' वन- डे पिकनिकसाठी हाकेच्या अंतरावर असलेलं हे अज्ञात ठिकाण आहे लयभारी – InMarathi

वन- डे पिकनिकसाठी हाकेच्या अंतरावर असलेलं हे अज्ञात ठिकाण आहे लयभारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा म्हटलं, की काही गोष्टी अगदी आवर्जून करायच्याच असतात. अनेकदा या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत, तर तो तुमचा फाऊल असल्याचं मित्रमंडळी तुम्हाला म्हणत असतील.

पहिल्या पावसात भिजणं, पावसाळी वातावरणात मस्तपैकी चहा आणि भजी यांचा आस्वाद घेणं, थंडगार टिमझिम पाऊस सुरु असताना, खिडकीत बसून छानपैकी तो पाऊस एन्जॉय करणं, आणि एखादी वर्षासहल करणं, या सगळ्या गोष्टी पावसाळ्यातील ‘मस्ट डू’च्या यादीत अगदी हमखास असतात.

 

rainy season im

 

वर्षासहल करताना, पावसाचा, थंडाव्याचा आणि उत्तम वातावरणाचा अनुभव घेणं हे जितकं महत्त्वाचं वाटतं, तितकंच नवीन काहीतरी पाहणं, अनुभवणं आणि नवनवीन ठिकाणं पाहणं हेसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरत असेल ना?

चला तर मग आज अशाच एका काहीशा कमी माहित असणाऱ्या ठिकाणाविषयी जाणून घेऊयात. पुण्यापासून हे ठिकाण अगदीच हाकेच्या अंतरावर आहे आणि मुंबईकर किंवा इतरांसाठी सुद्धा वनडे पिकनिकसाठी हे उत्तम ठिकाण ठरू शकतं.

पुण्याजवळील नयनरम्य ठिकाण

पुण्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेलं कुंडमळा हे ठिकाण आसपासच्या लोकांमध्ये फारच प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रेमी युगुलं असोत की चौकोनी कुटुंब, मित्रांची गॅंग असो किंवा भावंडांचा गोतावळा, कुंडमळ्याला अगदी सकाळी ७ वाजल्यापासूनच गर्दीचा ओघ सुरु झालेला असतो.

याचं मुख्य कारण म्हणजे इथली शांतता आणि सौंदर्य! मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला असल्याने, या ठिकाणी शांतता असते. इथे आवाज आलाच, तर तो तिथे वाहणाऱ्या पाण्याचा आणि तिथे असणाऱ्या पर्यटकांचाच असू शकतो.

ही जागा सायकलपटूंच्या विशेष आवडीची आहे. या ठिकाणी तुम्ही दिवसाची कुठल्याही वेळात गेलात, तरी तिथे सायकलपटू अगदी हमखास नजरेस पडतील. आपल्या सायकल्स घेऊन, पाण्याच्या धारेत फोटो काढत असलेले दिसतात.

धबधब्याचा आनंद…

 

kundadevi im

 

इंद्रायणी नदीवर असणारी जागा म्हणजे एक लहानसा धबधबाच आहे, असं म्हणायला हवं. नदीवर एक छोटासा बांध घालण्यात आला आहे. पावसाळ्यात जेव्हा भरपूर पाऊस होतो, त्याकाळात या धरणावरून पाणी वाहू लागतं. हे दृश्य पाहण्यासाठी नयनरम्य ठरतं.

याशिवाय एका बाजूला धरणात साठलेलं पाणी तिथून वाहत खाली आलं, की त्याखाली जाऊन धबधब्यात भिजण्याची हौस पूर्ण करून घेता येते.

कातळात अनेक ठिकाणी झालेले खड्डे आणि त्यामुळे बसायला जागा तयार झालेल्या असणं, ही एक महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे या धबधब्याचा भरपूर आनंद लुटता येतो.

एका बाजूला पार वीस फूट खोल असणारी इंद्रायणी, धरणाच्या एका काही ठिकाणी फक्त ५ फूटच खोल आहे. कुंडमळाला येणारे पर्यटक इथे पोहण्याचा सुद्धा पुरेपूर आनंद लुटतात.

कुंडमळा येथील मंदिर…

कुंडमळा या निसर्गरम्य आणि आताशा पर्यटनस्थळ होऊ लागलेल्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर सुद्धा आहे. कुंदराई मातेचं हे मंदिर नदीच्या अगदी मधोमध आणि धरणाच्या समोरच आहे. जवळपासच्या गावातील लोकांसाठी कुंदराई देवी म्हणजे कुलदैवत आहे.

 

kundadevi im1

 

इथे आल्यावर देवीचं दर्शन घेणं, तिला फुलं अर्पण करणं आणि ही प्रथा पाळली जाते. इथे आल्यावर देवीचा आशीर्वाद घ्यायलाच हवा, असं इथे मानलं जातं. या मंदिराच्या आवारात एक शिवलिंग सुद्धा पाहायला मिळतं. या प्राचीन शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करण्याची परंपरा सारेच भाविक पाळतात.

नदीवरील ब्रिज सुद्धा चर्चेचा विषय…

कुंदराई देवीच्या मंदिराजवळूनच नदी पार करण्यासाठी उपयोगी पडणारा एक पूल बांधलेला आहे. याची रुंदी मात्र फार नाही बरं का! एकावेळी एक दुचाकी किंवा चालणारी एक व्यक्ती एका टोकाकडून दुसरीकडे जाऊ शकेल, एवढाच हा ब्रिज रुंद आहे.

तुम्ही चालत जात असताना, समोरून एखादी दुचाकी आली, तर एका बाजूला चिकटून उभं  राहावं लागतं. दुचाकी जात असताना, काहीशी कंपनं अनुभवावी लागतात असा हा ब्रिज हीदेखील कुंडमळा ठिकाणाची मोठी खासियत आहे. एक दिवसाची पिकनिक म्हणून कुंडमळ्याला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?