ऑफिसात सारखं ७ ते ८ तास बसून काम करताय – मग तर तुम्ही हे वाचायलाच हवं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आरामदायी काम करायला कोणाला नाही आवडणार.
अगदी मस्तपैकी बसून, ए.सी.ची हवा खात, चहा-कॉफीचा झुरका घेत, बाहेरचा गोंगाट विसरायला लावणाऱ्या वातावरणात काम करायला मिळावे, किंबहुना तशी कंपनी मिळावी ही आजकाल प्रत्येक नोकरी शोधणाऱ्याच्या मनातील स्तुत्य इच्छा असते.
कुठे त्या फिल्डवरच्या कामात उन्हा-तान्हात फिरा, त्यापेक्षा हे बरंय, बसल्या जागी, जास्त काही हालचाल न करता आपल्यासमोर असणाऱ्या कॉम्प्यूटरवर फक्त ठाकठाक करायची.
मंडळी तुमच्यापैकी देखील बरेच जण मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर कामाला असतील, जेथे सकाळी गेलं की थेट संध्याकाळी काम संपल्यावर बाहेर पडायचं. फेरफटका मारायचा म्हटला तर ऑफिसातल्या ऑफिसात किंवा जास्तीत जास्त ऑफिस बाहेरील प्रीमायसेसमध्ये!
तुमच्या दृष्टीने देखील असं काम मिळालं म्हणून तुम्ही देवाचे आभार मानत असाल. पण मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे की कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते.
एखादी गोष्ट जेवढी उपयुक्त तेवढाच त्या गोष्टीचा अतिरेकही वाईट. असाच वाईट अतिरेक होतो बसून काम करण्याचा.
चला जाणून घेऊया काय होतं एकाच जागी खूप वेळ बसून काम केल्याने!
खूप वेळ एकाच ठिकाणी बसणे आणि शारीरिक हलचाली न करणे यामुळे शरीराच्या आतील कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेक आजार उदभवण्याची दाट शक्यता असते.
जर, तुम्ही चार तासाहून अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहत असाल तर ह्रदयरोग होण्याची १२५ टक्के खात्री आहे. आठवड्यातून ५५ तासांपेक्षा अधिक बैठे काम करत असाल तर, धोका दुप्पट वाढू शकतो. त्यामुळे कामातून थोड्या-थोड्या वेळानंतर ब्रेक घेतलाच पाहिजे.
एकाच ठिकाणी बसून राहिल्याने डोक्याच्या हिप्पोकॅम्पस् या भागावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या भागाला मानवी शरिरातील मेमरी संबोधले जाते.
शरीराची हालचाल न झाल्यामुळे हिप्पोकॅम्पस आकुंचन पावते आणि त्याचा आकार कमी होतो. यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होते.
तासनतास बसून राहिल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे पायांच्या खालच्या भागात सुज येण्याची समस्या उदभवते. हा त्रास होणारी व्यक्ती रात्री झोपल्यानंतर सुज मानेपर्यंत पोहचते.
यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते. जे लोक वेळ वाचवण्यासाठी डेस्कवरच लंच करतात, त्यांचे शरीर कॅलरी बर्न करू शकत नाही. त्यामुळे शरीरात फॅट सेल्सचे प्रमाण दुपटीने वाढते.
बसताना किंवा झोपताना फॅट सेल्सवर वजन पडले तर ट्रायग्लेसराइडचे प्रमाण वाढते. अशा व्यक्तिंना ह्रदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता निर्माण होते.
दिवसभर बसून काम करण्याच्या जीवनशैलीमुळे पल्मोनरी इंबोलिज्म अर्थात फुफ्फूसामध्ये ब्लड क्लॉटिंग होण्याची शक्यता असते. बैठ्या कामामुळे ब्लड सर्क्यूलेशनची गती मंदावते यामुळेही असे होण्याची शक्यता असते.
जेवणानंतर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे जेवण झाल्याबरोबर खुर्चीत बसल्याने कॅलरी वाढतात. याचा परिणाम असा होतो की, व्यक्तीमध्ये लठ्ठपणा वाढतो. यामुळे टाईप २ डायबिटीजचीही शक्यता वाढते.
आता बरेच जण म्हणतील आम्हीही ७-८ तास बसून काम करतो, पण आम्हाला नाही अजून त्रास झाला कसला?
तर मंडळी हा त्रास काही लगेच सुरु होत नाही, काही वर्षांनी तुम्हाला वर सांगितलेले बदल नक्की जाणवायला लागतील.
म्हणूनच या अपायांपासून बचाव व्हावा म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे की, जेवणानंतर लगेचच खुर्चीत बसू नये. थोडा वेळ चालले पाहिजे. प्रत्येक अर्ध्या तासानंतर जागेवरून उठले पाहिजे.
कुठे जाणे-चालणे शक्य नसेल तर चार-पाच मिनीट किमान उभे राहिले पाहिजे.
जर, तुम्ही अधिकारी पदावर काम करत असाल तरीही काही कामे ही स्वतः करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होईल आणि तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.