डॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आजच्या काळामध्ये आपण आजारी पडलो, तर त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला डॉक्टरवर कितीतरी पैसे खर्च करावे लागतात. खूप पैसे खर्च करून देखील आपण कधी पूर्णपणे बरे होवू ह्याची शाश्वती नसते. आजकालचे काही डॉक्टर देखील रुग्णाकडून जास्त पैसे काढता यावे, यासाठी त्याला तीनदा – चारदा उपचारासाठी बोलावतात. कधी – कधी लहानश्या आजाराला देखील आपण घाबरतो आणि लगेचच डॉक्टरांकडे जातो. आपल्या देशात खूप शिकलेले आणि तज्ञ डॉक्टर आहेत आणि त्यांची फी देखील तेवढीच जास्त आहे. पण आज आपण अश्या एका डॉक्टरांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची फी ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल. हा डॉक्टर फक्त २ रुपयांमध्ये लोकांवर उपचार करतो आणि हे गेल्या ४० वर्षांपासून तो करत आहे. चला तर मग जाणून घेऊया, या दिलदार डॉक्टरविषयी..
काही दिवसांपूर्वी आलेल्या एका तमिळ चित्रपटामध्ये, ज्याचे नाव मर्सल हे होते. त्यामध्ये अभिनेता विजय याने पाच रुपये फी घेणाऱ्या डॉक्टरचा रोल साकारला होता. त्यावेळी त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. पण त्याने साकारलेला हा डॉक्टर खऱ्या आयुष्यामध्ये देखील आहे. त्यांचे नाव टी. वीराराघवन आहे. ६७ वर्षीय वीराराघवन हे फक्त दोन रुपयांमध्ये लोकांवर उपचार करतात. डॉक्टर टी. वीराराघवन यांनी निर्णय घेतला आहे की, ते दुर्लक्षित समाजातील लोकांचा उपचार खूप कमी किंमतीमध्ये करणार.
डॉ. टी. वीराराघवन हे १९७३ सालापासून रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांचाकडून फक्त दोन रुपये फी घेत आहेत. चेन्नईमधील या डॉक्टरने स्टेनले मेडिकल महाविद्यालयामधून एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. २०१५ मध्ये आलेल्या पुरामध्ये त्यांचे सर्व काही वाहून गेले होते, त्यामुळे त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते. पण त्यावेळी त्यांनी हार न मानता ते पुन्हा एकदा जोमाने उभे राहिले. त्या परिस्थितीमध्ये देखील ते रुग्णालयांना सेवा देत होते.
१९७३ ला जेव्हा डॉ. टी. वीराराघवन यांनी सुरुवातीला लोकांवर उपचार करण्यास सुरू केली, तेव्हा ते २ रुपये फी घेत असत, त्यानंतर त्यांनी ही फी वाढवून ५ रुपये केली. त्यांनी आपल्या करीयरची सुरुवातच २ रुपये फी घेऊन केली. डॉ. टी. वीराराघवन हे त्यांच्या या फीमुळे एवढे प्रसिद्ध झाले आहेत की, त्यांच्या आजूबाजूचे डॉक्टरदेखील त्यांचे विरोध करायला लागले होते. तेथील डॉक्टरांनी डॉ. टी. वीराराघवन यांना कमीत कमी १०० रुपये फी रुग्णांकडून घ्यावी अशी त्यांची मागणी होती.
डॉ. टी. वीराराघवन हे सकाळी ८ वाजल्यापासून इरुकांचेरी येथे रुग्णांना पाहण्यास सुरू करतात आणि रात्री १० वाजेपर्यंत ते रुग्णांना तपासतात. या दोन रुपये घेणाऱ्या डॉक्टरांचा येथील लोक देखील खूप आदर करतात. त्यांना लोक २ रुपयावाले डॉक्टर म्हणून देखील आवाज देतात. ते वेश्या वस्तीत देखील रुग्णांना तपासण्यासाठी जातात. मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ते कुष्ठरोगींच्या जखमा भरत असत. काही डॉक्टर तर अश्या रुग्णांना हात देखील लावत नाहीत.
डॉ. टी. वीराराघवन यांचे याबद्दल म्हणणे आहे की, त्यांनी जेव्हा डॉक्टर बनण्यासाठी शिक्षण घेतले, त्यावेळी त्यांना काहीही पैसे खर्च करावे लागले नाहीत.
हे शिक्षण त्यांनी समाजाच्या सेवेसाठी घेतले आहे, मग ते त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांकडून पैसे कसे घेणार, म्हणून ते फक्त २ रुपयांमध्ये रुग्णांवर उपचार करतात.
त्यांनी माजी मुख्यमंत्री कामराज यांना धन्यवाद दिले, कारण त्यांच्यामुळेच ते आज रुग्णांवर मोफत उपचार करत आहेत.
असे हे महान डॉक्टर फक्त पैसे कमावण्यासाठी या क्षेत्रामध्ये न येता, समाजाच्या कल्याणासाठी या क्षेत्रात आले. डॉक्टरकी हा काही व्यवसाय नाही हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचे हे काम असेच निरंतर चालावे यासाठी त्यांना आमच्याकडून शुभेच्छा…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.