' दंडवतेंना दंडवत…! – InMarathi

दंडवतेंना दंडवत…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अनुपम कांबळी

कणकवली रेल्वेस्टेशन वरून मुंबईला प्रवास करत असताना किंवा प्रवास करून आल्यावर मी जिन्याजवळ मधु दंडवतेंचे जे तैलचित्र आहे त्याला दोन्ही हात जोडुन प्रणाम केल्याशिवाय कधीच पुढे जात नाही.

तो प्रणाम एवढ्यासाठीच असतो की, आज या कोकण रेल्वेने मी जो काही प्रवास करतोय तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे…! एका कर्मयोग्याप्रती व्यक्त केलेली ती क्रुतज्ञता असते.

राजापुर मतदारसंघाचे खासदार असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांचे अकस्मात निधन झाल्याने अहमदनगरच्या प्राध्यापक मधु दंडवतेंना पक्षाने थेट कोकणातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. निकष फक्त एकच होता तो म्हणजे नाथ पै यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे असलेली विद्वत्ता…!

 

nath pai InMarathi

 

काहीही झाल तरी कोकणची जनता लोकसभा निवडणुकीत मतदान करताना एका विद्वान उमेदवारालाच मत देणार हा पक्षाला असलेला विश्वास…!!

तो काळ इंदिरा गांधी यांचा होता. १९७१ साली संपूर्ण देशात इंदिरा गांधी यांची लाट आलेली असताना त्यांनी शेंदूर फासलेला दगड देखील निवडुन येत होता. महाराष्ट्र देखील याला अपवाद नव्हता. इंदिरा लाटेत कॉंग्रेसचे ४८ पैकी ४७ खासदार निवडून आले… फक्त एकच खासदार जनता दलाचा निवडुन आला… आणि तो खासदार म्हणजे आदरणीय मधु दंडवते…!

 

Madhu-dandvate InMarathi

 

कोकणची जनता कोणत्याही लाटेत वाहवत जात नाही, हे त्यावेळी इंदिरा गांधींना आम्ही दाखवून दिले होते. अगदी नरेंद्र मोदी यांची लाट आली. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सभा घेतल्यानंतरही सर्वच्या सर्व सहा जागांवर भाजपचा पराभव झाला.

 

Narendra-Modi-rajya-sabha

 

त्यावेळी सुद्धा कोकणी माणुस हाच संदेश देत होता की ज्याची देशात लाट असते त्याचीच आम्ही कोकणात खाट घालतो…! कोणत्याही बड्या नेत्याचा उधळलेला वारु थोपवुन दाखवण्याची ताकद या कोकणच्या मातीत आहे.

 

indira gandhi InMarathi

 

थोडक्यात अहमदनगरचे मधु दंडवते कोकणात निवडुन आले आणि नंतर ते कधी कोकणी झाले त्यांना सुद्धा कळल नाही. त्याकाळी मधु दंडवते हा कोकणी जनतेचा स्वाभिमान होता आणि आजही आहे. मधु दंडवतेंनी बँरिस्टर नाथ पै यांच्याप्रमाणे संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे करून राजापुर मतदारसंघाची ओळख ‘विद्वान लोकांचा मतदारसंघ’ अशी देशभरात सर्वदूर केली. आजही या द्वयींची भाषणे अभ्यासासाठी संसदेत जतन करून ठेवलेली आहेत.

 

indira gandhi InMarathi

 

कालांतराने दंडवते देशाचे रेल्वेमंत्री झाले. अ.ब. वालावलकर यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते परंतु आमचे नाना ते स्वप्न अक्षरशः दिवसरात्र जगले. दरीखोऱ्यातून रेल्वे शक्य नाही म्हणून याअगोदर कोकण रेल्वेच्या प्रस्तावावर अनेकदा फूली मारण्यात आली होती. मात्र जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा सहकारी आणि ई.श्रीधरन यांच्या सारखा ध्येयनिष्ठ इंजिनियर यांना सोबत घेऊन नानांनी हे अशक्यप्राय स्वप्न साकार केले.

कोकण रेल्वेची संकल्पना जेव्हा त्यांनी कोकणी जनतेसमोर मांडली तेव्हा कोणताही विकासात्मक द्रुष्टीकोन नसलेल्या तत्कालीन विरोधकांनी नानांवर अगदी टोकाची टीका केली. ‘ दंडवते सदा गंडवते’ या घोषणेपासुन रस्त्यावर फिरणाऱ्या रोड रोलरवर ‘आली पहा आली… दंडवतेंची रेल्वे आली…’ या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होता. मात्र क्षमाशील असलेल्या या कर्मयोग्याने ही विखारी टीका देखील अगदी हिमालयाप्रमाणे स्तब्ध राहून सहन केली.

 

Madhu-dandvate 2 InMarathi

 

लोकसभेत विरोधक म्हणुन इंदिरा गांधीवर शब्दांच्या धारदार अस्त्रांनी तुटून पडणारे नाना त्यांच्या अकस्मात निधनानंतर भावुक होऊन ‘राजीव गांधीना त्यांची आई आता कधीच मिळणार नाही’ असे उदगार काढतात, तेव्हा या व्यक्तीच्या ह्रुदयाची आणि विचारांची विशालता लक्षात येते.

कोकण रेल्वेचे स्वप्न साकारल्यानंतर हे विरोधक काळाच्या ओघात गडप झालेत, परंतु मधु दंडवते कोकणच्या इतिहासात अजरामर झालेत. जेव्हा केव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात एक पान हे खास नानांसाठी राखीव असेल आणि त्यांच नाव हे सुवर्णाक्षरातच लिहीले जाईल, यात तिळमात्र शंका नाही.

कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या नानांची कपाटे वेगवेगळ्या विषयावरच्या पुस्तकांनी भरलेली असत. ज्यांची कपाटे पैशांच्या थैल्यानी भरलेली होती त्या नेत्यांना कधीच पराभव पहावा लागला नाही.

मात्र कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न पुर्ण करणाऱ्या नानांचा १९९१ सालच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार कर्नल सुधीर सावंत यांनी पराभव केला. त्याच काळात नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झालेली असल्याने शिवसेनेची संघटना बळकट झाली होती.

अशा परिस्थितीत शिवसेनेने वामनराव महाडिक यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देऊन मतांचे विभाजन केल्याने त्याचा फटका मधु दंडवतेंना बसला व सुधीर सावंत विजयी झाले.

सलग पाच वेळा विजय मिळाल्यानंतर अचानकपणे झालेल्या या पराभवामुळे नानांना जबर मानसिक धक्का बसला होता. नेमकी त्याच वेळी त्यांना देशाचा पंतप्रधान बनण्याची संधी चालुन आली होती. तेव्हा मागच्या दरवाजाने (राज्यसभा) जाऊन मी पंतप्रधान होऊ इच्छित नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यावेळी लालू प्रसाद यादव व अन्य नेत्यांनी त्यांना बिहार मधला कोणताही मतदारसंघ निवडा, आम्ही तुम्हाला निवडून आणत लोकसभेवर पाठवतो याची खात्री दिली. तेव्हा तत्वांच्या या पूजाऱ्याने जे उत्तर दिले ते ऐकून त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणारा कोकणी माणुस मनातुन हळहळला. नाना प्रांजळपणे म्हणाले –

माझ्या लोकांनी मला निवडणुकीत नाकारले. त्यामुळे देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याचा नैतिक अधिकारच मला प्राप्त होत नाही.

 

Madhu-Dandavate-inmarathi01
indiatimes.com

 

आजच्या या बाजारू राजकारणात नानांसारखी नैतिकतेची व्याख्या सांगणारा दुसरा पुढारी शोधुन तरी सापडेल का…? आपली तत्व आणि नैतिकता जपण्यासाठी त्यांनी पंतप्रधान पदावर पाणी सोडले. अन्यथा मराठी माणुस देशाचा पंतप्रधान झाला असता. त्यानंतर 1996 च्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या जनतेचे लोकसभा निवडणुकीत विद्वान उमेदवाराप्रती असलेले आकर्षण पाहुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेनी पेशाने सीए व सारस्वत बँकेचे चेअरमन असलेल्या सुरेश प्रभुना उमेदवारी दिली.

यावेळी सुरेश प्रभुनी सुधीर सावंत व मधु दंडवते या दोघांचाही पराभव केला. त्यावेळी निकालादिवशी सुरेश प्रभुंना विजयी घोषित केल्यानंतर त्यांनी लगेचच शेजारी उभे असलेल्या मधु दंडवतेंची भेट घेत वाकुन त्यांच्या चरणांना स्पर्श केला. मतांच्या गोळाबेरजेत आपण विजयी झालेलो असलो तरी मधु दंडवतें या व्यक्तीचे कोकणप्रती असलेले योगदान प्रभुना चांगलेच ठाऊक होते.

त्यावेळी नानांनी सुरेश प्रभुंचे अभिनंदन करून त्यांना आलिंगन देत म्हटले की,

बॅरिस्टर नाथ पै व मी आम्ही दोघांनी संसदेत जपलेला या मतदारसंघाचा लौकिक तुम्ही कायम राखाल याची मला खात्री आहे. आज तुमच्या रूपाने या मतदारसंघाला पुन्हा एकदा विद्वान खासदार मिळाला.

काही वर्षापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर साध्या राहणीमानाचे मार्केटींग केले होते. त्यातला फोलपणा नंतर उघडकीस देखील आला. त्यावेळी अनेकांना अरविंद केजरीवालांच्या त्या साधेपणाचे कौतुक आणि अप्रुप वाटले कारण त्यांच्यातील बहुतांश लोकांना मधु दंडवते हे अजब रसायन माहितीच नव्हते.

 

arvind-kejriwal-marathipizza

 

बसस्टॉपवर रांगेत उभे असलेल्या नानांचे कित्येक प्रत्यक्षदर्शीनी दर्शन घेतलेले आहे. आपण या देशातील महत्वाचे नेते आहोत म्हणुन बसच्या पुढच्या दरवाजाने चढण्याची सवलत देखील या तत्वनिष्ठ व्यक्तीने कधी घेतली नव्हती. मधु दंडवते हे देशाचे अर्थमंत्री होते. हे पद गेल्यानंतर ते एका बँकेत जेव्हा चारचाकी गाडीसाठी कर्ज काढायला गेले, तेव्हा तिथला अधिकारी अवाक झाला.

देशाचे अर्थमंत्रीपद भूषविलेला नेता गाडीसाठी बँकेत कर्ज घ्यायला येतो हे चित्र या देशात पुन्हा कधी दिसेल असे मला तरी वाटत नाही. आपल्या साधेपणाचे मधु दंडवतेंना कधी मार्केटींग करावेसे वाटले नाही कारण तो त्यांच्या रक्तातीलच एक गुण होता.

अशा अवलिया नेत्याने कधी काळी माझ्या मतदारसंघाचे सलग पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते हे सांगताना निश्चितपणे माझी छाती अभिमानाने भरून येते.

सुरेश प्रभुनी रेल्वेमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देण्यासाठी मी जेव्हा कॉल केला तेव्हा माझ्या त्यांच्याकडे दोनच प्रमुख मागण्या होत्या. पहिली म्हणजे सावंतवाडीला रेल्वे टर्मिनस करा आणि त्या टर्मिनसला कोकण रेल्वेच्या शिल्पकाराचे म्हणजेच मधु दंडवतेंचे नाव द्या.

सुरेश प्रभूंनी पहिली मागणी पुर्ण करून सावंतवाडी टर्मिनसचे काम सुरू देखील केले पण त्या टर्मिनसला मधु दंडवतेंचे नाव द्यायला ते आज रेल्वेमंत्री पदावर राहिले नाहीत. ती जबाबदारी आपणा सर्वांना पार पाडावी लागेल.

 

sawantvadi tarminals InMarathi

 

ज्या काळात लोकशाही व्यवस्थेच्या मुलभुत सिद्धांतावर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत… ज्या काळात लोकशाही व राजकीय नेतेमंडळीवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय… त्या पिढीला आणि पुढच्या अनेक पिढ्यांना ‘दंडवते कोण होते’ हे समजणे नितांत गरजेचे आहे.

राजकारणात राहूनही निस्प्रुहपणे काम करता येते हे पुढच्या पिढ्याच्या मनावर ठसवुन देण्यासाठी त्यांना मधु दंडवते कोण होते हे माहिती असणे आवश्यक बनले आहे.

ज्यांचे चरणस्पर्श घेऊन क्रुतक्रुत्य होता यावे अशा फारच थोड्या व्यक्ती या भूतलावर होऊन गेल्या. त्यात करून फक्त राजकीय क्षेत्राचा विचार केला असता अशा व्यक्तींची संख्या ही नगण्यच होती. आता एकंदरीतच ज्या वेगाने राजकारणातून नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे, ते पाहता मधु दंडवते हे त्या थोर व्यक्तींच्या यादीतील शेवटचच नाव म्हणाव लागेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?