इस्लामिक सिक्रेट स्कूल: तालिबानी नराधमांविरुद्ध स्त्रियांनी पुकारलेला “शिक्षण जिहाद”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काही घटना या काळ लोटला, की आपोआप विसरल्या जातात. रशिया-युक्रेनच्या युद्धामध्ये आता जगाला काही रस नाहीये. तसंच, मागच्या वर्षी २०२१ मध्ये साधारणपणे याच महिन्यात तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानवर हल्ला करून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं.
ही घटना जेव्हा प्रत्यक्ष घडत होती, त्याचे विडिओ व्हायरल होत होते तेव्हा संपूर्ण जग हादरलं होतं. अफगाणिस्तानने तालिबानी लोकांच्या शक्तीपुढे हात टेकले आणि आता सर्वकाही तिथे आलबेल सुरू आहे हे मान्य करून या घटनेच्या दाहकतेवर सुद्धा पडदा पडला.
आज अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू ‘रशीद खान’ भारतात येऊन आयपीएल खेळतो, ‘एम्बसी ऑफ अफगाणिस्तान’ पर्यटकांना ‘व्हिजिट विसा’ देत आहेत याचा अर्थ तालिबानी लोक क्रिकेट, पर्यटन यांचा विरोध करत नाहीत असं चित्र सध्या तरी दिसत आहे. ही परिस्थिती अशीच राहील का?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
सांगता येत नाही. पण, काही घटनांमुळे हे स्पष्ट होत आहे की, अफगाणिस्तानच्या लोकांनी अजूनही हार मानलेली नाहीये. त्यांना ही आशा आहे की, एक दिवस ते पुन्हा आपल्या मातृभूमीवर अफगाणी झेंडा फडकवतील आणि तालिबानी लोकांना आपल्या देशातून हुसकावून लावतील.
“कोणी तरी आपला तारणहार येईल आणि परिस्थिती बदलेल” या केवळ आशेवर बसून न राहता अफगाणिस्तानच्या महिलांनी स्वतः ही जबाबदारी स्वीकारली आहे याचं सध्या विशेष कौतुक होत आहे.
अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्तेत असलेल्या ‘इस्लामिक ग्रुप’ने मुलींच्या शिक्षणावर बंदी आणलेली असूनही काबुल मध्ये १४ मुली रोज एकत्र येतात आणि शालेय शिक्षण घेतात ही बातमी सध्या व्हायरल होत आहे.
—
- तालिबानी राज्यातील हे जाचक नियम करणार महिलांच्या आयुष्याचा नरक…
- जगाला वेठीस धरलेल्या ‘तालिबान’च्या जन्माचा इतिहास… एक दाहक वास्तव!
—
या १४ मुली शाळेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोज नवीन मार्गाचा अवलंब करतात आणि आपल्याला कोणीच बघू नये याची ते पूर्ण काळजी घेतात.
महिलांचं शिक्षण, स्वातंत्र्य या गोष्टींच्या नेहमीच विरोधात असलेल्या अफगाणिस्तानमध्ये सध्या सुरू करण्यात आलेल्या ‘अंडरग्राउंड स्कुल’ या देशाच्या परिस्थितीत काय बदल घडवतील ? त्यांच्या सुरू करण्यामागे उद्देश आहे ? हे जाणून घेऊयात.
शालेय शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थीनी एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्यापेक्षा वयाने लहान मुलींसाठी गणिताची शिकवणी सुरू केली ज्याला मुलींनीही प्रतिसाद दिला. इतक्या वर्षात कधीही न घडलेली ही घटना अफगाणिस्तानसाठी महत्वाची मानली जात आहे.
शाळेत असल्याची भावना निर्माण व्हावी म्हणून या मुलींनी फळा आणि निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे बेंच ठेवून सुसज्ज आसन व्यवस्थेची सुद्धा व्यवस्था केली आहे.
“आम्हाला माहीत आहे की, ही गुप्त शाळा सुरू करून आम्ही किती मोठा धोका पत्करला आहे. आम्हाला ही शाळा बंद करण्यासाठी सतत धमकवलं जातं, पण मुलींच्या शिक्षणासाठी कोणताही धोका पत्करण्याची आमची तयारी आहे” अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानमधील या शाळेच्या शिक्षिकेने बीबीसी या वृत्तवाहिनीवर बोलतांना दिली आहे.
अफगाणिस्तानमधील या महिला आपल्या शाळेबद्दल कुठेही जाहिरात करत नाहीत. पण, तरीही मार्च २०२२ मध्ये या शाळेची माहिती तालिबानी लोकांपर्यंत या शाळेची माहिती पोहोचली होती. १४ विद्यार्थीनी शाळेत आल्या असतांना त्यांना सांगण्यात आलं होतं की, “शाळा आजपासून बंद होत आहे.”
दोन महिन्यांपासून तीच परिस्थिती होती. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलगी शाळा बंद झाल्याने दुःखी होती. मीडियाशी बोलतांना त्यांचे अश्रू अनावर होत होते, पण त्या परिस्थितीत देखील एक १५ वर्षांची मुलगी समोर आली आणि तिने अफगाणिस्तानमधील आपल्या मैत्रिणीला हा संदेश पाठवला की, “शूर व्हा. तुम्ही शूर असाल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.”
इतिहासात काय घडलं होतं?
तालिबानी लोकांनी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. तिथे लोकांना चांगला प्रतिसाद देखील मिळतांना दिसत आहे. पण, माध्यमिक शाळा सुरू करण्यावर आणलेली बंदी कधी उठवली जाईल? हा प्रश्न सध्या अफगाणिस्तानच्या लोकांना पडला आहे.
तालिबानी लोकांची अशी इच्छा आहे की, सर्वप्रथम देशात ‘इस्लामी’ वातावरण तयार व्हावं. मुलांना केवळ शिक्षणात प्राधान्य दिलं जावं. हे धोरण असूनही अफगाणिस्तानच्या अंतर्गत आणि सोव्हिएत युनियन सोबत असलेल्या वादामुळे २० वर्ष अफगाणिस्तानची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.
मुलगा असो वा मुलगी कोणालाही शिक्षण मिळत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे. तालिबानी सत्तेत आले आणि त्यांनी ही परिस्थिती अजूनच बिकट केली.
१९९० च्या दशकात जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार होतं तेव्हा देखील मुलींच्या शिक्षणावर सरसकट बंदी आणण्यात आली होती. पण, स्थानिक लोक तेव्हा काहीच करू शकले नव्हते. आजही तीच परिस्थिती उदभवत आहे.
आजच्या अफगाणिस्तानमध्ये शिक्षणमंत्री तर आहे, पण त्याचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहेत. कमालीची गोष्ट म्हणजे मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या या तालिबानी अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मुलींना कतार किंवा पाकिस्तान सारख्या देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवल्याचं समोर आलं आहे.
धार्मिक वळण:
इस्लामिक देशांच्या परंपरेप्रमाणे या प्रकरणाने सुद्धा धार्मिक वळण घेतलं आणि हा प्रश्न मौलवीच्या दरबारी नेण्यात आला. मौलवींनी याबाबत विचार करून मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचा फतवा काढला आहे ज्यामुळे स्थानिक लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
तालिबान सरकारने मुलींच्या शिक्षणाच्या प्रकरणावर तोडगा निघावा यासाठी एक समिती नेमली होती. त्यामधील वरिष्ठ अधिकारी हे मुलींना शिक्षण द्यावं या मताचे देखील होते, पण त्याचवेळी कंदहार शहरात मुलींना शिक्षण देण्याच्या विरोधात अज्ञात लोकांनी निदर्शन केलं आणि परिस्थिती पुन्हा बदलली.
हे बघून तालिबानी सरकारने आपली भूमिका अजूनच कडक केली. मुलींना शिक्षण नाही, बिना बुरखा बाहेर निघण्याची परवानगी नाही अशा जाचक अटी सध्या अफगाणिस्तानमध्ये लावण्यात आल्या आहेत.
सध्याची परिस्थिती:
अफगाणिस्तान मधील महिला अधिकार संघटना या सर्व गोष्टींचा सध्या उघडपणे विरोध करू शकत नाहीत. पण, त्यांनी या सर्व महिला विरोधी वातावरणाचा प्रतिकार शिक्षणाने देण्याचं ठरवलं आहे.
‘सिक्रेट स्कुल’ हे त्यासाठी उचलण्यात आलेलं पहिलं पाऊल असल्याचं त्यांनी बीबीसी या वृत्तवाहिनी सोबत बोलतांना सांगितलं आहे. महिला शाळेचं केवळ ‘नवाझ’ या एका शिक्षकाने समर्थन केल्याची माहिती समोर आली आहे. ‘नवाझ’ हा मुलींना इंग्रजी लिखाण, वाचन आणि कुराण हे विषय शिकवतो.
‘सिक्रेट स्कुल’ ही सध्या रोज दोन तास होत आहे ज्यामध्ये गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय शिकवले जातात. शाळेच्या शिक्षिकेला हे माहीत आहे की, सध्या १४ मुली येणारी या शाळेत येण्यासाठी अजून कित्येक मुली उत्सुक आहेत. पण, काहींना त्यांना पकडल्या जाण्याची भीती सतावत आहे.
“मुलींचा प्रतिसाद वाढला तर शाळेसाठी अजून मोठी जागा आम्ही बघू. मुलींसाठी माध्यमिक शाळा सुरू करण्याची परवानगी कधी मिळेल ते माहीत नाही. पण, तोपर्यंत त्यांच्यासाठी जे शक्य आहे ते मी नक्की करेल. ते माझं कर्तव्य आहे. शिक्षण ही एकच गोष्ट आहे जी अफगाणिस्तानच्या महिलांना या अंधारातून उजेडाकडे नेऊ शकते ” असा विश्वास या शाळेच्या शिक्षिकेने व्यक्त केला आहे.
काबुल विद्यापीठात सुद्धा “केवळ दाढी असलेल्या मुलांना प्रवेश मिळेल” असा नियम लागू करण्यात आल्याचं नुकतंच समोर आलं आहे. तालिबानी अतिरेक्यांनी अश्रफ गनी यांचं सरकार उधळून लावल्यानंतर तिथे महिलांसाठी असलेली परिस्थिती ही किती भयानक झाली आहे याचा वरील माहितीवरून अंदाज येऊ शकतो.
‘युनायटेड नेशन्स’ या जागतिक संघटनेने कित्येकदा तालिबान सरकारला महिला शिक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. पण, तालिबानी लोक अशा कोणत्याही सूचनेला भीक घालत नाहीत असं वारंवार समोर येत आहे.
एकीकडे महिला जागतिक पातळीवर इतकं यश मिळवत आहेत आणि दुसरीकडे अफगाणिस्तानमधील मुली ‘शिक्षण’ या आपल्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहत आहेत हे बघणं खेदजनक आहे.
येत्या काळात अफगाणिस्तानच्या महिला एकत्रित येतील, सुशिक्षित होतील आणि ही देशाला स्थैर्य मिळण्यासाठी, देशाची प्रगती होण्यासाठी आपलं योगदान देतील अशी आशा करूयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.