बॉलीवूडचे ‘मूर्खात काढणारे’ चित्रपट, यांचा फोलपणा तुमच्या लक्षात आलाय का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चित्रपट, त्यातले लक्षात राहतील असे संवाद आपल्याही नकळत आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेले असतात. नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आलेली मरगळ झटकायला चित्रपट पाहण्यासारखा दुसरा ‘स्वस्त आणि मस्त’ पर्याय नाही.
आपल्याच आयुष्याचे संदर्भ कधी आपण चित्रपटांमधल्या पात्रांशी जोडू पाहतो तर कधी निव्वळ मनोरंजन व्हावं म्हणून काही सिनेमांचा आनंद लुटतो. काही तासांसाठी तरी आपल्या कुरबुरी, आपली दुःखं विसरतो.
बॉलिवूडच्या चित्रपटांनी आजवर आपल्याला भरभरून आनंद दिलाय. आपल्या आरस्पानी सौंदर्याने मोहिनी घालणाऱ्या नायक- नायिकांबरोबरीनेच एकापेक्षा एक सरस अशी सौंदर्यस्थळं आपल्याला या सिनेमांनी दाखवली. वर्षानुवर्षे मनात रुंजी घालतील अशी गाणी दिली. आपल्याला आशावादी केलं. नवी उमेद दिली. स्वप्नं पहायला शिकवलं.
हे सगळं जरी खरं असलं तरी याच बॉलिवूडने आपल्यावर अगदी नकोश्या अशा सिनेमांचा, गाण्यांचा, अभिनय कशाही खातात हे माहित नसलेल्या तथाकथित कलाकारांचा आणि अनावश्यक सनसनाटी सीन्सचाही भडीमार केलाय.
असेही काही सिनेमे बॉलीवूडने दिलेत ज्यांच्या बाबतीत आता बऱ्याच काळाने विचार केल्यावर या सिनेमांनी आपल्याला अगदी ‘मुर्खात काढलंय’ असं आपल्या लक्षात येतं.
यातल्या काही हिट चित्रपटांनी लॉजिक पारच गुंडाळून ठेवलं होतं हे कित्येक वर्षं आपल्या लक्षातच आलेलं नाही. या सिनेमांची यादी तशी बरीच मोठी होईल. तरी यातले काही सिनेमे पाहू.
१. कभी ख़ुशी कभी गम :
शाहरुख-काजोल सारखी सुपरहिट जोडी म्हटल्यावर आजही अनेकजण कथानकाचा विचारही न करता सिनेमा पहायला तयार होतात. ‘कभी ख़ुशी कभी गम’ हा त्या काळी अगदी गाजलेला सिनेमा.
करण जोहरचा सिनेमा म्हटला की त्यातलं पात्र फॉरेनला गेलंच पाहिजे ही काळ्या दगडावरची रेघ! मग भलेही चित्रपट पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या वास्तवापासून ही गोष्ट कोसो दूर असो. यातलं ‘पू’ नावाचं पात्रं स्वतःच एक विनोद होता.
या सिनेमातही फॉरेन रिटर्न पात्रांना ‘संस्कारी’ टच द्यायला करण जोहरअजिबात विसरलेला नाही. प्रेयसीचे वडील गेल्यावर तिच्याशी लगेचच कोण कसं लग्न करेल असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण चित्रपटाचं नावंच ‘कभी ख़ुशी कभी गम’ असल्यामुळे काहीही शक्य आहे.
२. रेस ३ :
सलमान खानचं इतकं मोठं स्टारडम आहे ते त्याच्या स्टाईलमुळे. बजरंगी भाईजान सारखे काही मोजके सुखद अपवाद वगळल्यास सलमान खान काही आशयघन चित्रपट देण्यासाठी ओळखला जात नाही. पण ‘रेस ३’ या चित्रपटामुळे सलमानच्या चाहत्यांचंतरी मनोरंजन झालं असेल की नाही अशी शंका आहे.
ऍक्शन सिक्वेन्सेसनी खचाखच भरलेला हा चित्रपट अधिकच वीट आणतो तो त्यातल्या अनावश्यक गाण्यांनी.
३. रावडी राठोड :
आजवर तुम्ही ‘रावडी राठोड’ हा चित्रपट पाहिला नसेल आणि अक्षय कुमारसाठी तुम्हाला तो पाहायचा असेल तर उगीच तुमचा वेळ वाया घालवू नका.
या चित्रपटाल्या एका कहाणीत इतक्या उप कहाण्या आहेत की पाहणाऱ्याचा पुरता गोंधळ उडतो. दिग्दर्शकाला यातून काय सांगायचं होतं ते तोच जाणे!
४. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे :
‘डीडीएलजे’ ची हवा इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. आजही हा आपल्यातल्या अनेकांचा आवडता सिनेमा आहे. पण चित्रपटातला ट्रेनचा तो आयकॉनिक सीन आज बऱ्याच वर्षांनी पाहिल्यानंतर एक भलतीच गोष्ट दिसते.
गाडी चुकायला नको म्हणून अगदी शेजारी असलेला गाडीचा दरवाजा सोडून सिमरन राजकडे कशी धावत गेली?
५. कुछ कुछ होता है :
हा सिनेमा आणि लॉजिक यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. या चित्रपटात वडील झालेला राहुल कामावर जाताना पँटच घालायला विसरतो आणि त्याची लेक त्याच्या हे लक्षात आणून देते. एक आईच आपल्या मुलीसाठी बाबांच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीशी त्यांची सेटिंग लाव म्हणून पत्र लिहून ठेवते हे तर थोरच आहे.
सगळ्यात चीड आणणारी गोष्ट म्हणजे काही वर्षांनी अंजलीने केस वाढवल्यावर, ती साडी नेसू लागल्यावर अचानक राहुल तिच्या प्रेमात पडतो आणि बरीच वर्षं ती कुठे याने ज्याला काहीही फरक पडला नाही त्या राहुलच्या डोळ्यांत थेट तिच्या लग्नाच्या दिवशीच अश्रू तरळतात.
त्यांचं हे असामान्य प्रेम बघून भारावून गेलेला सलमान मग स्वतःच काजोलला शाहरुखकडे जायला सांगतो. ‘कुछ कुछ होता है पब्लिक, तुम नहीं समझोगे’.
६. तनु वेड्स मन्नू रिटर्न्स :
कंगनाच्या डबलरोलने यात चांगलीच मजा आणली. या चित्रपटाने आपलं कितीही मनोरंजन केलं असलं तरी ‘इस मुव्ही का और लॉजिक का कोई संबंध नहीं, कृपया जानकारी ले’ असं नमूद करायला बहुदा सिनेमा बनवणारे विसरले असावेत.
मनोरुग्णालयात जोडप्याचं समुपदेशन कोण करतं? आणि जिने आपल्यावर खरंच प्रेम केलंय तिला सोडून जिने आपली वाट लावण्यापलीकडे दुसरं काही केलं नाही तिच्याचकडे चित्रपटाच्या शेवटी परत जाणाऱ्या भोळ्या नायकाला काय म्हणावे?
७. मैने प्यार किया :
सलमान खानला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिलेला पहिलावहिला चित्रपट. हा चित्रपट आला तेव्हा अतिशय हिट ठरला. “एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं बन सकते” असं गहन भाष्य याच चित्रपटाने केलं.
आपल्या जगातले तत्त्वचिंतक यातलं गूढ उकलण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे ‘पॅरॅलल युनिव्हर्स’मध्ये अजूनही यावर विचार सुरू आहे आणि उफ्फ! ते कबुतर.. आजच्या डिजिटल युगातले कपल्स आणि सिंगल्स असे सगळेच चिठ्ठ्या पोहोचवणाऱ्या कबुतराची किमया बघून भारावूनच जातील.
—
- लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या ‘कभी खुशी कभी गम’च्या “वेडेपणाची” २० वर्षं पूर्ण!
- ह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे!
—
८. रब ने बनादी जोडी :
सगळ्या पहिली गोष्ट, पोटभर पाणीपुऱ्या खाल्ल्यावर घरी येऊन लगेच पुन्हा ताटभर जेवण जेवणारा माणूस तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या सुरिंदर साहनी यांना भेटाच.
सारखी दिसणारी माणसं एका जगात असतात हे आपण ऐकलंय, पण तानी पार्टनरने ते इतकं मनावर घेतलं की आपल्या समोर असलेला तंतोतंत आपल्या नवऱ्यासारखाच दिसणारा इसम आपला नवरा आहे हे तिच्या बिचारीच्या लक्षातच येत नाही. मग ती त्याच्या प्रेमात पडते पण शेवटी बंद डोळ्यांसमोर ‘रब’ने आपल्या नवऱ्याचा चेहरा आणल्यामुळे त्याच्याकडे परत जाते.
‘रब’ असे इशारे देत असता तर घटस्फोटच झाले नसते अशी उद्दात्त भावना चित्रपट पाहताना राहून राहून मनात येते.
९. ओम शांती ओम :
‘द अल्केमिस्ट’ मधल्या तत्त्वज्ञानाचा या चित्रपटात फार परिणामकारकपणे वापर केला गेलाय यात शंकाच नाही. यात शाहरुखच्या पात्राचा झालेला पुनर्जन्म, पूर्वजन्मी त्याने केलेलं भाषण त्याला तंतोतंत आठवणं, पात्राच्या पुनर्जन्मात त्याला शांतिप्रियाचं भूत दिसणं, त्या भुताने त्याच्याकडे पाहून शेवटी हसणं.
इतकंच काय, तर केवळ त्या भुताने झुंबराकडे नुसता इशारा केल्यावर ते झुंबर खाली पडून अर्जून रामपालचं पात्रं मरणं या सगळ्या गोष्टींनी आपल्याला भलेही खिळवून ठेवलं असेल. चित्रपटाचा चाहता केलं असेल, पण तार्किकदृष्ट्या पाहिलं तर हे काहीच पटू शकत नाही.
चित्रपटांचा मुख्य हेतू हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा असतो. त्यामुळे वरच्या आणि अशा बऱ्याच चित्रपटांमधल्या बऱ्याच गोष्टी तर्काला धरून नाहीत हे जरी आपल्या लक्षात आलेलं असलं तरी यापुढेही असं होतच राहणार आहे. त्यामुळे वैतागून जाण्यापेक्षा चित्रपटांमधल्या अशा चुकांवरही पोटभर हसूया.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.