' शेतकरी बांधवांच्या ‘डोळ्यातून पाणी’ काढणारा कांदा इतका स्वस्त होण्यामागची कारणं – InMarathi

शेतकरी बांधवांच्या ‘डोळ्यातून पाणी’ काढणारा कांदा इतका स्वस्त होण्यामागची कारणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशभरात नव्हेच तर जगभरात रशिया युक्रेन युद्धामुळे महागाईचा डोंब उसळला असताना आणि शेतीमालाचा उत्पादन खर्च जवळपास दुप्पट झालेला असताना कांदा कवडीमोल का होत आहे, या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधायला हवं.

कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात संपूर्ण देशातून आवक वाढल्याने मागच्या आठवड्याच्या तुलनेत बुधवारी लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात ३०० रुपयांची घसरण झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कांद्याचा बाजार एक हजार रुपयांपर्यंत आल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशातच राज्यात उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी सुरू झाली आहे. कांदा बाजारात येऊ लागताच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.

 

onion inmarathi

 

देशात गरजेपेक्षा अधिक कांद्याचे उत्पादन होते. तरीही केवळ साठवणुकीच्या जुनाट पद्धतीमुळे आणि निर्यात नसल्याने कांदा वाया जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

पुन्हा एकदा शेतकऱ्याची परिस्थिती अशी झाली आहे की, पिकत आहे तर खपत नाही, खपत आहे तर पिकत नाही आणि दोन्ही होतंय तर मालाला भावच मिळत नाही.

राज्यात खरीप, उशिराचा खरीप (रांगडा) आणि उन्हाळी अशा तीन हंगामात कांद्याची लागवड केली जाते. यंदा पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे तीनही हंगामांत कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात सुमारे २५ टक्के वाढ झाली होती. उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी एप्रिलअखेर सुरू होते. परंतु, यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे कांद्याच्या पिकाचे खूपच नुकसान झाले.

 

hot sun

 

कांद्याच्या पाती उन्हामुळे मोडून पडल्या. कांद्याची पुरेशी वाढ झाली नाही. कांदा लहान राहिला, ज्याला ग्रामीण भाषेत गोटी कांदा म्हणतात. त्यात उन्हामुळे जमिनीतील कांदा सडण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना नियोजित वेळेपेक्षा दहा-पंधरा दिवस अगोदरच काढणी करावी लागली.

देशात कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवरील राज्य असून, देशाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा ३० टक्के वाटा आहे. त्याशिवाय देशातील एकूण कांदा उत्पादनात कर्नाटक, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणाचा देखील मोठा वाटा आहे. देशात सरासरी कांद्याचे उत्पादन २५० लाख टनांच्या आसपास होते.

२०१९-२० मध्ये २६० लाख टन, २०२०-२१ मध्ये २७० लाख टन कांदा उत्पादन झाले होते. यंदा देशातील कांदा लागवडीखालील क्षेत्रात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यंदा उत्पादनात सुमारे ४० लाख टनांनी वाढ होऊन एकूण उत्पादन ३०० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे.

 

onion peels inmarathi

 

कांद्याचे भाव पडण्यामागचे कारण –

काढणी केलेल्या कांद्याला उन्हाचा फटका बसल्यामुळे तो कांदा चाळीत आणि गोदामात साठविला तरी तो सडण्याची शक्यता जास्त असल्यामुळे शेतकरी हा कांदा विक्री करण्याला प्राधान्य देत आहेत. पण, बाजारात कांद्याला मागणी नाही, कांदा लहान आहे आणि पुन्हा तो सडण्याची भीती आहे. याचा परिणाम म्हणून कांदा अक्षरश: कवडीमोल झाला आहे. तसेच लोडशेडिंग, वाढते खतांचे भाव या गोष्टी देखील जबाबदार आहेत.

 

onion inmarathi

जैन बांधव कांदा-लसूण का खात नाहीत?

भाजी एक फायदे अनेक! कांद्याच्या पातीचे ११ आरोग्यदायी फायदे तुम्ही वाचायलच हवेत…

मागील महिन्यांत प्रति क्विंटल सुमारे दोन हजार रुपयांच्या घरात असलेल्या कांद्याची थेट ४०० ते १३० रुपयांदरम्यान विक्री होत आहे. सरासरी दर ७००-८०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सोडाच, शेतातील कांदा काढून तो बाजारात विक्रीला घेऊन जाणेही परवडत नाही, अशी अवस्था आहे.

भारतातील निर्यात –

नाफेडच्या २०२०-२१च्या आकडेवारीनुसार भारतात सरासरी २५ लाख टन कांद्याची निर्यात होते. बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका, नेपाळ, इंडोनिशिया आणि अपवादात्मक परिस्थितीत कांदा रशिया, जर्मनीला जातो. केंद्र सरकारने निर्यातीचे नियोजन केले नाही तर कांदा मातीमोल होणार आहे.

कांदा निर्यातीला अनुदान देणे गरजेचे आहे. किमान वाहतूक अनुदान तरी मिळायलाच पाहिजे. त्याशिवाय देशातील कांदा बाहेर जाणार नाही. दरवर्षी देशातून सुमारे २०-२५ लाख टन कांदा निर्यात होतो, त्यात वाढ होऊन ४० लाख टन कांदा निर्यात झाला पाहिजे.

 

onion-inmarathi
indiatoday.com

निर्यातीत सातत्य नसल्याने देशात कांद्याचे भाव वाढले की, आपण निर्यात बंद करतो. त्यामुळे जागतिक बाजारात बेभरवशाचा कांदा निर्यातदार देश, अशीच आपली ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्यासाठी निर्यातीत सातत्य ठेवले पाहिजे. युरोपीय देशांना निर्यात कशी होईल, याचा यंत्रणेने विचार केला पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?