' आता पेट्रोल भरायला जावं लागणार थेट जेलमध्ये? नक्की काय आहे भानगड? – InMarathi

आता पेट्रोल भरायला जावं लागणार थेट जेलमध्ये? नक्की काय आहे भानगड?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या काळात स्वतःकडे स्वतःचं वाहन असणं ही आवश्यक गोष्ट झालेली आहे. आपलं वाहन असेल तर अगदी तातडीने कुठे जावं लागणं इथपासून ते केवळ आपल्याला सहज बाहेर जाण्यासाठी आपली गाडी कधीही काढता येण्यापर्यंत वाहन अनेक प्रकारे सोयीचं ठरतं.

फार लांबवर ऑफिस नसेल तर बस, ट्रेनने प्रवास करावा न लागता आपल्या वाहनाने ऑफिसला जाता येतं. सुट्टीच्या दिवसांमध्ये जवळच्याच एखाद्या ठिकाणी छोट्याश्या ट्रीपला जाऊन येता येऊ शकतं. पण वाहन म्हटलं की वेळोवेळी त्याची डागडुजी करणं, थोड्या कालावधीने पेट्रोल भरणं आलंच.

पेट्रोल पंपांवर जाऊन आपल्या वाहनामध्ये पेट्रोल भरणं ही आपल्याकरता सवयीची गोष्ट आहे. पण थेट जेलमध्ये पेट्रोलपंप उभारला गेल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? गुन्हे केलेल्यांना शिक्षा म्हणून त्यांची रवानगी तुरुंगात केली जाते. तुरुंगाचा आणि पेट्रोलपंपाचा काय संबंध असा प्रश्न आपल्याला सहाजिकच पडला असेल. पण हरियाणामधल्या एका जेलच्या बाहेरच्या आवारात चक्क पेट्रोलपंप उभारला गेला आहे.

 

petrol im

 

हरियाणातल्या अशा आणखीन १० तुरुंगाच्या आवाराबाहेर पेट्रोलपंप उभारले जाणार आहेत. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे पेट्रोल पंप चालवणारी माणसं दुसरी तिसरी कुणी नसून चक्क तुरुंगातले कैदीच हे पेट्रोलपंप चालवणार आहेत. हरियाणा सरकारने ही योजना आखण्यामागे काहीएक उद्दिष्ट आहे. नेमकी काय आहे ही सगळी भानगड? जाणून घेऊ.

बाहेरील लोकांना आत येऊन पेट्रोल भरता यावं या दृष्टीने हरियाणातील कुरुक्षेत्र तुरुंगाच्या बाहेरच्या आवारात पेट्रोल पंप उभारला गेला आहे. या पेट्रोल पंपाला ‘जेल फिलिंग स्टेशन’ असं म्हटलं गेलंय.

विशेष म्हणजे हे ‘जेल फिलिंग स्टेशन’ याच कुरुक्षेत्र तुरुंगातील कैदी चालवत असून त्यांना याबाबत प्रशिक्षण दिलं जात आहे. हरियाणा सरकारच्या एका योजनेचा हा एक भाग आहे आणि या जेल फिलिंग स्टेशनच्या अनुभवानंतर हरियाणातील इतर आणखी १० तुरुंगांच्या बाहेर असेच ‘जेल फिलिंग स्टेशन्स’ उभारले जाणार आहेत.

ही ‘जेल फिलिंग स्टेशन’ची योजना आहे तरी काय?

तेलंगणामधल्या पेट्रोल पंपांसारखेच पेट्रोलपंप हरियाणाच्या ११ तुरुंगाच्या बाहेरच्या आवारात उभारायचं हरियाणा सरकारने योजलं आहे. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या सहयोगाने हरियाणा सरकार हे ‘जेल फिलिंग स्टेशन्स’ उभारणार आहे.

 

indian oil IM

 

पायलट प्रोजेक्ट म्हणून ३१ मे पासून कुरुक्षेत्र तुरुंगाच्या आवाराबाहेरचा पेट्रोलपंप सुरू झाला. कुरुक्षेत्र तुरुंगानंतर अंबालाच्या तुरुंगांमध्ये २ पेट्रोल पंप चालवले जाणार असून फरिदाबाद, यमुनानगर, भिवानी, कर्नल, हिसार, झाज्जर, गुरगाव, जिंद इथल्या तुरुंगाबाहेर एकेक पेट्रोल पंप चालवलं जाईल.

तुरुंगातल्या कैद्यांना या पेट्रोल पंपांवर काम करायला मिळणार का परवानगी?

जे कैदी दोषी ठरले गेलेत त्यांच्यापैकी ज्यांची वागणूक चांगली आहे आणि ज्यांनी तुरुंगात बराच काळ घालवला आहे त्यांना तुरुंगाच्या नियमांनुसार पेट्रोल पंपांवर काम करायला परवानगी मिळणार आहे. अंडरट्रायल्सना तिथे काम करायला परवानगी मिळणार नाही.

 

indian jail inmarathi
quora

 

राज्याचे तुरुंग मंत्री रणजित सिंग चौटाला म्हणाले, “कैद्यांना या जेल फिलिंग स्टेशन्ससाठी प्रशिक्षण दिलं जातंय की नाही याची जेलर सुरुवातीला खातरजमा करतील आणि त्यानंतर त्यांची कर्तव्य, त्यांच्या वर्तनाच्या आधारावर त्यांची नियुक्ती केली जाईल.”

कैद्यांची सुधारणा आणि पुनर्वसनाचा हेतू :

चौटाला यांच्या म्हणण्यानुसार, या कैद्यांना आपल्या समाजाचा एक भाग बनवणे हे या योजनेमागचं उद्दिष्ट आहे. ते म्हणाले, “जेव्हा लोक या फिलिंग स्टेशन्सवर येतील तेव्हा कैदीदेखील सामान्य माणसांप्रमाणे काम करू शकतात हे त्यांना दिसेल. कैद्यांमध्ये सुधारणा करून त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं असा संदेश सगळीकडे पोहोचायला हवा.

हरियाणा सरकार या दिशेने प्रयत्न करत आहे.” तुरुंगाच्या नियमावलीनुसार पेट्रोल पंपांवर काम करण्याकरता कैद्यांना वेतन दिलं जाईल. या पेट्रोल पंपांमधून जो नफा मिळेल तो कारागृह कल्याण औद्योगिक निधीमध्ये जमा केला जाईल आणि कैद्यांच्या कल्याणासाठी वापरला जाईल.

सद्यस्थितीत पायलट प्रोजेक्ट कसा सुरू आहे?

पिपली कुरुक्षेत्र रस्त्यावर कुरुक्षेत्र तुरुंगात नव्याने उघडलेला हा पेट्रोल पंप उभारण्यात आलेला आहे. हा पेट्रोल पंप अंबाला-दिल्ली महामार्गापासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे. कुरुक्षेत्र तुरुंगाचे अधीक्षक सोम नाथ जगत यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल पंप चालवला जातो. आणि रोज जवळपास ४ लाखांची विक्री होते.

 

highway-inmarathi
dnaindia.com

वेश्यांमधील माणूसपण दाखवणारे हे १० भारतीय चित्रपट अनेकार्थी डोळे उघडणारे आहेत

देशासाठी हेरगिरी करणाऱ्या ४ ललना, सुंदर पण त्यापेक्षा जास्त खतरनाक!

सोमनाथ म्हणतात, “आता रोज सकाळी ६ पासून रात्री ११ पर्यंत ते चालवण्याचा आणि रोज ८ लाख रुपयांची इंधन विक्री करण्याच्या आमचा मनसुबा आहे. सकाळच्या तासांमध्ये आणि संध्याकाळी उशीरा तुरुंगाचे कर्मचारी हा पेट्रोल पंप चालवतील. कारण, तुरुंगाच्या नियमांनुसार कैद्याने संध्याकाळी ७:३० पर्यंत तुरुंगात असलं पाहीजे. उत्तर भारताच्या ५ राज्यांमधील हा असा पाहिलाच पेट्रोल पंप आहे… त्याचे परिणाम आशा पल्लवीत करणारे आहेत.”

खरं म्हणजे स्वतःच गुन्हे केल्यामुळे कैदी तुरुंगात जातात. तशात त्यांना काहीही करावं न लागता त्यांची तिथे व्यवस्था पाहिली जाते, त्यांना दोन वेळचं जेवण दिलं जातं. त्यांच्या ताकदीचा उपयोग करून घेता येऊ शकतो.

हा विचार हरियाणा सरकारच्या मनात येणं आणि त्यांनी यादृष्टीने असं सकारात्मक पाऊल उचलून कैद्यांना एकप्रकारे समाजात व्यक्ती म्हणून मान मिळावा ,या दृष्टीने प्रयत्न करणं केवळ नाविन्यपूर्णच नाही तर बाकीही राजांना अशा प्रकारचा वेगळा विचार करायला लावणारं आहे. हरियाणा सरकारची ही नामी योजना यशस्वी होवो हीच इच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?