उघड्यावर शौचास जाणाऱ्या महिलांचा “सत्कार” अपमान – जाणीवशून्यतेचा कलंक
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
गणेश पावसकर :-
उघड्यावर शौचास गेलेल्या महिलांच्या गळ्यात हार घालून सोलापूरचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी फोटोसेशन केलं आणि आपण किती कर्तव्यदक्ष अधिकारी आहोत हे दाखवण्यासाठी ते फोटो व्हायरल केले. सरकारी बाबूंची चमकोगिरी अशी की यांचे नियम- कायद्यांचे कागदी घोडे फक्त गरीबांच्या पुढे फुरफुरी मारतात. खासदार… आमदार वैगेरे तर लयच लांब राहिले… अगदी साधा गावचा सरपंच दिसला तरी हे बाबू त्यांच्या ढेंगत शिरून शिरसाष्टांग नमस्कार घालतात पण गरीब अन असहाय लोकांच्या पुढे मात्र यांची उरस्फोडी कर्तव्य तत्परता उफाळून येते.
पहिली गोष्ट अशी की, कोणी हौस किंवा पर्यटन म्हणून उघड्यावर शौचास जात नाही बापहो.. पण खाचखळग्याच्या धुळमाखल्या पायवाटेवरची दुःख तुम्हाला नाही कळायची. मुळात लोकांच्या प्यायच्या पाण्याची आबाळ बऱ्याच ठिकाणी असते. पिण्यासाठीही लोक चार चार मैलावरून पाणी आणतात. त्याठिकाणी लोकांना पाण्याची चैन परवडत नाही. पाण्याच्या प्रश्नाला आणि व्यवस्थापनाला राजकारणी लोकाएवढीच ही सरकारी धेंडेही तेवढीच जबाबदार आहेत. पण कमोडवर बसून कुथणाऱ्या या लोकांच्या जाणिवां भौतिक परिस्थिती आणि सामाजिक वास्तवापासून पार तुटलेल्या आहेत. लोकांच्या हागायची एवढी काळजी करण्यापेक्षा लोकांच्या जगायची पहिला सोय लावून द्या… मग पाहू.
गावखेड्यातील वातावरणाशी परिचित असणाऱ्यांना हे चांगलं ठाऊक असत की, तेथील सामाजिक परिस्थिती काय असते. या घटनेनंतर त्या महिलांच्या सामाजिक, कौटूंबिक जीवनावर काय परिणाम होईल? याचा कोणी विचार केला का? ठीक आहे, तुमच्या नियमात बसत असेल तर दंड करा, समज द्या पण असा अपमान करण्याची ही कोणती पद्धत? मुळात अश्या ठिकाणी दंड आकारणी सुद्धा तेथील पाण्याची उपलब्धता, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि याबाबत नीट विचारपूस करूनच व्हायला हवी.
आता या घटनेनंतर गजहब माजला आणि यावर त्यांनी भरभक्कम स्पष्टीकरण दिले पण त्यात त्यांनी केलेले दावे तर निव्वळ हास्यास्पद आणि केविलवाणे आहेत. आपण किती कामे केलीत हे त्यांनी छातीठोकपणे सांगितलं आहे. पण राजेंद्रजी, तुमच्या कर्तव्यात असणाऱ्या कामांचा गवगवा करण्याचं इथे तरी कारण नव्हतं. पण असो…
सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे या स्पष्टीकरणात त्यांनी अस म्हंटल की, माझ्या जातीमुळे मला लक्ष्य केले जातेय. पुरोगामी महाराष्ट्रात आजपर्यंत फक्त राजकारणी म्हणायचे माझ्या जातीमुळे माझ्यावर अन्याय होतो पण आज एका अधिकाऱ्याने जातीचं कार्ड खेळावं हे निंदनीय आहे आणि ते म्हणतात, मी आंबेडकर आणि विवेकानंद वाचले आहेत. आंबेडकर आणि विवेकानंद वाचणाऱ्या माणसाला ह्या गोष्टी कळू नये म्हणजे अवघड आहे. यांनी फक्त बहुधा वाचले पण त्यांना हे महापुरुष समजले नाहीत कारण.. कृतीत शून्य.
बर काम करताना अक्षम्य चूका होतात. आपणही असंख्य चूका करतो पण त्यानंतर साधी यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. म्हणजे घटनेबद्दल जराही पश्चाताप नाही आणि आता लगेच जातीच कार्ड बाहेर काढलं. अवघड आहे राव.
आणि हो… दारू, सेक्स आणि सिगार यांच्या पलीकडे झेप नसणारे महानगरी तथाकथीत फेमीनिस्ट आता तोंडात बोळा घालून बसलेत यात काही नवल नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.