१९ वर्षाचा अक्षय – मेहनत आणि हुशारीने झाला एका वर्षात कोट्याधीश!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
श्रीमंती म्हटलं की आपल्याला वॉरेनन बफे, बील गेट्स आणि अशी अनेक अमेरिकेतली नावं आठवतात. तर आशिया खंडात जॅक मां आठवतो. आणि भारतात जे श्रीमंत आहेत त्यांचे किती ब्रँड जगभरातल्या टॉप १०० मध्ये आहेत – हा संशोधनाचा विषय आहे. (वादग्रस्तही होऊ शकतो! असो!). दर्जेदार सेवा देत कोट्याधीश होणं हेही काम सोपं नाही. काहीतरी चाकोरी बाहेर जाऊन करायची इच्छा सर्वांचीच असते. पण चाकोरीबद्ध काम न करता काही वेगळं विशेषतः व्यवसाय करायचा म्हणजे कठीणंच होऊन जातं. व्यावसाय म्हणजे पुर्णवेळ नोकरी आणि नोकरी म्हणजे आठ तासाची हजेरी हे सर्वश्रुत आहेच. कॉलेजमध्ये हुशार नसलेला मार्क झुकेरबर्ग, अॅपलचा स्टीव्ह जॉब्स, बील गेट्स्, हे अभ्यासात जेमतेम होते. पण त्यांनी सोशल मीडिया, कंप्यूटरची क्रांती आणि त्यामधील अमुलाग्र बदल यामुळे त्यांनी आपला असा अमीट ठसा उमटवला आहे.
त्यात कमी वयातील, प्रामाणिक आणि कोट्याधीश शोधून सापडणं कठीणंच. आपल्याकडे आयआयटी, आयआयएमच्या मुलांच्या कँपस इंटरव्ह्यू नंतर त्यांना मिळणा-या पॅकेजच्या बातम्या व्हायरल होतात. पण ती मुलं म्हणजे कोणत्यातरी कंपनीत अधिकारी किंवा इंटर्नम्हणून जातात. त्यात स्वतःचा व्यावसाय सुरू करून यशस्वी होणारे तुरळकच. त्यातही भारतात अल्पावधीत कोट्यावधीश झालेले तर शोधावे लागतील. आपल्याकडे जॉब म्हणजे जॉईन अदर्स बिझनेस अशी सरधोपट वाट आपण निवडतो.
पण भारतीय वंशाचा अक्षय रुपारेलिया हा १९ वर्षाचा युवक इंग्लंडमधील कोट्याधीशांपैकी एक झाला आहे. ते ही कोणताही बिझनेसचा कौटुंबिक वारसा नसताना. असं काय केलं अक्षयने, त्याची कौटुंबीक पार्श्वभूमी व्यापार करण्याची होती का ? तर नाही. त्याची आई कर्ण बधीर विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षकेतर कर्मचारी आहे आणि वडील परिचारक आहेत. अशी पार्श्वभूमी असताना त्याने वयाच्या १९ व्या वर्षी स्वतःची रिअल इस्टेटची वेबसाईट सुरू केली. ज्याद्वारे लोकांना आपली प्रॉपर्टी विकता येते व विकत घेता येते. DoorSteps.co.uk, या वेबसाईटचा मालक अक्षय रुपारेलिया याने त्याच्या वेबसाईटवरील व्यवहारांकरता आणि शंकांचे समाधान करण्याकरता कॉलसेंटर हायर केले. तो शाळेतून आल्यावर आलेल्या फोनकॉल्सला उत्तरं देत असे.
तसेच त्याने त्याची पहिली प्रॉपर्टी डील ही त्याच्या बहिणीच्या प्रियकराच्या मदतीने केली. त्याचा हा व्यावसाय वाढवण्यामध्ये त्याच्या आईच्या जनसंपर्काची त्याला मोठी मदत झाली. ज्या वयामध्ये इंग्लंडमधील किशोरवयीनन मुलं फुटबॉल खेळण्यात व्यस्त असतात, त्यावेळी अक्षय शाळेतून आल्यावर आपल्या व्यवसायात व्यस्त असायचा. आज अक्षय इंग्लंडमधला सर्वाधिक कमीवयाचा कोट्याधीश आहे. त्याच्या वेबसाईटचा टर्नओव्हर १२ कोटी युरो इतका आहे.
जेमतेम १६ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या वेबसाइटने आज इंग्लंडमधील रिअलइस्टेट क्षेत्रातील महत्वाच्या वेबसाइट्सपैकी १८ व्या स्थानावर आहे. त्याच्या या कामाबद्दल त्याला विचारले असता त्याने सांगितले की –
घरं विकत घेणं आणि विकणं हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्यावेळी त्याच्याकडे कार चालवायचा परवाना नव्हता त्यावेळी त्याने बहिणीच्या प्रियकराच्या मदतीने एका प्रॉपर्टीचा व्यवहार यशस्वी केला होता. या डीलचे त्याने बहिणीच्या प्रियकराला ४० पाऊंड दिले होते. तसंच अक्षयने त्याच्या नातेवाईकांकडून सात हजार युरो घेऊन आपला व्यावसाय सुरू केला होता.
आज अक्षयच्या कंपनीमध्ये १२ कर्मचारी आहेत. हजारो घरांची विक्रि त्याच्या वेबसाईटवर होत आहे. त्याची वेबसाइट सक्सेस होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे जिथे इतर प्रॉपर्टी विकणा-या साइट्स ग्राहकांकडून ८०० ते १००० युरो घेतात. तिथे अक्षय फक्त ९९ युरो घेतो.
अक्षय क्विन एलिझाबेथ शाळेतला विद्यार्थी आहे. तो त्याच्या मित्रांमध्ये आलन शुगर या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. तसंच त्याचे गणित इकॉनॉमिक्स व पॉलिटिक्स हे विषय आवडीचे आहेत.
अक्षयला ऑक्सफर्डमधून इकॉनॉमिक्स व गणित विषय शिकण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. पण त्याने सध्या आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्याला प्राधान्य दिलं आहे. आता, आपली पहिली वहिली कार घेण्यासाठी अक्षय दरमहा १००० पाऊंड त्याला झालेल्या नफ्यामधून बाजूला काढत आहे. इतक्यात त्याने स्वतःची कार घेतली नाही. पण अद्यापतरी त्याचा बिझनेस जोरदारपणे सुरू आहे…!
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.