तुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
मागील भागाची लिंक : विठोबाशी भांडायचे, त्याच्याशी रुसवेफुगवे करायचे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३९
===
तिकडे तुकोबांच्या घरी ह्या जगी तुकोबांनी पूर्ववत ह्या जगात परतावे, वावरावे म्हणून कान्होबांनी पांडुरंगाला सोडून तुकोबांचीच मनधरणी चालू केली होती पण तिकडे रामभटाची अवस्था काय झाली होती?
संताप संताप । काहींसा अनुताप । लागला कंपवात । अंगामना ॥
संतापे पोळिली काया । गृहींही न गमे छाया । मनःशांती लोपलिया । तेचिंवेळी ॥
रोग चढे प्रतिदिनी । उपायाची न सापडणीं । करू न वाटे उष्टावणी । जलान्नाची ॥
क्षणी पाहावे निजला । तो आत्ताची बैसला । येरझार चालविला । अंगणात ॥
न येई बोलता । न येई सांगता । ब्राह्मण झाला परौता । आपणयासी ॥
गेले आत्मभान । हारपले समाधान । मौनावले तत्त्वज्ञान । जिह्वेवरिचें ॥
आतां काय करावे । कुणासी हे सांगावे । कुणालागी पुसावे । पुढती काय ॥
ना नातीं उपेगाची । वा संगत मित्रांची । अवस्था ही पोरक्याची । ऐसी आली ॥
काळ कठीण चिं आला । सर्वस्व घेओनी चालिला । जीव कष्टीं मात्र राखिला । दंडाकारणे॥
खरेच, रामभटांवर अवघड प्रसंग आला. एक काशीबाई येऊन गेली तितकीच. नंतर कुणी आले नाही, कुणी काही बोलले नाही. देहूगावच्या वार्ता मात्र कुणाकुणाकडून पोहोचत होत्या. तुकोबा आडवे आहेत, अजून उठलेले नाहीत ही काळजी सर्वांना झाली होती. तिची धग वाढत चालली होती. हजारो लोकांनी प्रयत्न करूनही गाथेची भिजलेली प्रत कुणाला गवसत नव्हती. इंद्रायणीने गाथा गिळली असे जो तो म्हणत होता.
आणि इकडे आपल्याच मनाचा कोंडमारा वाढत जाऊन रामभटाला वेड लागायची वेळ आली होती. एका यज्ञस्थळी ब्रह्मवृंदाच्या अनौपचारिक बैठकीत तुकारामाचा विषय निघतो काय, त्याच्या चौकशीची माळ आपल्या गळ्यात पडते काय, आपणही त्वरित तुकारामाला निरोप पाठवितो काय, तो येतो काय, आपण बोलतो काय आणि आपल्या एका कल्पनाविलासाला पांडुरंगाची इच्छा समजून तो तुकाराम इंद्रायणीत गाथा बुडवूनही टाकतो काय!
किती वेगात घडले हे सारे! आपले नेमके कुठे चुकले? आपण गुपचूप माहिती काढायला हवी होती का? पण काय नवे कळले असते? आणि माहिती काढ असे आपल्याला कुणी कशाला सांगायला हवे होते? आपण लक्ष ठेवून होतोच की? आपणच कशाला, सगळेच माहिती काढत होते, जवळ ठेवून होते, कुजबुजही चालू होतीच. तिला यज्ञस्थळी वाचा फुटली इतकेच.
तुकारामाच्या विलक्षण लोकप्रियतेची कल्पनाही सर्वांना असावी. पण ब्राह्मणांना शूद्रांचे भय ते कशाला? ते घाबरतात फक्त राजसत्तेला. तुक्याचा विषय कठीण होईल असा अंदाज म्हणूनच कुणाला आला नाही. आपल्यालाही नाही. तुकारामाच्या लोकप्रियतेची जात वेगळी आहे हे आपल्या ध्यानी आले नाही. तुकाराम भक्तीची पताका घेऊन उभा होता. ज्ञानोबांनी जिचे नूतनीकरण केले होते तीच ही भक्तीची पताका होती. ती ज्याच्या हाती जाते तो सामान्य नसतो हे आपल्याला कळायला हवे होते. पण आपण पडलो विद्वान, द्विज. कर्मकांडाने येणारा कठोरपणा भक्तीनेच नष्ट होऊ शकतो हे आपल्याला कळले नाही का?
आता राहून राहून सकाळी हातात टाळवीणा घेऊन आलेला तुकाराम समोर येतो. तो आपल्याला घाबरला नाही. तो आपल्याशी उद्धटपणेही बोलला नाही. त्याला समजण्यात आपणच कमी पडलो. आज वाटते, तो खूपच तेजस्वी होता. त्याची वाणी मधुर होती. त्याचे शब्दोच्चार मोहक होते. कुणीही प्रेमात पडावे असेच त्याचे व्यक्तिमत्व होते. आपणही त्याच्या प्रेमात पडलो आहोत का?
रामभटाच्या मनात विचारकल्लोळ जाहला. विचारांचे काहूर माजले. काय चुकले, किती चुकले? का चुकले, कसे चुकले? पुढे काय? आता काय? रामभटाच्या एका मनाने निर्णय दिला – तू चुकलास! साफ चुकलास!
अरे तुझ्या दारी । आले होते ब्रह्म ।
तयाशी विषम । वर्तलास ॥
नसता कारण । केलास धिक्कार ।
वायां अनाचार । झाला खास ॥
आतां पुढे काय । कसे करशील ।
गेली आणशील । लाज मागें ॥
तुकोबाचे मागे । उभा सारा लोक ।
येथे तूं चिं एक । तुझे जगी ॥
आपण एकटे आहोत ह्या नव्या भावनेने रामभटाला ग्रासले. तुकारामाने इंद्रायणीत गाथा बुडविल्याची हकिगत ब्रह्मवृंदापैकी कितीकांना एव्हाना समजली असेल. त्याला आपण कारण झालो हे ही कळले असेल. असे असताना एकही ब्राह्मण आपल्याकडे फिरकला कसा नाही? आज पाचवा दिवस, नेमके काय घडले हे माहित करून घ्यावे असे कुणालाच कसे वाटले नाही?
रामभटाचा संताप झाला. लोकांवर, स्वतःवर. विलक्षण संतापामुळे सर्वांग तापले. अंगाला, मनाला थरथर सुटली. उठवेना, बसवेना, निजवेना अशी स्थिती झाली. येरझाऱ्या घालून पाय दमले. जमिनीवर गडाबडा लोळावेसे वाटू लागले. अंगाची लाही लाही होऊ लागली. थंड पाण्याने कितीदा स्नान केले तरी ती शमेना. पित्तशामक औषधांचा परिणाम होईना. निद्रा तर नाहीशीच झाली होती.
रामभट स्वतःला पूर्ण समजत होता. पण तसे नव्हते. आणि म्हणूनच तो पुरा वाया जाणार नव्हता. कारण त्याचे अर्धांग – अर्धांगिनी पूर्ण सजग होती. नेमके काय घडले हे तिलाच नीट माहिती होते. रामभटाच्या मनात काय कल्लोळ माजला आहे हे ती जाणू शकत होती. त्याच्या अंगची आग कोणताही वैद्य बरा करू शकणार नाही, त्याला ह्या प्रसंगी आधार हवा आहे हे तिने काशीबाई येऊन गेल्याच्या दिवशीच जाणले होते.
ज्या यज्ञस्थळी तुकोबांचा विषय निघाला होता तेथे शेवटी एका वृद्ध ब्राह्मणाने चार समजावणीचे शब्द उच्चारले होते. तुकाराम ही सामान्य मनुष्य नव्हे, जपून असा हे सौम्य शब्दांत सांगितले होते. पण उन्माद जेव्हा सांघिक होतो तेव्हा त्यास इतकी सौम्य मात्रा पुरत नसते. रामभटाला त्या उन्मादाची बाधा झाली होती. तो उन्माद आता सरला होता. पण त्याचे पडसाद आता त्याला सहन होत नव्हते. अशा प्रसंगी त्या वृद्धाची येथे गरज आहे हे जाणून त्या गोविंदभटांना रामभटाच्या अर्धांगाने गुपचूप बोलावणे धाडले होते.
तुकोबांनी गाथा बुडविल्याच्या पाचव्या दिवशी ते गोविंदभट दुपारी दत्त म्हणून अकस्मात रामभटाच्या दरवाजात उभे राहिले! त्यांना पाहून रामभटांना गहिंवरून आले! चेहेऱ्यावरील त्रस्तता क्षणभर दूर गेली. त्यांनी गोविंदभटांचे पाय धुतले, धूत वस्त्राने पुसले आणि त्यांना आदराने भिंतीजवळ चौरंगावर बसविले. मागे टेकावयास पाट दिला, पाणी पुढे केले आणि आपण पायाशी बसून विचारले,
गुरुजी, आपण इतक्या दूरवर अचानक कसे आलात?
गोविंदभट म्हणाले,
ज्ञानोबारायांनी पाठविले!
हे ऐकताच रामभट चमकले! ह्यांना आपली अवस्था कशी कळली? हा काय प्रकार? ह्या सर्वामागे आपली पत्नीच असेल ही शंका त्यांच्या मनाला काही शिवली नाही आणि ते उगीच बसले. ते पाहून गोविंदभट म्हणाले,
इतके आश्चर्य कशाचे? मला बरीचशी हकिगत कळली. तुका तुझ्याकडे येऊन गेला आणि त्याच दिवशी त्याने गाथा बुडविल्याचे कळले. तुला मी ओळखतो. झाल्या प्रकाराने तू अस्वस्थ झाला असशील असे वाटले म्हणून यायचे ठरविले. मला एकच सांग, तुझे कवित्व इंद्रायणीत बुडव अशी आज्ञा तू तुक्याला दिलीस का?
हा प्रश्न ऐकून रामभट रडायचेच बाकी राहिले. म्हणाले,
गुरुजी, नाही हो. मी आज्ञा दिली नाही…..
इतके बोलून रामभटांनी सर्व हकीगत विस्ताराने सांगितली, आपल्या मनातील विचारांचा उडालेला गोंधळ सांगितला आणि संतापाने आपले अंग कसे पोळते आहे व आग आग होत आहे हे ही सांगितले.
ते होईपर्यत, रामभटांच्या पत्नीने दूध आणून ठेवले व पायां पडून विनंती केली की आता गोविंदभटांनीच काय तो मार्ग दाखवावा. आपलीच वैद्यकी लागू पडेल असे म्हणून त्या स्वयंपाकासाठी आंत निघून गेल्या.
त्यांच्याकडे कौतुकाने पाहात गोविंदभट म्हणाले,
रामा, तुला वाटते तसा तू एकटा नाहीस. तुझी सीता बघ तुझ्यासोबत आहे. ती सर्व जाणते. तू आता सावर. धीर धर. तुझ्याकडून अन्याय झालेला नाही पण तुक्यासारख्या थोर पुरुषाशी स्वतःस शहाणा समजून उद्धट बोलल्याची चूक तुझ्याकडून नक्की घडली आहे. तू संवेदनशील मनाचा आहेस म्हणून तुझी चूक तुला डाचत आहे. यातून आता बाहेर जाण्याचा एकच मार्ग आहे, तो मी तुला सांगतो. ऐक. रामा, लक्षात घे, तुकाराम हा आजचा वारकरी संप्रदायाचा नेता आहे. हे नेतृत्व त्याने मिळवलेले नाही, तो ही तसे मानत नाही. ते त्याच्या गळ्यात आपसूक येऊन पडलेले आहे. तो म्हणेल तो शब्द आज त्या पंथात प्रमाण आहे. हे त्याने केवळ कवित्व करून मिळविलेले नाही तर विलक्षण वैराग्याने त्यास ती अवस्था प्राप्त झालेली आहे. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव तो कोळून प्यायला आहे. त्याच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही. जे जे ज्ञानोबांनी सांगितले ते ते सारे तो आपल्या पद्धतीने लोकांसमोर मांडत असतो. त्याचे काही तसे अभंग मी परवाच आपल्या सभेत सांगितले होते. तो वेदांवर वा ब्राह्मणांवर प्रहार करीत नाही. तो दंभावर कोरडे ओढतो. तसे व्यासांनी ओढले आणि ज्ञानोबांनीही. त्यांच्यावर ब्राह्मणांनी फार बोलू नये. ब्राह्मण याज्ञिक जर स्वच्छ वृत्तीने जगते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आता आपण थोडे थांबू. ज्ञानोबांचे विचार हा आपल्या शैलीत कसे मांडतो ते मी तुला भोजनोत्तर सांगतो आणि तुझ्या ह्या भवरोगावरचा उपायही सुचवितो.
===
(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.