कोकणावर ६२५ लोकांचा जीव घेणाऱ्या या सागरी-अपघाताची आजही गडद सावली आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सागरी अपघात म्हटलं, की टायटॅनिक या बोटीचा विषय निघाल्याशिवाय राहत नाही. टायटॅनिक हे त्याच्या काळातील सर्वात मोठं जहाज होतं आणि हिमनगाला आदळल्यामुळे त्याला अपघात झाला, ते समुद्रात बुडालं हे अगदी लहानग्या मुलांना सुद्धा माहित असतं.
या सागरी अपघातावर आधारित चित्रपट फारच गाजला आहे, हेदेखील वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र तुम्हाला हे माहित आहे का, की असाच एक भीषण अपघात स्वातंत्र्यपूर्व काळात एका भारतीय जहाजाचा सुद्धा झाला होता.
या अपघातात शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले होते. चला आज जाणून घेऊया या भयानक सागरी अपघाताविषयी!
चाकरमानी गावी निघाले :
स्वातंत्र्य अगदी तोंडावर होतं तेव्हाचा तो दिवस. १९४७ मधील जुलै महिन्यातील १७ तारीख! भाऊच्या धक्क्याला तोबा गर्दी होती. चाकरमानी मंडळी गावी जाण्यासाठी उत्सुक होती. दीप अमावास्येचा दिवस, सणाचा महिना असलेला श्रावण सुरु होणार होता.
आषाढाच्या तुफान पावसाने मागचे दोन दिवस थैमान घातलं होतं. त्यामुळे एकंदर स्थिती कशी असेल, याची शंका होतीच. चाकरमान्यांना गावी घेऊन जाण्यासाठी ‘रामदास’ बोट मोठ्या दिमाखात उभी होती.
एरवी मुंबई-गोवा सागरी मार्गावर चालणारी ही बोट या विशिष्ट काळात, रेवस आणि आसपासच्या परिसराच्या फेऱ्यांसाठी तैनात होती.
अशी होती रामदास बोट :
रामदास बोटीची निर्मिती झाली होती, ती स्कॉटलंडमध्ये, १९३६ साली! १९४२ साली ही बोट युद्धाच्या कारणासाठी सरकारने आपल्या ताब्यात घेतली होती. त्यानंतरच्या काळात मात्र, ही बोट पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू झाली. जवळपास १८० फूट लांब आणि २९ फूट रुंद असणाऱ्या रामदासचं वजन तब्बल ४०६ टन होतं.
नेहमी मुंबई जवळच्या सागरी भागात फेऱ्या असणाऱ्या रामदासमधून एक हजार पन्नास प्रवासी, १० हॉटेल कर्मचारी आणि ४२ खलाशी अशा जवळपास ११०० माणसांना प्रवासाची मुभा होती.
रामदास त्यादिवशी प्रवासाला निघणार होती, त्यावेळी शेख सुलेमान हे बोटीचे कप्तान होते तर चीफ ऑफिसर म्हणून आदमभाई काम पाहणार होते. बोटीची पाहणी करण्यात येऊन, ती प्रवासासाठी सज्ज असल्याचं बंदर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं.
प्रवास सुरु तर झाला पण :
साडे आठच्या सुमारास रामदास बोटीचा प्रवास सुरु झाला. मात्र त्यावेळी सुद्धा हवामान खात्याचा अंदाज साफ चुकला होता. हवामान खातं आणि त्यांचा अंदाज चुकणं ही बाब काही नवी नाही, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरत नाही. या बोटीचा प्रवास सुरु असतानाच वादळी वारा आणि पावसाने तिला गाठलं. या तडाख्यातून सुटणं फारच कठीण जाणार होतं.
खरंतर अलिबाग, मुरुडकडे जाणारी मंडळी या बोटसेवेचा नेहमीच लाभ घेत असत. त्यांच्या प्रवासासाठी हा पर्याय फारच उत्तम आणि सोयीचा होता. रस्तामार्ग अधिक खर्चिक आणि महाग ठरत असल्याने, सागरी मार्गाची निवड कोकणवासी करत असत. तो दिवस मात्र काळरात्र ठरणार, हे बोटीवर उपस्थित ७५० लोकांना माहित नव्हतं.
वातावरणात अचानक झालेला बदल कप्तानाच्या लक्षात आला होता. मात्र तोवर बोटीने ८-१० मैलांचं अंतर पार केलं होतं. भर समुद्रात तिची भ्रमंती सुरु होती. सुलेमान आणि आदमभाईंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रेवस अजूनही दूरच होतं. प्रवास खडतर होणार असल्याची जाणीव झालेली होती.
वादळात बोट पुरती सापडली. मोठमोठ्या लाटा उसळत होत्या, त्यावर रामदास हेलकावे खात होती. जागेवर बसून असणारे प्रवासी, सीट घट्ट पकडून ठेऊन जागेवर स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी समुद्राचं हे असं रौद्ररूप पाहिलं नव्हतं. ज्यांनी पाहिलं होतं, ते इतरांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. सुखाचा आणि आनंदाचा प्रवास आता भयावह ठरू लागला होता.
पिंपाने घात केला :
बोटीसमोर तेलाचं मोठंथोरलं पिंप वाहत आलं. त्याच्यापासून वाचण्यासाठी शेख यांनी बोटीची दिशा बदलली. मात्र हे करत असताना बोट एका बाजूला कलली. वादळी लाटेच्या तडाख्याने त्यात आणखी भर पडली. यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी बोटीची दुसरी बाजू गाठली.
सुरक्षेसाठी प्रवाशांनी अनावधानाने केलेली ही कृती धोकादायक ठरली. सारा भार एका बाजूला गेला आणि अजस्र लाटांसमोर टिकाव न लागल्याने बोट उलटली. बोटीत पाणी शिरू लागलं. काही जण समुद्रात फेकले गेले.
ज्यांना पोहता येत होतं त्यांनी स्वतःहून पाण्यात उड्या टाकण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी लाईफ जॅकेटचा शोध सुरु केला. खवळलेला समुद्र मात्र सगळ्यांशी तितक्याच निर्दयपणे वागत होता.
काहींचं दैव बलवत्तर :
या भीषण सागरी अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र काहींचं दैव बलवत्तर होतं. नियती त्यांच्या मदतीला धावली होती. हरी मढवी आणि त्यांचा एक मित्र असे दोघे रेवस बंदराकडे पोहत निघाले. पट्टीचे पोहणारे मढवी जीव वाचवण्यात यशस्वी ठरले, तर त्यांचा मित्र मात्र त्यातून वाचू शकला नाही.
मढवी यांनी त्यांच्या मुलाचं नाव रामदास ठेवल्याचं म्हटलं जातं. कांहींनी स्वतःला पोहता येतं म्हणून जीव वाचवू शकणारे लाईफ जॅकेट्स, बेल्ट्स इतरांना देऊ केले. मात्र पाहू शकणारी व्यक्ती प्राण वाचवू शकली नाही.
काळ समोर आ वासून उभा ठाकलेला असताना सुद्धा माणुसकीचं दर्शन अनेकांनी दाखवल्याचं या घटनेविषयी केलेल्या वर्णनांमध्ये पाहायला मिळतं.
रेवसचे मासेमार ठरले तारणहार :
सागराचा रुद्रावतार शमू लागल्यावर रेवसचे मच्छीमार मासेमारीसाठी निघाले. त्यावेळी समुद्रात अनेकजण पोहत असल्याचं त्यांना दिसलं. नुकतंच वादळ होऊन गेलेलं असल्याने ही गोष्ट चमत्कारिक आहे, असं वाटेपर्यंतच त्यांना समुद्रात मृतदेह तरंगताना सुद्धा दिसू लागले. परिस्थितीचं गांभीर्य त्यांना लक्षात आलं.
हातावर पोट असलेल्या त्या कोळी बांधवांनी मागचा पूढचा विचार न करता, जाळ्यात सापडलेली हजारो रुपयांची मासळी पाण्यात फेकून दिली. लोकांचे जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावले. या मच्छीमारांनी जवळपास ७५ जणांचा जीव वाचवला असल्याची नोंद झालेली आहे.
बोटीचे कप्तान शेख आणि आदमभाई सुद्धा या अपघातात बचावले. ‘रामदास’ बुडाल्याची माहिती मुंबईला सुद्धा कळवण्यात आली.
—
- भारतातील दुर्दैवी, सर्वात भीषण रेल्वे अपघातामागे ही २ प्रमुख कारणे होती…
- एरवी शांतताप्रिय असलेल्या पारशी लोकांनी मुंबईत दंगल का घडवली होती?
—
तिथेही शक्य तेवढ्या प्रमाणात बचावकार्य झालं. काहींचे जीव वाचवण्यात यश आलं. काहीजण पोहत पोहत ससून डॉकला पोचले.
अंधश्रद्धा अशीही आणि तशीही :
या बोटीने प्रवास करायला निघणार होता असा एक तरुण अंधश्रद्धेपायी मुंबईतच थांबला. नियतीने त्यांच्यासमोरील संकट दूर केलं असं म्हणायला हवं. ‘आवस वाढा आवस’ असं म्हणत कुणी बाई घराजवळ आल्याने, आता अमावास्येला प्रवास नको, असा निर्णय घेऊन त्याने तो प्रवास टाळला होता. अंधश्रद्धेपायी प्रवास न करणाऱ्या गिरगावातील या तरुणाचं नशीब बलवत्तर होतं असं म्हणायला हवं.
अलिबाग, रेवस, मांडवा, वरसोली, उरण, सासवणे, करंजा, किहीम आशा भागात अनेक मृतदेह वाहून किनाऱ्याला लागले होते. कोकणात अनेक कथा, भुताखेतांच्या गोष्टी रचल्या गेल्या. अनेक नव्या अंधश्रद्धा जन्माला आल्या.
एका बाजूला माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या या अपघाताच्या बाबतीत असंही म्हटलं जातं, की किनाऱ्याला लागलेल्या मृतदेहांवरील दागिने लुबाडून नेण्याच्या घटना सुद्धा घडल्या.
अमानुषतेचं घाणेरडं स्वरूप सुद्धा यानिमित्ताने पाहायला मिळालं. एकंदरीतच, हा सागरी अपघात फारच भीषण आणि भयावह ठरला होता.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.