' होतकरू तरूणांसाठी अत्यंत महत्वाचं : आरोग्य सेवा क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी – InMarathi

होतकरू तरूणांसाठी अत्यंत महत्वाचं : आरोग्य सेवा क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : संजय सदानंद भोंगे, समाज कार्यकर्ता, परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई.

===

वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी रोजगार निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. यासाठी गेल्या काही वर्षापासून भारत सरकार युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देते आहे. त्या अनुषंगाने नवनवीन कार्यक्रम राबवले जात आहेत. रोजगार निर्मिती करण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे युवकांमध्ये कौशल्य असणे गरजेचे आहे, म्हणुनच देशभरात कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम राबवण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्र मंडळाची निर्मिती ही केली आहे, जे देशातील विविध सरकारी आणि खाजगी शिक्षण संस्था, स्वयंसेवी संघटना यांच्या माध्यमातून तरुणांना कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन आणि संधी देत आहे. सरकारच्या विविध मंत्रालयांनीही आपल्या कार्यक्षेत्राशी संबधित नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे.

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानेही आरोग्य क्षेत्रात युवकांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम तयार केले आहेत. आरोग्याक्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे. तेव्हा समाजातील रुग्णालयात मग ती खाजगी असतील किंवा सरकारी सेवा देण्यासाठी प्रशिक्षित युवक युवतींची आवश्यकता असते. या गरजा लक्षात घेवून या अभ्यासक्रमांची निर्मिती केली गेली आहे. अगदी 8 वी पास ते पदवीधारक युवकांना आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार अभ्यासक्रम निवडून प्रशिक्षण मिळावे आणि त्यांना रोजगार मिळावा किंवा त्यांना स्वयं रोजगाराची संधी मिळावी हा या अभ्यासक्रमांच्या निर्मिती मागचा हेतू आहे.

 

Career opportunities -inmarathi02

 

भारत सरकारच्या परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई या केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या प्रशिक्षण संस्थेत संस्थेचे निदेशक डॉ. दीपक राऊत यांच्या प्रयत्नाने नुकतेच 5 अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. मुंबईतील सहयाद्री विश्रामगृहाच्या सभागृहात 3 नोव्हेंबर 2017 रोजी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दिपकजी सावंत, महाराष्ट्राचे कौशाल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थित या अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी आरोग्य मंत्रालयाचे विशेष अतिरिक्त महासंचालक डॉ. बी. डी. अथानी, राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सचिव श्री. श्यामलाल गोयल, राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, युनिसेफच्या राष्ट्रीय प्रतिनिधी श्रीमती यास्मिन अली हक आदी उपस्थित होते.

या प्रसंगी, 1. स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector), 2. मधुमेह शिक्षक (Diabetes Educator), 3. सामान्य कार्य सहायक (General Duty Assistant) 4. गृह आरोग्य मदतनीस (Home Health Aide) 5. प्रथम प्रतिसाद दाता (First Responder) या अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

आजच्या धकाधकीच्या काळात समाजाला आवश्यक स्वास्थ्य सेवा निर्माण करण्यासाठी हे अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहेत. या अभ्यासक्रमा विषयी जरा विस्ताराने माहिती करून घेवू या.

स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector):

आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कि भारत सरकारने गेल्या 3 वर्षा पासून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवायला सुरुवात केली आहे. आगामी काळात या अभियानाला अधिक गती देण्यासाठी स्वच्छता निरीक्षक हे महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

वाढत्या शहरी करणाने, नवनवीन नगरांचा विकास होतो आहे. परिणाम स्वरूप नवीन उदयास येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, उद्योग, मोठी हॉटेल्स, विमानतळे, रेल्वे, शॉपिंग मॉंल अश्या आस्थापनामध्ये स्वच्छता निरीक्षक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची गरज निर्माण होत राहणार आहे. ही गरज लक्षात घेवून आणि सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रमामधील नवीन बदलांना सामवून घेत या अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थीला कौशल्य आत्मसात करण्याची पूर्ण संधी देण्यासाठी अभ्यासक्रमात प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील भेटी, प्रात्याक्षिके, यांचा अधिकाधिक समावेश करण्यात आला आहे. एक वर्षाच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने विज्ञान विषयासह किमान 12 उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशासाठी ची वयोमर्यादा 18-30 वर्ष आहे.

मधुमेह शिक्षक (Diabetes Esducator):

देशात आणि विश्वभरात टाईप 2 मधुमेहाने ग्रस्त रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. सुमारे ६२ कोटी नागरिक देशात या व्याधीने ग्रस्त आहेत. बदलत्या आरामदायी जीवनशैली मुळे मधुमेहा ची समस्या विक्राळ रूप धारण करते आहे. या व्याधीला आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून नियंत्रणात आणणे शक्य आहे. त्यासाठी सदर व्याधीग्रस्त व्यक्तींनी आपल्या जीवनशैलीत आवश्यक बदल करत, नियमित औषध उपचार घेतले तर शरीरातील रक्त शर्करेचे प्रमाण नियात्रणात राखता येवू शकते. त्यासाठी त्यांना नियमित मार्गदर्शन, समुपदेशन आणि पाठपुरावा यांची नितांत आवश्यकता असते.

अनेकदा रक्त शर्करेच्या नियंत्रणासाठी पाळायच्या पथ्याना वैतागून व्याधीग्रस्त व्यक्ती नियंत्रण झुगारतात आणि मग आहार आणि नियमित औषधे घेणे टाळतात, त्यात खंड पाडतात. तेव्हा त्यांना मानसिक आधाराची आणि प्रोत्साहनाची गरज असते. असा आधार आणि प्रोत्साहन देवून व्याधीग्रस्त लोकांना समुपदेशन देणारी सल्ला केंद्र मधुमेह शिक्षक, स्थानिक मधुमेह तज्ञ डॉक्टरांच्या सोबतीने चालवू शकतात. म्हणून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमाच्या पूर्तते नंतर युवक रुग्णालयात मधुमेह तज्ञ डॉक्टर यांना सहायक म्हणून काम करू शकतील. ग्रामीण भागात जिथे डॉक्टर नसतात तिथे तर अश्या तरुणांना विशेष संधी आहेत.

या साठी निर्माण केलेला हा अभ्यासक्रम 3 महिन्यांचा असून या अभ्यासक्रमात मधुमेह या आजाराविषयी सर्वांगीण माहिती, त्याची कारणे, तपासणी, उपचार, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, समुपदेशन कौशल्य, या विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रमासाठी उमेदवार सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील पदवी धारक असावा जसे, समुपदेशन, गृह विज्ञान, पोषण, पराचारिका, औषधशास्त्र, ओक्यूपेशनल/फ़िजिओथेरेपी , सूक्ष्म जीवशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ( Counselling, Home Science, Nutrition, Nursing, Pharmacology, Occupetional and Physiotherepy, Microbiology, Social Sceince etc). या अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा 18 -30 वर्ष आहे.

 

Career opportunities -inmarathi03

 

सामान्य कार्य सहायक (General Duty Assistant) :

आरोग्य क्षेत्रात सेवा पुरवण्यात खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचा दवाखान्यांचा महत्वाचा वाटा आहे. या रूग्णालयामधून दैनंदिन आरोग्य सुविधा देतांना डॉक्टर, नर्स आणि तंत्रज्ञाना मदतनिसांची गरज भासत असते. सेवेत दाखल होतांना या मदतनिसांना प्रशिक्षण मिळालेले नसते. विशेषतः खाजगी रुग्णालयात अप्रशिक्षित मदतनीस अधिक प्रमाणात असतात, त्यांना तेथील डॉक्टर किंवा इतर प्रशिक्षित कर्मचारी अनेकदा जुजबी प्रशिक्षण देवून कार्य साधत असतात.

रुग्णांच्या सेवेसाठी जर अश्या दवाखान्यांना, रुग्णालयांना योग्य ते प्रशिक्षण प्राप्त केलेले कुशल कर्मचारी मिळाले तर अधिक चांगल्या सेवा देणे शक्य आहे. या साठीच या सामन्य कार्य सहायक प्रशिक्षणाची निर्मिती करण्यात आली आहे.

6 महिन्यांच्या या अभ्यासक्रमात या उमेदवारांना रुग्णाच्या सुश्रुशे पासून तर रुग्णालयातील सर्व दैनंदिन कार्य सुलभतेने करण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिक अभ्यास सह दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी उमेदवार विज्ञान विषयासह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्याक्रमात सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 18-30 असणे गरजेचे आहे.

गृह आरोग्य मदतनीस (Home Health Aid):

 

Career opportunities -inmarathi05

 

वाढते शहरीकरण, आणि परिवारातील खर्च यांचा मेळ घालण्यासाठी पतीपत्नी दोघेही नौकरी निमित्ताने घराबाहेर असण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्या वेळी दुर्धर आजाराने ग्रस्त वृद्ध माता पिता यांच्या सुश्रुशे साठी घरात कोणीतरी मदतनीस असणे ही काळाची गरज आहे. काही वेळा अपघात ग्रस्त रुग्ण घरात असतात त्यांना रोज ड्रेसिंग करण्याची, त्यांना वेळच्यावेळी औषधोपचार देण्याची, इंजेक्शन देण्याची, त्यांची स्वच्छता आणि निगा राखण्याची गरज असते. महिनोन्महिने अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांना पाठीवर जखमा होतात त्यांना रोज स्वच्छ ठेवणे त्यांच्यावर ड्रेसिंग करण्याची गरज असते. हे सर्व काम त्या कार्यात निष्णात व्यक्तीने करायला हवे.

मग अश्या वेळी परिवारातील सदस्यांना या विषयीची माहिती नसते, तेव्हा एखादी आया किंवा अप्रशिक्षित घरगुती नोकराला कामावर ठेवले जाते, त्यामुळे कदाचित रुग्णांच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. म्हणून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

या प्रशिक्षणाचा उद्देश हा रुग्णांना अश्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांच्या सुश्रुशे शी संबधी कौशल्य विकसित करणे हा आहे, ज्यात रुग्णांच्या दैनंदिन गरजा, जसे स्नान, ड्रेसिंग, वेळच्या वेळी औषधी देणे, त्यांना मानसिक आधार देणे, या सर्व विषयी प्रात्यक्षिका सह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणा नंतर प्रशिक्षित व्यक्ती स्वतंत्र पणे अश्या प्रकारे सेवा देण्याचे काम करू शकतील. या 4 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी उमेदवार विज्ञान विषयासह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्याक्रमात सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 18-30 वर्ष असणे गरजेचे आहे.

प्रथम प्रतिसाद दाता (First Responder):

 

Career opportunities -inmarathi04

 

अनेकदा आपल्याला आकस्मिक अपघातांना तोंड द्यावे लागते. कधी वाहनांचा भीषण अपघात होतो, कधी नैसर्गिक आपत्तीशी सामना होतो, कधी घरातच काहीतरी अनपेक्षित घडते. अश्या वेळी त्या अपघाता मध्ये सापडलेल्या व्यक्तींना जो व्यक्ती प्रथम पाहतो त्याने योग्य तो प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. तरच त्या व्यक्तीला त्या जीवघेण्या प्रसंगातून सावरणे शक्य होते. सर्वसामान्य व्यक्तींना अश्या प्रसंगात सावध होऊन काय मदत करावी तेच कळत नाही परिणामी अपघात ग्रस्त व्यक्ती वर प्राण गमवायची पाळी येते. आणि आजूबाजूला असलेले फक्त अज्ञानामुळे बघ्याची भूमिका घेतात.

म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीला अकस्मात होणाऱ्या अपघातांच्या प्रसंगी अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना कसा प्रतिसाद द्यायचा त्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. विशेषतः शालेय शिक्षक, आंगण वाडी कार्यकर्ते, आशा, वाहन चालक, रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर, रिक्षाचालक, टॅक्सी चालक, वॉचमन, पोलीस, या सारख्या सगळ्यांनाच या प्रशिक्षणाची गरज आहे.

प्रथम प्रतिसाद दाता हे 4 दिवसाचे प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणात, अपघात ग्रस्त व्यक्ती ला हाताळणे, त्यांचा रक्त स्त्राव थांबवण्यासाठी करावयाच्या कृती, हाथ पाय मोडले असतील तर त्यांना उचलण्याच्या पद्धती, कृत्रिम श्वसन, तात्पुरते ड्रेसिंग कसे करावे या सारख्या तातडीने करावयाच्या मदतीच्या कृती योग्य पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणा साठी किमान शैक्षणिक पात्रता 8 वी पास असून वयोमर्यादा 18-30 वर्ष असणे गरजेचे आहे.

या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन आधीच सांगितल्या प्रमाणे “परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, 332, सरदार वल्लभभाई पटेल रोड, खेतवाडी, मुंबई 400004” येथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती साठी युवकांनी संस्थेच्या संकेतस्थळ www.fwtrc.gov.in भेट द्यावी.

इच्छुक तरुणांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या अर्ज नमुन्यात प्रवेश अर्ज पाठवणे आवश्यक आहे. हे अभ्यासक्रम भारत सरकार च्या वतीने राबवले जात असून अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?