' या रहस्यमय विहीरीचं “पाणी” तुमच्यासाठी घातक ठरू शकतं – वाचा यामागची दंतकथा! – InMarathi

या रहस्यमय विहीरीचं “पाणी” तुमच्यासाठी घातक ठरू शकतं – वाचा यामागची दंतकथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पाणी… पाणी म्हणजे जीवन… पाण्याविना या पृथ्वीतलावर मानवाचं अस्तित्वच नाही, या पाण्यामुळेचं पृथ्वीवर जीवन आहे…

एवढचं काय तर जर कधी तिसरं महायुद्ध झालं तर ते केवळ या पाण्यासाठी होईल असे म्हणतात… आणि हे तेवढचं खरं देखील आहे…

पण हेच पाणी माणसांना जोडतं सुद्धा! कसं म्हणताय, तर हा प्रसंग वाचून बघा!

 

water-scarcity marathipizza

 

एकदा ऑफिसमधून घरी जात होते, ठाण्यावरून दादरला जायला लोकल पकडायची होती… उशीर झाला म्हणून मी पळत सुटले आणि गर्दीतून कशीबशी वाट काढत अखेर गाडी सुटायच्या आत गाडीत चढले!

मी जागा शोधली आणि बसले! दमलेली मी जरा शांत झाली आणि बॅगमधून पाण्याची बाटली काढली, बघते तर काय बाटलीत पाणीच नाही…

निराश होऊन मी बाटली बॅगमध्ये परत ठेवली, तेवढ्यातच समोरून एक हात मला बाटलीतलं पाणी ऑफर करत होता, समोर एक काकी मला त्यांची बॉटल देत म्हणाल्या हे घे पाणी हवं होत ना!

मी त्यांना थँक यु म्हणत एक-दोन घोट पाणी पिले… खूप बर वाटलं…

हा संदर्भ इथे सांगायचा उद्देश एवढाच की असं बरेचदा आपल्याबरोबर देखील होत, आपणही कोणा तहानलेल्याची तहान भागवतो, म्हणून पाणी माणसांना जोडत असं!

पण आज आम्ही तुमच्यासाठी विचित्र माहिती घेऊन आलो आहोत.

कुठली म्हणताय? आपण पाणी का पितो? जरा विचित्र प्रश्न आहे पण हा प्रश्न विचारण्यामागे कारणही तसंच आहे.

भारतात एक असं ठिकाण आहे जिथल्या विहिरीतलं पाणी पिल्याने लोक चक्क भांडायला लागतात…!

tantrik bavdi-marathipizza

 

भारतात अनेक दंतकथा प्रचिलित आहेत, त्यातलीच ही एक. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी अशा दंतकथेंमुळे प्रसिद्ध झाली आहेत.

या वास्तू आणि त्यांच्या मागील रहस्य सोडविण्यात कित्येक लोकांच्या नाकी नऊ आले. त्यातलीच ही एक दंतकथा.

मध्यप्रदेशातील शोपूर शहराजवळ असलेली तांत्रिक बावडी नावाची विहीर आहे. २५० वर्षांपूर्वीची ही विहिर जरी आता बुजविली गेली असली तरी तिच्याभोवतीचे रहस्य आजही कायम आहे.

या विहिरीविषयी असे सांगितले जाते की, एका तांत्रिकाने या विहिरीवर कांही तांत्रिक क्रिया केल्या आणि तेव्हापासून जो कोणी या विहिरीचे पाणी पितो तो भांडायला लागतो.

म्हणजे अगदी सख्ये भाऊ बहिणी म्हणा किंवा जिवलग मित्र असो इथलं पाणी प्यायले की त्यांच्यात भांडणे सुरू होतात.

पूर्वी राजपरिवाराच्या मालकीची असलेली ही विहिर राजघराण्यातील भांडणांचेही कारण बनली होती. आधी या जागेचे नाव हिरापुरी असून सध्या याला गिरीधरपूर नावाने ओळखल्या जाते.

येथील एका गढीमध्ये ही विहिर आहे. या गढीचे पडके अवशेष इथे बघायला मिळतात.

 

tantrik bavdi01-marathipizza

 

असे सांगण्यात येते की, गिरीधरपूर हे नगर गिरीधर गौड राजाने वसविले होते. २५० वर्षांपूर्वी राजा गिरीधरसिंग गौड याने त्याच्या सत्ताकाळात या गढीत आठ विहिरी खोदल्या होत्या.

त्यापैकी एका विहिरीतील पाण्यावर राजावर नाराज झालेल्या तांत्रिकाने काही तांत्रिक क्रिया केली. त्याचा प्रभाव या पाण्यावर पडला.

सुमारे १०० चौरस फूटाचा व्यास व १० फूट खोल असलेली ही विहिर त्यामुळे कलागती म्हणजे भांडणे लावणारी विहिर म्हणून ओळखली जाऊ लागली. या विहिरीजवळ एक शिवमंदिरही आहे.

पूर्वी येथे आमराई होती तेथे राजे लोक नेहमीच येत असत. या गढीतील एका विहिरीत आजही पाणी आहे.

तर इतर बुजल्या गेल्या आहेत. असेही सांगतात की, येथे एकदा गिरीधर गौड राजाने जादूच्या स्पर्धा भरविल्या.

त्यात तांत्रिक क्रियांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका जादूगाराने ताडाचे झाड नुसत्या नजरेने तोडून दाखविले. तर दुसर्‍या जादूगाराने जादूच्या सहाय्याने ते पुन्हा जोडून दाखविले.

मात्र त्यात थोडी फट राहिली. खूप वर्षांपर्यंत हे झाड जिवंत होते, असेही सांगण्यात येते.

आहे ना भन्नाट गोष्ट…?

जर तुम्हालाही या भांडकुदळ पाण्याची विहीर बघायची असेल तर तुम्ही देखील या ठिकाणाला भेट देऊ शकता. या ठिकाणी जाण्यासाठी नॅरोगेज रेल्वे आहे.

आता या दंतकथेत किती सत्यता आहे हे माहित नाही… पण पाण्यामुळे किंवा पाण्यासाठी कुणाचंही भांडण न व्हावं हीच अपेक्षा…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?