संतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza
===
मागील भागाची लिंक : माझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३५
===
मला मूर्छा आली तो विषय महत्त्वाचा नाही. आसपास लोक होते, त्यांनी मला सावध केले, सावरले, माजघरात नेऊन निजवले. कुणी वैद्यांना बोलावून आणले, त्यांनीही काही उपचार केले व विश्रांती घेण्यास सुचविले. भयाने माझे त्राण गेले होते, मी पडून राहिलो. अधूनमधून निद्रा येत राहिली. माझी इकडे ही अवस्था होत असताना तिकडे देहूत मोठा प्रसंग घडत होता.
प्रसंगी ब्रह्मवृंद तुला तुझ्या रचना इंद्रायणीत बुडवायला सांगेल, मग तू काय करशील?
ह्या माझ्या बोलण्याचा तुकोबांनी ‘विठ्ठलाची आज्ञा’ असा अर्थ घेतला होता व ते माझ्या घरून त्वरेने निघाले होते. पुढे मला कळले की ते इतके वेगाने निघाले की त्यांच्या बरोबरीच्या कान्होबा आणि इतर मंडळींना त्यांच्या वेगाने चालणे अशक्य झाले. ते काही बोलत नव्हते, ह्या लोकांनी मारलेल्या हाकांना ओ देत नव्हते. त्यांच्या मनात काय चालले आहे ह्याचा अंदाज कुणालाही येत नव्हता. तुकोबांचा चालण्याचा वेग असा होता की त्यांच्यात आणि ह्या लोकांत बरेच अंतर पडले. ही मंडळी घरी पोहोचून बघतात तर घरभर फिरून फिरून तुकोबांनी त्यांच्या अभंगांच्या वह्या कुठून कुठून शोधून काढल्या होत्या. काही चिटोरेही होते. वहिनीबाई भांबावून कोपऱ्यात उभ्या होत्या.
कान्होबांनी पाहिले, तुकोबांनी साऱ्या वह्या एका कापडात बांधायची तयारी केली होती. कान्होबांच्या मनात भयशंका उपजली. त्यांच्या सर्वांगाला एक सूक्ष्म थरथर सुटली. बोलता येणार नाही अशी जीभ जड झाली. तरी त्यांनी धीर केला आणि विचारले,
दादा, काय करता आहात?
तुकोबांनी असे दाखविले की त्यांनी जणू प्रश्न ऐकलाच नाही आणि उलट विचारले,
सर्वांत पहिली वही कोठे आहे?
कान्होबांनी मनाशी काही ठरवून उत्तर दिले,
आठवत नाही.
तुकोबांनी पुन्हा विचारले,
सर्वांत पहिली वही कोठे आहे?
कान्होबांची अवस्था बिकट झाली. ते गप्प बसले. मात्र जेव्हा तिसऱ्यांदा तोच प्रश्न आला,
सर्वांत पहिली वही कोठे आहे?
तेव्हा मात्र कान्होबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी कुठूनशी शोधून ती वही आणून दिली. हे होईतोवर तुकोबा रामभट वाघोलीकरांकडे जाऊन तरातरा परत आल्याची वार्ता देहूभर होऊन लोक बाहेर जमा होऊ लागले होते. हलक्या आवाजात काय झाले ह्याची चर्चा सुरू झाली होती. जे सोबत आले होते त्यांना कान्होबांनी सांगितले की रामभटांकडे काय झाले ह्याबद्दल अवाक्षरही तोंडून निघता कामा नये. जे सांगायचे ते दादा सांगतील. आत तुकोबांनी वह्या एका कापडात व्यवस्थित बांधल्या आणि कपाळाला लावल्या. मग गळ्यात टाळ अडकवून एका निश्चयी मुद्रेने ते हातात बांधलेल्या वह्या घेऊन घराबाहेर जाण्यास निघाले. वहिनीबाई दरवाजा अडवून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या,
काय करताय ते कळू द्या तरी..
तुकोबा म्हणाले,
बाजूला सरका!
यावेळी तुकोबांच्या आवाज असा होता की वहिनीबाई नकळत, यंत्रवत बाजूला झाल्या. आता कान्होबांना अंदाज आला. वाड्याच्या दरवाजात ते उभे राहिले आणि मोठ्या कष्टाने अवसान आणून म्हणाले,
दादा, वह्या माझ्या आहेत, मी लिहिल्यात.
कान्होबांचे हे शब्द ऐकून तुकोबांनी मान वर करून कान्होबांकडे अशा नजरेने पाहिले की कान्होबांचा धीर सुटला व ते तुकोबांच्या पायावर पडले व पाय धरून दादा दादा करू लागले. तुकोबा काहीही बोलले नाहीत, त्यांनी कान्होबांना उठविले, स्वतःसाठी मार्ग करून घेतला आणि ते थेट इंद्रायणीच्या दिशेने चालू लागले. बाहेर जमलेल्या समुदायाला काही समजत नव्हते, त्यांनी तुकोबांना वाट करून दिली, तुकोबांमागे वहिनीबाई, कान्होबा चालू लागले आणि सारा जनसमुदाय मूकपणे पावले टाकू लागला.
तुकोबा गंगेवर पोहोचले. नदीकाठी एका वटवृक्षाला पार केलेला होता. त्यावर अभंगाचा गाथा ठेवला. गळ्यातले टाळ हातात घेतले आणि गजर केला –
रामकृष्णहरि
समुदाय म्हणाला,
रामकृष्णहरि
जयजयरामकृष्णहरी
समुदायाने लय पकडली, सूर धरला आणि रामकृष्णहरिच्या गजराने आसमंत व्यापून गेला. बाजूला इंद्रायणी आपल्या गतीने वाहात होती. पुढे काय घडणार आहे ह्याचा तिला अंदाज होता की नव्हता हे आपण कसे सांगणार? पण ज्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता असे कान्होबा, आवलीबाई त्याच गंगेला मनोमन प्रार्थना करीत होते की, हे आई, काही विपरित घडू देऊ नकोस.
एकूण घटनाक्रमाची माहिती नसलेला पण एकत्र जमा झालेला देहूगांव गजराने बेभान झाला. लय वाढत चालली. आवाज टिपेला पोहोचला आणि तुकोबांनी हात वर केला –
पंढरीनाथ महाराज की जय!
श्री ज्ञानदेव महाराज की जय!
श्री नामदेव महाराज की जय !
श्री एकनाथ महाराज की जय!
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनी वाहावे भार माथा ।।
साधने संकटे सर्वांलागी सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ।।
भाव हा कठीण वज्र हे भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ।।
तुका ह्मणे वर्म भजनें चिं सांपडे । येरांसी तो पडे ओस दिशा ।।
मंडळी, आजचा दिवस ह्या तुकारामासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याला वाटते, ज्या मायेने हे सारे विश्व उभारले आहे तिच्या विळख्यात तो स्वतःही सापडलेला आहे. हे मायाजाल आपल्याला छेदता येईल का ह्याची परीक्षा त्याला आज करायची आहे. एकवेळ कठीण असे वज्रही भेदता येईल पण आपला मान, आपला अहंभाव तोडता येणार नाही. जगण्यासाठी म्हणून जी साधने म्हणायची किंवा न जगू देणारी अशी जी संकटे म्हणायची ती दोन्ही ह्या मायेपायी शेवटी शिणविणारीच होत असतात. तो शीण कमी व्हायचा असेल तर अहंभाव, अभिमान क्षीण होत गेला पाहिजे. तसा तो व्हायचा तर वर्म सापडले पाहिजे. ते वर्म सापडण्याचा एकमेव मार्ग भजन आहे. ज्यांना हे पटत नसेल त्यांनी माझे हे सांगणे मानू नये, त्यांना जगण्याचे अन्य मार्ग असतील तर अन्य दिशा ओस पडल्या आहेत. तिकडे जाणारेही काही लोक आहेत. ते नसता भार डोक्यावर घेऊन फिरत असतात. ह्या तुकारामाला इतकेच कळले आहे की हे सारे विश्व विष्णुमय आहे, एकसारखे, एकजिनसी आहे. त्यात आपण विरून गेले पाहिजे आणि त्यासाठी आपला अभिमान नष्ट झाला पाहिजे. मग संकटांना आपण घाबरणार नाही आणि ह्या साधनावाचून माझे अडते असेही म्हणणार नाही. दोन्हींमुळे होणारा शीण तेव्हाच नष्ट होईल. म्हणून हा तुकाराम म्हणतो,
इतुले करी देवा ऐकें हे वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ।।
इतुले करी देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ।।
इतुले करी देवा विनवितो तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ।।
इतुले करी देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ।।
भलतिया भावें तारी पंढरीनाथा | तुका ह्मणे आता शरण आलो ।।
हा तुकाराम पंढरीनाथास आळवीत आहे की आता मी तुला पूर्ण शरण आलो आहे तर माझ्या मनात दुसरा काही विचार येऊ देऊ नकोस आणि मला आता तारून ने. त्यासाठी देवा, तू इतकेच कर की माझे एक ऐक, तू पंढरीनाथच माझ्या हृदयात येऊन राहशील असे कर. देवा, तुला मी विनवितो की तू इतकेच कर की संतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे. देवा, म्हणतो ती गोष्ट ऐक आणि इतकेच कर की माझी दृष्टी सम होऊ दे आणि सर्वत्र एकच पाहू दे. देवा, हा तुकाराम म्हणतो की, माझे हे वचन ऐक आणि इतकेच कर की माझा हा अभिमान पूर्ण जाळून टाक!
जाणावे तें काय नेणावे तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ।।
करावे तें काय न करावे तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ।।
बोलावें तें काय न बोलावे तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ।।
जावे तें कोठे न जावे तें आता । बरवें आठवितां नाम तुझे ।।
तुका ह्मणे तूं करिसी तें सोपें । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ।।
हे देवा, आम्ही जेव्हा आमच्या मताने चालतो तेव्हा आमच्या हातून पापपुण्ये होतात. ते काही बरे नाही. सोपे काय ते तूच करू शकशील. त्यासाठी आम्ही तुझ्याकडे यावे हे बरे. कोठे जावे, कोठे जाऊ नये हा विचार करण्यापेक्षा तुला आठवावे हे चांगले. हा तुकाराम म्हणून म्हणतो, काय जाणायचे आणि काय नाही ते मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे. काय करावे वा काय करू नये हे मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे. काय बोलावे वा काय बोलू नये तेही मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे.
इतकी कथा सांगून रामभट म्हणाले,
आबा, नारायणा, हा सारा प्रकार झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी कुणापाशी तरी तिचा उच्चार करीत आहे. आज येथवर सांगितले. यापुढील प्रकार सांगण्याची ताकद आता माझ्यात आज उरलेली नाही. दमलो मी. थांबतो आता. उद्या या रोजच्या वेळेस!
===
(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.