प्रिय मोदीजी – लक्षात ठेवा – भारतीय जनता शब्द नं पाळणाऱ्याला माफ करत नाही…!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
लेखक: भाऊसाहेब अजबे
===
प्रिय मोदीजी,
आपण आमचे सर्वात लाडके पंतप्रधान आहात. तुम्ही विद्युतगतीने ट्विटर वर व्यक्त होता हे आम्हाला आवडत. त्या दिवशी बघा ना नितीश कुमारांनी ‘भ्रष्ट’ यादवांची साथ सोडल्यावर तुम्ही कसं लगेच ट्विट केलं. पण मोदीजी ‘वर्णिका’ ला सपोर्ट करणारं ट्विट अजूनही तुमच्याकडून आलेलं नाही. असा भेदभाव तूम्ही का करता याचं उत्तर काही अजून आम्हाला मिळालेलं नाहीये.
स्त्रियांविरोधी गुन्हा भ्रष्टाचारापेक्षा कमी महत्वाचा आहे का? आणि हाच गुन्हा जर काँग्रेस /आप/तृणमूल काँग्रेस/समाजवादी पार्टी /राजद च्या नेत्याच्या सुपुत्राने केला असता तर आपण असेच शांत बसला असतात का ?
मोदीजी, तुमचे फोटो पण किती मस्त असतात. हाच रक्षाबंधन चा फोटो पहा.
या लहान मुली किती विश्वासाने पाहत आहेत तुमच्याकडे. तुमची छपन्न इंची छाती किती आश्वासक वाटत आहे त्यांना…! यातल्याच एखादीवर, आरएसएस स्वयंसेवक / भाजप पदाधिकारी पुत्राने ‘वर्णिका कुंडू’ सारखा प्रसंग आणला तर तुम्ही आता जसे ‘मौनीबाबा’ झाले आहात तसेच मौन ठेवाल का? चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे तेथील पोलीस आपल्या नियंत्रणाखाली असतात. तर आता ‘विकास बराला’ वरील गुन्हा हे पोलीस जसा डायलूट करीत आहेत तसाच तुम्ही कराल का? जर तसे नसेल तर वर्णिका ची चूक काय आहे मग? तुम्हाला तिने राखी बांधली नाही हा तिचा गुन्हा ठरला का?
तुम्ही मागे एकदा ‘मन की बात’ वर घोषणा करून selfiewithdaughter हा ट्विटर वर नंबर एकचा ट्रेंड सुरू केला. किती कौतुक वाटलं तेव्हा तुमचं आम्हाला. ते फक्त सोशल मिडिया पुरत्या प्रसिद्धीसाठी होतं का? असं वाटलं होतं की हा हॅशटॅग म्हणजे वर्णिका सारख्या मुलीचं ‘संरक्षण’ करण्याचे वचन होते. पण दुर्दैवाने ‘ संरक्षण’ विकास बराला ला मिळत आहे!
एका ट्विट मध्ये तुम्ही म्हणाला होतात की ‘निर्भया’ ला विसरू नका…
पण पहा तुम्हीच आज निर्भयाला विसरला आहात !
मोदीजी, आम्हाला आठवतंय निवडणुकीवेळी तुम्ही म्हणाला होतात ‘शिवाजी महाराज का आशीर्वाद – अब की बार मोदी सरकार’.
आम्ही मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला तुमचं सरकार बनवलं. पण तुम्ही मात्र शिवाजी महाराज विसरलात. त्यांच्या ‘सुशासनात’ स्त्रियांकडे वाकडी नजर करणाऱ्याला काय शिक्षा दिली जायची हे तुम्हाला महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं असेलच. पण त्याचाही तुम्हाला विसर पडला आहे असं दिसतंय.
मोदीजी, ‘बेटी बचाओ’ मध्ये वर्णिका पण येते – याची कृतिशील दखल तुम्ही घ्याल अशी आशा आहे. तुम्ही म्हणता त्या मागच्या ‘मौनी बाबांचं’ मौन बोचलं म्हणूनच तुम्हाला निवडून दिलं. पण तुमचं ‘सेलेक्टिव्ह मौन’ हे जास्त बोचरं आहे !
मोदीजी, इतिहासाचा असा धडा आहे की भारतीय जनता ‘संधी’ देते, ‘विश्वास’ ठेवते, पण शब्द नं पाळणाऱ्याला ‘माफ’ करत नाही!
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page