' इंदिरा गांधी, हिटलर आणि (अप)प्रचारतंत्र – InMarathi

इंदिरा गांधी, हिटलर आणि (अप)प्रचारतंत्र

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आणिबाणीच्या काळातील एक प्रसंग सांगितला जातो.

देशभरात इंदिरा गांधींनी आणलेलं अनुशासन पर्व किती महत्वपूर्ण आहे ह्याबद्दल काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक नेते ह्यांनी प्रचार करत रहाण्याचा आदेश दिला गेला होता. जनमत लादलेल्या हुकूमशाहीस अनुकूल रहावं ह्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. पण खुद्द हे कार्यकर्ते, नेते स्वतः इंदिरा गांधींशी एकनिष्ठ होते का?! की त्यांना देश, लोकशाही, मत स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य ह्या बिनकामाच्या गोष्टींची जास्त काळजी होती?

 

intoday.in

हे चाचपडण्यासाठी एक गुप्त समिती स्थापन झाली. प्रमुख कोण होते हे त्याकाळची परिस्थिती माहित असणारे ओळखतीलच. सूचना अशी दिली गेली की दिलेल्या क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक नेते ह्यांना एकत्र आणून बैठका घ्यायच्या. त्यात इंदिरा गांधी, आणिबाणी, देशद्रोह, अनुशासन ह्या विषयांवर “नेहेमीच्या काँग्रेसी लोकशाही आणि मत स्वातंत्र्य परंपरेस अनुसरून” चर्चा होऊ द्यायची. त्यातून अंदाज बांधायचा.

अशाच एका बैठकीत प्रत्येकजण इंदिरा गांधींची भलामण करत होता. आणिबाणी ही देशावर झालेली दैवी कृपाच – असा सूर होता. काँग्रेस श्रेष्ठींनी पाठवलेला हेर अधूनमधून स्वतःच एखाद दुसरी नकारात्मक टिपणी करायचा तर त्याच्यावर सगळे धावून यायचे. बैठक संपली, निर्धास्त होऊन हेर बाहेर पडला.

थोड्याच वेळात त्याला बैठकीत असणाऱ्या एका नेत्याने गाठला. आणि म्हणाला – “साहेब, तुम्ही जे जे बोललात ते अगदी खरं आहे! पण असं काही बोललं तर आमच्यावरच तुरुंगात जायची पाळी येईल म्हणून गप बसावं लागतं!” हेर आश्चर्यचकित झाला.

पुन्हा थोड्या अंतरावर आणखी दोघे भेटले. सेम स्टोरी. हे असं पुढील २-३ दिवस होत राहिलं.

 

indira-gandhi-orop-marathipizza

 

हेर दिल्लीला पोहोचला आणि त्याने योग्य तीच रिपोर्टींग केली –

“सर्वजण इंदिरा गांधींवर प्रेम आणि आणिबाणी चं प्रचंड समर्थन करत आहेत. काळजी नसावी.”

===

अशी ही कथा.

हो – कथाच.

पोस्टची पहिली ओळ वाचलीत ना? पुन्हा वाचा.

“आणिबाणीच्या काळातील एक प्रसंग सांगितला जातो.”

🙂

एक इंदिरा गांधी हे नाव सोडलं तर वरील कथेत कोणताही ठोस संदर्भ नाही. स्पष्ट नामोल्लेख नाहीत. डिटेल्स नाहीत. “प्रसंग सांगितला जातो” म्हटलं की विषय संपला.

प्रचारकी नाटकं कशी असतात ह्याचं हे छोटंसं उदाहरण.

 

propaganda-media-controls-us-marathipizza

 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हिटलर बद्दल अशीच एक कथा पेरली गेली होती. ती कथा अशी :

===

अॅडॉल्फ हिटलर संपूर्ण जर्मनीत किती लोकप्रिय आहे आणि सर्व जर्मन जनता त्याच्यावर किती जिवापाड प्रेम करते, असं त्याला त्याचे सगळे मंत्री, सगळे मित्र, सगळे जवळचे अनुयायी सांगायचे.

 

hitler-marathipizza00

 

पण, खरं काय आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा तो गुपचूप एका थिएटरमध्ये शिरला आणि अंधारात एका रांगेत जाऊन बसला. तिथे सिनेमा सुरू होण्याआधी सरकारी प्रचारपट दाखवला जात होता. हिटलरची छबी दिसताच क्षणार्धात सगळं थिएटर उठून उभं राहिलं आणि एक हात पुढे करून ‘हेल हिटलर’च्या आरोळ्या, चीत्कार, घोष सुरू झाले.

हिटलर ते अद्भुत दृश्य मंत्रमुग्ध होऊन पाहात बसला होता, तेवढ्यात त्याच्या पाठीला मागच्या माणसाचा बूट टोचला. तो त्याच्या कानात खुसफुसला, त्या हरामखोराबद्दल तुझी जी भावना आहे, तीच आमचीही आहे. पण, उठून उभा राहिला नाहीस, तर बाहेर नेऊन गोळ्या घालतील त्याचे कुत्तरडे पोलिस तुला. चल ऊठ पटकन्!!!

===

हिटलर असो वा इंदिरा गांधी – कुणीकडून का असे ना, फसवे प्रचार कसे होतात हे कळावं म्हणून ही पोस्ट.

बाकी काही नाही.

काहींना अगदी स्पष्ट लिहिल्याशिवाय कळत नाही म्हणून :

१) हिटलरची पोस्ट “लोकांचं एखाद्या नेत्यावर प्रेम आहे असं वाटणं किती उलट असू शकतं” हे दर्शवण्यासाठी होती. निर्देश अर्थातच सध्या नकोश्या झालेल्या नेत्यांकडे होता. “कुत्तरडे पोलीस” वगैरे खमंग फोडणी होती. अश्या उडवाउडवीच्या संदर्भहीन पोस्ट्स वापरून वातावरण निर्मिती कशी होते – हे उलट दिशेने दर्शविण्यासाठी वर इंदिरा गांधींची खोटी, कल्पित कथा लिहिली आहे.

२) हिटलरचा नरसंहार आणि गांधींची आणिबाणी, दोन्हीही सत्य घटनाच आहेत. त्यांची भलामण अशक्यच. फक्त त्यांचा वापर आजचं वातावरण हवं तसं करण्यात होतो, अतिरंजित/खोट्या कथा पेरल्या जातात हे कळावं एवढाच हेतू आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?