९६ कुळांचा इतिहास सांगणाऱ्या या मंदिराची रचनाही ९६ अंकावर आधारित आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
९६ कुळी हा शब्द एकदम राजेशाही वाटतो. खासे मराठे लोक आपल्या घराण्यासाठी हा शब्द सर्रास वापरतात आणि त्यांना खरोखर तसाच मान आहे. संस्थाने खालसा झाली, राजेशाही संपली तरीही छत्रपतींचे जे सरदार आहेत जी घराणी आहेत ती आजही हा ९६ कुळी असण्याचा अभिमान बाळगतात.
भारतात कितीतरी घराण्यांनी राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य येण्यापूर्वी खूप परकीय आक्रमणे झाली होती. त्यात बरीच घराणी लुप्तही झाली. पण नंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर महाराष्ट्रातील मंदिरे उभारली.
त्यांच्या नंतरही बऱ्याच मंदिरांची उभारणी झाली. असेच एक वेगळे मंदिर आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे कमळाभवानी देवीचे मंदिर हे असेच इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. या मंदिरात ९६ या अंकावर आधारीत बांधकाम केले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
या मंदिराचे हे वेगळेपण आणि इतिहास
संभाजी राजांच्या मृत्युनंतर मराठ्यांच्या सातारा आणि कोल्हापूर येथे दोन वेगवेगळ्या गाद्या झाल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हैदराबादचा निजाम आणि मराठे एकमेकाचे शत्रू होते. जसे मराठा साम्राज्यात मुस्लीम सरदार होते तसेच निजामाच्या पदरीही मराठा सरदार होतेच. त्या सरदारांपैकी एक होते, रावरंभा निंबाळकर! यांनीच हे आगळेवेगळे मंदिर बांधले.
त्यांचे मूळ पुरुष होते रंभाजी बाजी. ते फलटणच्या महादजी निंबाळकरांचे नातू. निजामाने त्यांना पुणे, बारामती, श्रीगोंदा, तुळजापूर, माढा, करमाळा, भूम इत्यादी ठिकाणच्या जहागिरी दिल्या.
१७२४ पासून १८९५ पर्यंत म्हणजे दीडशे वर्षाहून जास्त काळ निंबाळकरानी निजामाची चाकरी केली. या कालावधीत जहागिरीवर येणाऱ्या पुरुषाचे नांव काहीही असले तरी त्यांच्या नावापुढे रावरंभा हा किताब कायम होता. रंभाजी, जानोजी,महाराव, बाजीराव असे पराक्रमी वारस या घराण्याला लाभले.
रंभाजी यांचे वास्तव्य बराच काळ तुळजापूर येथे असल्यामुळे त्यांना देवीच्या भक्तीची आस लागली होती.
तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धारानंतर त्यांनी त्यांची जहागीर असलेली ठाणी होती तिथेही देवीची मंदिरे बांधली. ती ठाणी होती, माढा, रोपळ आणि करमाळा. रंभाजीच्या कालावधीत ही मंदिरे बांधायला सुरुवात झाली आणि जानोजीच्या कालखंडात पूर्ण झाले.
यापैकी माढ्याची माढेश्वरी ही माढा या गावाच्या नावावरून ओळखली जाते. माढेश्वरी आणि करमाळ्याची कमळादेवी ही मंदिरे आजही सुस्थितीत आहेत. यातील कमळादेवीचे मंदिर हे अतिशय सुंदर असून त्याचे वेगळेपण म्हणजे त्याची रचना ९६ या अंकावर आधारीत आहे. तिचे बांधकाम अतिशय सुंदर आहे.
करमाळ्याच्या पूर्व दिशेला ८० एकर परिसरावर मंदिराची आखणी केली गेली.आणि तिथेच देवीची प्रतिष्ठापना केली. म्हणून हा भाग देवीचा माळ म्हणून ओळखला जातो.
पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराचे क्षेत्रफळ ३२० फूट बाय २४० फूट आहे. या मंदिराला पाच दरवाजे आहेत. आणि प्रत्येक दारावर गोपुरे आहेत. यातील पूर्वेकडील एका दाराचे गोपूर काळाच्या ओघात नामशेष झाले आहे.
गोपुरे ही दाक्षिणात्य मंदिरांची खासियत! ही गोपुरे महाराष्ट्रात प्रथम आणायचा मान रंभाजी यांच्याकडेच जातो. ते जेव्हा दक्षिणेत त्रिचनापल्ली येथे मोहिमेवर गेले होते तेव्हा त्यांनी तिथे ही गोपूर शैली पहिली आणि त्यांना ती फार आवडली. तिच शैली त्यांनी या मंदिराच्या बांधकामात वापरली.
कमळाभवानीचे हे मंदिर नुसतेच सुंदर नाही तर त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बांधकामात केलेला ९६ या अंकाचा वापर! रावरंभा यांच्या जहागिरीत गावे होती ९६. कमळाभवानीचे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे, ते ९६ खांबांवर उभे आहे.
गर्भगृह, अंतराळ, आणि सभामंडप अशी रचना आहे. गाभाऱ्यातील कमळाभावानीची पाच फुटाची अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील मूर्ती गंडकी या शिळेत घडवलेली आहे.विविध आयुधे धारण केलेली ही मूर्ती तुळजाभवानीचे प्रतिरुप आहे. तिच्या दागिन्यांची रचना पण अगदी तंतोतंत तुळजाभवानीसारखीच आहे.
गर्भगृहाच्या वरच्या बाजूस उंच शिखर आहे. हे शिखर सहा स्तरात असून त्यावर विविध देवतांची शिल्पे कोरली आहेत. या शिल्पांची संख्या आहे ९६. या शिखराच्या शेवटच्या भागात सहस्रदल कमल आहे. त्यावर मुस्लीम शैलीतील घुमट आणि बाजूला मिनार आहेत.
मंदिराच्या चारीही बाजूला फरसबंद बांधकाम आहे. मंदिराच्या तटालगत भाविकांसाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्या आहेत ९६.
मुख्य मंदिरासमोर भव्य दीपमाळा आहेत. त्या इतक्या भव्य आहेत की, त्या प्रज्वलित करायच्या असतील तर आत पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून जावं लागतं. या पायऱ्या आहेत ९६. विशेष म्हणजे या दीपमाळा उंचीला मंदिरापेक्षा मोठ्या आहेत. या दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर ९६ गावातून पण त्यांच्या ज्वाला दिसायच्या असं सांगतात. या दीपमाळापैकी फक्त चौथ्या दीपमाळेचा चबुतरा शिल्लक आहे.
अंदाजे शंभर वर्षापूर्वी वीज पडून ती दीपमाळ ईशान्येकडील गोपुरावर पडल्यामुळे ते गोपूर पडले.
कमळाभवानी मंदिराच्या परिसरात अजून एक महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे हत्ती बारव. बारव म्हणजे पाय विहीर. पायऱ्या असलेली विहीर. मंदिरासमोरील शेतामध्ये एक भव्य बारव आहे. चिरेबंदी दगडापासून बनवलेली ही बारव १०० फूट खोल आहे. षटकोनी आकाराच्या या बारवेला ९६ पायऱ्या आहेत. त्या काळात सर्व गोष्टी मानवी श्रमावर केल्या जात. यंत्रसामुग्री नसताना ही बारव खोदायला किती कष्ट पडले असतील याची कल्पनाच केलेली बरी.मंदिराच्या बांधकामापेक्षा बारव खोदायलाच जास्त पैसा खर्च झाला असं लोक सांगतात.
ही बारव इतकी मोठी असल्याने त्यावर मोट होती ती पण हत्तीची. म्हणून हिला हत्ती बारव असे म्हणतात.त्या मोटेने पाणी काढून शेजारच्या शेताला दिले जायचे. आजही ही बारव सुस्थितीत आहे.त्या मोटेचे अवशेष आजही तिथे आहेत. जवळच मोटेच्या हत्तीची समाधी आहे.
अशा रीतीने या मंदिराच्या उभारणीत ९६ या आकड्याचा खूप कौशल्याने वापर केला आहे.अंकशास्त्राच्या दृष्टीने ९ आणि ६ या अंकांचे महत्व म्हणजे ९ हा अंक परिपूर्ण जीवनाचे तर ६ हा अंक स्वत:च्या वैभवातून समाजाचा उत्कर्ष साधण्याचे द्योतक आहे.
मराठा घराण्यात जी ९६ कुळे आहेत त्यापैकी एक निंबाळकर हे एक घराणे. त्या कुळाचा उद्धार करणे हा हेतू आहे असं मानलं जातं.
हेतू काहीही असला तरी वास्तुशिल्पाचा एक वेगळा आविष्कार आपल्याला या मंदिराच्या रूपाने पाहायला मिळतो.
कमळाभवानी देवीचे नवरात्र थाटात होते पण मुख्य यात्रा भरते ती कार्तिक पौर्णिमेला. चतुर्थी पर्यंत हा उत्सव चालतो. रोज छबिना निघतो पण शेवटच्या दिवशी हा छबिना रात्रभर चालतो. या छ्बीन्यासमोर मुस्लीम नर्तकी नृत्य करत असते. तिला आजन्म लग्न करता येत नाही.
हा छबिना खंडोबाच्या मंदिरापर्यंत जातो. खंडोबा हा देवीचा रक्षणकर्ता मानला जातो. चंपाषष्ठीला खंडोबाच्या वतीने देवीला साडी चोळीचा आहेर दिला जातो.
किती विविध परंपरा आहेत या एका ९६ कुळी सरदाराने बांधलेल्या मंदिरात. आणि आजही त्या तितक्याच जिव्हाळ्याने सांभाळल्या जातात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
९व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.