवाईचा उल्लेख कशाला आणला जातो? त्यामागचा हेतू ओळखण्याची गरज आहे. त्यातून जातीय अस्मितेच्या भारावलेल्या झुंडी उभ्या करता येतात आणि जानेवारीच्या आरंभी आपल्याला त्याचीच प्रचिती आलेली आहे.

शरद पवार अलिकडे आपल्या राजकारणातल्या पन्नाशीचे सोहळे करण्यात गर्क होते. त्यासाठीच ग्रंथ प्रकाशित करण्याचे समारंभही नित्यनेमाने चालू आहेत. कुठल्याही लटपटी करून मागल्या चार वर्षात त्यांची राजकारणात कुठे डाळ शिजलेली नाही. पक्ष वाढवण्याची वा निवडणूका जिंकण्याची इच्छाशक्तीही पवार व त्यांचे सहकारी हरवून बसलेले आहेत. नैराश्याने त्यांना कमालीचे घेरलेले आहे. आपला विचार व भूमिकाही ठामपणे मांडून लोकमत जिंकण्याची उमेद त्यांच्यासारखे किंवा पुरोगामी गमावून बसलेले आहेत. अशावेळी आपल्या हेतू व कार्याविषयी उमे़द यावी, म्हणून काय करता येत असते?

मार्टीन ल्युथर हा प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक त्याचे नेमके उत्तर देतो आणि पवारांनी नेमके त्याचेच अनुकरण चालविले आहे. मार्टीन ल्युथर काय म्हणतो बघा,

‘परमेश्वराने नाव घेण्याइतका उत्साह माझ्या मनाला वाटत नाही तेव्हा मी माझ्या शत्रूच्या, पोपच्या आणि त्याच्या हस्तकांच्या दगलबाजीच्या, त्याच्या ढोंगबाजीच्या आठवणी आठवतो. त्या आठवणी जाग्या होताच माझा संताप आणि द्वेष फ़ुलून येतो. माझा नैतिक अहंकार खुलतो आणि नव्या उत्साहाने मी देवाचे नाव घेऊ लागतो. माझ्या संतापाचा पारा चढताच, परमेश्वरा, तुझ्या नावाचा जयजयकार असो, या भूतलावत तुझे राज्य येवो, मी तुझ्या मनासारखे करीन, ही प्रार्थना मी दुप्पट जोराने म्हणू लागतो.’

ही झुंडींना वापरण्याची खरी युक्ती वा चतुराई असते. त्यांच्या नित्यजीवनात नसलेल्या समस्या खर्‍याखुर्‍या समस्या असल्याचे मनात भिनवायचे आणि मग त्यातून जो अशा लोकसमुहात त्वेष व द्वेष संचारतो. त्यावर स्वार होऊन आपले हेतू व भूमिका त्यांच्या गळी मारायच्या, असा खराखुरा डाव असतो. पवारांच्या हातून महाराष्ट्र गेला आहे आणि पक्षीय वा अन्य मित्रांच्या मदतीने मतदाराला जिंकण्याची आकांक्षा ते गमावून बसलेले आहेत.

 

sharad_pawar_inmarathi
indianexpress.com

अशावेळी पेशवाई वगैरे शब्द त्यांना उत्साह देतात व तेच शब्द अन्य मागास लोकसमुहांना चिथावण्या देऊ शकत असतील, तर बोनसच असतो.

जी गोष्ट पवारांची तीच तथाकथित पुरोगाम्यांची आहे.

भाजपाच्या विरोधात लढायचेही अवसान ही मंडळी गमावून बसलेली आहेत. त्यासाठी मग सामान्य लोकांच्या जीवनात खोटे वा काल्पनिक शत्रू सैतान निर्माण करून, त्यांच्याकडून हिंसाचार घडवण्याचा मतलब साधून घ्यायचा असतो. त्यांना क्रांतीच्या डरकाळ्या फ़ोडून मैदानात आणायचे अ़सते. पण त्याचवेळी अशा संधीसाधूंचा एक डोळा सत्ताधीश आपल्याला काही सौदे करून देणार असतील तर तिकडेही रोखलेला असतो. त्यात काही साधले तर हेच माथी भडकवणारे लोक त्या रस्त्यावर उतरलेल्या क्रांतीकारी लोकांविषयी काय भूमिका घेतात? मार्टीन ल्युथर त्याची साक्ष आहे.

धर्मगुरू व पोपला आव्हान देत सामान्य जनतेला रस्त्यावर आणणार्‍या ल्युथरला जर्मन राजेशाहीने चुचकारले आणि त्याची भाषा कशी बदलली तेही तपासून बघता येईल. त्याच्या पदरात लाभ पडले वा राजेशाहीने मान्यता दिल्यावर ल्युथर म्हणतो, ‘एखादे शासन कितीही अकल्याणकारी असले आणि बाजारबुणग्यांची बाजू कितीही न्याय्य असली तरी त्यांची झुंडशाही चालवून घेण्यापेक्षा राजेलोकांचे दुष्ट शासनच परमेश्वरास अधिक पसंत करील.’ हे क्रांतीच्या आरोळ्या वा एल्गार पुकारणार्‍यांचे वास्तविक चेहरे असतात.

याचे कारणही समजून घेतले पाहिजे. बहुतांश सामान्य लोक असेल त्या परिस्थितीमध्ये सुखी नसले तरी समाधानी असतात. त्यांच्या न्याय अन्यायाच्या संकल्पना किरकोळ असतात. पण सुखवस्तु व बुद्धीमान अशा मूठभर लोकांना कधीच समाधानी जगता येत नाही. त्यांना कायम आयुष्यात काहीतरी हुकल्याची वा चुकल्याची वेदना असह्य झालेली असते. पण जनतेतील त्यांची संख्या नगण्य असते आणि सत्तेशी दोन हात करण्याची हिंमत वा कुवत त्यांच्यापाशी नसते.

मग असे लोक आपण ज्या कारणासाठी दु:खी वा असमाधानी आहोत, तीच सामान्य अडाणी जनतेची समस्या तक्रार असल्याचा गवगवा करू लागतात. त्यासाठी आवेशपुर्ण भाषा वापरून ते जनतेचे व समाजाचे दुखणे असल्याचा आकांत मांडतात. त्यासाठी सताधीश वा अन्य काही काल्पनिक शत्रूंचा बागुलबुवा माजवतात. त्यातून झुंडी निर्माण होतात आणि सामाजिक संघर्षाला तोंड फ़ुटते. त्याचाच पुढे राजकीय संघर्ष बनवण्याची संधी तात्कालीन राजकीय नेते साधून घेत असतात.

त्यात क्रांती झाली तरी लढून उध्वस्त झालेल्या सामान्य माणसाचे कधी कल्याण होत नाही. त्याला दाखवलेले स्वप्नातले स्वातंत्र्य त्याच्या वाट्याला लधी येत नाही. त्यातही मजेची गोष्ट म्हणजे शहाणा बुद्धीमान म्हणून जो वर्ग असतो, तोही राजकारणात पारंगत नसल्याने त्याची अवस्था अधिक दयनीय होत असते. त्याच्यावर आधीचे जुलमी राज्यकर्त्ते बरे म्हणायची नामुष्की येत असते. केजरीवालचे आरंभीचे बुद्धीमान सहकारी त्याचे जळजळीत उदाहरण आहेत. मुद्दा इतकाच, की चतुर राजकारणी वा नेते नेहमी आपल्या राजकीय मतलबासाठी सामान्य लोकांची झुंड बनवतात. त्यांच्या माथी काल्पनिक न्याय भरवून त्यासाठी झुंजवून घेतात. त्या गरीब पिडीताच्या आयुष्यात कधीच मोठा बदल होत नाही. दोनशे वर्षानंतर भीमा कोरेगाव हा का ज्वलंत विषय होऊ शकतो त्याचे उत्तर झुंडीच्या मानसिकतेमध्ये सामावलेले आहे.

(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ पुस्तकातले आहेत)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?