काश्मीरला पाकिस्तानच्या तावडीतून वाचवणाऱ्या राजेंद्रसिंहांची अव्यक्त कथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – विशाल दळवी
—
भारत आणि पाकीस्तान मधील आजवर चालत आलेल्या शत्रुत्वाचं सर्वात मोठं कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे – धरतीवरील स्वर्ग ‘काश्मीर’.
अनेक चुकीच्या निर्णयांमुळे आज या स्वर्गाचे नरकात रुपांतर झाले आहे हे वास्तव आहे.
काश्मीर मुद्दा नेमका निर्माण कसा झाला आणि त्यापुढे काय घडलं याची कहाणी जितकी रोचक आहे त्यापेक्षा रोचक आणि रंजक कहाणी आहे त्या माणसाच्या शौर्याची – ज्याने काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात नं जाऊ देण्यासाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान दिले.
हा माणूस लढला नसता, तर आज काश्मीर पाकिस्तानात असते…!
राजेंद्र सिंह त्यांचे नाव…
काश्मीरी सेनेचे सेनाध्यक्ष…!
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतात जवळपास ५६५ छोटी-मोठी संस्थाने आणि त्यांची स्वत:ची राज्ये होती. यापैकी बहुतांश संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली परंतु काहींनी त्याला विरोध केला. विरोध करणाऱ्यांमध्ये जम्मू काश्मीरच्या संस्थानाचा देखील समावेश होता.
भारत सरकारने अनेक विनवण्या करून देखील जम्मू काश्मीर भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. जम्मू-काश्मीर संस्थानामधील बहुसंख्य लोकसंख्या मुस्लीम होती, परंतु त्यांवर राज्य करणारा मात्र हरी सिंह हा अल्पसंख्यांक हिंदू राजा होता.
आणि हेच कारण होते की नव्याने स्थापन झालेल्या पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा होता.
(काश्मिरचं भौगोलिक आणि राजकीय महत्व जाणून घेण्यासाठी वाचा: जम्मू काश्मीर महत्वाचं का आहे? )
परंतु काश्मीरचे राजा हरी सिंह ना पाकिस्तानला भिक घालत होते, ना ही भारताचा पक्ष घेत होते.
राजा हरी सिंहांनी स्वतंत्र काश्मीरची घोषणा केली. यामुळे चिडून पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद अली जीना यांनी ‘STANDSTILL AGREEMENT’ कराराचा भंग करीत काश्मीरमध्ये पेट्रोल, धान्य आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली. यावर कळस म्हणून जीनांच्या आदेशावरून पाकिस्तानी सेना २२ ऑक्टोंबर १९४७ रोजी काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्ताहून रवाना झाली.
याचवेळी राजा हरी सिंहांच्या काश्मिरी सैन्याला देखील बंडाची कीड लागली आणि कित्येक मुस्लीम सैनिकांनी पाकिस्तान सोबत हातमिळवणी केली. एव्हाना पाकिस्तानी सैन्य श्रीनगर पासून अवघ्या १६४ किमी अंतरावर असलेल्या मुझ्झफाराबाद येथे येऊन ठेपले होते. म्हणजे काही वेळातच पाकिस्तान काश्मीरवर चालून जाणार होते आणि काश्मीर पाकिस्तानाच्या पदरी पडणार होते.
चिंतेत पडलेल्या राजा हरी सिंहांनी भारताकडे मदतीची याचना केली. परंतु जोवर राजा हरी सिंह ‘Instrument Of Accession’ करारावर स्वाक्षरी करत नाही तोवर भारताकडून मदत मिळणार नाही असे भारत सरकारने कळवले. (या करारा वर स्वाक्षरी करणे म्हणजे राजा हरी सिंह जम्मू काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्यास तयार आहेत असा अर्थ होता.) अखेर नाईलाजाने राजा हरी सिंह यांनी ही अट मान्य केली.
एव्हाना रावळकोट, मुझ्झफाराबाद आणि चकोटी पर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानी फौजेला आपला विजय दृष्टीक्षेपात दिसत होता.
परंतु याचवेळी मोठ्या धीराने उभ्या राहिलेल्या काश्मिरी सेनेच्या सेनाध्यक्ष राजेंद्र सिंहांनी काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात जणू देणार नाही अशी शपथ घेतली आणि इथून पाकिस्तानचा विजय पराभवात परिवर्तीत होऊ लागला.
जेव्हा त्यांना कळले की, पाकिस्तानी सैन्य श्रीनगरच्या अगदी जवळ आले आहे तेव्हा त्यांनी बारामुल्ला आणि श्रीनगरला जोडणारा पूल उडवून टाकला. एकमेव मार्ग उध्वस्त झाल्यामुळे दोन दिवस पाकिस्तानी सैन्याला काहीही हालचाल करता आली नाही. परंतु त्यांचा हल्ला सुरुच होता.
या हल्ल्यात दुर्दैवाने पराक्रमाची शर्थ करताना राजेंद्र सिंहांन वीरमरण आले. पण या दोन दिवसात भारतीय सैन्य काश्मिरी सेनेच्या मदतीला येऊन पोहोचले आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्याला पार पिटाळून लावले.
आता काश्मीर अधिकृतरीत्या भारताचा भाग झाला होता. राजेंद्र सिंहांच्या युद्ध कौशल्यामुळे आणि हिंमतीमुळे धरतीवरचा हा स्वर्ग भारताच्या नशिबी आला.
ब्रिगेडियर राजेंद्र सिंहांना मरणोत्तर महावीर चक्र बहाल करण्यात आले आणि काश्मीरचे रक्षक अशी उपाधी बहाल करण्यात आली.
त्यांची या शौर्यगाथेचा इतिहासामध्ये फारच कमी वेळा उल्लेख केला जातो. पण त्यांचे बलिदान काश्मीरच्या मातीमध्ये कायमचे रुजले गेले आहे. आणि त्यापासूनच प्रेरणा घेत भारतीय सैन्य अहोरात्र काश्मीरचे रक्षण करत आहे.
ब्रिगेडियर राजेंद्र सिंहांना आदरयुक्त सलाम!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.