नक्षल प्रभावित भागातून आलेल्या एका तरुणाची प्रत्येकाने वाचावी अशी ‘यशोगाथा’!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्याला जीवनामध्ये कितीतरी संकटांचा सामना करावा लागतो. कोणतेही संकट कधीही सांगून येत नसते. काहींना तर जन्मापासूनच कितीतरी संकटाना सामोरे जावे लागते. तरीदेखील या संकटाना न जुमानता जे आपले प्रयत्न सुरू ठेवतात, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश नक्कीच मिळते. परिस्थिती ही माणसाला त्याच्या जीवनामध्ये कितीतरी गोष्टी शिकवून जाते, याच परिस्थितीमुळे आपल्या सभोवतालच्या लोकांचा खरा चेहरा समोर येतो. तुम्हाला नक्षलवादी लोकांविषयी माहिती असेलच, ह्या लोकांमुळे त्या ठिकाणच्या गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नक्षलवादी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात, त्यामुळे नक्षलवाद प्रभावित क्षेत्रामध्ये प्रगती होणे कठीण होऊन बसते. पण आज आपण अश्या मनुष्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो नक्षली क्षेत्रात राहिला होता, तरी देखील आज खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे.

२३ वर्ष वय असलेल्या अनूप राजची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनुप राज बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यामधील चेंव गावामध्ये राहणारा आहे. बिहारचा हा भाग देशाच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये येतो. त्यामुळे या भागामध्ये शाळा आणि महाविद्यालय नाही आहेत.
गावातील इतर मुलांप्रमाणेच अनूपने पाचव्या इयत्तेपर्यंत शाळेचे तोंड देखील बघितले नव्हते, पण अनूपच्या वडिलांची त्यांच्या मुलाने शिकून मोठ्या पदावर नोकरी करावी अशी इच्छा होती. ते स्वतः देखील गावामधील शिकलेल्या लोकांमधील एक होते. अनूप सांगतो की, त्यांच्या वडिलांनी इतिहास या विषयात पदवी संपादन केली होती. घराजवळच राहून काही काम करावे अशी त्यांची इच्छा होती, पण नोकरी न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर शेती करण्याचा निर्णय घेतला.

गावामध्ये शाळा नसल्यामुळे अनूपच्या वडिलांनी त्यांच्या एका मित्राच्या सहाय्याने त्याचे गावापासून लांब राफिगंजमध्ये अॅडमिशन केले होते, त्यानंतर अनूपचे शिक्षण चालू झाले. सर्व काही बरोबर चालले होते. पण त्याचवेळी २००८ मध्ये त्याचे वडील घरात काहीच न सांगता सर्वांना सोडून निघून गेले. अनूप आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते कुठेच सापडले नाहीत. या प्रकरणाची त्यांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली होती, पण काहीही फायदा झाला नाही. त्यांचे वडील पोलिसांना देखील मिळाले नाहीत.

अनूपचे वडील अचानक असे हरवल्यामुळे त्याच्या आईला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्यामुळे ती काम सोडून घरी बसली आणि अनूपचे वडील परत येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागली. याचवेळी नातेवाईकांनी देखील आपले हात मागे घेतले आणि अनूपला स्वतःचे घर स्वतःच चालवण्याचा सल्ला दिला. त्यावेळी अनूपने स्वतःचा विश्वास कमी पडू दिला नाही आणि या परिस्थितीवर मात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने काम करत आपल शिक्षण चालू ठेवले आणि आपल्या घराची जबाबदारी उचलली.
बारावी पास झाल्यानंतर त्यांने मेहनत करून ९९७ च्या रँकने आयआयटी मुंबईमध्ये अॅडमिशन घेतले. येथे आल्यानंतर अनुपने कधी मागे वळून पहिले नाही आणि नेहमी जीवनात पुढे काय करायचे, याचा विचार केला. त्यानंतर अनूपला सौदीमध्ये सिव्हील इंजिनियरची नोकरी मिळाली.

२०१५ मध्ये अनूप भारतामध्ये परत आले आणि काही मित्रांच्या साथीने एक स्टार्टअप सुरू केला. त्याच्या कंपनीचे नाव पी.एस. टेक केअर हे आहे, ही एक हेल्थकेअर कंपनी आहे. आज हा स्टार्टअप व्यवसाय कोट्यावधी कमवत आहे. ज्या पद्धतीने अनुपने हार न मानता स्वतःच आपले भविष्य घडवले, त्याचप्रमाणे आपल्यालाही आपले भविष्य घडवता आले पाहिजे. अनूपची ही गोष्ट त्याच्यासारख्या इतर तरुणांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित नक्की करेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.