' इतिहासात पहिल्यांदा “वैज्ञानिकांचा मोर्चा” ! – कशासाठी? वाचा! – InMarathi

इतिहासात पहिल्यांदा “वैज्ञानिकांचा मोर्चा” ! – कशासाठी? वाचा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

देशभरातले वैज्ञानिक, विज्ञान शिक्षक, विज्ञानाचे विद्यार्थी आणि समाजातील पुरोगामी घटक मिळून देशभरात विज्ञान मोर्चाचे आयोजन करत आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता इ. ३० मोठ्या शहरांमध्ये ९ ऑगस्ट रोजी हे मोर्चे काढण्यात येतील. प्रथमच, देशभरातले वैज्ञानिक देशासमोरच्या समस्या, समाजातील घडामोडी, सरकारची धोरणे आणि संशोधन क्षेत्रातील अडचणी याबद्दलची त्यांची मते समाजासमोर या मोर्चाच्या माध्यमातून मांडणार आहेत.

देशातल्या नामांकित वैज्ञानिकांनी केलेल्या आवाहनाचे मराठी भाषांतर:

march for science marathipizza
breakthrough-india.org/imfs.html

===

देशबांधवांनो,

हे नमूद करायला आम्हाला आनंद होतो कि याच वर्षी २२ एप्रिल रोजी सुमारे एक दशलक्ष लोकांनी जगभरातील ६०० शहरांमध्ये विज्ञान मोर्चांमध्ये सहभागी होऊन वैज्ञानिक संशोधनासाठी भरीव निधीची तरतूद करावी आणि सरकारची धोरणे वैज्ञानिक पुराव्यावर आधारलेली असावीत अशी मागणी केली. आताच्या घडीला, या जागतिक प्रयत्नांमध्ये सहभागी होणे आम्हाला अत्यंत महत्त्वाचे वाटते आणि त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो.

एका बाजूला, भारतीय वैज्ञानिकांनी हिग्स बोसॉन आणि गुरुत्वीय लहरींच्या शोधात, मंगळयानाच्या माध्यमाने अवकाश संशोधनात आणि कृत्रिम उपग्रह प्रक्षेपणप्रणालीच्या निर्मितीतून तंत्रज्ञानातील स्वावलंबित्व वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला, समाजातल्या वाढत्या अवैज्ञानिकता आणि धार्मिक भेद यांच्यामुळे भारतीय समाजातील वैज्ञानिक दृष्टिकोन धोक्यात आला आहे आणि सरकारच्या अपुऱ्या मदतीमुळे विज्ञान संशोधनदेखील अडचणीत आले आहे.

आयआयटी, एनआयटी आणि आयसर यांच्यासारख्या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक मदतीत झालेली कपात आम्हाला चिंतीत करते. सद्यस्थितीत, विद्यापीठांकडे विज्ञान संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. संशोधनासाठी निधी वितरित करणाऱ्या Department of Science and Technology, Department of Bio-Technology आणि Council of Scientific & Industrial Research या संस्थांनादेखील सरकारच्या निधी कपातीचा फटका बसला आहे. शासकीय प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांनी स्वतःच्या वेतनाचा काही भाग त्यांच्या संशोधनाच्या विक्रीतून मिळवावा असे सांगितले जात आहे.

प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती आपल्याला प्रेरणा देणारी आहे, पण विज्ञानाच्या नावाखाली, पुरावा नसलेल्या तद्दन अवैज्ञानिक संकल्पना देशातील काही उच्चपदस्थांकडून खपवल्या जात आहेत ज्याच्यामुळे खऱ्या देशाभिमानापेक्षा अविवेकी अंधाभिमानाला चालना मिळत आहे. देशात झुंडहत्या आणि Honor Killing सारखे प्रकार समोर येत असताना वैज्ञानिक विचारांचा आग्रह धरणे हे समाजस्वास्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचे झाले आहे.

जगभरातील आंदोलनांप्रमाणे भारतातील वैज्ञानिक, शिक्षक, विज्ञानोत्साही आणि विद्यार्थी यांनी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यासाठी उघड आणि प्रखर भूमिका घेणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. आम्ही देशभरातल्या संशोधक, शिक्षक, विद्यार्थी आणि जबाबदार नागरिकांना असे आवाहन करतो की त्यांनी ‘इंडिया मार्च फॉर सायन्स’चे कार्यक्रम देशभरात (मुख्यत्वे राज्यांच्या राजधान्या) पुढील मागण्या करीत आयोजित करावेत:

१) विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी आणि शिक्षणसाठी पुरेशा निधीची तरतुद करा

२) अवैज्ञानिक, अस्पष्ट संकल्पना आणि धार्मिक असहिष्णुता यांचा प्रसार तात्काळ थांबवून, राज्यघटनेच्या ५१अ या कलमाला अनुसरून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी मूल्ये आणि शोधप्रवृत्ती यांचा विकास करण्याचे प्रयत्न करा.

३) केवळ शास्त्रीय कसोट्यांवर उतरणाऱ्या आणि पुराव्यासहित असणाऱ्या संकल्पनांनाच शिक्षण व्यवस्थेत स्थान मिळावे याची काळजी घ्या.

४) सरकारी धोरणे ही वैज्ञानिक पुराव्यावरच आधारलेली असावीत.

पुणे मार्च स्थळ आणि वेळ:

9 आॅगस्ट, संध्याकाळी 5,

गांधी पुतळा, पुणे रेल्वे स्टेशन

वरील आवाहनाची लिंक: INDIA MARCH FOR SCIENCE – An appeal by scientists

भाषांतर : असीम

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?