जेजुरीच्या खंडेरायाला हळद उधळण्यामागे आहे भगवान शंकराची गोड कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपला भारत देश हा सण, उत्सवांचा आणि विविध रंगांचा देश! कोणत्याही उत्सवात हळद कुंकू हे सगळ्यात महत्वाचा भाग असतात. पूजा करताना देवाला सर्वप्रथम हळदी कुंकू वाहिले जाते. मग बाकी फुले, वस्त्रे येतात पण पहिला नंबर हळदी कुंकवाचा. पण तुम्हाला हे माहित आहे का, काही देवांना फक्त हळद वाहिली जाते.
हळद कुंकवासोबत येते तेव्हा ती हळद असते पण जेव्हा उधळली जाते तेव्हा भंडारा होते.
पिढ्यानपिढ्या आपण गाणी ऐकत आलो आहोत, वाघ्या मुरळी भंडारा उधळी…कधी जेव्हा बिरोबा, मंगोबा अशा गावातील देवांच्या पालख्या निघतात तेव्हा भंडारा उधळला जातो. त्या भंडाऱ्याचा एक विशिष्ट वास असतो तो आसमंतात दरवळून जातो.
आदमापूर येथे बाळूमामांचा उत्सव असतो तेव्हा अशीच भंडाऱ्याची उधळण होते. सारा आसमंत पिवळाधम्मक होऊन जातो. तसेच खंडोबाची जी जी देवस्थाने आहेत त्या सर्व ठिकाणी पालखी सोहळा होतो त्या प्रत्येक वेळी भंडारा उधळला जातो. ढोल, कैताळ वाजवतात, त्याच्या तालावर लोक नृत्य करतात. एकंदरीत उत्सव वातावरण उत्साही करून टाकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
श्रद्धेने देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुजारी कपाळाला चार बोटे भंडाऱ्याची लावतातच. स्त्री पुरुष अबाल वृद्धांना हा भंडारा लावला जातो. आणि लोकही श्रद्धेने तो कपाळावर लावून घेतात.
जेजुरीचा खंडोबा लाखो भाविकांचे आराध्य दैवत! पुण्यापासून दिड तासाच्या अंतरावर असलेलं जेजुरी हे गाव म्हणजेच खंडोबाचे अत्यंत जागृत स्थान आहे. नवलाख पायरी असलेला गड सोन्याची जेजुरी असं या जेजुरीचं वर्णन केलं आहे त्या जेजुरीत भंडारा उत्सव वर्षातून तीन वेळा साजरा होतो. या भंडारा उत्सवात संपूर्ण गडावर भंडारा उधळला जातो. त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाची छटा पसरते.
अगदी आकाश सुद्धा पिवळे धम्मक होऊन जाते. ही रंग छटा अगदी सोन्यासारखी दिसते म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणतात.
हा भंडारा उधळताना भाविक ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असे गर्जत असतात. मल्हार हे खंडोबाचे अजून एक नाव. मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा त्याने पराभव केला. म्हणून त्याला मल्लारी असेही म्हणतात. भंडारा उत्सव होणारे जे महत्वाचे दिवस आहेत त्यापैकी एक दिवस म्हणजे सोमवती अमावस्या. या भंडारा उत्सवात देवाची पालखी निघते आणि त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक तिष्ठत उभे असतात. पालखीत बसून देव कऱ्हा नदीत स्नानाला जातात. या पालखीत खंडोबा, त्याची पत्नी म्हाळसा यांना बसवलेले असते. जेजुरीच्या मंदिरातून ही पालखी निघते ती थेट कऱ्हा नदीकडे नेली जाते. आणि या पालखीला खांदा देण्याचा मान केवळ रामोशी धनगर समजला आहे.
या पालखी सोहळ्यावेळी केल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे अवघा आसमंत पिवळा जर्द होतो. उंचावरून हे दृश्य अतिशय विहंगम असते. आपल्याकडे लग्नाच्या आदले दिवशी जो हळदी समारंभ असतो तसाच खंडोबा आणि म्हाळसा यांच्या भेटीवेळी भंडारा उधळून केला जातो. बऱ्याच जाणकारांच्या मते खंडोबा हा सूर्याचा वंशज आहे.
हा भंडारा उधळण्याचा सोहळा वर्षातून दोन किंवा तीन वेळा होतो. सोमवती अमावस्या जी सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात त्या अमावस्येला हा सोहळा होतो तर खंडोबाचे नवरात्र झाल्यानंतर चंपाषष्ठीला!
खंडोबा हा ९ व्या शतकात होऊन गेलेला अवतार. याला महादेवाचा अवतार असं मानलं जातं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कितीतरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा हा नवसाला पावणारा देव आहे. त्याच्या दोन पत्नी म्हाळसा आणि बाणाई या पार्वती आणि गंगेचे रूप मानले जाते.
महाराष्ट्र, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेशातील कितीतरी कुटुंबांचा कुलस्वामी असलेला खंडोबा हा मेंढपाळ, धनगर, शेतकरी आणि अनेक अठरापगड भटक्या जातीतील लोकांचेही श्रद्धास्थान आहे. अश्वारूढ असलेल्या खंडोबाची चार भुजाधारी मूर्ती आहे. त्याच्या एका हातात भंडारा पात्र आहे आणि दुसऱ्या हातात अतिशय भव्य तलवार जिला खंडा असं म्हणतात ती आहे. उरलेल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूल आहे. त्यामुळेच त्याच्या आरतीत त्याचे वर्णन खंडामंडीत असे केलेले आहे. शंकराचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत.
त्याला बाजरीचा रोडगा, वांग्याची भाजी आणि पातीच्या कांद्याचा नैवेद्य दाखवला जातो. काही कुटुंबात पुरणपोळीचा नैवेद्य पण असतो. जे मांसाहारी भक्त आहेत ते खंडोबाला बोकड कापून पण नैवेद्य दाखवतात.
खंडोबाला भंडाराच का प्रिय आहे?
याबाबत अशी आख्यायिका आहे, एकदा रात्रीने शंकराकडे आपल्या काळ्या रंगासाठी नाराजी व्यक्त करुन आपला स्वीकार करावा अशी प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी तिला वरदान दिले की, जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार घेईन तेव्हा तुला मस्तकी धारण करेन. त्या वरदानाने रात्र हळदीच्या रुपात पृथ्वीवर जन्मली आणि मणी मल्ल दैत्यांचा संहार केल्यानंतर मार्तंड भैरवाने हळद अर्थात भंडारा मस्तकी धारण केला. सर्व देवतांनी त्यावेळी भंडारा उधळून आनंद व्यक्त केला आणि याचसाठी जेजुरी येथे भंडारा म्हणून हळद उधळली जाते.
नवविवाहित जोडप्याला खंडोबाच्या दर्शनासाठी हमखास आणले जाते. मराठीत त्याला वावरजत्रा असे म्हणतात. ज्या जोडप्याला मूल बाळ होत नसते ते खंडोबाला मूल होण्यासाठी नवस बोलतात. आणि असं विश्वास आहे की खंडोबाला बोललेला नवस कधीही निष्फळ होत नाही. आणि मुले झाल्यानंतर त्या मुलं बाळांना घेऊन सहकुटुंब केलेल्या खंडोबाच्या दर्शनाला कोकरजत्रा असे म्हणतात.
ही जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख पीठ मानले जाते. बाकी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि कर्नाटकात तीन ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, आणि तिथेही भाविक अशाच श्रद्धेने जातात आणि देवाच्या पायी नतमस्तक होतात.
हे सारे पहिले की श्रद्धेला, उपासनेला जात धर्म काहीही नसते, म्हणून तर खंडोबाची अनेक मंदिरे जेजुरीच्या बरोबरीने अनेक ठिकाणी उभी आहेत. या साऱ्या परंपरा पाळत श्रद्धेचे अनंत देव्हारे लोक आजही त्याचे नांव भक्तिभावाने घेतात असेच वाटते.
—
- तारुण्य व आरोग्य टिकवण्याचा रामबाण उपाय आयुर्वेदाने कित्येक शतकांपूर्वीच देऊन ठेवलाय!
- ”ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” : भक्तांच्या आवाहनामागचा इतिहास फार कमी लोकांना माहितीये!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.