तुझ्याकडे सुख फार झाले का? मग आता देवापाशी दुःख माग : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २९
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मागील भागाची लिंक : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २८
===
अाबाने मौनाचा असा अभ्यास एकीकडे चालविलेला असताना दुसरीकडे नारायणाला मात्र काय करावे ते समजेनासे झाले. आबा बरोबर असला की दिवस भर्रदिशी निघून जात होता. सुरुवातीला त्याने घरातल्यांबरोबर बोलून चालून वेळ काढला पण नंतर करमेनासे झाले. रामकाका आपल्या दिनचर्येत व्यस्त असत. शेवटी वेळ पाहून त्याने काकांना गाठले आणि म्हणाला,
काका, आबा तुम्ही सांगितलेला मौनाचा अभ्यास करतोय. मी दोन दिवस घरी जाऊन येऊ का? गाडी सोडतो, इकडील सर्व प्रकार सांगतो आणि लगोलग येतो परत!
रामभट म्हणाले,
तू गाडी आणि गाडीवान दोघांना परत पाठव आणि काय द्यायचा तो निरोप त्यांच्याबरेबर दे. जर तिकडे गेल्यावर काही अडचण उभी राहिली तर लगेच परतणे व्हायचे नाही. दृष्टीआड सृष्टी म्हण आणि येथे शांत राहा.
नारायण मान हलवत म्हणाला,
बरं, काका. मी उद्याच गाडी परत पाठवतो. पण मलाही काही अभ्यास द्या की. की मी ही मौनच करू?
रामभट उत्तरले,
तुला मौन? अरे, तुला बोल म्हणायची वेळ आहे! आबाला मौन सांगितले ते ह्याचसाठी की त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्यालाच सापडावीत. प्रश्नांनी नुसती गर्दी केली होती त्याच्या मनात. तुझा प्रश्न वेगळा आहे! तुझा प्रश्न हा आहे की तुला प्रश्नच पडत नाहीत! नारायणा, प्रश्न पडणे ही पहिली पायरी आहे आणि प्रश्न सुटणे ही पुढची. तुला प्रश्न नाहीत, अडचणी नाहीत, सारे कसे यथास्थित चालू आहे!
नारायण म्हणाला,
काका, तुम्ही म्हणता हे खरं आहे. मी आजवर असाच जगलो. परवा तुकोबांनी माझी कानउघडणी करेपर्यंत माझा दिवस सुखात उजाडत होता आणि सुखातच मावळत होता. मात्र आता बदल झाला आहे आणि मलाही प्रश्न पडला आहे. माझा प्रश्न असा की मला जर कोणतीच भौतिक अडचण नाही तर मी यापुढे नेमका जगू कसा? तुकोबा म्हणाले, कीर्तनाचे मानधन घ्यायचे नाही! मला हा उपदेश मानणे जड गेले नाही कारण ते सोडूनही उपजीविका होणार याची मला खात्री आहे. आबाला पडतात तसे प्रश्न मला पडत नाहीत हे खरे आहे पण काका, आज मला एक मोठा प्रश्न पडलेला आहे की यापुढे मी जगू कसा? तुकोबांसारख्या थोरांचा सहवास, उपदेश झाल्यावर मी माझ्यात नेमका काय बदल करू?
रामभट म्हणाले,
आपल्याला काही इच्छा झाली आणि तिची पूर्ती झाली की सुख होते आणि पूर्ती न झाली तर दुःख होते. तू असे दाखवीत आहेस की तू जणू सुखदुःखांच्या पार गेला आहेस! खायला प्यायला ल्यायला मिळाले, आता अजून काही नको असे म्हणणे हे बुद्धिमांद्याचे लक्षण आहे. तू तुझ्यात नेमका बदल कसा करावास, करावास की नाही अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. आपल्या पूर्वसुरींनी ती तयार ठेवली आहेत पण ती मिळवीन अशी इच्छा तरी तुला व्हायला पाहिजे. तुला कशाचीच इच्छा होत नाही! त्याचे कारण तू सांगतोस की तुला काही कमी नाही! तुकोबांना विचारशील तर ते म्हणतील, काही हरकत नाही, तुझ्याकडे सुख फार झाले का? मग आता देवापाशी दुःख माग!
इच्छा चाड नाही । न धरी संकोच ही काही ।।
उदका नेले तिकडे जावें । केले तैसें सहज व्हावें ।।
मोहरी कांदा उंस । एक वाफा भिन्न रस ।।
तुका ह्मणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ।।
नारायणा, तुकोबा म्हणत आहेत, सुख ही पीडा आहे! तेव्हा तू आता दुःखाची इच्छा कर! तुला कसली इच्छा, हौस नाही म्हणतोस ना? आजवर असेच जीवन होते, त्याचा काही संकोचही वाटत नव्हता. पाणी जसे न्यावे तसे जाते. तसे आपण आजवर सहज जगलो. वास्तविक एकाच वाफ्यात मोहरी, कांदा, उस लावले तरी त्यांचे रस जसे वेगळे निघावे तसे आपण सारे वेगवेगळे आहो पण आपले वाहणे मात्र पाण्यासारखे होत आहे. म्हणजे कसे तर आपल्या इच्छेने चालायचे नाही! आपल्याला आपला म्हणून वेगळा वास, रस, चव आहे ह्याची जाणीवच आपल्याला नाही!
नारायणा, गंमत पाहा. एका वाफ्यात उगवूनसुद्धा मोहरीला कळते की आपण मोहरीसारखे वाढायचे, मोहरीसारखे जगायचे. कांद्याला कांद्यासारखे आणि उसाला उसासारखे वाढायचे कळते. म्हणून शेजारी वाढूनसुद्धा एकमेकाला एकमेकांच्या गुणांची लागण होत नाही.
तुझी अडचण अशी आपण मोहरी आहोत की कांदा हेच तुझ्या लक्षात आलेले नाही. आणि दिवस म्हणून सुखाने चालले आहेत. माझे गुण मी ओळखीन आणि तसा जगीन असे म्हणण्यासारखी स्वतःची ओळख स्वतःला पटली पाहिजे. ती ओळख पटावी अशी तीव्र इच्छा तुला होऊ दे, नारायणा.
नारायण म्हणाला,
काका, तुम्ही जे काही सांगता आहात ते मला थोडे थोडे कळते आहे. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा की जे जीवन समोर आले ते मी आजवर जगलो. एका अर्थी सुखी झालो. पण स्वतःला ओळखण्यासाठी मी विशेष असे प्रयत्न काहीच केले नाहीत. हे खरे आहे. माझ्या बुद्धीला मी काही कामच दिले नाही. म्हणून तिला मांद्य आले. आता प्रश्न आला की माझी स्वतःची ओळख मला पटावी म्हणून मी काय करू? आपला मला पहिला उपदेश काय आहे?
रामभट म्हणाले,
तुकोबांचा एक अभंग ऐक. ते त्यांचे जीवन मांडीत असतात. त्यातून आपल्याला बोध होतो. दिशा मिळते. त्या दृष्टीने ऐक.
देह तुझ्या पायी । ठेवूनी झालो उतराई ।।
माझ्या जीवा । करणें तें करीं देवा ।।
बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धी ।।
तुका ह्मणे नेणे । भावभक्तीचीं लक्षणे ।।
मनाच्या एका अवस्थेत तुकोबा हे लिहून गेले आहेत. आपल्या हातून ह्या नरदेहाचे सार्थक झालेले नाही ह्याची खंत त्यांना वाटत होती. त्यामुळे ते स्वतःला बहु अपराधी असे म्हणवून घेत आहेत. सामान्य मनुष्य म्हणतो मी सदाचाराने वागतो, माझी कामे मी सचोटीने करतो, कुणाला लुबाडीत नाही, कुणाला फसवीत नाही. आणि म्हणून माझ्या भाळी कोणताही दोष लागलेला नाही. तुकोबांसारखे थोर लोक ह्या अशा वागण्यात आपल्या जीवनाचे सार्थक मानीत नाहीत. किंबहुना असे वागणे म्हणजे मिळालेल्या नरदेहाचा योग्य उपयोग न करून आपण अपराध केला असे ते मानतात. सामान्यांत आणि संतात फरक असतो तो असा. आपल्याला मिळालेल्या ह्या जन्माचा आपण योग्य उपयोग केला नाही ह्याचे कारण सांगताना तुकोबा पुढे म्हणतात, मी मतिमंद आहे, मी हीनबुद्धी आहे! नारायणा, तुझ्याबद्दल बोलताना मी मघाशी म्हटले की तुझ्या बुद्धीला मांद्य आलेले आहे. त्याचा अर्थ आता तुझ्या आती अजून लक्षात येईल. आपण कोण, कसे आणि आपले वर्तन कसे असावे आणि आपली प्रगती व्हावी या साठी आपण कसे झटावे हे ज्याला कळत नाही आणि कळल्यास तो तसा वागत नसल्यास त्या माणसाला बुद्धिमांद्य आले आहे असे अवश्य म्हणावे. तुकोबांचे थोरपण असे की त्यांना उन्नतीची आंस लागली आणि त्या काळात त्यांनी स्वतःला मंद बुद्धीचा म्हटले! स्वतःस मंदबुद्धीचा म्हणवून घेणे तरी ठीक, पण नारायणा, विचार कर की तुकोबांनी स्वतःस हीन बुद्धीचा का म्हणवून घेतले असेल? ह्या प्रश्नाचे उत्तर असे की आयत्या मिळालेल्या देहाचा उपयोग निव्वळ खाण्यापिण्यासाठी करणे आणि आला दिवस ढकलणे हे ते कृतघ्नपणाचे समजतात! ज्याने हे जीवन दिले त्याचे ऋण फेडण्यासारखे आपल्या हातून काहीच घडत नाही म्हणजे आपली बुद्धी हीन दर्जाची आहे असे तुकोबांचे मत आहे. यावर तुकोबांनी जो उपाय केला त्याचा तू विचार कर नारायणा. ते म्हणाले, देवा, मी भावभक्ती वगैरे काही जाणत नाही. मी नेमके काय करावे ते मला कळत नाही. तेव्हा माझा देहच मी तुला वाहतो. तूच आतां असे काही कर, ह्या जिवाकडून करवून घे की जेणेकरून मी तुझा उतराई होईन. तुझ्या ऋणातून मुक्त होईन.
नारायणाने विचारले,
काका, माणसाचा संत कसा होतो ह्यावर आबा मागे प्रश्न विचारीत होता. तुम्ही त्याचे नेमके उत्तर दिलेत. पण तुम्ही काय म्हणता? मी ही तसेच स्वप्न बघू?
रामभट म्हणाले,
संतत्व ही माणसाच्या उन्नतीची उच्चावस्था आहे. प्रत्येकाने जर उन्नतीची आंस धरली पाहिजे तर त्याला तू अपवाद कसा असशील? तेथे पोहोचू की नाही हा विचार मनात आणू नये. आहे तेथे राहणार नाही हा विचार मनात ठेवावा. तुकोबांचा एक अभंग तुला सांगून ठेवतो. त्यावर तू विचार कर.
तुकोबा म्हणतात –
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय ।।
परिमितेविणें बोलणें ते वायां । फार थोडे काय पिंड पीडी ।।
समाधान त्याचें तो चि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ।।
तिका ह्मणे होय पीडा ते न करी । मग राहें परीं भलतियें ।।
===
(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.