हरवलेल्या मुलाने कित्येक वर्षानंतर गुगल अर्थ वापरून कुटुंबाचा लावला शोध: “Lion” चित्रपटाची सत्यकथा
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
‘गुगल अर्थ’ हा गुगलच्या आजवरच्या वाटचालीतील सर्वात महत्त्वपूर्ण शोधांपैकी एक शोध म्हणावा लागेल. कारण घरबसल्या कोणत्याही देशात, प्रदेशात फेरफटका मारायचा असेल तर गुगल अर्थ पेक्षा उपयुक्त असे दुसरे साधन नाही.
याच गुगल अर्थच्या मदतीने एका भारतीय व्यक्तीने विदेशात राहून आपल्या रक्ताच्या माणसांचा शोध घेतला. आणि त्याचा तो शोध यशस्वी देखील झाला!
ही सत्य घटना इतकी प्रभावशाली आहे की ऐकताना, वाचता अंगावर काटा उभा राहतो. अशी उत्कंठावर्धक घटना लवकरच दृश्यरुपात तुमच्यासमोर उलगडली जाणार आहे गर्थ डेविस दिग्दर्शित ‘लायन’ या चित्रपटाच्या माध्यमातून. मुख्य गोष्ट म्हणजे या चित्रपटात ‘सरु ब्रायरले’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारतोय ‘देव पटेल’ (स्लमडॉग मिलीनियरवाला) हा भारतीय वंशाचा अभिनेता!
चला तर जाणून घेऊ ‘लायन’ ज्या घटनेवर बेतलाय ती घटना नेमकी काय आहे ते…!
‘सरु मुंशी खान’ एका गरीब कुटुंबातील असून त्याला तीन भाऊ आणि एक बहिण होती. वडिलांनी अर्ध्यावर सोडलेल्या संसाराचा गाडा सरूची आई एकटी हाकत होती.
गुड्डू, सरू, कालू, आणि शकिला यामध्ये गुड्डू ९ वर्षांचा तर सरू ५ वर्षांचा असल्याकारणाने गुड्डूला कुटूंबातील हलाखीची फार लवकर समज आली…अन् सरूसमवेत तो छोटेमोठे काम करून आईला होईल तशी मदत करू लागला.
शाळेत नं जाणारी ही निष्पाप मुलं परिस्थितीपुढे झुकून रेल्वे स्टेशनवर भिक मागून, लोकांचे अन्न चोरून उदरनिर्वाह करत होते. एके दिवशी गुड्डू लहानग्या सरूला स्टेशनवर सोडून एका कामानिमित्त निघून गेला आणि आपण येईपर्यंत येथून हलायचे नाही अशी ताकीदही त्याने सरूला दिली. त्याचवेळी नेमका थकलेल्या सरूचा देह काही वेळ स्टेशनवर विसावला अन् कधी झोप लागली हे त्याला समजलेच नाही. बराच वेळ उलटून गेल्यामुळे सरू ताडकन उठला आणि गुड्डूला सर्वत्र शोधू लागला. नेहमीप्रमाणे ट्रेनमधील कामावरच पोट असणाऱ्या सरूला समोर उभी असलेल्या ट्रेनमध्ये गुड्डू असल्याची शक्यता वाटू लागली. गुड्डूला ट्रेनमध्ये शोधता शोधता भुकेने व्याकूळ झालेला सरू भावाच्या वाटेकडे डोळे लावून पुन्हा ट्रेनमध्ये पहुडला. काही काळाने उन्हाच्या झोताने सरूला जाग आली, अन् अर्धवट झाकलेल्या डोळ्यांनीच सरूने संपूर्ण ट्रेनमध्ये एक नजर टाकली त्या रिकामी ट्रेनमध्ये सरू शिवाय कोणाचाच मागमूस नव्हता. ट्रेन 80 किमीच्या वेगाने धावत स्टेशनपासून फार दूर पोहोचली होती. अन् सरूचा प्रवास सुरू झाला होता तो कायमचा आपल्या कुटुंबापासून दूर होण्यासाठी.
काही वेळानंतर ती ट्रेन कोलकत्याला जाऊन पोहोचली. सरू एका वेगळ्या विश्वात होता. कोणाची भाषा समजत नव्हती आणि कोणी ऐकून घेण्याचा प्रयत्नही करत नव्हते. त्यातच भीक मागून राहणाऱ्या सरूचे एका व्यक्तीने अपहरण केले. नशीब बलवत्तर म्हणून सरू त्याच्या तावडीतून सुटून एका चांगल्या माणसाला भेटला, पोलिसांकडे नेले असता पत्ता न सांगू शकल्याने सरूला किशोर सुधारगृहात पाठवण्यात आले.. 1987 ह्या वर्षामध्ये एक दिवस असा आला की सरूला एका अनधिकृत संस्थेने सुधारगृहातून दत्तक घेतले. शिक्षण देऊन, चांगला माणूस बनवून सरूला त्या संस्थेने एका ऑस्ट्रियन दांपत्याला दत्तक दिले. जॉन आणि सू ब्रायरले ह्या दांपत्याला स्वतःचे अपत्य असूनही एका भारतीय मुलाला सांभाळण्याची त्यांची इच्छा होती. चांगल्या संस्कारांसोबतच बिझनेस मॅनेजमेंटसारखे उच्च शिक्षण त्यांनी सरूला दिले.
ऑस्ट्रेलियात सुखा समाधानात असतानाही सरूला भारताची आठवण येत होती आणि विश्वास देखील होता की एक ना एक दिवस तो त्याच्या कुटुंबाला पुन्हा भेटेल.
यावेळी जुन्या आठवणी त्याला खूप उपयोगी पडल्या. हरवलेल्या दिवशी ट्रेनमध्ये असताना १४ तास आणि ताशी वेग ८० किलोमीटर असल्यामुळे कोलकत्यापासून १६०० किमी लांब घर असावे असा त्याने अंदाज लावला. गुगलचा आधार घेऊन सरूने कोलकात्यापासून १६०० किमी दूर असलेल्या मध्य प्रदेश मधील खांडवा ह्या जागेचा शोध लावला.
११ महिन्यांनंतर तो खांडवा येथे पोहोचला असता त्याचे कुटुंब दुसरीकडे राहायला गेल्याची माहित सरूच्या हाती लागली. जुन्या फोंटोंवरून सरूने कुटुंबाचा नवीन पत्ता मिळवला आणि तिथे पोहचताच त्याच्या आईला त्याच्या परतण्याची काहीच आशा नव्हती असे चित्र समोर आले. परंतु ताटातूट झालेले एक कुटुंब पुन्हा एकत्र आले आणि कुटुंबाच्या भेटीची आस लागलेल्या सरूच्या कहाणीचा शेवट गोड झाला.
सदर चित्रपट ‘अ लॉंग वे होम’ या कादंबरीवर प्रेरित आहेत. अश्या धाटणीचे आजवर अनेक चित्रपट जागतिक सिनेमांच्या पटलावर घडून आले असले तरिही क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवणाऱ्या या कहाणीला हॉलीवूड स्टाईलने दाखवण्याचा दिग्दर्शक गर्थ डेविसचा हातखंडा कितीपत यशस्वी झालाय हे येत्या 25 नोव्हेंबर रोजी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Article By: प्रतीक्षा मोरे
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.