IBN लोकमत ला खुलं पत्र – “आम्ही मराठीच्या अक्षरालाही धक्का लागू देणार नाही”
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
प्रति,
श्री. महेश म्हात्रे कार्यकारी संपादक,
आयबीएन लोकमत
पत्रास कारण : आयबीएन-लोकमतच्या मराठीबद्दलच्या काही चुकीच्या समजुती.
नमस्कार महेश सर, गेल्या आठवड्यात समाजमाध्यमांवर आयबीएन-लोकमतचे मराठीबद्दलचे अनेक गैरसमज निदर्शनास आले. एस. बी. सारस्वत आणि दीपक चव्हाण या #मराठीबोलाचळवळ च्या कार्यकर्त्यांशी झालेल्या आयबीएन-लोकमतच्या कर्मचाऱ्यांच्या संभाषणाच्या क्लिप्स व्हायरल झाल्या, आयबीएन-लोकमतच्या कर्मचाऱ्यांकडून अगदी कोर्टात खेचूपर्यंत भाषा वापरण्यात आली. आम्ही हिंदी वृत्तवाहिन्या न बघता मराठी वृत्तवाहिन्या जेव्हा बघतो, तेव्हा एक मराठी वृत्तवाहिनी म्हणून आमच्या आयबीएन-लोकमतकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नसतील तर त्याकरता आयबीएन-लोकमतच्या कार्यालयात फोन करून सूचना देणे हा ग्राहक म्हणून आमचा हक्क आहे, आम्ही केवळ आमचा हक्क मागतो आहोत.
आयबीएन-लोकमतचा दर्शक मराठीभाषिक असताना, भाषेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आयबीएन-लोकमतने जबाबदार भूमिका घ्यावी अशी माफक अपेक्षा आहे. आयबीएन-लोकमतच्या कर्मचाऱ्याने सुधारणा करू हे देखील फोनवर म्हटल्याचे दिसून येते आहे, त्याबद्दल सर्वप्रथम आभार पण त्यांनी मांडलेल्या अनेक भाषिक मुद्द्यांचे आम्हाला खंडन करावेच लागेल, कारण आयबीएन-लोकमतप्रमाणे इतरही अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये हे गैरसमज असू शकतात. शिवाय फोन केल्यावर केवळ धक्क्याला लावण्याकरता बरं बरं ठीक आहे, करू सुधारणा हा सूर त्यांच्या बोलण्यात दिसून आल्याने हे पत्र लिहावे लागत आहे.
काही मुद्दे आणि त्याचे खंडन :
१) महाराष्ट्रातली वर्तमानपत्रे :
आयबीएन लोकमतच्या कर्मचाऱ्याचा दावा : महाराष्ट्रातले ९०% मराठी लोक टाईम्स ऑफ इंडिया वाचतात
खंडन : कृपया २०११ ची खालील आकडेवारी बघा.
पहिली पाच वर्तमानपत्रे
– लोकमत : ७५ लाख वाचक
– दै. सकाळ : ४५ लाख वाचक
– पुढारी : २५ लाख वाचक
– टाईम्स ऑफ इंडिया : २० लाख वाचक
– पुण्य नगरी : १७ लाख वाचक
टाईम्सचे २०११ मधले वाचक २० लाख! २०१७ मधले आपण ५ लाख जास्त घेऊ! खरंतर आकडेवारी घसरूदेखील शकते पण आयबीएन-लोकमतच्या समाधानाकरता जास्त घेतली आहे. मग महाराष्ट्रात ९०% लोक टाईम्स ऑफ इंडिया वाचतात हा दावा फोल ठरतो.
२) मराठी शाळा :
आयबीएन लोकमतच्या कर्मचाऱ्याचे दावे : अ) महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद पडल्या. ब) राजकारण्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. क) अगोदर लोकांना सांगा स्वतःच्या मुलांना मराठी माध्यमात घालायला मग आमच्याकडे या.
खंडन :
अ) २०१५ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ कडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ १८% मुलं इंग्रजी शाळेत शिकतात. बाकीची ८२% मुलं मातृभाषेतून शिकतात. (मराठी, हिंदी, गुजराती ई.)
ब) राजकारण्यांची मुले कुठे का शिकेनात, त्याचा वृत्तवाहिनीच्या हिंदी वार्तांकनाशी काय संबंध येतो? वृत्तवाहिनीचे वार्तांकनाचे निकष राजकारण्यांची मुले कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकतात यावरून लावले जातात का?
क) मराठी माणूस मराठी माध्यमात आपल्या मुलांना शिकवत नाही असं आयबीन-लोकमतचा कर्मचारी म्हणतो (जे पूर्ण चुकीचं आहे) तर मग महाराष्ट्रातले किती हिंदीभाषिक स्वतःच्या मुलांना हिंदी माध्यमातून शिकवतात? कशाच्या आनंदात त्यांच्याकरता हिंदी वार्तांकन केले जाते ?
३) महाराष्ट्राचं अस्तित्त्व :
आयबीएन लोकमतच्या कर्मचाऱ्याचा प्रश्न : जगाच्या पाठीवर महाराष्ट्राला काय अस्तित्त्व आहे?
उत्तर : देशाच्या एकूण कराच्या ४०% कर महाराष्ट्र देत असेल तर, अशावेळी महाराष्ट्राचं जगाच्या पाठीवर काय अस्तित्व आहे हे विचारणं करंटेपणा नाही का? महाराष्ट्रातच देशाची आर्थिक राजधानी आहे, हे आयबीन-लोकमतचा कर्मचारी विसरला काय? अजंठा-वेरूळ, एलीफंटा, सह्याद्री घाट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा जागतिक वारसा लाभलेल्या वास्तू महाराष्ट्रात आहेत याचा आयबीन-लोकमतच्या कर्मचाऱ्याला विसर पडला काय?
४) हिंदीबद्दलच्या समजुती :
आयबीएन लोकमतच्या कर्मचाऱ्याचे दावे : अ) देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे. ब) महाराष्ट्रात प्रत्येकाला हिंदी कळतं. क) हिंदी चित्रपट पाहता ना?
खंडन :
अ) आपल्या देशाला राष्ट्रभाषा नाही! हा घ्या पुरावा : महेश सर, तुम्हाला ही वस्तुस्थिती माहिती नाही, असं होऊ शकत नाही.
माहितीच्या अधिकारात काढलेली माहिती : https://goo.gl/cAeSjs
गुजरात उच्चन्यायालयाचा निकाल : https://goo.gl/44Vuan
उद्या स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न आला तर आपली मराठी मुले तोंडावर पडायला नकोत, यासाठी काळजी घ्यायला नको का?
ब) महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण विभागात मराठीच समजत नाही तर हिंदी कुठून समजेल? जिथे मराठी समजत नाही तिथे विशेष प्रयत्न करून सरकारी शाळांमधले शिक्षक तिथल्या मुलांना मराठी शाळांमधून शिकवतात. शिवाय सर्वांना हिंदी समजत असले तरीही लोक मराठी वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, मराठी शाळा, मराठी कार्यक्रम, चित्रपट, या सगळ्यांना भरभरून प्रतिसाद का बरं देत असतील? हिंदी समजत असले तरीही, त्यांचं त्यांच्या मातृभाषेवर प्रचंड प्रेम आहे, आयबीएन-लोकमतने त्यांच्यावर हिंदी लादू नये. हिंदीचा खूप पुळका असेल तर मराठी वृत्तवाहिनी बंद करून आयबीएन-लोकमतने हिंदी वृत्तवाहिनी सुरु करावी!
क) हिंदी चित्रपट पाहिले म्हणजे हिंदी समजतच असते का? इंग्रजी चित्रपट पाहिले म्हणजे इंग्रजी समजतच असते का? आजही इंग्रजी चित्रपटातले विनोद किती जणांना कळतात? सबटायटल्सशिवाय पूर्ण इंग्रजी चित्रपट समजणे शक्य आहे का? इतर प्रांतातले अनेक लोक तेलुगु-तमिळ-मल्याळम चित्रपट बघतात म्हणजे त्यांना ते चित्रपट समजत असतात का? चित्रपट पाहण्याचा निकष केवळ भाषा असत नाही. जुरासिक पार्क, टायटॅनिक सारखे चित्रपट पाहण्यामागे भव्य कलाकृती पहाणे हा उद्देश असतो. पण तेच निकष वृत्तवाहिन्यांना लागू होऊ शकत नाहीत. इथे तुम्ही देत असलेल्या बातम्या सर्वसामान्यांना समजायला हव्यात!
५) संस्कृतबद्दल स्पष्टीकरण आणि इतर :
आयबीएन लोकमतच्या कर्मचाऱ्याचे दावे : अ) मराठीचा जन्म संस्कृतमधून झाला. ब) टेबलला मराठी शब्द आहे का?
खंडन :
अ) महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला अभिजात दर्जा मिळावा म्हणून पाठवलेल्या अहवालात याचे पूर्णपणे खंडन केलेले आहे.
अहवाल वाचा – https://goo.gl/DEVwFf
जोपर्यंत यात नवीन काही संशोधन होऊन अधिकृतपणे नवीन मान्यता मिळत नाहीत, तोपर्यंत आयबीएन-लोकमतने स्वतःचे संशोधन मांडू नये असे आवाहन.
ब) पापड, गुरु, जंगल, असे अनेक शब्द ऑक्सफर्ड शब्द्कोशाने आत्तापर्यंत उचलले आहेत. प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द असलाच पाहिजे असे नाही ना? काही शब्द भाषेमध्ये जसेच्या तसे येऊ शकतात. टेबलला मराठी शब्द आहे का, हा एकच कुजकट प्रश्न, मराठीप्रेमींच्या येणाऱ्या किती पिढ्यांना ऐकावा लागणार आहे, देव जाणे!
६) भाषा आज जिवंत आहे उद्या मरेल, शिवाजीच्या काळातली मराठी आज समजते का?
खंडन :
सर्व संतांचे अभंग तुम्हाला समजतात ना? शेकडो वर्ष झाली, तुकोबांचे, नामदेवांचे अभंग तुम्हाला अजूनही समजतात ना? भाषा कधी मरते? तुम्ही तिचा वापर थांबवला तर! इथे आम्ही मराठीचे पुत्र अजून जिवंत आहोत, आणि आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही मराठीच्या अक्षरालादेखील धक्का लागून देणार नाही, जेव्हा जेव्हा मराठीला डावलले जाते तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या मातृभाषेकरता मैदानात लढायला उतरतोच! गेला पूर्ण आठवडा त्याची झलक बघतच आहात.
असो मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर तुम्ही गांभीर्याने विचार कराल आणि केवळ दबाव म्हणून मराठी भाषेचा सन्मान न ठेवता, आपल्या भाषेचा अभिमान म्हणून, महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे म्हणून आनंदाने अधिकाधिक वार्तांकन मराठीतून कराल अशी सर्व मराठीप्रेमींच्यातर्फे अपेक्षा करतो.
आभार,
सुचिकांत वनारसे
९०५२३४४४७६
Dnyanbhashamarathisanstha@gmail.com
[पत्राचे लेखक ‘ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान’ संस्थेचे अध्यक्ष आहेत.]
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page