आजही ‘इथे’ स्टॅम्प पेपरवर मुलींची होते विक्री, एक विदारक सत्य!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या देशात कितीही कायदे कठोर केले किंवा कितीही सुरक्षा यंत्रणा भक्कम केल्या तरी स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबायचे किंवा कमी व्हायचे नाव घेत नाहीये!
आजही स्त्रियांना बलात्कार, छेडछाड अश्या कित्येक प्रकारांना सामोरे जायला लागत आहे!
याबरोबरच आणखीन एक प्रकार आहे ज्यात आपला देश आजही मागासलेला आहे तो म्हणजे स्त्री-भ्रूण हत्या! खरंतर आजच्या काळात स्त्री-भ्रूण हत्या आणि त्याचे परीणाम माहीत असूनसुद्धा आपल्याइथे आजही हा प्रकार अगदी राजरोसपणे चालू आहे!
स्त्री – भ्रूण हत्या हा आपल्या समाजाचा खूप गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही आहे. आजही काही शहरांमध्ये स्त्री – भ्रूण हत्या चालू असल्याचे दिसून येते.
स्त्री – भ्रूण हत्येच्या विरुद्ध कठोर कायदे असूनही हे प्रकार बंद होताना दिसत नाहीत, कारण यामध्ये डॉक्टर आणि सरकारी कर्मचारी यांचा देखील भाग असतो.
त्यामुळे हे प्रकार अनेकवेळा उघडकीस येत नाही परिणामी देशात मुलींची संख्या कमी होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्रात हा प्रकार काही प्रमाणात कमी दिसून येतो, पण उत्तर भारतामध्ये याचा अजूनही दबदबा आहे, एकंदरच उत्तर भारतात स्त्रियांवरचे अत्याचार किंवा इतर गुन्ह्यांचं प्रमाण आपल्याला जास्त आढळून येईल!
त्यामुळे स्त्री-भ्रूण हत्येच्या प्रकरणात तिकडचंच नाव आल्यास नवल वाटणार नाही!
आज आम्ही तुम्हाला एका अशा प्रथेबद्दल सांगणार आहोत, ज्या प्रथेमध्ये फक्त १० ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलींचा करार केला जातो.
स्त्री – भ्रूण हत्या वाढल्याने मध्यप्रदेशमध्ये मुलींच्या आणि मुलांच्या संख्येमधील तफावत वाढत चालली आहे. मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने, या प्रथेचा उगम झाला आहे.
मध्यप्रदेशच्या शिवपुरीमध्ये मुलींच्या संख्या कमी होत असल्यामुळे १० ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरने मुलींचा करार केला जातो आहे.
आणि मुदत संपल्यावर त्याच मुलीला दुसऱ्या पुरुषाला विकले जाते. अशी ही प्रथा माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी, परंपरांना मागे टाकून आपला देश आज प्रगतीकडे अग्रेसर झाला आहे. स्त्रियांना आणि पुरुषांना समान हक्क आणि वागणूक मिळावी, यासाठी प्रत्येक पातळीवर आपापल्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत.
तरीही अशी प्रथा निर्माण होणे, ही एक आश्चर्याची बाब आहे. एका स्टॅम्प पेपरवर मुलींचा करार होणे, ही प्रथा आपल्याला पुन्हा एकदा त्याच जुन्या रूढी-परंपरांची आठवण करून देते.
कसा होतो करार
या प्रथेमध्ये विक्री करण्यात आलेल्या स्त्रीमध्ये आणि तिला खरेदी केलेल्या पुरुषामध्ये एक करार केला जातो. हा करार १० ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केला जातो आणि या करारानुसार ती स्त्री – तिला विकत घेतलेल्या पुरुषाकडे राहण्यास जाते.
संबंध संपल्यावर, पुन्हा नवीन करार
जेवढी जास्त रक्कम ठेवढी कराराची मुदत जास्त असते. रक्कम जास्त दिलेली असल्यास या स्त्री – पुरुषांमधील संबंध जास्त काळ टिकून राहतात. पण रक्कम कमी असेल, तर यांच्यामधील संबंध जास्त काळ टिकून राहत नाहीत.
एकदा का कराराची मुदत संपली की, ती स्त्री त्या पुरुषाला सोडून परत येते आणि त्यानंतर परत एकदा तिचा दुसऱ्या पुरुषाशी करार केला जातो.
एका अज्ञात स्त्रीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे की, या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या प्रथेला संपवण्यासाठी कितीतरी वेळा हा मुद्दा सरकारच्या समोर देखील मांडण्यात आला.
पण जोपर्यंत पिडीत स्त्रिया स्वतःहून समोर येणार नाहीत आणि स्वतः त्याचा विरोध करणार नाहीत. तोपर्यंत या प्रथेला थांबवणे, अशक्य आहे.
अशी ही प्रथा आजही चालू आहे आणि कितीतरी स्त्रियांची त्यांच्या इच्छे विरुद्ध विक्री होत आहे. सोशल मिडीयावर देखील या प्रथेचा खूप विरोध होताना दिसत आहे.
असंही नाही कि हि प्रथा कुणी बंद करायला प्रयत्न केला नाही, आजवर बऱ्याचदा हि प्रथा थांबवायचा प्रयत्न झाला आहे, पण तरीही आपण या स्त्रियांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यात अयशस्वी ठरतो आहोत!
आज आपला समाज नारी-शक्ती, किंवा महिलांचे हक्क याविषयी बेंबीच्या देठापासून ओरडतोय पण तरीही अशा गोष्टी या समाजाच्या या दुतोंडी स्वभावाला काळीमा फासणाऱ्या आहे!
पण या सगळ्या रूढी, प्रथा ह्या थांबायला हव्यात, कारण फक्त समाजच नव्हे तर संपूर्ण देशाचं एक वेगळ चित्र यामुळे तयार होतं ज्याचे परीणाम अत्यंत चुकीचे होतात, आणि आपल्यालाच ते भोगायला लागतात!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.