“छातीठोक” हार्दिक पटेल, सेक्सटेप आणि सामाजिक मानसिकता
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
“सेक्स” हा शब्द कानी पडताच जरासा अवघडल्यासारखं होत! नाही का? असं का होत? एखाद्याची लैंगिक उत्तेजना जागृत होणे म्हणजे ती व्यक्ती असभ्य, असंस्कृत, नालायक, चारित्र्यहीन ठरवायची का? किंवा तश्या भावना मुला-मुलींमध्ये आल्या तर त्यास सामाजिक संस्कृतीची केलेली प्रताडणा ठरवून टाकणे योग्य आहे काय?
एका ठराविक वयात म्हणजेच पौगंडावस्थेत (Puberty) शारीरिक बदल घडून येतात. पौगंडावस्था म्हणजे लैंगिक संक्रमणाचा काळ. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा काळ मुलांमध्ये वयाच्या 11 ते 12 यादरम्यान सुरू होतो तर मुलींच्या 12 ते 13 या वयात सुरू होतो. आणि अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या वयाच्या 16 ते 18 व 15 ते 17 या वयवर्षांमध्ये संपतो. याच काळात कुमारवयीन अपरिपक्व मुला-मुलींचे सामाजिक-मानसिक आणि मुख्यतः शारीरिक दृष्टीने प्रगल्भ अशा तरुण व्यक्तीत परिवर्तन घडते.
या काळात मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन तर मुलींमध्ये ईस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाची (Hormones) ची निर्मिती होत असते. याच काळात त्यांच्या लैंगिक गुणधर्मांचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो. म्हणजेच या काळात मूला-मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल आणि त्यामुळे शारीरिक गरजांमध्ये होणारी वाढ ही नैसर्गिक असते. होय “सेक्स” ही एक नैसर्गिक गरज आहे.
जसं पाणी, जेवण आहेत अगदी तशीच. हे पचायला जड जात कारण आपल्या समाजाने घालून दिलेल्या तथाकथित सभ्यपणाच्या मानदंडाच्या लक्ष्मणरेखा हे सत्य पार करतं. बाकी हे ज्ञान सांगण्यामागचा हेतू इतकाच की, “सेक्स ही वाईट गोष्ट नाही, ती शारीरिक गरज आहे” ही गोष्ट आपण मान्य करावी.
Sex is not a hot topic But its like, “हर बच्चा एक्साम में कॉपी तो करना चाहता है लेकीन जब वो बच्चा, टीचर की भूमिका में आता है तो वो चाहता है की स्टुडंट्स कॉपी ना करे”
थोडक्यात, सुरुवातीला उपस्थित केलेले प्रश्न, सेक्सची उत्तेजना होणे म्हणजे असभ्य, असंस्कृत, नालायक असणे असूच शकत नाही.
आता ती शारीरिक गरज दोन प्रकारे भागवता येते. एक तर कायदेशीर व परस्पर सहमतीने आणि दुसरी बळजबरीने. कायद्यानुसार वैध पद्धतीने, दोघांच्या सहमतीने आणि बळजबरीने म्हणजे बलात्कार सारखे प्रकार अत्याचार, धमकी देऊन वगैरे वगैरे.
तर आता येऊ मुख्य मुद्द्याकडे “हार्दिक पटेल – सेक्सटेप” कडे.
ह्या सेक्स टेप बद्दल हार्दिक काय म्हणतोय पहा :
थोडक्यात – हार्दिक छातीठोकपणे समोर उभा आहे.
गुजरात मध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. गुजरात हे भाजपचे हिंदुत्वाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. 2014 च्या लोकसभेत मोदींनी ह्याच गुजरातच्या तथाकथित विकासाच्या मॉडेलच्या जीवावर पक्षांतर्गत प्रधानमंत्री पदाची उमेदवारी मिळविली व गुजरात सारखा विकास (?) देशभर करू असे दिव्य स्वप्न भारतीयांच्या मनात रंगवून प्रधानमंत्री पद गाठले. तर मग नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभेची इतकी धास्ती का घेतलेली आहे? कारण आता तर ते प्रधानमंत्री पण आहेत. असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असेल. त्यासाठी आपल्याला गुजरात मधील काही राजकीय गणितं समजून घ्यावी लागणार आहे.
गुजरात मध्ये याआधीच्या निवडणुकीत भाजपाने 9.67% असलेल्या मुस्लिम समाजाच्या उघड विरोधात जाऊन हिंदुत्वाच्या बळावर 88.57% हिंदूंची एकगठ्ठा मते प्रभावित करत विजय खेचून आणला. 2002 च्या दंग्यांनंतर आजतागयत तरी हाच पॅटर्न गुजरात मध्ये होतो. मुस्लिमांना तिकीट न देणे वगैरे वगैरे. गुजरात मध्ये हिंदुत्वाचा रक्षक व व्यापाऱ्यांना पोषक असा पक्ष अशी प्रतिमा भाजपची होती. नव्हे तर ती निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीचा भागच म्हणा.
मोदी यावेळी प्रधानमंत्री आहेत तेव्हा गुजरातची लढाई त्यांच्या नाकाची लढाई होऊन बसलेली आहे. गुजरात मध्ये पाटीदार-पटेल समाज 12 3%, OBC 40%, आणि दलित 7% आणि मुस्लिम 9% आहे. मुस्लिम समाज तर 2002 च्या दंग्यांमुळे भाजपपासून कधीच दुरावलेला. पण ह्यावेळी, GST-नोटबंदी मुळे पारंपरिक मतदार व्यापऱ्यांचा असलेला रोष, उना येथील दलित अत्याचाराच्या घटना, भाजपचा आर्थिक कणा असलेल्या पटेल समाजाची आरक्षणाची मागणी, फसवी दारूबंदी, इत्यादी घटनांमुळे तिथले सारे राजकीय गणितच बदलून गेलेले आहेत.
या साऱ्या घटनांची परिणीती म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, आणि अल्पेश ठाकूर ह्या तीन युवानेत्यांचा झालेला उदय.
पाटीदार, दलित आणि OBC जनतेचे लक्षणीय असे पाठबळ ह्या तीनही नेत्यांना लाभलेलं आहे. तेव्हा विषय स्पष्ट आहे. ह्यावेळी गुजरातमधील निवडणूकित “हिंदूत्व” हा फॅक्टर आजिबात चालणार नाही. आणि मोदींच्या अस्वस्थतेची खरी गोम हीच आहे.
2014 च्या पाशवी बहुमताच्या जोरावर सत्ता हस्तगत केल्यानंतर मोदींनी भाजप वरील पकड मजबूत केली आहे. यशवंत सिन्हा, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शत्रुघन सिन्हा, कीर्ती आझाद यांसारख्या दिग्गजांना त्यांनी सर्रास बाजूला केले. ह्या सर्व मंडळीला आत्तापर्यंत एखादं दुसरा अपवाद वगळता शांत बसविण्यात मोदींना यश आलेलं होत. पण जनतेत वाढता रोष व गुजरात मधील परिस्थिती बघून त्यांना जास्त काळ शांत ठेवता येणार नाही. हे मोदींना लक्षात आलेलं आहे. आणि जर अश्या परिस्थिती गुजरात हातातून गेले तर मोदींच्या पक्षांतर्गत असलेल्या हिटलरहीला उघड विरोध सुरू होईल. आणि विरोधकांनाही आजून बळ मिळेल.
या वरून स्पष्ट दिसून येते की मोदींना घाम फुटला आहे.
आता येऊ यात हार्दिक पटेल कडे.
23 वर्षाच्या या तरुणाने मोदींच्या नाकात अगदी दम करून सोडलाय. एकीकडे मोदींच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांचा ढीग असताना हा 23 वर्षीय हार्दिक, लाखो लोकांची गर्दी सभेसाठी खेचून आणत आहे. त्यामुळेच त्याला शह देण्यासाठी कधी त्याच्या साथीदारांना धमकावून, पैशांचे पदाचे आमिष दाखवून फोडणे किंवा पैशांनी विकल्या गेल्याचा आरोप करणे, देशद्रोहाचा आरोप लावणे, तडीपार करणे, विनाकारण जेल मध्ये टाकणे, अश्या प्रकारचे सर्व हातखंडे भाजपच्या संस्कारी महापुरुषांनी वापरून बघितले पण यात काहीही यश त्यांना हाती आले नाही.
या उलट पाटीदार समाजासोबतच इतर समाजही त्याच्याकडे आजून आकर्षित होत आहे. अशा प्रकारच्या त्रासाला जिग्नेश व अल्पेश ही अपवाद नव्हते. पण मुख्य म्हणजे हार्दिक, जिग्नेश, अल्पेश यांच्यातील एकजूट. आणि त्यातच अल्पेशने जाहीररित्या धरलेली काँग्रेस ची वाट.
तेव्हा हार्दिक पटेल ला बदनाम करण्यासाठी एक शेवटचे “मोदीअस्र” वापरले. (like ब्रह्मास्र, पण देवाची बदनामी का? म्हणून मोदीअस्त्र). काय तर वैयक्तिक आयुष्यात डोकविणे..!
दोन सज्ञानींने संगनमताने 4 भिंतीच्या आता काय करावे नि काय करू नये हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. विशेष म्हणजे त्या तथाकथित सेक्सटेपला “सेक्सटेप” म्हणणे चुकीचे आहे. कारण त्यात हार्दिक सारखा दिसणारा व्यक्ती एका मुलींबरोबर फक्त चर्चा करताना दिसत आहे. भक्तांना अपेक्षित असलेला सांस्कृतिक कार्यक्रम त्यात नाही. तर विडिओवरून हार्दिक पटेल म्हणतोय की CD तील व्यक्ती मी नाहीये. मी त्यापुढेही जाऊन म्हणेल की जरी तो असला तरी तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. विडिओनुसार तो त्या मुलीवर कुठलाही दबाव टाकताना, बळजबरी करताना दिसत नाहीये.
आणि जर परस्पर सहमतीने ते दोघे Sexual Intercourse करत असतील तर त्यात वाईट काय? सेक्स करने हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक जीवनाचा भाग आहे. आणि तो जर संगनमताने असेल तर त्यात चारित्र्यहीन सारख्या गोष्टीचा संबंध काय? मध्ययुगीन मानसिकता असणारे लोकच त्याला चारित्र्यहीन ठरवतील.
“Even if it is #HardikPatel in that #video why should he be ashamed of having consensual sex? Those who filmed these private moments are the ones who should be ashamed! #HowLowCanYouGo”
पत्रकार सीमा गोस्वामी यांचे याप्रकरणावरील हे ट्विट अधिक लक्षवेधी ठरत आहे.
निवडणुकांच्या पूर्वी अशी विडिओ व्हायरल होणे म्हणजे नक्कीच राजकीय कारण ह्यामागे आहे. जननेत्याला अश्या लैगिंक प्रकरणात अडकवून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष भरकटवून त्याचे राजकारण संपविण्याचा डाव हे काही आता नवीन राहिलेले नाहीत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने खेळलेला हा अत्यंत नीच प्रकारचा राजकीय डाव आहे. यावर जनतेने योग्य प्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीतही असा प्रकार पाहायला मिळाला होता डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्याही काही विडिओ क्लिप्स, फोटो व्हायरल करण्यात आले होते. पण तेथील जनतेने त्याला महत्व दिलेच नाही. व नेत्यांच्या “Right to Privacy” चा अधिकार मान्य करून आधुनिक मानसिकतेचे दर्शन घडविले. तशीच काहीशी मानसिकता, हार्दिक CD प्रकरणामुळे भारतातही दिसून आला. अनेक युवकांनी, बुद्धिजीविंनी, नेत्यांनी, संपादकांनी, पत्रकारांनी हार्दीकचे समर्थन केले. आणि हे त्याच्या वैयक्तिक जीवनाच्या हक्कांचे उल्लंघन आहे असे नेटीझन्सनेही ठासून सांगितले.
हार्दिक चे वय केवळ 23 वर्ष आहे त्याने त्याच्या शारीरिक गरजा कश्या पूर्ण कराव्यात, नको कराव्यात. हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. किंवा ब्रह्मचारी रहावे. काही भाजप समर्थकांनी विडिओ viral झाल्यानंतर “बेशर्म हार्दिक” असा ट्रेंड चालवला. जर आपण मानून चाललो की त्याने सेक्स केला तर तो मात्र चार भिंतीच्या आत केला.
चार भिंतींच्या आत सेक्स करणारे बेशर्म की त्या भिंतींच्या आतील व्यक्तीगत जीवनात डोकविणारे? – तुम्हीच ठरवा.
सेक्स ला धर्महीन, चारित्र्यहीन ठरविणाऱ्या तथाकथित संस्कृतीरक्षकांना कालिदासांसारख्या नाटककारांची काम (सेक्स), ऋंगाराची महती गायलेल साहित्य, खजुराहो येथील मंदिरांवर साकारलेली कामाची शिल्प, गाथा सप्तशतींचे पुन्हा एकदा दर्शन घडविण्याची गरज आहे. जगाला कामसूत्राची देणगी या देशाने जगाला दिली. सेक्सविषयी तत्कालीन भारतीय समाजाला कधीच असूया नव्हती, घृणा नव्हती तर आदर होता आणि कामाचं जीवनातलं महत्त्व त्यांना पटलेलं होतं. एक मोकळी पण स्वैराचार नसलेली जबाबदारीची जाणीव असणारी काम संस्कृती या देशानं पाहिली आहे, अनुभवली आहे.
अश्या देशात, ऐन निवडणुकांच्या काळात सेक्सचा वापर करून जनमत घडवण्याचा प्रयत्नांना समाजाने संभावितपणे उत्तर देण्याची गरज आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.