राष्ट्रगीताची “सक्ती” आणि “वंदेमातरम की जन गण मन वाद” : RSS कार्यकर्त्याच्या नजरेतून
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
लेखक : महेश मोहन वैद्य
===
टीप : सदर लेखात व्यक्त केलेले विचार लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत. InMarathi.com त्या विचारांशी सहमत असेलच असं नाही.
===
आधुनिक काळात जागतिक पटलावर कोणत्याही देशाची ओळख किवा अस्मिता ‘राष्ट्रध्वज’ आणि ‘राष्ट्रगीत’ या दोन गोष्टींनी अधोरेखित होतात. राष्ट्रध्वज यांना तर भारतात काय किंवा जागतिक इतिहासात काय लाखो-हजारो वर्षाची परंपरा आहे. अगदी छोट्या संस्थाना पासून तर मोठ्या साम्राज्या पर्यंत प्रत्येकाचा वेगळा ध्वज आणि त्याचा अभिमान दोन्ही सोबत चालत आलेले आहे. पण राष्ट्रगीत ही १९ व्या शतकाची भेट आहे आणि तिचा एवढा प्रसार झाला की, आज जगात अस्तिवात असलेल्या ज्ञात आणि अज्ञात प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत त्या त्या देशाचे मानचिन्ह आहे. या विषयी जागतिक स्तरावर नियम अलिखित पण एकदम पक्के आहेत. प्रत्येक देशाच्या राष्ट्रगीताला योग्य तो सन्मान प्रत्येक देश त्या त्या वेळेला देत असतो.
राष्ट्रगीताचा नक्की वाद काय आहे? हे माहित नसताना, विविध लोकांच्या अनेक उलट सुलट प्रतिक्रिया बघायला मिळाल्या.
प्रथम भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ लिहल्या गेल्या पासुनच वादाची किनार मागे लागली आहे. ‘जन गण मन”’ हे नोबल पारितोषिक विजेते कवी, चित्रकार, लेखक, शिक्षक असे उतुंग व्यक्तिमत्व असलेले स्व. राविद्रनाथ टागोर यांनी १९११ साली लिहले आहे. त्यांनी ते इग्लंडचा राजा पंचम जार्ज यांच्या भारत भेटीच्या वेळेस त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे कौतुक म्हणून लिहले आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काही लोक हा गैरसमज असल्याचे सिद्ध करायचा प्रयत्न करतात. यात असलेल्या “भारत भाग्यविधाता” या शब्द रचनेमुळे हा वाद आहे.
तर काहींना ‘जन गण मन’ एवजी बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ कादम्बरीत १८८२ साली लिहलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला राष्ट्रगीत बनवावे अशी इच्छा होती. कारण १८८२ पासूनच भारतीय स्वातंत्र्य सैनिकांत हे गीत कमालीचे लोकप्रिय तर झालेच पण यातील ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता कि जय’ हा तर भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जयघोष पण झाला होता. अनेक क्रांतिकारक ‘वंदे मातरम’ असा जयघोष करत एक तर फासावर लटकले किंवा इंग्रज सैनिकांच्या गोळ्यांना बळी पडत अमर झाले, तर कॉंग्रेसची एकही सभा या दोन घोषणे शिवाय होत नव्हती.
‘वंदे मातरम’ गीत १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कॉंग्रेसच्या अधिवेशनात म्हंटले. १९०५ मध्ये इग्रजांनी ‘वंदे मातरम’ या गीतावर बंदी पण आणली. तरी १९१५ पासून हे गीत नियमित आणि आग्रहपूर्वक कॉंग्रसेच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्व धर्माचे लोक एकदिलाने गाऊ लागले. या काळात ‘वंदे मातरम’ हे गीत भारतीय जनतेचे “राष्ट्रगीतच” बनले होते. पण १९२१ मध्ये कॉंग्रेस पक्षाने ‘खिलापत चळवळीला’ पाठींबा दिला आणि ‘वंदे मातरम’ चे भाग्य पालटले. या खिलापत चळवळीमुळे भारतातील इस्लामी धार्मिक कट्टरतावाद वाढला आणि त्याचे परिणाम एवढ्या विकोपाला गेले की आतापर्यंत लोकप्रिय आणि सगळ्या धर्माचे लोक ज्या घोषणा आणि गीत एकदिलाने म्हणायचे त्यांना मूर्ती पूजक गीत आणि घोषणा म्हणून विरोध होऊ लागला. याचे पर्यावसन म्हणून १९२३ साली कॉंग्रेस अधिवेशनात तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष महमद अली जिन्ना यांनी इस्लाम विरोधी घोषित केले आणि याचे गायन बंद करायची मागणी केली. या मागणी पुढे कॉंग्रेस झुकली आणि कॉंग्रेस मधील ‘वंदे मातरम’ गायन बंद पडले.
१९३७ साली कॉंग्रेसनेच ‘वंदे मातरमच्या’ पहिल्या दोन कडव्यांना त्यात मूर्तीपूजा नसून देशाच्या सौंदर्याचे वर्णन आहे असे म्हणत राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाल्यावरअनेक हिंदू संघटना आणि राजकीय पक्षांना आशा होती की ‘वंदे मातरम’ भारताचे अधिकृत राष्ट्रगीत होईल पण तत्कालीन सरकारने ‘जन गण मन’ ला राष्ट्रगीत बनवले आणि काही दिवस हा वाद पुन्हा ऐरणीवर आला. मात्र तत्कालीन राष्ट्रपती राजेद्रप्रसाद यांच्या पुढाकाराने ‘वंदे मातरम’ च्या पहिल्या दोन कडव्याना राष्ट्रगीताचा दर्जा दिल्या गेला.
आता तुम्ही म्हणाल की वरील काहींना माहित असलेला आणि काहींना माहित नसलेला इतिहास पुन्हा येथे सांगायची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाचा आताचा निर्णय आणि या इतिहासाचा संबंध काय? पण विवादाची सुरवात या इतिहासातूनच आहे. कट्टर धार्मिक मानसिकता कोणत्या स्वरुपात राजकारण करते, त्याचा फायदा घेणारे राजकारणी तो कसा घेतात आणि सामान्य लोकांचा बुद्धिभेद कसा करतात हे या सगळ्यात अभ्यासण्यासारखे आहे.
या वाद-विवादानंतर जेव्हा २४ जानेवारी १९५० ला ‘जन गण मन’ ला भारताचे राष्ट्रगीत म्हणून अधिकृत पणे घोषित करण्यात आले, तेव्हा सगळ्या भारतीयांनी याला भरभरून ‘मान-सन्मान-प्रेम’ दिले जे कोणत्याही देशाच्या राष्ट्र्गीतास मिळायला हवे. यात हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदू संघटना ज्यांना मनापासून ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत म्हणून हवे होते यांनीही राष्ट्रगीताला मनापासून तितकाच सन्मान दिला.
पण २०१६ साली एका खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने देशातील सगळ्या चित्रपट गृहात चित्रपट प्रदर्शना आधी ‘राष्ट्रगीत’ वाजवावे असा निर्णय दिला आणि या निर्णयामुळे एका नवीनच वादाला तोंड फुटले. या वादाचा मला नाही वाटत की कोणत्याही सामान्य भारतप्रेमी नागरिकाने इतकेच काय तर संविधान निर्मात्यांनीही विचार केला असेल. पण अशी स्थिती २०१६मध्ये उभी ठाकली. जेव्हा या निर्णयाची पूर्तता म्हणून भारतातील सगळ्या चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजण्यास सुरवात झाली आणि देशातील बहुसंख्य लोक राष्ट्रगीताला सन्मान म्हणून उभे राहून त्यास मानवंदना द्यायला लागली. तेव्हा दोन मानसिकतेची लोक जाणीवपूर्वक बसून राहून राष्ट्रगीताचा अपमान करू लागली. त्यातील पहिले होते फाळणी नंतर इच्छा असूनही पाकिस्थानात जाऊ न शकलेले मुस्लीम ज्यांनी पुन्हा तेच कारण समोर केले जे ‘वंदे मातरम’ बाबत महमद अली जिन्ना यांनी दिले होते की, “हे गीत मूर्ती पूजक आहे जे ‘इस्लाम’ च्या विरोधात आहे.” याला कारण म्हणून त्यांनी राष्ट्रगीतातील ‘अधिनायक’ या शब्दाला आक्षेप नोंदवला. त्याच बरोबर भारतात अजून एक मानसिकता फोफावली जी अजारक परिस्थिती निर्माण करण्यात तरबेज आहे. ती कायद्याने बोलतांना मानवतावाद, स्वतंत्रवाद याला महत्व देऊन अंतर्गत मनात नक्षलवादाचा प्रभाव पाडून भारतातील ‘सार्वभौम, संवैधानिक, लोकशाही’ व्यवस्था उखडून टाकायची मनसुबे बांधत होती, ती म्हणजे ‘कम्युनिस्ट विचारसरणी’. या भांडणाचे राजकारण त्याच्या पद्धतीने करत त्यांनी ‘राष्ट्रगीत’ म्हणतांना जे करोडो भारतीय उभे राहून राष्ट्रा बद्दल सन्मान देत आहे त्यांना ‘अभिव्यक्ती स्वतंत्र्या’च्या नावाखाली बुद्धीभ्रम तयार केला आणि इतके वर्ष सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारने याकडे दुर्लक्ष केले.
राष्ट्रगीताला सन्मान म्हणून उभे राहणे हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक आणि संवैधानिक कर्तव्य आहे…
आणि ते कर्तव्य निभावण्यात भारतीय कधी कमी पडणार नाही याची खात्री असल्यानेच कदाचित संविधानाच्या संसदीय समितीने या करता मार्गदर्शक नियम दिले तरी कायद्याचे आवरण त्याला दिले नाही. याचाच फायदा अजारक अभिव्यक्तीचे कैवारी आणि इस्लाम धर्माभिमानी घेत आहेत.
या मार्गदर्शक तत्वांमध्ये राष्ट्रगीत कुठे वाजवायचे आणि ते सुरु असताना कसे उभे राहायचे याचे स्पष्ट निर्देश या नियमात दिले आहेत, त्यात राष्ट्रगीत सुरु झाल्यावर सावधानमध्ये उभे राहायचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यात फक्त बदल इतकाच केलाय की कोणत्याही कलाकृतीत कथेच्या ओघात राष्ट्रगीत किंवा त्याची धून दाखवण्यात किंवा ऐकवण्यात येत असेल तर सावधानमध्ये उभे राहायची गरज नाही.
पण कट्टर धार्मिक इस्लामी आणि स्युडो अभिव्यक्तीवादी याचे २०१६ नंतर चित्रपटगृहात बहुसंख्य भारतीयांशी खटके उडायला लागले. मुंबईतील कुर्ला येथील चित्रपटगृहात एका मुस्लीम परिवाराला, तसेच केरळमध्ये काही डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना याच कारणावरून चित्रपटगृहातील इतर लोकांशी खटके उडाले, प्रत्येकावर त्या त्या ठिकाणी पोलिसांवर गुन्हा नोंदण्यासाठी दबाव आणल्या गेला. या मुळेच या सक्तीची चर्चा – प्रतिचर्चा, विरोध, मोरल पोलिसिंगचे आरोप याचा धुराळा उठला आणि प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले.
निदान वर्तमानपत्र, वृत्त वाहिन्या मधील बातमीने तरी हाच मुद्दा समोर आणला आहे. मित्रांनो, मुळातच खरा मुद्दा हाच आहे! राष्ट्रगीत कुठे वाजवायचं? का वाजवायचं? किती वेळ वाजवायचं? हा मुद्दाच नाही आहे.
खरा मुद्दा हा आहे की, राष्ट्रगीत सुरु असताना आम्ही राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे का राहायचं? आणि आम्ही “उभे” नाही राहिलो म्हणून तो “गुन्हा” होतो का?
मात्र तोच धागा पकडून माननीय न्यायालय अजून पुढे जाऊन असे म्हणते की राष्ट्रगीताच्या वेळेस उभे राहणे सक्तीचे नाही.
चित्रपट गृहात राष्ट्रगीत वाजवावे की नाही?? हा मुद्दाचं नाही आणि कधीही नव्हता, मुळातचं भारतातील काही लोक धार्मिकतेच्या किंवा वैचारिक बांधीलकीच्या नावाखाली बहुसंख्य भारतीय लोक जे करतात ते आपण न करता आपली वेगळी ओळख ठसवण्याचे हे उद्योग आहेत. या लोकांना राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे हे राष्ट्रगीताप्रती आणि राष्ट्राप्रती असलेली बांधिलकी आणि कर्तव्य न वाटता सक्ती वाटते ते याच करणासाठी.
चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे न राहिल्याबद्दल आक्षेप ज्यांच्यावर घेतल्या गेला त्यात दुर्दैवाने मुख्यत: वरील दोनच प्रकारचे (धार्मिकतेच्या किंवा वैचारिक बांधीलकी) लोकं होते. काही ठिकाणी मारझोड झाली जी व्हायला नको होती आणि काही ठिकाणी चुकीची भूमिका पण घेतली गेली. शारीरिक व्यंग असलेल्या लोकांवर पण उभे राहायची सक्ती केल्या गेली जे व्हायला नको होते असे मला मनापासून वाटते.
पण त्याच बरोबर धार्मिकतेच्या मुद्यावर राष्ट्रगीताच्या वेळेस उभे न राहणे पण तितकेच अयोग्य आहे. कारण हा फक्त भावनेचा आणि अस्मितेचा प्रश्न नसून आपल्या राष्ट्रीय कर्तव्याच्या जाणीवेचा पण प्रश्न आहे. बाकी वैचारिक बांधिलकी आणि लिबरल याच्या विचाराखाली उभे राहण्यास नकार देणारे डावे हे भारताच्या विचारधारेशी कधी एकरूप झालेचं नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घटना विरोधी असल्याचा सतत आरोप करत आणि संघ शाखेत कधी राष्ट्रध्वज लावत नाही म्हणून संघाला दुषणे देणारे आणि स्वत: किती संविधानाचा आदर करतात याची जंत्री देणारे डावे, स्वतः खुलेआम राष्ट्रगीताला आदर देत नाही ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणात राष्ट्रगीता करता उभे न राहिल्यामुळे ज्यांच्यावर कारवाई झाली ते डाव्या विचारांचे लोक होते. त्यात संघाचा किंवा हिंदुत्व वादी पकडला गेला नाही यातच सगळ आल.
काहींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताला विरोध असताना त्यांनी या बाबत घेतलेली भूमिका हास्यास्पद वाटत आहे. पण मुळातच संघाने किवा संघ परिवारातील सदस्याने राष्ट्रगीताचा जाणून अपमान केलेला अजून तरी बघण्यात आला नाही.
आता विचार तुम्हाला करायचा आहे की संवैधानिक आणि संपूर्ण लोकशाही पद्धतीने देशाने स्वीकारलेल्या राष्ट्रगीताला उभे राहणे ही सक्ती आहे का? आणि उभे न राहणारे देशद्रोही नाही काय? पुन्हा एकदा सांगतो की मुद्दा हा नाहीच की, राष्ट्रगीत कुठे वाजवायचे… मुद्दा हा आहे की तुमच्या राष्ट्रगीताला आम्ही मान का द्यायचा.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page | Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.