या महेंद्रसिंग धोनीचं करायचं काय…?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सत्ताधारी पक्षाचं पुढच्या निवडणुकांमध्ये काय होणार यांच्या खालोखाल देशातला महत्वाचा यक्ष प्रश्न म्हणजे या धोनीचं करायचं काय? हा प्रश्न पडायचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये समोरच्या गोलंदाजाला मन मानेल तेंव्हा हवं तिकडे फेकून देणारा धोनी लुप्त झालाय. आता जो खेळतोय तो धोनीचा हमशकल किंवा तोतया खेळतोय असं वाटून राहिलंय.
२०१५ च्या सुरवातीलाच आपण ऑस्ट्रेलियाकडून थोडक्यात सामने हरलो. एकामागोमाग एक दणादण चेंडू पब्लिकमध्ये फेकून देणाऱ्या धोनीची संध्याकाळ सुरु झाली ती तिथपासून.
कसलेल्या राजकारण्याला लोकांची नाडी समजावी तसाच क्रिकेट हा खेळ जाणणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला हा निसर्गाचा कौल समजला आणि चुपचाप गड्याने कर्णधारपदाची वस्त्रं उतरवली.
तेंव्हाच धोनी निवृत्त होईल अशी शंका आली जी अजून तरी खोटी ठरली आहे. उलट अनेकदा मैदानात विराट कोहलीपेक्षा धोनीच जास्त दिसतो. विराट इतका अलिप्त कर्णधार मनमोहनसिंगही नव्हते. नेमकं काय घडलंय आणि पुढे काय वाढून ठेवलंय? कारण सगळेच आता बोलायला लागलेत आणि धोनी अजूनही अमरनाथसारखा उंचावर उभा आहे आणि त्याचे सहकारी मिलिटरी जवानासारखे त्याला जपतायत.
महेंद्रसिंग धोनी हा फलंदाज म्हणून सुपरस्टार होणं हे क्रिकेट या खेळाचं वैगुण्य नव्हे तर क्रिकेट जिवापलीकडे आवडणाऱ्या अनेक क्रिकेट रसिकांचं पाप आहे.
याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे. गोलंदाजांनी कुत्र्यासारखा मार खाणं म्हणजेच पैसे वसूल मॅच असते.
२२५-२३० चा लक्ष्य भेदताना एखाद्या संघाची फेफे उडाली तर प्रेक्षकांना कंटाळा येतो. पण तेच ३५०-३७५ किंवा ४०० करताना सामना अटीतटीचा झाला तर ती मॅच अधिक यादगार राहते. अश्या सामन्यांमध्ये गोलंदाजांचं मरण असतं. आजकाल तर जास्त लोक मावावेत म्हणून मैदानं लहान करून क्षमता वाढवण्याचे उद्योग चालू आहेत.
ऑस्ट्रेलियात सीमारेषेवर झेल जाण्याएवढा दूर मारलेला चेंडू भारतात कित्येक ठिकाणी षटकार असतो. बाकी नियम, खेळपट्या, मैदानं तर सोडूनच द्या.
झहीर खान निवृत्त झाल्यावर कोणीच काही लिहिलं बोललं नाही (प्रस्तुत लेखक त्याला अपवाद). चारच दिवसांनी वीरेंद्र सेहवाग निवृत्त झाला तर भारतीय क्रिकेटला सुतक लागलं.
१९९९-२००० च्या मोसमात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात (मार खायला) गेला. तिकडे अजित आगरकरच्या पाच भोपळ्यांची चर्चा झाली. त्याच्या सुदैवाने तेंव्हा समाजमाध्यमं नव्हती नाहीतर विनोदांना पूर आला असता. पण या सगळ्या नादात त्या कोवळ्या आणि नाजूक दिसणाऱ्या मुलाने पहिल्या दोन कसोटी सामन्यात ११ बळी मिळवले होते याकडे कोणीच ढुंकूनही बघितलं नाही.
स्टीव्ह वॉला आगरकरने त्या मालिकेत तीनदा बाद केलं होतं. अनेकांना आठवणार नाही पण १९९९ आणि २००३-०४ हे दोन्ही दौरे अजित अगरकरने अक्षरशः गाजवले. ऍडलेड सामना आगरकरनेच जिंकून दिला होता. पण हे कोणालाही आठवत नाही कारण अजित आगरकर हा अष्टपैलू म्हणून संघात घेतला गेला होता आणि त्याने त्या उपाधीला जागत फलंदाजीत छाप पाडली नव्हती.
महेंद्रसिंग धोनीकडे या दृष्टिकोनातून बघायला हवं.
एका अत्यंत नाजूक क्षणी धोनी संघात आला. तो आला आणि नरेंद्र मोदींच्या थाटात त्याने दिग्विजय केला. पण त्या आधी नेमकं काय घडलं होतं संघात?
नयन मोंगियाचा पत्ता कट झाल्यानंतर संघाला अनेक वर्षं यष्टीरक्षक मिळाला नाही. नयन मोंगियाच्या आधीसुद्धा किरण मोरे नंतर थोडं चाचपडायला झालं. पण सय्यद किरमाणी ते किरण मोरे आणि पुढे मोरे ते मोंगिया या कालखंडांमध्ये एवढं जीवघेणं अंतर नव्हतं. नयन मोंगिया नंतर आपल्याकडे दीप दासगुप्ता पडताळून झाला. फलंदाजीत बरा होता पण यष्टिरक्षणात गोलकिपरही नव्हता.
त्यानंतर अजय रात्रा आला. दासगुप्तापेक्षा उजवा पण फलंदाजीत काही षटकंही कामाचा नव्हता. मध्येच विजय दहिया येऊन गेला.
२००३ ला वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविड यष्टीरक्षक होता. (अजय जडेजा काही सामने कर्णधार होता तेंव्हा द्रविडने बाजू सांभाळली होती) दिनेश कार्तिक आला तेंव्हा अप्रतिम यष्टीरक्षक होता पण फलंदाजीत फार खास नव्हता. किमान काही षटकं उभा राहील आणि स्टंप्सच्या मागे उत्तम उभा राहील असा खेळाडू हवा होता.
एका फुरफुरणाऱ्या घोड्याची नितांत गरज असताना महेंद्रसिंग धोनी नावाचा नावातच मारझोड असलेला खेळाडू मिळाला.
कधीकधी कुचकामी ते बऱ्याचदा ठीकठाक पण धडाकेबाज फलंदाजीचं तंत्र असलेला धोनी फलंदाज म्हणून वन डे मध्ये महान झाला आणि हाच महेंद्रसिंग धोनी नावाच्या एका अफलातून यष्टिरक्षकावर आपण अन्याय केला. कारण तेच क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे.
१९९० च्या दशकाच्या अखेरपर्यंत यष्टिरक्षकाची फलंदाजी हा बोनस समजला जात असे. रॉडनी मार्शने ऑस्ट्रेलियासाठी आपली कारकीर्द गाजवली. मग काही काळ ग्रेग डायरने जबादारी उचलली. मग इयान हिलीने हा किल्ला सांभाळला. तोपर्यंत यष्टीरक्षक हा सर्वात आधी यष्टिरक्षणासाठी घेतला जात असे.
मुळात पाच फलंदाज, पाच गोलंदाज आणि एक यष्टीरक्षक अशी मांडणी असे. यष्टिरक्षकाने आणि दोन गोलंदाजांनी जबाबदारीने बॅट सांभाळायची म्हणजे फलंदाजी क्रमांक आठ पर्यंत जाई.
वेस्ट इंडिजचा जेफ दजॉ असो ऑस्ट्रेलियाचा मार्श असो की हिली, सय्यद किरमाणी असो की किरण मोरे, नयन मोंगिया असो की अगदी गेला बाजार विजय यादव, हे फलंदाज म्हणून उपयुक्तच होते. त्यांची निवड होत असे ती यष्टिरक्षणासाठी.
ऍडम गिलख्रिस्ट आल्यानंतर हे निकष बदलले.
त्या आधी वेस्ट इंडिजने ज्युनियर मरेच्या आणि श्रीलंकेने रोमेश कालुविथरणाच्या माध्यमातून धडाकेबाज फलंदाजी करणारा यष्टीरक्षक ही संकल्पना राबवली होती. पण गिलख्रिस्ट आणि या खेळाडूंमध्ये फरक होता.
दक्षिण आफ्रिकेसाठी आजही कसोटीत क्विंटन डिकॉक यष्टींमागे असतो आणि वनडेत एबी डिव्हिलियर्स. श्रीलंकेसाठी वनडेत हे काम कुमार संगकारा करत असे. ऍडम गिलख्रिस्टने हे बदलून टाकलं. यष्टीरक्षक म्हणून तो अफाट तर होताच. पण फलंदाज म्हणून तो मॅथ्यू हेडनसारख्या श्रेष्ठ फलंदाजांच्या बरोबरीचा होता.
त्या वेळच्या त्यांच्या फलंदाजीत जस्टिन लँगर, हेडन, रिकी पॉन्टिंग, डॅमियन मार्टिन, माईक हसी, अँड्र्यू सायमंड्स यांच्याच तोडीचा ऍडम गिलख्रिस्ट येत असे. पहिले पाच अगदी पन्नासमध्ये परतले तरी गिलख्रिस्ट किमान पावणे चारशेची व्यवस्था करत असे.
महेंद्रसिंग धोनी त्याच तोडीचा फलंदाज झाला. कसोटीपेक्षाही वनडेत तो सर्वश्रेष्ठ फलंदाज झाला.
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, यांच्या तोडीस तोड महेंद्रसिंग धोनी झाला. हे होत असतानाच तो भारताचा सर्वात यशस्वी (श्रेष्ठ नाही, माझ्या मते तो मान गांगुलीचा) कर्णधार झाला. दोन दोन वर्ल्डकप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफीचा त्याच तोडीचा कप हे सगळं उचलणारा धोनी पहिला कर्णधार झाला.
आणि हेच करताना तमाम पब्लिक धोनीला यष्टीरक्षक म्हणून विसरून गेलं. यष्टींमागे धोनी आहे म्हटल्यावर काळजी राहिलीच नाही.
फलंदाज म्हणून धोनी बायकोसारखा खपला आणि यष्टीरक्षक म्हणून आईसारखा. कधीतरी अतिपरिचयात अवज्ञा झाली आणि लोक आता फलंदाजीवरून धोनीची उपयुक्तता ठरवायला लागलेत जसं काही तो संघातून बाहेर गेला की मागे बॉल आपोआप थांबणार आहे.
यष्टिरक्षण हा भयानक कठीण प्रकार असतो. तुमचं सर्वांग कमालीचं मजबूत लागतं.
चित्याची चपळाई, माणसाचं डोकं आणि हत्तीचा शांतपणा हे सगळं यष्टिरक्षणात लागतं. हे करता करता धोनीने फलंदाज म्हणून घरच्या लक्ष्मीसारख्या खस्ता काढायच्या आणि वर जबरदस्त यशस्वी कप्तानही व्हायचं. काही सणसणीत अपवाद वगळता धोनीने ह्या सर्व जबाबदाऱ्या चांगली आठ वर्षं पेलल्या.
१९९९ साली अलेक स्टुअर्ट हा ब्रिटिश कॅप्टन हे सगळं कसं सांभाळू शकतो ही आश्चर्याची गोष्ट होती. धोनीबद्दल कधीच कोणाला तसं वाटलं नाही. त्याच्यावर सिनेमा बनवणाऱ्याला ते वाटलं नाही तर जनतेला कसं वाटणार? धोनीवर बनलेल्या सिनेमात एकूण कितीवेळा धोनी यष्टींच्या मागे दाखवलाय? सुशांतसिंग राजपूतला तरी हे आठवेल की नाही, शंका आहे. जसं काही धोनी फलंदाज होता आणि टाईमपास म्हणून फावल्या वेळात यष्टिरक्षणाचे मोजे घालायचा.
मान्य आहे आज फलंदाज म्हणून धोनी पूर्वीचा राहिला नाही. २०० च्या वर लक्ष्य असताना टी २० मध्ये २७ चेंडूत २७ ची धोनीची चैन संघाला परवडणारी नाही.
पण विकेटकिपर म्हणून तो काय आहे? अजूनही त्याच्या यष्टिरक्षणाला तोड आहे काय? त्याच्या हातून बॉल सुटतो? रन आउट चुकतो? स्टंपिंगला धोनी मागे राहतो? धोनीची नजर मंदावलीये? धोनी धावण्यात मागे आहे? डोळ्याचं पात लवत ना लवत तोच यष्ट्या उडवणाऱ्या धोनीचा दरारा कमी झालाय काय? क्रिकेट फक्त फलंदाजासाठी बघितलं की ह्या गोष्टी लक्षात राहत नाहीत.
हरकत नाही, हाकला धोनीला. वृद्धिमान साहा वनडेत तयार होईल. पण त्याची क्षमता पूर्वीचा फलंदाज धोनी होण्याची आहे काय? मग आत्ताचा धोनी काय वाईट आहे? वर धोनी खेळणार म्हणजे त्याचा बारा वर्षांचा अनुभव खेळणार. त्याचा फायदा रवी शास्त्री आणि विराट कोहलीला करून घ्यायचाय.
अजूनही अटीतटीची वेळ आली की सर्रास विराट कोहली सीमारेषेवर जाऊन उभा राहतो आणि धोनी सूत्रं हातात घेतो. संघात असलेली बांधणी हे दाखवते. कदाचित विराटला पुढचे सहा महिने धोनी मास्तरची गरज पडणार आहे. अफलातून यष्टीरक्षक, उपयुक्त फलंदाज आणि जबरदस्त अनुभवी आणि तितकाच शांत आणि मनमिळावू विनयशील माजी कप्तान जर विराट कोहलीला वृद्धिमान साहा वगैरेंपेक्षा जवळचा वाटत असेल तर त्याला इलाज नाही.
तूर्तास या ‘महेंद्रसिंग कोहली’ मधून धोनी बाहेर पडणं दृष्टिपथ्यात नाही.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.