सत्यशोधकांचा ‘दलवाई द्रोह’ : हमीदभाईंच्या विचारांचा कुणीच वारस नाही का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
मुस्लीम सत्यशोधक मंडळ या संघटनेच्या तत्वविचाराचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा भारतातील हिंदू मुस्लीम प्रश्नाच्या दृष्टीने पाहता एका नव्या युगाची पहाट केव्हाच झाली आहे असे ज्या अनेकांना वाटले त्यांच्यापैकीच मीही एक आहे.
दलवाई, शहा, कुरुंदकर या तिघांनी विवेकी धर्मचिकित्सेची आणि अधुनिकातावादाची मूलगामी संकल्पना प्रस्थापित करून इथल्या विचारकलहाला निर्णायक दिशा देण्याचे काम केले आहे.
‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ ही संघटना म्हणजे या मंडळींच्या कार्याचे फलित आहे. दलवाई यांच्या रूपाने मुस्लिम समाजात नवे सुधारणावादी नेतृत्व पुढे येत आहे हे पाहून नरहर कुरुंदकर यांनी हमीदभींचे वर्णन ‘उगवता तारा’ असे केले होते. सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेच्या काळात हमीद दलवाई यांच्या मनात मुस्लीम समाज उदारमतवादी आणि आधुनिक होईल ही अशा शेवटपर्यंत भरून होती.
धर्माला कालबाह्य ठरवून मानवनिर्मित आधुनिक मुल्ये आत्मसात करण्यासाठी मुस्लीम समाजास आव्हान करणे हा दलवाई यांच्या कार्यामागील मूलगामी विचार होता.
दलवाईनी जेव्हा काम सुरु केले तेव्हाची मुस्लीम समाजाची परिस्थिती लक्षात घेतली तर त्यांचे कार्य किती जटील आणि तेवढेच गरजेचे होते हे लक्षात येते.
मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना होऊन आज तब्बल सत्तेचाळीस वर्षांचा अवधी गेला आहे. या एवढ्या मोठ्या कालावधीत भारतातला मुस्लिम प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा झाला आहे. त्याचे प्रतिबिंब अनेक घटनांमधून दिसून येते.
या परिस्थितीत मुस्लीम सत्यशोधक मंडळासारखी चाकोरीबाहेरची विचारधारा असणाऱ्या संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे हे ओघानेच आले.
म्हणून या पार्श्वभूमीवर दलवाई आणि त्यांच्या साथीदारांचे कार्य पुढे नेण्यात मंडळाचे योगदान, तसेच मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांकडून वेळोवेळी मांडली जाणारी मते आणि सैद्धांतिक भूमिकांचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते.
अध्यक्षांची भूमिका काय आहे?
गेल्या वर्षी मंडळाचे सध्याचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी सरांचे नवरात्र व्याख्यानमालेत एक व्याख्यान झाले. या व्याख्यानात त्यांनी प्रामुख्याने मांडलेले ठळक मुद्दे असे, की
“कुराणात सांगितल्याप्रमाणे किंवा इस्लामला मान्य असलेले जिहादी वर्तन अलीकडच्या काळात होत नाही. याचे कारण म्हणजे मुळातच इस्लाम समजून घेतलेला नाही. ज्याने इस्लाम समजून घेतला तो कधीच समाजविरोधी वर्तन करत नाही. इस्लामचा जिहाद हा अन्यायाच्या विरोधातला आहे. जिहाद दोन प्रकारचा असतो, एक ‘अल ए अकबर’ आणि दुसरा ‘अल ए असगर’. यापैकी पहिल्या प्रकारात म्हणजे ‘अकबर’ मध्ये स्वतः मधल्या अंतर्गत दुर्गुणांच्या विरोधात संघर्ष करणे अपेक्षित आहे. तर दुसर्या प्रकारात अल्लाहच्या उद्दात कार्यासाठी (for divine cause) शक्य त्या सर्व मार्गांनी सशस्त्र लढा देणे, युद्ध करणे अपेक्षित आहे. परंतु आजच्या काही जिहादी संघटनांनी याचा पूर्ण अर्थ समजून न घेतल्याने ते आत्मघातकी आणि हिंसक घटना घडवत आहेत.”
या मांडणीचा एकंदर विचार करता असे दिसून येते की ‘जिहाद’ चा अर्थ मुलतत्ववाद्यांनी चुकीचा घेतला आहे असे तांबोळी यांचे मत आहे. ‘जिहाद अल असगर’ हा इस्लाम मध्ये आहे हे स्वतः तेही नाकारत नाहीत. सुरुवातीला कोणताही निष्कर्ष न काढता आपण तांबोळी सरांची सैद्धांतिक भूमिका नक्की काय आहे ते पाहू.
पहिल्या मुद्द्यात तांबोळी यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याचा सारांश असा की इस्लामचा जिहाद हा अन्यायाच्या विरोधातला संघर्ष आहे.
खरेतर या वाक्याला इस्लामच्या राजकीय इतिहासाशी अनभिद्न्य असलेली कोणतीही व्यक्ती तत्काळ सहमती दर्शवेल. कारण कुराण आणि इस्लामच्या वैचारिक मांडणीला अभिप्रेत असलेला अन्याय म्हणजे नक्की काय आहे हे या ठिकाणी तांबोळी सरांनी स्पष्ट केलेले नाही. ते स्पष्ट होण्यासाठी कुराणातील काही आयती पाहू –
“आणि एके समयी लुकामामाने आपल्या मुलास उपदेश करीत असताना त्याला सांगितले की हे माझ्या मुला, कोणालाही परमेश्वराचा जोडीदार ठरवू नकोस. यात संशय नाही की शिर्क हा सर्वात मोठा अन्याय आहे.” (कुराण ३१:१३)
येथे ‘शिर्क’ हा शब्द आला आहे. शिर्क या अरबी पारिभाषिक शब्दाचा अर्थ कोणालाही परमेश्वराचा जोडीदार ठरवणे म्हणजे अनेकेश्वर आहेत असे मानणे. किंवा मूर्तीपूजा, जी अनेकेश्वर मतवादास पोषक आहे, ती करणे असा होतो.
म्हणूनच अनेक ठिकाणी ‘मुशरिक’ (शिर्क करणारा) म्हणजे मूर्तिपूजक असा अर्थही करण्यात आला आहे. थोडक्यात, जे लोक मूर्तीपूजा करतात आणि अल्लाहच्या संदेशाचे पालन करत नाहीत असे कुराणातच म्हटले आहे. अन्याय म्हणजे काय हे सांगणाऱ्या अनेक आयती कुराणात आहेत, जसे की-
“आणि जे लोक परमेश्वरावर खोटे कुभांड रचतील त्यांच्याहून जुलमी आणखी कोण?” (कुराण ११: १८)
अर्थात, शिर्क करणे अल्लाह च्या आणि प्रेषित पैगंबर यांच्या मार्गदर्शनाविरुद्ध वर्तन करणे हा इस्लाममध्ये सर्वात मोठा अन्याय आहे. मुस्लिमाने शक्य त्या सर्व मार्गांनी शिर्क विरुद्ध संघर्ष करणे (म्हणजेच जिहाद करणे) हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य कर्तव्य आहे असे कुराण म्हणते. तांबोळी यांनी जिहाद बद्दल बोलताना जिहाद च्या प्रकारांवर काही मते मांडली आहेत, तीही पाहूयात.
ते म्हणतात की जिहाद चे दोन प्रकार आहेत. ‘अल ए असगर’ आणि ‘अल ए अकबर’. इस्लामी धर्मशास्त्रात या दोन्ही जिहाद चा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे. तो कसा ते पाहू –
जिहाद अल अकबर (मोठा जिहाद) – प्रत्येक मुस्लिमाने स्वतःमधील अंतर्गत दुर्गुणांना संपवण्यासाठी संघर्ष करणे या प्रकारात अपेक्षित आहे. सर्व वाईट गुणांना तिलांजली देऊन अल्लाह च्या कृपेसाठी पात्र राहिले पाहिजे असा या जिहादचा थोडक्यात अर्थ घेता येईल.
जिहाद अल असगर (छोटा जिहाद) – प्रत्येक मुस्लिमाने शक्य त्या मार्गांनी अल्लाह चे साम्राज्य जगभर प्रस्थापित करण्यासाठी सशस्त्र लढा देणे या प्रकारात अपेक्षित आहे. अनेक अतिरेकी संघटनांच्या प्रेरणास्थानी हा जिहाद आहे.
जिहाद च्या या वर्गीकरणाला मुस्लीम मुलतत्ववादी किती मान्यता देतात आणि कोणत्या जिहाद चा पुरस्कार करतात हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू. मुळात मुहम्मदाच्या संपूर्ण आयुष्यात आणि पुढे इस्लामच्या सुवर्णकाळातही जिहाद ही संज्ञा लष्करी सामर्थ्याच्या आणि सशस्त्र संघर्षाच्या दृष्टीने वापरण्यात आली आहे. जिहाद चे हे वर्गीकरण कुराणात स्पष्टपणे आलेले नाही. छोटा नि मोठा जिहाद हे वर्गीकरण पुढे अकराव्या शतकात विकसित झालेले आहे.
‘हिस्ट्री ऑफ बगदाद’ या पुस्तकात मुस्लीम पंडित अल-खातीब- अल-बगदादी या मुस्लिम धर्मपंडिताने ती केलेली आहे. खरं पाहता सुन्नी न्यायतत्वशास्त्रात (jurisprudence) ‘जिहाद अल अकबर’ ला काडीचेही महत्व नाही. कोणत्याही हदीसची सत्यता आणि अर्हता तपासताना सर्वात महत्वाचा निकष असतो की कुरणात जे लिहिलंय ते त्या हदीसच्या आधारे स्थापित व्हायला हवे. ‘जिहाद अल अकबर हदीस’ या निकषाचे समाधान करतच नाही.
कुराणात म्हटल्याप्रमाणे,
“मुसलमानांपैकी ते लोक की जे एखाद्या निमित्ताविना घरी बसून राहतात व जे अल्लाह च्या मार्गात प्राण व संपत्तीनिशी जिहाद करतात, दोघांची स्थिती एकसमान नाही. अल्लाह ने बसून राहणार्यांपेक्षा प्राण व संपत्तीसह युद्ध करणार्यांचा दर्जा श्रेष्ठ ठेवला आहे असे अल्लाहने प्रत्येकासाठी भल्याचेच वचन दिले आहे परंतु त्याच्याजवळ जिहाद करणार्यांच्या सेवेचा मोबदला बसून राहणार्यांपेक्षा जास्त आहे. त्यांच्यासाठी अल्लाह कडून मोठे दर्जे आहेत आणि क्षमा व कृपा आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा व दया करणारा आहे.” (कुराण ४:९५)
जिहाद चा स्पष्ट संदेश देणाऱ्या आयातीचा विचार करता ‘अल अकबर’ ही हदीस कुराणाच्या मुळ ढाच्याशी विसंगती दर्शवणारी आहे. पुन्हा ‘सहिह मुस्लीम’ आणि ‘सहिह बुखारी’ या दोन महत्वाच्या आणि प्राथमिक हदीस संग्रहाशी या हदिसचा संबंध नाही. त्यामुळे या हदीस च्या अर्हतेकडे जाण्यापूर्वीच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ‘जिहाद अल अकबर’ ही संकल्पना जगातील बहुसंख्य (अर्थात सुन्नी) मुस्लिमांच्या दृष्टीने इस्लामविरोधी अन पर्यायाने पाखंडी आहे. अनेक आयतींचा संदर्भ घेऊन ही हदीस चूक आहे असे सांगण्यात इस्लामी मुलतत्ववादी कोठेही कमी पडलेले नाहीत. या प्रकरणाची कुराणातील मूळ संदर्भ पाहून त्याआधारे आणखी शहानिशा करता येईल, पण विस्तारभयाने मी ती करण्याचे टाळतो आहे. जिज्ञासूंनी स्वतः ती पडताळून पाहणे उचित ठरेल.
आता मुद्दा असा आहे, की आधुनिक दृष्टी आणि सत्यशोधक वृत्ती असलेल्या हमीद दलवाई यांच्या मुस्लीम सत्यशोधक समाजाचा वारसा चालवणाऱ्या तांबोळी सरांची भूमिका या बाबतीत दलवाई यांच्याप्रमाणे परखड नाही, किंबहुना कमालीची संदिग्ध आणि कोड्यात टाकणारी आहे. ते म्हणतात की “आजच्या काही मुस्लीम संघटनांनी जिहाद चा अर्थ समजून न घेता ते आत्मघातकी आणि हिंसक घटना घडवीत आहेत” आणि हे पटवून देण्यासाठी ज्या हदीसची ते साक्ष देत आहेत तीच मुस्लीम पंडितांनी इस्लामबाह्य ठरवली आहे.
हमीद दलवाई यांच्या भूमिकेशी फारकत
हमीदभाईंच्या इस्लामविषयक आकलनाचा सर्वात महत्वाचा पैलू हा आहे की, –
या देशातील मुसलमानांच्या वर्तणुकीचा अभ्यास केल्यानंतर, त्यांच्या मते, मुसलमानांच्या वागण्यामागे विशिष्ट संस्कारांनी बनलेले त्यांचे मन आहे आणि हे संस्कार प्रामुख्याने मुसलमानांच्या धर्मामधून म्हणजे इस्लाममधून उगम पावलेले आहेत. तेव्हा सामाजीक जीवनामधून धर्माचे प्रामाण्य नष्ट करून आणि या देशाच्या भवितव्याशीच आपले भवितव्य जोडलेले आहे हे लक्षात घेऊन त्यांनी मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावे. हिंदू समाजात अनेक धर्मसुधारक झाले. आणि त्यांनी परंपरावादी आचार विचारांची चिकित्सा करून आपल्या समाजाला कालसुसंगत असे रूप देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची क्रांती भारतीय मुस्लिमांत झाली नाही.
हमीद दलवाई यामुळेच भारतीय मुस्लिमांमधील पहिले धर्मसुधारक म्हणावे लागतील. हे काम करताना दलवाई यांनी तथाकथित ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्या अनेक मुस्लीम नेत्यांवरही टीका केली आहे. “आधुनिक व्हा, कालबाह्य आचारविचार सोडा” हे मुस्लीम समाजाला कानीकपाळी ओरडून सांगणाऱ्या दलवाई यांच्या अनुयायांनी इस्लाम चिकित्सेत बोटचेपेपणाची भूमिका घ्यावी याहून अधिक दुर्दैव ते काय?
‘भारतातील मुस्लीम राजकारण’ या पुस्तकात दलवाई लिहितात,
“भारतातील मुस्लिमांची अशी धारणा आहे, की त्यांचा समाज निर्दोष असून ते भारतातील इतर समुदायांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांची ही धारणा काही गृहीतकांवर आधारलेली आहे. त्यातील एक महत्वाच गृहीत असं आहे की, ‘इस्लाम’ मध्ये निर्दोष समाजाची कल्पना सामावलेली आहे. धर्मातच तशी दृष्टी अंतर्भूत असल्याने सच्चा निर्दोष मुसलमान असण्याचा अर्थ हा होतो की, त्याला प्रगतीसाठी अधिक काही करण्याची गरजच उरत नाही. मात्र आधुनिक निकषानुसार हा दावा स्वीकारार्ह ठरत नाही” (पान क्र. ९८)
पुढे –
“आज भारतीय मुस्लिमांमध्ये अभिजन वर्गातील आधुनिक विचारांचे मुस्लीम आहेत. परंतु ते स्वतःच्या आधुनिक मनोभूमिकेबाबत मुस्लीम समाजाच्या प्रतिक्रिया काय होतील, याबाबत सतत घाबरून असतात. असे उदारमतवादी प्रतिबद्ध नसतात आणि ढोंगीही असतात. ते भारतीय मुस्लिमांच्या प्रगतीच्या दृष्टीने निरुपयोगी तर ठरतातच पण अडसरही ठरतात. त्यांच्यामध्ये नीतिधैर्य नसतं आणि मोठ्या सामाजिक समस्यांबाबत अनास्थाही असते. हीसुद्धा आपल्या लोकशाहीची समस्या आहे.” (पान क्र. १००)
दलवाई यांची भूमिका इतकी स्पष्ट आणि स्वच्छ आहे. तसे पाहता दलवाई यांच्या प्रत्येक भूमिकेचा भार आज तांबोळी यांनी उचलावा असे म्हणणेही उचित नाही. परंतु ते जी भूमिका मांडत आहेत ती ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ या अत्यंत महत्वाच्या संघटनेच्या अध्यक्षपदावरून मांडत आहेत. त्यामुळे त्या भूमिकेला विशेष महत्व आहे.
तीन तलाक च्या बाबतीत बोलताना तांबोळी सरांचे मत असे की “तीन तलाक इस्लामबाह्य आहे”.
मुळात एखादा वैयक्तिक कायदा आजच्या काळात गैरलागू आहे हे ठामपणे सांगण्यासाठी धर्मग्रंथात डोकावून पाहण्याची गरज का भासावी? भारत हा सार्वभौम देश असून त्याला स्वतःचे संविधान आहे. जे की भारतातील प्रत्येक नागरिकाने अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले आहे. असे असताना आजच्या काळात कोणत्या गोष्टी चूक आहेत हे ठरवण्यासाठी संविधानाच्या कसोटीवर त्या चूक आहेत की बरोबर हा निकष पुरेसा ठरतो. परंतु तसे न करता अधुनिकतावादी विचाराचा वारसा सांगणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षाने वैयक्तिक कायदे कालबाह्य ठरवण्यासाठी पुन्हा धर्मग्रंथात आधार शोधावा ही गोष्ट सर्वसामान्यांच्या बुद्धीला पटणारी नाही.
दुर्दैवाची गोष्ट ही की धर्मचिकित्सेचा जो मुलभूत भाग दलवाई व त्यांचे सहकारी यांच्या विचारात होता त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे अथवा करण्यात आले आहे. तीन तलाक, हलाला, समान नागरी कायदा हे विषय हे विषय उचलून धरतानाही मानवता आणि सामाजिक न्याय या निकषांवर जोर दिला जातो. आणि असे असतानाही अनेकदा ‘मूळ धर्म न्यायचाच’ आहे हे सांगण्याचा मोह झालेला दिसून येतो. हे प्रश्न
मानवतेचे आणि न्यायचे खचितच आहेत, परंतु मुळातच सामाजिक जीवनाला धर्माज्ञेऐवजी विवेकाची आणि कालसुसंगततेची प्रतिष्ठापना करण्याशी – म्हणजेच ‘सेक्युलरिझम’ शी जोडले गेले आहेत. धर्मनिरपेक्षतेचा व्यापक, सर्वसमावेशक आग्रह आणि त्या अनुषंगाने कठोर धर्मचिकित्सा या बाबींवर मंडळाचा दृष्टीक्षेप राहिलेला नाही हे प्रकर्षाने दिसून येते. सत्यशोधक मंडळाने मुस्लिमांच्या धार्मिक भावनांना जपतच आपले कार्य केले पाहिजे, दलवाई यांची प्रखर बुद्धिवादी भूमिका अडचणीची ठरत आहे अशी धारणा मंडळाची दिसून येते. असा मार्ग पत्करणे म्हणजे मंडळाच्या स्थापनेमागे जो धर्मचिकित्सेचा आणि निरापेक्षतेचा विचार आहे त्यालाच तिलांजली देण्यासारखे आहे.
सध्याच्या काळात मु. स. मंडळाचे महत्व आणि आवश्यकता
धर्म आणि सेक्युलरिझम या दोन तत्वांमधील विचारकलह भारताला नवीन नाही. मग तो हिंदू असो अथवा मुस्लीम असो!
हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांमधील सुधारणावादी चळवळीकडे पहिले तर तुलनेने हिंदू धर्मसुधारणा फार पुढे आहे. पण ती पूर्णत्वास पोचली आहे हे व्यवहारात दिसत नाही. मुस्लिमांच्या बाबतीत सुधारणावादी आणि उदारमतवादी बाजू मांडणारे ‘मु. स. मंडळ’ आणि आणि त्यांचीच अखिल भारतीय शाखा म्हणजे ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स’ वगळता दुसरी चळवळ अस्तित्वातच नाही. असे असताना इथल्या मुस्लिम समाजात त्यांच्या प्रगतीच्या आणि सर्वोदयाच्या दृष्टीने काही परिवर्तन घडवून आणायचे असेल तर मु. स. मंडळ आणि मोजकेच सुधारणावादी मुस्लिम यांना ते आव्हान पेलावे लागेल. त्यामुळे, राष्ट्रवाद वगैरे पुढचे मुद्दे वगळले तरी, स्वतःचा वैयक्तिक आर्थिक आणि सामाजिक उत्कर्ष साधण्यासाठी आणि या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी मुस्लिमांनी धर्माची शिकवण बाजूला ठेवली पाहिजे ही भूमिका मंडळाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. मंडळ किंवा एकंदरच मुस्लिम नेतृत्व जेव्हा स्वतःच्या धर्माबाबतीत उदारमतवादी कालसुसंगत भूमिका घेते तेव्हा तशी भूमिका घेणे इथल्या बहुसंख्य हिंदुना बंधकारक असते. कारण ते तसे करून हिंदुंवर नैतिक दबाव आणत असतात. परिवर्तन हे अशा पद्धतीने हातात हात गुंफून घडवले जात असते. दलवाई यांच्या कार्याचा आढावा घेताना ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते.
वास्तविक धर्मचिकित्सेचा, परिवर्तनाचा इतका आदर्श मार्ग समोर असताना मंडळाने प्रत्येक बाबतीत संदिग्ध भूमिका घेणे सुधारणेत अडसर घालणारे आहे. सत्यशोधक समाजाचा वारसा चालवताना धर्मचिकित्सेचे मूळ तत्व नजरेआड करणे याला सत्यशोधकांचा उघड दलवाईद्रोहच म्हणावे लागेल. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा विषय हा फक्त मुस्लिम समाज्पुर्ता मर्यादित नाही. भारतात धर्मनिरपेक्षतेचे मूलगामी मूल्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मंडळाच्या विचारांना असामान्य महत्व आहे. या देशातील विवेकवादी उदारमतवादी हिंदूंशी संवाद साधल्याशिवाय परिवर्तन आणणे शक्य नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आजच्या मर्यादांमध्येही मंडळाच्या कामाला मोल आहेच, परंतु त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांबाबत, विशेषतः मुलभूत धर्मनिरपेक्षतेचे मूल्य जोपासण्याबाबत पूर्णपणे व्यक्तीस्वातंत्र्यवादी आणि समतावादी भूमिका मंडळाने आणि त्याच्या प्रवक्त्यांनी घेणे व्यापक परिवर्तनाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.