पहा रवी शास्त्रींच्या मर्जीतले नवीन प्रशिक्षक झहीर, द्रविड पेक्षा किती दिग्गज आहेत ते!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
लेखक : शरद बोडगे
भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षकपदी संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी रामकृष्णन श्रीधर यांची निवड काल मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली. यापूर्वी भरत अरुण, संजय बांगर यापूर्वीही या संघाबरोबर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होतेच.
मुख्य प्रशिक्षकाला आपली सपोर्ट स्टाफ निवडण्याचे अधिकार असावे किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते. परंतु त्याआधी झहीर, द्रविड सारख्या नवख्या खेळाडूंना नाकारून या तीन दिग्गजांना का संधी दिली गेली ते पाहूया. त्यासाठी तीन दिग्गजांचे जरा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी नक्कीच डावलून चालणार नाही.
गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण:
हा ५४ वर्षीय दिग्गज माजी गोलंदाज भारताकडून २ कसोटी सामने खेळला असून त्याने त्यात ४ बळी मिळवले आहेत तर ४ एकदिवसीय सामन्यात तब्बल १ विकेट घेऊन या दिग्गजाने आंतरराष्ट्रीय कारकीर्दही गाजवली आहे.
फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर
आपल्या बीड जिल्ह्यातील हा मोठा फलंदाजीचा अनुभव असलेला खेळाडू भारताकडून १२ कसोटी सामने खेळला असून त्याने त्यात ४७० धावा केल्या आहेत. १२ कसोटीमध्ये ५०० धावा करण्याचा संजय बांगर यांचा विश्वविक्रम केवळ आणि केवळ ३० धावांनी हुकला आहे, तर तब्बल १३.८४ च्या सरासरीने १५ एकदिवसीय सामन्यांत १८० धावा केल्या आहेत. एखाद्या गोलंदाजाला लाज वाटेल अशी ही सरासरी आहे.
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर:
यांना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काय असत हेच माहित नाही. एक खेळाडू म्हणून हे जेवढ्या वेळा परदेशात गेले नसतील तेवढे हे प्रशिक्षक म्हणून गेले आहेत.
आजकाल सगळेच म्हणतात की रवी शास्त्रीने आपल्या मर्जीतील लोकांना सपोर्ट स्टाफमध्ये घेतलं आहे. मग हीच सर्व लोक अनिल कुंबळे प्रशिक्षक असतानाही ह्याच जबाबदाऱ्या पार पाडत होती. तिच माणसं विरोधी विचारांच्या किंवा ज्यांच्यात विस्तवही जात नाही अशा दोन दोन लोकांच्या कशी मर्जीतली असू शकतात. एकतर ही लोक तेव्हा रवी शास्त्री परत संघात प्रशिक्षक म्हणून कधी येतोय याचसाठी तिथे असतील किंवा कुंबळे नक्की काय करतोय हा वॉच ठेवायचं तरी काम करत असतील.
बरं आपण यासाठी कोणत्या खेळाडूंची आधी निवड करून परत त्यांना नाकारतोय याचाही काही विचार नाही. राहुल द्रविड एकटा ३४४ एकदिवसीय सामने खेळला आहे जे रवी शास्त्री (कसोटी+ एकदिवसीय=२३०), संजय बांगर (कसोटी+ एकदिवसीय=२७), भरत अरुण (कसोटी+ एकदिवसीय=६) आणि आर श्रीधर(लिस्ट ए + फर्स्ट क्लास= ५०) यांच्या बेरजेपेक्षा २१ ने जास्त आहेत. तरी यात द्रविडच्या कसोटी सामन्यांची आकडेवारी नाही.
गेले दीड महिना कोहली, शास्त्री आणि बाकी टीमने जो काही गोंधळ घातला आहे, त्याचे परिणाम हे हळूहळू भविष्यात किती भीषण आहे हे कळलेच. एक पायंडा तर आपण चुकीचा पाडलाच आहे की प्रशिक्षक निवडताना कर्णधाराची मर्जी राखावी, पण आता सपोर्ट स्टाफ निवडताना प्रशिक्षकाच्या मर्जीतील लोक निवडून आपण त्यावर कळस चढवलाच आहे.
ह्या मर्जी सांभाळताना आपण कुणाची निवड करतोय, त्याची पूर्वीची कामगिरी काय, आपण संघाला यात किती महत्त्व देतो ह्या गोष्टी किती गौण आहे हे समोर आलं. आधी यांनी ध्यानात ठेवावं की खेळ आहे म्हणून तुम्ही आहे. नाहीतर आज कबड्डी, फुटबॉल या खेळांची तशीही लोकप्रियता वाढत आहे. तुमचा कधी वेस्ट इंडिज होईल कळणार पण नाही आणि असं काही होणार नाही असं म्हणणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं त्याच वेस्ट इंडिजकडे लारा पण होता आणि व्हिव्हियन रिचर्डपण..!
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page