' “मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- अजब फतवा! – InMarathi

“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- अजब फतवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

उत्तर प्रदेशात देवबंद येथे असलेले दार-ऊल-उलुम हे इस्लामी विद्यापीठ अनेक विषयांवर फतवे प्रसिद्ध करत असते. मुस्लिम समाजातील व्यक्तीला रोजच्या जगण्यातील निर्णय घेताना जर कुराण आणि हदीसचा संदर्भ घेऊन सुद्धा अडचण येत असेल तर ती व्यक्ती सर्वमान्य इस्लामी धर्मपीठाकडे त्या प्रश्नावरील तोडग्यासाठी जात असते.

दार ऊल उलुम देवबंद हे विद्यापीठ फक्त भारतात नव्हे तर जगभरात इस्लामी धर्मपीठ म्हणून फतवे काढून शंका निरसन करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करत असते.

हे सर्व फतवे दार ऊल उलुमच्या वेबसाईटवर तात्काळ प्रसिद्ध केले जातात जेणेकरून सर्व मुस्लिम समुदायाला ते मार्गदर्शक ठरतील.

 

 

या विद्यापीठाने इस्लामी धर्मशास्त्राला अनुसरून असाच एक अजब फतवा प्रसिद्ध केला गेला होता.

एका मुस्लिम मुलीने प्रश्न विचारला होता की,

“मला काही मुलांकडून लग्नासाठी मागणी घातली गेली आहे, ज्यांचे वडील बँकेत कर्मचारी आहेत. म्हणजेच इस्लाममध्ये निषिद्ध मानल्या गेलेल्या संपत्तीवर ही मुले मोठी झाली आहेत. इस्लामच्या मान्यतेनुसार या कुटुंबात लग्न करणे योग्य आहे काय?”

 

 

या प्रश्नाला उत्तर देताना दार-ऊल-उलुम म्हणते, “अशा कुटुंबात लग्न करणे इस्लाममध्ये निषिद्ध आहे. ‘हराम’च्या म्हणजेच व्याजाच्या पैशावर जगणे हे नीतीला धरून नाही. म्हणून अशा कुटुंबात लग्न करणे टाळले पाहिजे.”

दार-ऊल-उलुमने दिलेला हा पहिला फतवा नाही. या वेबसाईटवर सध्या विविध विषयावर निर्णय देणारे जवळजवळ ९ हजार फतवे एका क्लिकवर उपलब्ध आहेत.

अर्थात मुस्लिम समुदायाला अजूनही रोजच्या जगण्यातले निर्णय घेताना धर्मपिठाच्या मार्गदर्शनाची गरज भासते असे म्हणावे लागेल. कळीचा मुद्दा हा आहे की, हे फतवे काढताना मौलवी कुठल्या संदर्भांचा वापर करतात?

इस्लामी धर्मशास्त्राचा मूलाधार असणाऱ्या कुराण आणि हदीस या दोन ग्रंथांच्या आधारे आणि प्रेषितांच्या उक्ती आणि कृतीच्या आधारे या फतव्याद्वारे निर्णय दिले जात असतात.

उदा:

“जे लोक व्याज खातात त्यांची दशा त्या माणसासारखी असते ज्याला सैतानाने स्पर्श करून सोडले आहे. आणि ते या दशेत गुरफटण्याचे कारण हे आहे की ते म्हणतात, “व्यापारदेखील शेवटी व्याजासारखीच गोष्ट आहे.” वास्तविक पाहता अल्लाहने व्यापाराला वैध केले आहे. आणि व्याजाला निषिद्ध.” (सुरह-अल-बकरा, २७५)

कुराणातील या आयतीत सांगितल्याप्रमाणे व्याज घेणे आणि त्यातून येणाऱ्या पैशावर गुजराण करणे पाप आहे.

दार ऊल उलुमने काढलेला फतवा या आयतीवर आधारलेला आहे. अनेक मुस्लिम मौलवींनी हा फतवा इस्लामच्या नियमांना अनुसरून असल्याचे सांगत त्याला एकमताने मान्यता दिली आहे.

बँकिंग व्यवस्था ही पूर्णपणे व्याजातून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून आहे. २०१५-१६ च्या वर्षात भारतात बँकिंग सेक्टरमध्ये एकूण रोजगाराच्या तब्बल २१ टक्के रोजगाराची निर्मिती झाली.

बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असताना एखादी व्यवस्था २१ टक्के रोजगार निर्माण करत असेल तर हा आकडा लक्षणीय आहे.

 

sector_employment_inmarathi

 

असे असताना धर्माने मुस्लिम असणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचा रोजगार मिळवण्याचा मार्गच निषिद्ध आहे असे म्हणणे किती मूर्खपणाचे आहे हे मुस्लिम पंडितांना कळेल अशी अपेक्षा बाळगणे धाडसाचे आहे.

मुळात ऐहिक जीवनातील निर्णय हे आत्ताच्या परिस्थितीवर आणि वर्तमानातील निकष लावून घ्यायचे असतात हे साधे तत्व इस्लामी मुल्ला मौलवी आणि दार उलुमच्या धर्मधुरिणांना मान्य नाही हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करायला जाणे म्हणजे आयसीसच्या अतिरेक्यांना शस्त्र उचलू नका असे सांगण्यासारखे आहे.

भारतातील मुस्लिम तरुण या असल्या फतव्यांना किती मान्यता देतात हा या चर्चेतील महत्वाचा मुद्दा आहे.

सध्याची परिस्थिती पाहता हे फतवे मुस्लिम समुदायात प्रचंड मान्यताप्राप्त आहेत असा निष्कर्ष काढण्याला पुरेसा वाव आहे. एरवी “मुस्लिम समाज आर्थिक मागास आहे” अशा वल्गना करणारे प्रस्थापित मुस्लिम नेतृत्व अशा वेळी कुठे जाते?

प्रश्न जेव्हा धर्माधिष्ठित जीवनपद्धती झुगारून देऊन नवी कालसुसंगत जीवनपद्धती अंगीकारण्याचा येतो तेव्हा स्वतःला लोकशाहीवादी म्हणून मिरवणारे मुस्लिम नेतृत्व तोंड उघडत नाही हा इतिहास आहेच.

 

muslimleader_owaisi_inmarathi

 

तीन तलाकच्या बद्दल संसदेत झालेल्या चर्चेच्या वेळी खासदार एम. जे. अकबर यांनी नेहरूंच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला.

ज्यात एक मुस्लिम महिला नेहरुंना जाब विचारते की “हिंदू कोड बिलामुळे हिंदू आधुनिक होतील. पण मुस्लिम तसेच राहतील. आधुनिकतेची फळे मुस्लिमांना कधी चाखायला मिळणार?”

त्यावर नेहरू उत्तरतात, “सही वक्त नही मिला.”

हा ‘सही वक्त’ नेहरूंच्या कारकिर्दीनंतर बऱ्याचदा येऊन गेला आणि अनुनयाचे निर्लज्ज राजकारण करण्याच्या नादात तो गमावलाही गेलाय.

हे अनुनयाचे राजकारण मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला जितके जबाबदार आहे, तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त ‘दार ऊल उलुम’ सारख्या मुलतत्ववादी इस्लामचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे अस्तित्व जबाबदार आहे.

हे निराशाजनक वास्तव लक्षात घेता असल्या अधोगतीकडे नेणाऱ्या भंपक फतव्यांना न जुमानता ऐहिक जीवनातील निर्णय वर्तमानातील फायदे तोटे लक्षात घेऊन करण्याची समज जितक्या लवकर मुस्लिम तरुणांमध्ये निर्माण होईल तितका त्यांचा आर्थिक सर्वोदय लवकर शक्य आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?